तटबंदी

0
86
_kille-vijaydurg_2

तटबंदी (फॉर्टिफिकेशन) म्हणजे शत्रूच्या हल्ल्यापासून आपल्या स्थानांचे संरक्षण व्हावे म्हणून बांधलेली भिंत. आक्रमकांकडून केला जाणारा तोफेच्याे गोळांचा मारा आदी शस्त्रास्त्रांपासून बचाव करणे, शस्त्रास्त्रांच्या हालचालीत व्यत्यय आणणे, समुद्रकिनाऱ्यारून होऊ शकणाऱ्या हल्यालीत पासूनच्याद बचावाची खबरदारी ही तटबंदी बांधण्यानची मुख्यर उद्दिष्टेऱ आहेत. तटबंदीच्या बाहेर चौफेर गोळामारी करता यावी व तटबंदीच्या कोणत्याही ठिकाणाहून शस्त्रास्त्रे सुलभतेने वापरता यावी, असाही त्यामागील उद्देश असतो.

तटबंदीचे स्वरूप अनेक प्रकारचे असू शकते. उदाहरणार्थ, सपाट जमिनीवरील व डोंगरावरील किल्ले, गावासभोवतालच्या कोटभिंती, खंदक, काटेरी कुंपणे इत्यादी कृत्रिम तटबंदीचे प्रकार आणि नद्या, डोंगर व जंगले हे नैसर्गिक तटबंदीचे प्रकार आहेत. आधुनिक काळात महाविध्वंसक शस्त्रास्त्रांच्या माऱ्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी जमिनीच्या पोटात बोगदे वा तळघरे उभारावी लागतात; तथापि अठराव्या शतकाअखेरपर्यंत संरक्षण–व्यवस्थेत जमिनीवरील किल्ल्यांवर भर असे. राजधान्या व दळणवळणाची मोक्याची स्थळे पक्क्या तटबंद्यांनी सुरक्षित केली जात. त्यांस स्थानविशिष्ट तटबंदी (पॉइंट फॉर्टिफिकेशन) म्हटले जाते. तथापि व्यापक क्षेत्ररक्षणास (एरिक डिफेन्स) उपरोल्लेखत तटबंदी–प्रकार योग्य नव्हते. एकोणिसाव्या शतकापासून वैज्ञानिक–तांत्रिक प्रगती झपाट्याने होऊ लागली, त्यामुळे मोठमोठ्या सैन्यांच्या व शस्त्रास्त्रांच्या हालचाली त्वरेने करणे शक्य झाले. म्हणून तटबंदीच्या रचनेतही बदल करणे क्रमप्राप्त ठरले. आधुनिक काळातील जनरल ब्रिऑलमाँत, ग्रुसाँ वगैरे सैनिक वास्तुशिल्पकार प्रसिद्ध आहेत. तटबंदीच्या इतिहासावरून काही प्रमाणात सामाजिक, राजकीय, शास्त्रीय आणि युद्धतंत्रीय बदल कळू शकतात.

वैदिक वाङ्‌मय, पुराणे, प्राचीन प्रवासवर्णने, धार्मिक साहित्य आणि वास्तुशिल्पासंबंधीचे ग्रंथ यांमधून तटबंदीची माहिती विखुरलेली आहे. अर्थशास्त्र, युक्तिकल्पतरु, मानसोल्लास इत्यादी प्राचीन ग्रंथांत तटबंदीविषयी मार्गदर्शन केलेले आढळते. साधारणपणे सैन्यसंचालन, शासनसुविधा व नागरी वस्ती यांच्या दृष्टीने तटबंदी केली जाते. पुरुषपुर (आधुनिक पेशावर), मुलतान, इंद्रप्रस्थ, पाटलिपुत्र, कनौज, शिवनेरी (जुन्नर) इत्यादी ठिकाणची प्राचीन तटबंदी प्रसिद्ध आहे. जरासंधाची राजधानी राजगृह (राजगीर/गिरिव्रज) हिच्या रक्षणासाठी टेकड्या, दोन कोट, बुरुज अशी तटबंदी होती; तर पाटलिपुत्राची लाकडी कृत्रिम तटबंदी गंगा व पुनपुन नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहांना पूरक होती. नगराच्या अंतर्भागात किंवा एका टोकाला अथवा नगरापासून दूर, पण नगरावर लक्ष राहील अशा प्रकारे तटबंदी व दुर्ग बांधले जात. सोपारा–पैठण राजमार्गावरील शिवनेरी–जुन्नर येथील किंवा श्रीरंगपट्टण येथील तटबंदी त्या प्रकारची आढळते. गंधार (अफगाणिस्तान) व वायव्य हिंदुस्थानातील डोंगरी दुर्गांची माहिती ग्रीक इतिहासकार ॲरियन (इसवी सन पूर्व चौथे शतक) यांनी दिली आहे.

मुस्लिम–आक्रमणपूर्व काळातील देवगिरी (दौलताबाद) हा एकच दुर्ग असा आहे, की त्यामुळे त्या काळातील तटबंदीची कल्पना करता येते. बहमनी राजवटीत व तदनंतर देवगिरीत किरकोळ बदल झाले; परंतु तेथील हिंदू पद्धतीचे सैनिकी वास्तुशिल्प अद्वितीय आहे. एकापेक्षा अधिक तट–कोट, बालेकिल्ला, पाणीपुरवठ्याची सोय, गुप्तवाटा, खंदकात पाणी सोडण्याची आणि त्याची पातळी नियंत्रित करण्याची व्यवस्था यांमुळे देवगिरीची तटबंदी जवळजवळ अभेद्य ठरली.

मुसलमानांनी भारतातील पूर्वकालीन तटबंदीत बदल केले. तुर्की, इराणी व अफगाणी वास्तुशैलीतील स्वतंत्र तटबंद्या हिंदू नगरांपासून दूर आढळतात. लाहोर, तुघलकाबाद, शहाजहानाबाद (दिल्ली), फतेपुर सिक्री, आग्रा, गुलबर्गा इत्यादी ठिकाणच्या तटबंद्या ही मुस्लिम काळातील उदाहरणे होत.

राज्यकर्त्यांचे वैभव व त्यांचे सामर्थ्य ठळकपणे दिसावेत, या हेतूने प्राचीन काळी तटबंदी अलंकृत केली जाई. प्रचंड तट, बुरुज, दरवाजे व त्यांवरील नक्षीकाम, कमानी, पडद्या (पॅरापेट), जंगी, कंजूर, कंगोरे, गणेशपट्टी (लिंटेल) यांचे आलंकारिक स्वरूप डोळ्यांत भरण्यासारखे असे. उपलब्ध साधनसामग्री, सामाजिक–राजकीय परिस्थिती व तुर्की, इराणी वगैरे शिल्पकल्पना यांमुळे कलाकुसरीत वैचित्र्य निर्माण होई. उदाहरणार्थ, गुलबर्गा येथील तटबंदीच्या शिल्पात हिंदू–इराणी शिल्पाचे मिश्रण झालेले दिसते.

पूर्वीच्या तटाची भिंत सतरा मीटरपर्यंत जाड तटबंदीची उंची जाडीच्या प्रमाणात आढळते. तटमेढीत कंगोरे, जंगी व धारे असल्यामुळे भिंत चढणाऱ्यावर शस्त्रास्त्रांचा मारा करता येई. तोफा आल्यानंतर मेढीत खिडक्या ठेवून त्यांतून तोफा डागत. तटाभोवती पहिला पाण्याने भरलेला, दुसरा काटेरी झाडांनी आच्छादलेला व तिसरा म्हणजे सर्वांत बाहेरचा शुष्क अशा तीन परिखा म्हणजे खंदक असत. शिवाय, आजुबाजूचा मुलूख उजाड किंवा जंगलयुक्त ठेवण्याची पद्धत होती.

प्रवेशद्वार : भारतीय तटबंदीची रचना जगद्‌विख्यात आहे. कित्येक तटबंद्यांना एकमेकांशी काटकोन करणारे सात सात दरवाजे होते. दोन दरवाज्यांमधील मार्ग चिंचोळा व नागमोडी असे. मार्गावर चौक्या व रक्षणबुरुज (बारबिकॉन) ठेवल्यामुळे आत घुसलेल्या शत्रूवर मारा करता येत असे. दरवाज्याच्या डोक्यावर सज्जे ठेवून, त्याच्या तळात भोके ठेवत. त्यांतून शत्रूंवर डांबर, उकळते पाणी व शिसे शिंपडणे शक्य होई. शिवाय, दरवाज्याला आग लावली गेल्यास ती विझवता येई. दरवाज्यावर लोखंडी धारदार सुळे ठोकत. सुळ्यांमुळे हत्तींची टक्कर कमी पडे. भारतीय तटबंद्यांना पॅलेस्टाइन व युरोपीय पद्धतीप्रमाणे तटापासून पुढे उतार (ग्लॅसिस) ठेवत नसत; परंतु गिरिदुर्गाच्या पहिल्या प्रवेशद्वाराकडे जाताना तट उजव्या बाजूला, तर कडा डाव्या बाजूला असा मार्ग ठेवल्यामुळे शत्रूला ढालींचा उपयोग फारसा होत नसे.

पाणीपुरवठा : सर्व तटबंद्यांत पाणीपुरवठा उत्तम होता. फतेपूर सिक्रीत इराणी रहाटगाडग्यांच्या व नळांच्या साहाय्याने पाणी खेळवले जाई. दक्षिण भारतातील गुलबर्गा, बीदर, जिंजी, नळदुर्ग, सोलापूर येथील तटबंद्या सैनिकी वास्तुशिल्पाच्या दृष्टीने आदर्श आहेत. इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्या आगमनानंतर मात्र त्यांनी युरोपीय सैनिकी वास्तुशिल्पानुसार कोलकाता (फोर्ट विल्यम), मद्रास, कडलोर, पाँडिचेरी व वसई आणि आग्वाद (गोवा) येथे दुर्ग बांधले. त्यांपैकी फोर्ट विल्यम, आग्वाद व वसई हे किल्ले नमुनेदार आहेत. इंग्रजांनी त्यांचे राज्य स्थापल्यानंतर मात्र नवीन तटबंद्या (वायव्य भारत सोडून) बांधणे बंद केले. भरतपूर व दीग येथील जाट राजांचे किल्लेही भक्कम स्वरूपाचे असल्यामुळे एकोणिसाव्या शतकात इंग्रजांना ते काबीज करणे कठीण झाले होते.

ज्या स्थानांचे रक्षण करायचे त्याच्या भवती दुर्गपुंजांची स्थायी तटबंदी बांधण्याची प्रथा १८५० नंतर सुरू झाली. दोन दुर्गांमधील शत्रूवर तोफा डागता येत असल्यामुळे शत्रूला त्यात घुसणे किंवा हालचाल करणे कठीण होई. यासाठी खंदकांचाही उपयोग करण्यात येई. उदाहरणार्थ, बंदराच्या भोवती चौदा किल्ल्यांचा मिळून दुर्गपुंज बांधण्यात आला होता. त्या दुर्गपुंजांचा उत्तर व दक्षिण भूभाग जलमय करण्याची व्यवस्था होती. पहिल्या जागतिक महायुद्धात जर्मनांच्या अजस्र तटभेदी तोफांनी दुर्गपुंजांचा विध्वंस केला. त्यामुळे दुर्गपुंज व स्थायी तटबंदी यांची उपयुक्ततता संपल्याचे ध्यानी आले. त्याऐवजी शेकडो किलोमटर लांबीचे खंदक, मशिनगन मोर्चे व खंदकांच्या पुढे काटेरी तारांची व सुरुंगांची तटबंदी अशा तटबंद्यांचा वापर सुरू झाला.

साधारण अठराव्या शतकांनंतर तटबंदीचे संरक्षणासाठी अपुरेपण जाणवू लागले. भिंत बांधून वास्तूचे रक्षण करणे आधुनिक युद्धतंत्रात अशक्य होऊ लागले. तोफगोळ्यांचे सामर्थ्य कसल्याही प्रकारच्या भिंती भेदू लागले, रणगाड्यांचे आक्रमण भिंती अडवू शकणे अवघड होते आणि विमाने तर आकाशातून बंदिस्त ठिकाणावर बाँबहल्ले करू शकत. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या अखेरीस लढाऊ विमाने, बाँबफेकी त्सेपेलीन वायुजहाजे, विषारी वायू व रणगाडा या चार नवीन शस्त्रादिकांचा उदय झाला. परिणामतः तटबंद्यांच्या वास्तुशिल्पात बदल करणेही क्रमप्राप्त ठरले. १९१९ ते १९३९ या काळात खंदक युद्धतंत्राचा अस्त सर्वत्र होत गेला. स्थायी तटबंदीच्या निर्मितीकडे दुर्लक्ष झाले. जर्मनी, फ्रान्स व रशिया येथे चलनशील युद्धतंत्रावर आणि त्यास साजेसा रणगाडा, विमाने व स्वयंचलित तोफा इत्यादींवर भर देण्यात आला. याशिवाय प्रदेश उजाड करणे, विस्तृत भूप्रदेशाचा हालचालींसाठी लाभ घेणे, शत्रूच्या पिछाडीस गनिमी युद्धतंत्र वापरणे आणि एकापाठोपाठ व जागोजागी रणक्षेत्रीय तसेच अस्थायी तटबंद्या उभ्या करणे, अशी रशियाची संरक्षणव्यवस्था होती. फ्रेंचांनी मात्र सरहद्दीवर स्थायी स्वरूपाची जमिनीच्या पोटात ‘मॅजिनो लाइन’ नावाची अखंड तटबंदी बांधण्यास सुरुवात केली. या तटबंदीत रणगाड्यांना, बाँबहल्ल्यांना व गोळामारीला दाद न देणारे काँक्रीटी व पोलादी चिलखतांचे किल्ले गुंफण्यात आले. या शिवाय जमिनीच्या पोटातच बराकी, दारूगोळा व रसदपुरवठा–भांडारे, रस्ते–बोगदे वगैरेही बांधले. तीन लक्ष सैनिक त्यात राहू शकतील अशी ती व्यवस्था होती; या मॅजिनो लाइनला डावलून शत्रूला फ्रान्समध्ये घुसणे अशक्य होईल अशी फ्रेंचांची कल्पना होती; परंतु १९४० पर्यंत बांधणी पूर्ण झाली नाही. आर्देन या फ्रान्सच्या जर्मनीकडील सरहद्दीवरील जंगलांच्या बाजूकडे तर तटबंदीच नव्हती. जर्मनीने याच दुर्बलतेचा लाभ घेऊन हल्ला केला व त्यात फ्रान्सचा पाडाव झाला. जर्मनीने या हल्ल्यात छत्रीधारी सैन्याचा उपयोग करून किल्ल्यावर किंवा मॅजिनो लाइनच्या पिछाडीस सैन्य उतरवून तटबंदी कुचकामी केली. परिणामतः रणगाडे व विमानहल्ल्याचा प्रभाव पडल्यामुळे पुढे रणक्षेत्रीय तटबंद्यांवरच भर देण्यात आला. रणक्षेत्रात आघाडीपासून पिछाडीपर्यंत सुमारे ५० किलोमीटर अंतरावर अलग अलग; परंतु एकमेकांस सहाय्यक होतील अशा मोर्चांची व बलस्थानांची (स्ट्राँग पॉइंट्स) व गुटिकास्थानांची (पील बॉक्सेस) जाळी विणण्यात आली. अशा ठिकाणी रणगाडा, विमानभेदी आणि साध्या तोफा ठेवून सैनिकांचे खंदक ठेवत. मोर्चांभोवती काटेरी तारांची व सुरुंगांची कुंपणे करत व आकाशातून होणाऱ्या माऱ्यापासून बचाव होईल अशी छत्रेदेखील असत. दुसऱ्या महायुद्धात अशा तऱ्हेचे जपानी बंकर मोर्चे काबीज करण्यास फार मोल द्यावे लागले. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याचे गुटिकामोर्चे फोडण्यात मात्र भारतीय सैनिकांनी कौतुकास्पद यश मिळवले.

भर समुद्रावर लढाया करून समुद्रावर किंवा समुद्राच्या पोटात शत्रूची हालचाल बंद पाडणे हा संरक्षणाचा क्रियाशील पवित्रा असतो. याबरोबरच सागरी किनारा व बंदरगोद्यांच्या संरक्षणासाठी तोफांचे मोर्चे व इतर साधनांनी तटबंद्या स्थापणे, ही व्यवस्था करावी लागते. किनाऱ्यावर किंवा सागरी किल्ले व तोफ मोर्चे यांवर शत्रूची गोळामारी होऊ शकणार नाही, या दृष्टीने किनारा तटबंदी बांधावी लागते. कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याजवळ शत्रूच्याच जहजांना नांगर टाकून गोळामार करता येणार नाही याची काळजी घेण्यात येते. शत्रूच्या जहाजांना आपल्या तोफांच्या गोळामारी क्षेत्रात तर आणावयाचे; पण त्याचे तोफगोळे मात्र आपल्या तटबंदीवर पडू नयेत, हे तत्त्व सागरी तटबंदीत महत्त्वाचे असते. हल्ली जरी रॉकेट किंवा प्रक्षेपणास्त्रे वापरली जातात, तरी हे मूलतत्त्व लक्षात ठेवूनच संरक्षणव्यवस्था करावी लागते. तोफा आणि अस्त्रांचे मोर्चे अलग अलग असून ते काँक्रिट–पोलादी कवचधारी असतात. बंदराच्या किंवा किनाऱ्यावरील उंच जागांवर तटबंदीमोर्चे बांधतात. त्यांना मायावरणाची जरूरी असते. बंदराच्या प्रवेशमार्गावर मोर्चे ठेवावे लागतात. बंदरप्रवेश मार्गात पोलादी जाळी व सुरुंग पेरणी केली जाते. शत्रुसैनिक व जमिनीवर उतरणारे विमान यास किनाऱ्यावर पाय ठेवणे धोक्याचे व्हावे, या हेतूने किनारी तटबंदी उभारली जाते. यासाठी भरती–ओहोटी लक्षात घेऊन जलांतर्गत जलरेषेपर्यंत लोखंडी तुळ्यांची उभी–आडवी जाळी, टोकदार खांब आणि सुरुंग पेरतात. अडथळे काढता येऊ नयेत म्हणून त्यांवर किनाऱ्यावरून गोळामारी करण्याची व्यवस्था असते. याशिवाय, किनाऱ्यावर व किनाऱ्याच्या पिछाडीस तोफांची आणि मशिनगनची बलस्थाने व गुटिकामोर्चे असतात.

अण्वीय अस्त्रांच्या अकल्पनीय विध्वंसक माऱ्यापासून संरक्षण कसे करावे, ही फार मोठी समस्या आहे. या अस्त्रांमुळे विस्तृत भूभागाचा नाश करणे कठीण नाही. किरणोत्सर्गामुळे मानवहानीही प्रचंड होऊ शकते. नागरिकांच्या संरक्षणासाठी छत्रस्थाने, बोगदे, मॅजिनो लाइनसारखी तटबंदी यांची गरज आहेच. ज्या ठिकाणी अण्वीय स्फोट होणार असेल त्या ठिकाणी कोणीही नसणे, हाच एक मार्ग यावर दिसतो. लोकवस्तींची, उद्योगधंद्यांची किंवा इतर महत्त्वाच्या केंद्रांची आणि स्थानांची पांगापांग करणे, हाही एक तोडगा यावर काढता येईल.(मूळ माहिती मराठी विश्ववकोश. माहितीसाठी वापरलेले संदर्भ 1. Chakravarti, P. C. Art of War in Ancient India, Delhi, 1972. 2. Chand।er, D. Art of Warfare on ।and, London, 1974. 3. Hogg, J. Fortress, London.)

 

About Post Author