Home वैभव इतिहास डोणे गावचा राणे-इनामदार वाडा

डोणे गावचा राणे-इनामदार वाडा

8
carasole

मुंबईपुणे महामार्गावरील शीळ फाट्याहून कर्जत मार्गावरून कल्याणला जाणाऱ्या रस्त्यावर कर्जतच्या उत्तरेला दीड किलोमीटर अंतरावर राणे-इनामदारांचा भव्य वाडा पाहण्यास मिळतो. एकर/दीड एकर जागेवर विस्तारलेला तो वाडा म्हणजे अडीचशे वर्षांपूर्वीच्या वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. वाडा उल्हास नदीच्या काठावर उभारलेला आहे. वाड्याचा आकार ६०१×९०१ असा आयताकृती आहे. वाडा दुमजली असून, चारपाकी कौलारू छपराने आच्छादला आहे. त्या सुबक रचनेच्या छपरामुळे जाणवणारा वाड्याचा रुबाब मराठा वीराच्या बेडर आणि निधड्या वृत्तीच्या थाटाला साजेसा आहे. वाड्याला पूर्वी गोल खापरी नळीची कौले होती. आता त्यावर बंगलोरी कौले पूर्वीचा थाट सांभाळून चकाकताना दिसतात.

वाड्याच्या प्रशस्त अंगणातून प्रवेश केल्यानंतर भक्कम सागवानी लाकडांचे रेखीव खांब, तुळया-लगड-वासे यांचा सुबक साचेबंद सांगाडा आणि काही तुळयांच्या अग्रभागी कोरलेली चित्रे नजरेस पडतात. ती जुनी वास्तू पाहिल्यानंतर पुढील एखादी अशी काव्यपंक्ती सहज मुखातून बाहेर पडते.

हा भक्कम वाडा ! नव्हे दिसावा महापुरुषच खडा |
जणू भासतो उभा ठाकला ‘रण’वीर रांगडा |
ऊन, पाऊस किती बरसला, नाही त्याला तडा |
डौल डौलतो डोणीमधला हा भव्य भव्य वाडा ||

पडवीतून ओसरीवर बसले आणि भिंतीवरून सहज नजर फिरवली तर वाड्याचे सुरेख रेखीव कोनाडे, त्यांची नक्षीदार बांधणी, तुळतुळीतपणा नजरेत भरतात. वाड्याच्या भिंतींवर सिमेंटच्या प्लॅस्टरऐवजी घोटीव मुलायम चुन्याचे प्लॅस्टर पाहून आश्चर्य वाटते. त्यावर हात फिरवला तर त्याचा तुळतुळीतपणा हाताला सुखावून जातो.

वाड्याच्या सुंदर रेखीव तुळया 5×5×50 आकाराच्या खांबांवर व्यवस्थित आखीव-रेखीव तक्तपोशीने आवळलेल्या आहेत. त्या वरच्या मजल्याचे ओझे धीमेपणाने, रूबाबदारपणाने सांभाळत आहेत.

वाड्याच्या आतल्या दालनात प्रवेश करताना दिसणारी चौकट पाहण्याजोगी आहे. त्या चौकटीवर वरपासून पायापर्यंत (उंबऱ्यापर्यंत) असलेले, सालंकृत रमणीच वाटावी असे नक्षीकाम चकीत करणारे आहे. चौकट ओलांडून आत गेल्यावर दार बंद केल्यास जुन्या पद्धतीचा आडणा उत्तम स्थितीत वापरात असल्याचे दिसते.

वाड्याला भिंतीची चौफेर तटबंदी आहे. पूर्वी त्याला बांबूंचे कुंपण होते. त्याला वर्ड असे म्हणत. वाड्याच्या बाजूस एकेकाळी गोकुळाप्रमाणे शे-दोनशे दुभत्या गाई-त्यांची वासरे आणि दुधाने भरलेली रांजणं होती अशी आठवण वाड्याचे सांप्रत मालक वामनराव राणे-इनामदार सांगतात. तसेच, वाड्यात एका बाजूला शेतीच्या अवजारांचीही रेलचेल होती.

मधल्या दालनात पूर्वेकडे देवघर आहे. खोली स्वतंत्र, सुरेख आणि पावित्र्य जपलेली आहे. तेथील लहानशा देव्हाऱ्यात सोन्याच्या मूर्ती (टाक) आहेत. ते ध्यानमंदिर राणे यांच्या वैभवाला शोभते. तेथे जाणाऱ्याने क्षणभर स्तब्ध व्हावे, असे त्या मंदिराचे दृश्य आहे.

वाड्याच्या वरच्या मजल्यावर प्रशस्त दालने आहेत. त्यातील एक दालन राणे-इनामदारांचा ‘दरबार हॉल’ या नावाने प्रसिद्ध आहे. एकेकाळी त्या घराण्यातील महापुरुष तेथे बसून इनामदारीचा कारभार करत असावेत. तळमजल्याप्रमाणेच तेथेही सारे आखीवरेखीव आणि स्वच्छ आहे. ती जागा पवित्र आणि निर्मळ भासते. त्या शेजारच्या एका दालनातील कोपऱ्यात शस्त्रे ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाटवजा बंदिस्त जागा आहे. ती जागा त्या वाड्याचे वैशिष्ट्य आहे. सध्या राणे यांच्याकडे जुनी बंदुक आणि तलवार पाहण्यास मिळते. तलवारीवर चांदीच्या वर्खाचे नक्षीकाम केल्याच्या खुणा दिसतात.

वाड्यात स्वतंत्र पाणीपुरवठ्यासाठी उत्तम दगडी बांधकामातील बारव आहे. ती आजही पाणी देते.

वाड्याच्या अंगणात उंबर, वड आणि पिंपळ यांचे एकत्र असलेले झाड पाहून आश्चर्य वाटते. तो पूर्वी प्रचंड मोठा वृक्ष होता. त्याचे अवशेष तेथे पाहण्यास मिळतात. त्या तिन्ही वृक्षांची ती एकत्रित गुंफण ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवाचे प्रतीक असल्याचे भासते. ती गुंफण त्या वास्तूला तिच्या निर्मितीच्या आधीपासून आशीर्वाद देत आहे असा भाव प्रकटतो.

वाड्याच्या मागील व पुढील अंगणात आंघोळीसाठी पिंडीच्या आकाराची बैठक आहे. वाड्यात छोट्या व मोठ्या आकाराची जाती आणि इतरही जुन्या वस्तू पाहण्यास मिळतात.

राणे यांच्या वाड्याला मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास संस्कृतीचा स्पर्श आहे. म्हणूनच त्या वास्तूचा वास्तुरंग गहिरा असल्याचा भासतो.

मराठ्यांच्या इतिहासातील वसईचा दिग्विजय ही महत्त्वाची विजयश्री मानली जाते. वसई मोहिमेच्या महासंग्रमात धारातिर्थी पडलेल्या राजबाराव यांच्या उत्तराधिकाऱ्यांना चिमाजीअप्पा यांच्‍याकडून डोणे हे गाव इनाम मिळाले. त्यानंतर बुरुडीवरून राणे घराणे डोणे येथे स्थलांतरीत झाले. त्यांनी डोणे येथे आल्यावर गावानजीक आमराईत वाडा बांधून वास्तव्य केले. त्या वाड्याचे अवशेष पाहण्यास मिळतात. प्रस्तुत लेखात वर्णन केलेला वाडा नंतर बांधण्यात आला. त्या वाड्यावर पुढील काळात अनेक कर्तृत्ववान माणसे जन्मास आली.

बाबाजी चंद्रराव राणे ऊर्फ बाबाजीराव हे रसिक मनाचे आणि सत्शील वृत्तीचे गृहस्थ होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भूमिगतांना वेळोवेळी मदत केल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या बागेत ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या छावण्या असतानादेखील त्यांनी स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा भाई कोतवाल यांना वाड्यात आश्रय दिला होता. ते असहकार आंदोलनात जवळील रेल्वे स्थानकात स्वातंत्र्य सैनिकांना मदत करत. त्यांनी त्यांच्या त्या कार्याने ते वसईच्या मोहिमेत हुतात्मा झालेले राजबाराव यांचे वंशज आहेत हे सिद्ध केले.

डोणे गावात दामले यांची नाटक कंपनी ‘संगीत हरिश्चंद्र’, ‘संगीत तुकाराम’, ‘संगीत पुंडलिक’ अशी संगीत नाटके करत असे. गावातील हनुमान जयंतीच्या उत्सवात दामले नाटक कंपनीची ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत स्वयंवर’ यांसारखी नाटके होत असत. एकदा बाबाजीरावांनी ती संपूर्ण नाटक कंपनीच खरेदी केली व स्वत: चालवली. वाड्याचे वर्तमान मालक वामनराव राणे-इनामदार वाड्याच्या माडीवर असलेल्या त्या सामानाच्या भरलेल्या पेट्या दाखवतात. त्यात पडदे, पोशाख, अंगरखे, तुमान इत्यादी गोष्टी; तसेच, खणखणीत वाजणारी नाटकाची घंटाही पाहण्यास मिळते. बाबाजीराव यांच्या नाटकाचे पडदे दाजी भाटवडेकर आणि प्रभाकर पणशीकर यांनी अनेकदा त्यांच्या नाटकांसाठी वापरले असल्याची आठवण वामनराव सांगतात. बाबाजी चंद्रराव हे सहिष्णूवृत्तीचे दिलदार असल्यामुळे राजकारणात तत्कालीन काँग्रेस पक्षात त्यांना मान होता. अलाहाबाद काँग्रेस अधिवेशनात त्यांनी भाग घेतला होता. ऑनररी मॅजिस्ट्रेट म्हणून कोर्टकामात त्यांची मदत घेतली जात असे.

राणे घराण्यात हरीभक्त परायण (ह.भ.प.) अनंतराव यशवंतराव राणे हे संतप्रवृत्तीचे पुरुष होऊन गेले. त्‍यांनी त्या काळी बदलापूर येथे शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्यासाठी बरीच मदत केली होती. त्यांना गगनगिरी महाराज, पद्मनाभ शास्त्री, ह.भ.प. सावळारामबाबा महाराज, ह.भ.प. महानंदस्वामी, ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, ह.भ.प. त्र्यंबक महाराज शिंदे या ज्येष्ठ संतांचा सहवास लाभला. अनंतराव राणे यांच्या आध्यात्मिक जीवनाला त्या संतांकडून मार्गदर्शन झाले. त्यांच्या मनामध्ये दादामहाराज राणे यांचा वारसा चालवण्याची ईर्षा निर्माण झाली. त्यांनी किर्तने, प्रवचने या माध्यमातून भागवत धर्माचा प्रसार करण्याचे व्रत हाती घेतले आणि ते संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या वाणीचे खऱ्या अर्थाने उपासक झाले. ह.भ.प. अनंतराव राणे उपरोक्त वास्तूत हरिकिर्तनात रमले.

वामनराव राणे (वाड्याचे मालक) – ८८०५५३५९७७

 

– डॉ. सदाशिव शिवदे
(छायाचित्रे – सदाशिव शिवदे)

About Post Author

Previous articleवसई मोहिमेचा दिग्विजय
Next articleकरण चाफेकर – जिद्दी जिनिअस!
डॉ. सदाशिव सखाराम शिवदे हे 'अखिल महाराष्‍ट्र इतिहास परिषदे'चे अध्‍यक्ष होते. त्‍यांनी पशुवैद्यक पदविका (D.Vet) मिळवली होती. त्यांनी मराठी आणि इतिहास या विषयांत एम.ए.ची पदवी तर. इतिहास-संस्‍कृत या विषयांत पी.एच.डी. मिळवली होती. त्‍यांनी संभाजीराजे, महाराणी येसूबाई, कान्‍होजी आंग्रे, हंबीरराव मोहिते, शिवाजी महाराजांच्‍या पत्‍नी सईबाई, अशा अनेक ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वांवर संशोधन ग्रंथ लिहिले. त्‍यांची आतापर्यंत संशोधन ग्रंथ, शोधनिबंध, अनुवादित, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह या प्रकारांत एकूण अठरा पुस्‍तके प्रकाशित आहेत. त्‍यांच्‍या 'माझी गुरं-माझी माणसं' या ग्रामीण कथासंग्रहातील कथांचे आकाशवाणीवर वाचन झाले. शिवदे यांना त्‍यांच्‍या लेखनाकरता अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते. शिवदे यांचे ७ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले. लेखकाचा दूरध्वनी 9890834410

8 COMMENTS

  1. junya parampara vastu chi
    junya parampara vastu chi Uttam prakre dekhbal karun vadiloparajit vastunchi japavnuk keli asun tyanchi athavan aani khuna hay ajkalchya pidhila pahnyas Millen far Kathin ahe. Te ya lekhamule Shree Vamanrao Rane ani tyncha parivarane japlyabadal tynche hi abhinandan ani Think Maharashtrache abhar!

  2. puratan kalatil vastunchi
    puratan kalatil vastunchi japavnuk chan pathine keli asun asha vastly pahnyas Milne atacha amcha pidhis far kathin. Juna inamdar vada, tyatil vastunchya khuna japvyla baddal Shree Vamanrao Rane ani tynchya Parivars shubhecha! Tasech think Maharashtra che an bar.

  3. सुरेख वर्णन.. वास्तू आणि तिचा
    सुरेख वर्णन.. वास्तू आणि तिचा इतिहास साक्षात डोळ्यासमोर उभा राहिला. उद्बोधक माहिती मिळाली. धन्यवाद.

  4. आपल्या कुंटुबाने जी जपणूक
    आपल्या कुंटुबाने जी जपणूक केली आहे त्यास आमच्या जवळचे शब्दही अपुरे पडतील. भावी पिढीनेही सदर वास्तूचे जतन करण्‍यासाठी परपंरा
    जपावी असे मनापासून वाटते. धन्यवाद! ॐ हरीॐ

  5. राणे घराणे आणि इतिहास वाचून…
    राणे घराणे आणि इतिहास वाचून सार्थ अभिमान वाटतो. जय महाराष्ट्र.

Comments are closed.

Exit mobile version