डॉ. संपतराव काळे – सायकलवारीतील प्राचार्य

6
45
carasole

सायकल हे वाहन एकेकाळी शहरांतील सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन उपयोगात होते. स्वयंचलित दुचाकी, चारचाकी वाहने आल्यावर सायकलकडे दुर्लक्ष होऊ लागले. स्वयंचलित वाहनांना ऐट आहे – त्यामुळे सायकल चालवणे कमीपणाचे ठरू लागले. जीवनाची गती वाढल्यावर सायकलचा वापर कमी होत गेला. मोठमोठे कारखाने, शाळा-महाविद्यालये, मोठ्या संस्था यांच्या आवारात पूर्वी सायकल स्टँड असत. त्यांची जागा बव्हंशी मोटार सायकल व मोटार गाड्या यांनी व्यापलेली दिसते.

सायकलबाबत असे उदासीनतेचे वातावरण सगळीकडे असताना ‘सिन्नर महाविद्यालया’चे प्राचार्य डॉ. संपतराव सहादराव काळे यांनी मात्र त्यांचे सायकलप्रेम जपले आहे. त्यांनी भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवली, पण ते भौतिक सुखांच्या मोहपाशात रमले नाहीत.  त्यांनी साधी राहणी आत्मसात केली आहे. त्यांना प्राचार्यपद कमी वयात लाभले आहे. त्यांनी त्या पदाचा उपयोग सायकलला वलय, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी उपयोगात आणला आहे. ते ‘नाशिक सायक्लिस्ट ग्रूप’च्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या ‘पंढरीच्या वारी’त दरवर्षी समील होतात. त्यांची ओळख ‘सायकलवारीतील वारकरी प्राचार्य’ अशी होत आहे.

संपतराव यांचे बालपण निफाड तालुक्यातील कोळवाडी ह्या छोट्या खेड्यात गेले. त्यांचे एकत्र कुटुंब साठ माणसांचे होते. तेथे त्यांचे भरणपोषण झाले. विटीदांडू, आट्यापाट्या, सूरपारंब्या असे गावरान खेळ खेळता खेळता त्यांच्यामध्ये खिलाडू वृत्ती बाणली. गाई-म्हशींचे धारोष्ण दूध पचवून भावंडे व सवंगडी यांच्यासोबत कुस्तीचे डाव शिक, शेतीतील कामे कर, गुरे चरण्यास ने असे त्यांचे मातीत मळलेले बालपण व तरुणपण आहे. त्यांनी जेव्हा सातवीतील स्कॉलरशिप मिळवली तेव्हा कोळवाडीसाठी तो ऐतिहासिक महत्त्वाचा क्षण होता. ते निफाडच्या ‘वैनतेय विद्यालया’त आठवीच्या वर्गात नवागत म्हणून आले तेव्हा त्यांना कौतुकच लाभले.

त्यांनचे वडील सहादराव, गावातील वागता माणूस! घरातील कारभारी. ते केवळ चौथीपर्यंत शिकले होते, पण त्यांच्या अंगी ग्रामीण शहाणपण ठासून भरलेले होते. त्यांना पावकी, निमकी, दीडकीचे पाढे तोंडपाठ होते. ते घरातील मुलांना हिशोब सोडवण्यास सांगत; कांदा, भाजीपाला विकून बाजारातून आलेल्या पैशांचे हिशोब तोंडी विचारत. छोटा संपत खेळण्यात जितका चपळ तितकाच हिशोबातही तरबेज! ते वडिलांचे हिशोब काही सेकंदांत सोडवत.

संपतचे आठवी ते दहावी शिक्षण कोळवाडी ते निफाड पायी प्रवास करत झाले. ‘वैनतेय’च्या वि.दा. व्यवहारे सरांनी त्याला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला, पण संपतला बारावीला मनाजोगे मार्क्स मिळाले नाहीत, त्यामुळे संपतने इंजिनीयर व्हावे ही वडिलांची इच्छा त्याच्याकडून पूर्ण झाली नाही. तेव्हा त्यांनी विज्ञानात उच्च शिक्षण घेऊन काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा चंग बांधला. ते नाशिकच्या ‘मराठा विद्या प्रसारक’च्या ‘के.टी.एच.एम. महाविद्यालया’तून पहिल्या वर्गात बी.एस्सी. झाले. त्यांनी प्रताप महाविद्यालय, (अंमळनेर) येथे एम.एस्सी.साठी प्रवेश मिळवला. ते एम.एस्सी.तील नेत्रदिपक यशाने सहजगत्या प्राध्यापक होऊ शकले. प्राचार्य काळे जेथे प्राचार्य म्हणून काम करत आहेत त्याच सिन्नर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांची प्रथम नेमणूक झाल्याचे ते आनंदाने सांगतात.

त्यांना व्यायामाची, खेळाची आवड होतीच. ते नोकरी निमित्ताने नाशिकमध्ये राहत असताना त्यांचा राजू ठाकरे, डॉ. नायक , विश्वनाथ आळसे, मनोज पळसकर, आर्किटेक्ट संतोष देशमुख आदी मित्रांशी संपर्क आला. त्यांचा त्र्यंबक रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रोज जॉगिंग, व्यायाम असा सिलसिला सुरू झाला. त्यातील काही मित्रांना पोहण्याचीही आवड होती. त्यांनी त्यांच्या सोबत शेजारच्या जलतरण तलावात पोहण्यात प्राविण्य मिळवले.

विश्वनाथ आळसे यांना सायकलिंगची आवड होती. डॉ. नायक , राजू ठाकरे हेही सायकलप्रेमी. त्यांच्या सोबत बालपणीची अपुरी राहिलेली प्राचार्य डॉ. संपतराव यांची सायकल चालवण्याची ऊर्मी उफाळून आली अन् सुरू झाले रोजचे तासाभराचे सायकलिंग. ही घटना साधारण २००१ ची.

त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून सोलर एनर्जीवरील ‘नॅनो मटेरियल्स’वर बारा शोधनिबंध सादर केले. त्यांना ते पीएच.डी. करत असतानाच, दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये संशोधन करण्याची संधी मिळाली. सेऊल म्हणजे ऑलिंपिकची पंढरी. तेथे त्यांच्यातील खेळाडूला ऊर्जा मिळत राहिली. तेथेही त्यांनी सहा शोधनिबंध सादर करून, सोलर एनर्जीसंदर्भात त्यांच्या स्वत:च्या नावावर चार पेटंट मिळवली.

त्यांच्या कर्तृत्वाला प्राचार्यपदाने नवी झळाळी मिळाली आहे. ते एकत्र कुटुंबात वाढले असल्याने सर्वांना सोबत घेऊन, काम करण्याची वृत्ती, कामातील नेटकेपणा, इतरांना प्रोत्साहन देणे, समस्या समजावून घेत कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावणे आदी गुणवैशिष्ट्ये यांच्यामुळे सहकारी व विद्यार्थी यांच्यातही लोकप्रिय ठरत आले आहेत.

त्यांचा सायकलसफरीबरोबर रोजचा धावण्याचा सरावही होतो. त्यांची सायकलवर नाशिकच्या परिघात वीस किलोमीटरपर्यंतची रपेट आठवड्यातून दोन दिवस ठरलेली असायची. त्याच वेळी, त्यांना मॅरेथॉन स्पर्धा खुणावू लागली. त्यांनी ‘मुंबईच्या अर्ध मॅरेथॉन’मध्ये २००७ साली प्रथमच सहभाग नोंदवून आठ हजार प्रतिस्पर्ध्यांमध्ये पहिल्या प्रयत्नात पहिल्या पन्नासात येण्याची मजल मारली. त्यांनी एकवीस किलोमीटर अंतरासाठी एक तास बेचाळीस मिनिटे इतकी वेळ नोंदवली. त्यांनी नाशिकच्या ‘मराठा विद्या प्रसारक’ समाजाच्या मॅरेथॉन स्पर्धेत पंचेचाळीस वर्षांवरील गटात बारा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत त्यांनी तीन वेळा प्रथम क्रमांक पटकावून वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी त्याच स्पर्धेत एकवीस किलोमीटर अंतरासाठी तिसऱ्या क्रमांकाचे यशही मिळवले.

प्राचार्य त्यांच्या सायकलिंगबद्दल बोलताना खुलतात. त्यांनी २०११ साली ‘ट्रेक -३७००’ ही तेवीस हजार रुपये किंमतीची सायकल विकत घेतली.

सायकलिंगसाठी अॅल्युमिनियमचा सांगाडा असलेली कमी वजनाची (साधारण पंधरा-सोळा किलो) सायकल वापरली जाते. वजनाने हलक्या व ३ × ७ असे दोन्ही बाजूंनी गिअर असल्याने त्या सायकली वेगाने धावतात. नियंत्रणासाठी त्यांना मोटारसायकलप्रमाणे डिस्क गिअर असतात. त्या सायकली सपाटीच्या रस्त्यावर प्रतितास साधारण तीस किलोमीटर, तर उताराच्या रस्त्यावर प्रतितास साधारण पंचावन्न किलोमीटर अशा वेगाने धावू शकतात. त्यांचे माऊंटेन बाईक, रेसर बाईक, हायब्रिड बाईक असे विविध प्रकार आहेत. सध्या, प्राचार्य डॉ. संपतराव काळे यांच्याकडे चाळीस हजार रुपये किंमतीची सायकल आहे.

नाशिक ते पंढरपूर ही सायकलवारी महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकनंतर प्राचार्य डॉ. संपतराव काळे त्या दिंडीचे महत्त्वाचे घटक आहेत. दिंडीचा पहिला थांबा ‘सिन्नर महाविद्यालया’वर असतो!
संपत काळे नाशिकमध्ये राहतात व सिन्नरला रोज कारने जा ये करतात, पण जन्मगावी जातात ते सायकलने. नाशिकला त्यांचा स्नेह्यांचा मोठा ग्रूप आहे. घरी, त्यांच्या पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे, मुलांनाही सायकलींची ओढ आहे. त्यांनी स्वत:साठी खर्चिक सायकल घेतली तेव्हा पत्नीने विरोध केला, पण तिला त्यांचे सायकलप्रेम आणि त्यामुळे त्यांना लाभलेला फिटनेस आवडतो.

डॉ.संपतराव काळे – 9422758242

– किरण भावसार

About Post Author

Previous articleअरण गावचे हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय
Next articleयम-नचिकेत संवाद
किरण भावसार हे वडांगळी, ता. सिन्नर (नाशिक) येथील रहिवाशी असून सध्या नोकरीनिमित्त सिन्नर येथे स्थायिक आहेत. त्यांना कथा, कविता, ललित लिखाणाची आवड आहे. त्‍यांची ‘मुळांवरची माती सांभाळताना’ हा कवितासंग्रह, तसेच ‘आठवणींची भरता शाळा’ व ‘शनिखालची चिंच’ या दोन ललित लेखसंग्रहांची ईबुक्स प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या ‘मुळांवरची माती...’ या कवितासंग्रहाला कुसुमाग्रजांच्या पहिल्या कवितासंग्रहाच्या नावाने दिला जाणारा ‘विशाखा’ पुरस्कार, अहमदनगर येथील ‘इतिहास संशोधन मंडळा’च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘कवी अनंत फंदी’ पुरस्कार मिळाला आहे. लेखकाचा दूरध्वनी -7588833562

6 COMMENTS

  1. सरआपला आम्हाला आभिमान आहे .
    सर आपला आम्हाला आभिमान आहे .

  2. पंढरपूरचे सायकल वारकरी
    पंढरपूरचे सायकल वारकरी प्राचार्य काळे सर खूप ग्रेट आहेत…..खरोखर आदर्श व्यक्तीमत्व

  3. संपतराव काळे

    संपतराव काळे
    डायनामिक पर्सनैलिटी keep it up.
    तुम्हाला खुप माेठे झाल्याचे पहायचे आहे़

  4. “हेल्थ इज वेल्थ” हे
    “हेल्थ इज वेल्थ” हे लहानपणापासून ऐकत आलो आहे, पण सर ते प्रत्यक्ष आचरणातून शिकवत आहे. आपल्यासारखे शिक्षक सगळ्यांना लाभायला हवेत तर नक्कीच भविष्यात आपण सक्षम पिढी तयार करू शकू.

Comments are closed.