डॉ. राजेंद्र बडवे – आनंदी कॅन्सर सर्जन

9
55
carasole

‘कर्करोगा’च्या हजारो रुग्णांना संजीवनी देऊन त्यांचा आजार केवळ बरा करणारे नव्हे; तर कोलमडून पडलेल्या काही रुग्णांना फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेण्याचे बळ देणारे धन्वंतरी म्हणजे पद्मश्री डॉ. राजेंद्र बडवे! बडवे हे आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेले कुशाग्र संशोधक आणि निष्णात शल्यवैद्यक (सर्जन) आहेत. त्यांनी स्तनांच्या कर्करोगावर केलेल्या संशोधनामुळे त्या आजाराने होणाऱ्या मृत्यूचा दर पंचवीस टक्क्याखाली घटला. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे UICC तर्फे २००३ साली Reach to Recovery International Medal मुंबई मेडिकल फाउंडेशनचा २००७ सालचा ‘सुश्रुत पुरस्कार’ ‘इंडियन न्युक्लिअर सोसायटी’चा २०१० सालचा जीवनगौरव पुरस्कार UAE कॅन्सर काँग्रेसचा २०१३ सालचा पुरस्कार.

त्याशिवाय त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा असा Lal Bahadur Shastri National Award for Excellence in Public Administration, Academics and Management  हा पुरस्कार २०१३ साली राष्ट्रपतींच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.

त्या सगळ्यांवर कळसाध्याय रचला गेला तो त्यांना २०१३ साली ज्या वर्षी त्यांना ‘पद्मश्री’ हा भारत सरकारचा किताब दिला गेला! ते ‘टाटा मेमोरियल सेंटर’चे डायरेक्टर म्हणून कार्यभार गेली आठ वर्षें सांभाळत आहेत.

मुंबईतील परळचे प्रसिद्ध ‘टाटा मेमोरिअल सेंटर’. देशाच्या कानाकोपऱ्यातून रोज तेथे येणारे हजारो रुग्ण, त्यांतील काही हॉस्पिटलच्या बाहेर फुटपाथवर पथाऱ्या टाकून, संसार मांडून बसलेले. डॉक्टर्स-नर्स-रुग्ण अशा सगळ्यांची लगबग अखंड चालू. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थोडी भीती. थोडी शंका. आत शिरल्यावर डाव्या हाताला वळले, की डायरेक्टरांची केबिन आहे.

डॉ. बडवे हे मूळ मुंबईचे. त्यांचा जन्म गिरगावातील. त्यांनी पहिली पाच वर्षें गिरगावात घालवल्यानंतर त्यांचे एक वर्ष दादरला आणि मग उरलेले बालपण बांद्रयाला गेले. बांद्र्याच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’चे हेडमास्तर हरणे गुरुजी हे त्यांचे आवडते शिक्षक. डॉ. बडवे म्हणतात, ‘मूर्तिमंत प्रेमळपणा म्हणजे हरणे गुरुजी.’ त्याशिवाय इंग्रजीचे खरवंडीकर मास्तर आणि संस्कृतचे बेम्बाळकर गुरुजीही डॉक्टरांचे लाडके. त्या सगळ्यांच्यात एक समान सूत्र कोणते असेल तर ते म्हणजे त्यांची अतिशय प्रेमळपणाने बोलण्याची, समजावून सांगण्याची, ठाय लयीत विद्यार्थ्यांशी बोलण्याची पद्धत. स्वतः डॉ. बडवे यांना, रुग्णाशी सहज संभाषण साधण्याची कला कोठून आली असावी याचा अंदाज असा सहज येतो.

बडवे शाळेच्या आठवणींत रमून जातात. “शाळेत असताना आम्ही पाच-सहा मित्र एक गंमतशीर गोष्ट रोज करायचो. आमच्या सगळ्यांची घरे शाळेपासून जवळ-जवळ तीन किलोमीटर तरी दूर होती आणि मधली सुट्टी असायची अर्ध्‍या तासाची. घंटा वाजली रे वाजली, की आम्ही घराच्या दिशेने पळत सुटायचो. दहा-बारा मिनिटे धावून आल्यावर पुढच्या पाच मिनिटांत पटापट जेवायचे आणि मग पुन्हा दहा-बारा मिनिटे पळून धापा टाकत शाळेत पोचायचे! खरे तर, अर्ध्या तासाच्या सुट्टीत फक्त पाच मिनिटे खाण्यासाठी! इतकी पळापळ करणे हा वेडेपणाच होता! पण आम्ही तो करायचो. कारण आम्हाला मजा यायची, त्यात वेगळा आनंद मिळायचा.” एखादी गोष्ट त्यातून फायदा काय होतो हा विचार बाजूला ठेवून, त्यातून निखळ आनंद मिळतो म्हणून करायची हे कदाचित शिकवून येत नाही. तो एकेकाच्या वृत्तीचा भाग असावा लागतो.

बडवे यांनी शाळेनंतर प्रवेश घेतला माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये. त्यांची मृदुला यांच्याशी भेट तेथेच झाली. त्यांची केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलमधील टेबल-पार्टनर मृदुला पुढे लाईफ पार्टनर बनली. बडवे महाविद्यालयात असताना क्रिकेट आणि टेबल-टेनिस खेळत. डॉक्टरांचे शाळेपासून गणित आणि विज्ञान हे आवडते विषय होते. तेथेही, ते गणितात सर्वोच्च गुण मिळवून विद्यापीठाच्या आठल्ये पदकाचे मानकरी ठरले. पुढे खरी गंमत आहे. त्यांच्या मनात आय.आय.टी.ला प्रवेश घ्यावा की मेडिकलला? असा संभ्रम निर्माण झाला. निर्णय होत नव्हता. त्यांनी शेवटी ‘टॉस’ केला! कौल मिळाला मेडिकलचा!

बडवे यांचे केईएम रुग्णालयाशी संलग्न ग्रँट मेडिकल महाविद्यालयात वैद्यकशास्त्राचे शिक्षण सुरु झाले. डॉक्टर म्हणतात, ‘तेथे डॉ. रेगे, डॉ. मेहता, डॉ. भटनागर असे काही नामवंत शिक्षक लाभले. डॉ. रवी बापट आणि डॉ. अरुण सम्सी यांच्या कितीतरी आठवणी आहेत! कामावरील असाधारण निष्ठा म्हणजे काय हे त्या दोघांकडून शिकण्यास मिळाले.’ बडवे यांनी पदव्युत्तर शिक्षण ‘जनरल सर्जरी’ विषयात पूर्ण केले. त्यानंतरही पुढील नऊ वर्षें शिक्षण चालू होते.

डॉक्टरांचे वडील टाटा रुग्णालयात प्रशासकीय विभागात होते. त्यामुळे राजेंद्र बडवे यांचे विद्यार्थिदशेत तेथे येणे-जाणे असायचे. त्यांना कर्करोगासारखा दुर्धर आजार आणि त्यातील आव्हाने तेथे जाणवली व ती त्यांनी पेलायला हवीत असे त्यांच्या मनाने घेतले. मग टाटा रुग्णालयात कर्करोगाचा विशेष अभ्यास सुरु झाला. त्यांनी पुढील तीन वर्षें thoracic  surgery चे शिक्षण घेतले. त्यांनी त्यानंतर सहा महिने जपानला जाऊन अन्ननलिकेच्या कर्करोगावर काम केले आणि नंतर, त्यांनी इग्लंडच्या ‘रॉयल मार्सडन’मध्ये स्तनाच्या कर्करोगावर विस्तृतपणे काम केले. ‘रॉयल मार्सडन’ हे प्रतिष्ठेचे समजले जाणारे आणि कर्करोगाचे जगातील सगळ्यात पहिले रुग्णालय आहे. तेथे, त्यांची प्राध्यापक मायकेल बाम यांच्याशी ओळख झाली. कर्करोगतज्ज्ञ डॉ. जॉन बंकर शहाऐंशी वर्षांचे. तेथे ते आणखी शिकायला म्हणून sabbatical वर आले होते! त्या दोघांकडून खूप शिकण्यास मिळाले असे बडवे सांगतात. त्यांचा शोध निबंध ‘Timing of surgery during menstrual cycle and survival of premenopausal women with operable breast cancer’ या विषयावर होता. तो ‘Lancet’ या मानाच्या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. त्याची दखल घेऊन ‘रॉयल सोसायटी’ने त्यांना अध्यापनासाठी विचारणा केली. संशोधनाला भारतात कितपत वाव मिळेल अशी शंका मनात होती, पण मायदेशात परत येण्याच्या ओढीने मन भारताकडे धाव घेत होते. शिवाय, भारतात कॅन्सरविषयक संशोधनात त्यांची स्वत:ची भर टाकता येईल असा वास्तविक विचारही त्यांच्या मनात होता.

परदेशात आणि भारतात काय फरक जाणवला? या प्रश्नावर डॉक्टर म्हणतात, ‘तिकडे रुग्णांची संख्या अगदी कमी म्हणजे भारतातील रुग्णसंख्येपेक्षा साधारण एक पंचमांश इतकी असते. शिवाय, खूप व्यक्तिनिष्ठता आहे. तेथे गुप्तता पाळण्यावर फार भर आहे. इतका, की रुग्ण महिलेच्या परवानगीशिवाय तिच्या नवऱ्यालादेखील तिच्या आजाराबद्दल माहिती देता येत नाही! एकूणच, तेथे कुटुंबसंस्थेवरील विश्वास कमी आहे.’ ते पुढे म्हणाले, “एकदा तर गमंतच झाली. मी बँकेत खाते उघडण्यास गेलो. त्यात पगार जमा होणार होता. मी counter वरील कर्मचाऱ्याला मला बायकोसोबत joint account उघडायचा आहे असे सांगितले. ती कर्मचारी मला चार-चारदा ‘are you sure?’ असा प्रश्न अविश्वासाने विचारत होती! शेवटी, मी न राहवून म्हटले, ‘तुम्ही असे का विचारता?’ त्यावर उलट तिने मलाच विचारले, ‘तुम्हाला भीती नाही वाटत, की तुमची बायको तुमचे हे पैसे घेऊन पळून जाईल?’ आता यावर तिला काय सांगणार? मला हसावे की रडावे ते कळेना.”

“त्याउलट भारतात रुग्णाला त्याच्या नातेवाईकांचा आधार असतो. डोळ्यांत पाणी आणणारे अनेक किस्से येथे घडले आहेत. एकदा एक तरुण मुलगी ‘टाटा’त दाखल झाली. ती जास्तीत जास्त सहा महिने जगू शकली असती इतका तिचा आजार बळावला होता. एक मुलगा तिच्यापाशी अहोरात्र बसून असायचा. तिची शुश्रूषा करायचा. तिला बेडवरून उठणेदेखील जेमतेम जमायचे. पण त्याचे तिच्यावर प्रेम होते. तिच्याशी लग्न करायचे त्याने ठरवले होते. आम्ही त्यांचे लग्नही रुग्णालयात भटजी बोलावून लावून दिले. असे प्रसंग मुळापासून हलवून टाकतात आणि रुग्णांशी माझे जुळणारे भावनिक नाते तर इतके अनमोल आहे! एकदा, मी कोकणातील शिक्षकांवर शस्त्रक्रिया केली. त्यांनी जाताना मला ते स्वतः तीस वर्षें वापरत असलेले त्यांचे पार्करचे पेन भेट दिले. एक न दोन. अशा खूप आठवणी …”

तुम्ही भविष्यात अजून काय करू इच्छिता? या प्रश्नावर डॉक्टरांचे उत्तर सुटसुटीत पण खूप काही सांगणारे होते. त्यांचे उद्दिष्ट कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांना सुधारित वैद्यकीय सुविधा मिळवून देणे हे आहे. एखादी समस्या जर निसर्गातून उभी राहिली असेल तर त्यावरील उत्तर/उपायही निसर्गाकडेच असणार. पण त्यासाठी सर्जन्सनी संशोधनाकडेही लक्ष द्यायला हवे. आपल्याकडे सर्जन्स चाललेल्या कामात समाधान मानताना दिसतात. आज कॅन्सर रुग्णांमध्ये survival rate साठ-सत्तर टक्के असेल तर तो आपण नव्वद टक्क्यांपर्यंत कसा नेऊ शकू हा विचार कमी जण करतात. कर्करोगातील अनिश्चितता जाणून घेणे हे खरे आव्हान आहे. त्यासाठी मूलभूत संशोधनात अधिकाधिक लोक यायला हवेत.

डॉक्टरांसमोर रुग्णांचे दुःख, आजाराचे गांभीर्य – त्यातील अनिश्चितता आणि एकूणच कामाचा ताण हे सगळे असूनही ते कायमच प्रसन्नचित्त आणि हसतमुख दिसतात. त्यांच्या नुसत्या भेटीनेही मनावरील ओझे हलके होते असे त्यांचा प्रत्येक पेशंट म्हणतो. त्यांना भेटणारे रुग्ण हे वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक पार्श्वभूमीतून आलेले असतात. पण ते प्रत्येकाशी सारख्या आत्मीयतेने बोलणे, छोट्यातील छोट्या शंकांचे निरसन करणे हे न कंटाळता करतात. अशा प्रसंगांत मनाची उभारी असली म्हणजे कर्करोगाची निम्मी लढाई जिंकलेली असते. पण त्यासाठी अत्यावश्यक असा आश्वासक संवादसेतू डॉक्टर त्यांच्यात आणि रुग्णात सांधतात. इतकी सकारात्मक ऊर्जा आणि इतका आशावादी दृष्टिकोन कोठून येतो?  त्या प्रश्नावर डॉक्टर नेहमीसारखे छान हसून म्हणतात, “पेशंट्समुळेच ! त्यांच्याशी बोलण्यातून भरपूर ऊर्जा मिळते आणि मी दमलो असे कधी म्हणायचेच नाही. कारण आपण जे बोलू ते शरीरातील प्रत्येक पेशी ऐकत असते. Being happy is an ambient state. There has to be a very strong reason to deviate from it.” किती सहज बोलून गेले डॉक्टर! केबिनच्या बाहेर पडल्यावर आणि नंतरही, कितीतरी वेळ ते शब्द माझ्या कानात घुमत राहिले.

– आसावरी फडके

About Post Author

9 COMMENTS

  1. छान माहीती मिळाली . लेख
    छान माहीती मिळाली . लेख अप्रतिम .

  2. अत्यंत सुरेख लेख … डाॅ पडले
    अत्यंत सुरेख लेख … डाॅ बडवे यांचे काम फार मोठे आहे

  3. एका जीवनदायी व्यक्तिमत्वाचे
    एका जीवनदायी व्यक्तिमत्वाचे विविध पैलु उलगडून दाखवणारा उत्तम लेख. आसावरी अभिनंदन …

  4. खूपच माेठं काम आहे..
    खूपच माेठं काम आहे…डाँक्टरांना माझा नमस्कार…

  5. उत्तम माहितीपूण लेख
    उत्तम माहितीपूण लेख

  6. डॉ.बडवे यांचं विचार व कार्य…
    डॉ.बडवे यांचं विचार व कार्य विषयी वाचून भारावून गेलो. उत्तम प्रेरणादायी लेख.
    महेश फडके.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here