आनंदीबाई जोशी (31 मार्च 1865 – 26 फेब्रुवारी 1887) या आधुनिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या पहिल्या भारतीय महिला. पण त्यांचा मृत्यू परदेशातून शिकून आल्यावर लगेच झाला. त्यानंतर अॅनी जगन्नाथ यांचा उल्लेख आढळतो. त्या डॉक्टर होऊन भारतात 1894 मध्ये परतल्या, पण अॅनी यांच्यावरही काळाने वैद्यकीय सेवा सुरू करण्याआधी झडप घातली. त्यामुळे दोघींच्याही शिक्षणाचा फायदा स्त्री समाजाला झाला नाही. रखमाबाई सावे (राऊत) त्या दोघींनंतर डॉक्टर झाल्या. त्यांनी प्रदीर्घ काळ डॉक्टर म्हणून काम केले (22 नोव्हेंबर 1864 – 25 सप्टेंबर 1955). त्यामुळे वैद्यकीय सेवा देणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर हा मान डॉ. रखमाबाई यांच्याकडे जातो. त्यांनी मुंबई, सुरत आणि राजकोट या तीन वेगवेगळ्या शहरांत डॉक्टर म्हणून 1895 ते 1930 पर्यंत काम केले.
रखमाबाई इंग्लंडमधून पदवी घेऊन भारतात 1895 मध्ये परतल्या. त्या लगेच मुंबईच्या कामा इस्पितळात हाऊस सर्जन म्हणून रुजू झाल्या. रखमाबाई यांचा डॉक्टर होण्याचा प्रवास संघर्षमय होता. त्यांनी त्यांचे लग्न नाकारून डॉक्टर होण्याचा निवडलेला पर्याय समाजाला मंजूर नव्हता. परिणामी, त्या इंग्लंडमधून परतल्या तेव्हा त्यांचा समाजात स्वीकार होण्याची शक्यता धूसर होती. कामा इस्पितळातील जागाही तात्पुरत्या स्वरूपाची होती. त्यामुळे त्या मुंबईपासून दूर सूरत येथे माळवी इस्पितळात गेल्या. त्यांची कसोटी पाहणारे दोन मोठे प्रसंग सुरुवातीलाच आले. ते म्हणजे 1896 च्या प्लेगची साथ आणि 1897 चा दुष्काळ. आत्यंतिक गरिबी, औषधांपासून ते जाणिवांपर्यंत अनेक गोष्टींचा अभाव आणि स्त्री डॉक्टरांच्या कामाला असलेल्या मर्यादा अशा परिस्थितीत त्या अहोरात्र सेवा करत होत्या. तेव्हा त्या बत्तीस-तेहतीस वर्षांच्या असतील. त्यांना त्यांच्या त्या कामगिरीबद्दल ब्रिटिश सरकारकडून ‘कैसर-ए-हिंद’ हा मान मिळाला. ‘फ्ल्यू’च्या साथीनेही (1918) त्यांच्या कौशल्याची कसोटी घेतली.
इस्पितळाच्या इमारतीत बायका औषधासाठी येत पण बाळंतपणासाठी राहण्यास तयार नसत. वास्तुदोष, शकुन-अपशकुन अशा समजुतींचा समाजावर पगडा होता. रखमाबाई यांनी लोकांच्या मनातील शंका फिटाव्यात म्हणून इस्पितळाच्या आवारातील गाभण शेळीचे बाळंतपण केले. त्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्या घरोघरी इस्पितळातील बाळंतपण सुरक्षित असते हे पटवून देत असत. त्यांच्या प्रयत्नांना यश येत गेले तशा बायका बाळंतपणासाठी इस्पितळात येऊ लागल्या. तेव्हा बाळंतपणासाठी आलेल्या बाईला चाळीस दिवस इस्पितळात ठेवून घेतले जाई. त्यातील अनेक बाळंतिणींसोबत त्यांची आधीची लहान मुलेही असत. रखमाबाई यांनी त्या लहान मुलांसाठी माळवी इस्पितळाच्या आवारात बालकमंदिर सुरू केले. मुलांचे संगोपन, शिक्षण यासाठी काही साधने पुरवली आणि प्रसंगी स्वत:चा वेळही दिला. सतत कार्यरत असणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांना स्वत:कडे कामापायी वेळ देणे शक्य नव्हते. तरीही नीटनेटकी राहणी ही त्यांची आवड होती. त्यांचा पेहराव त्यांच्या कामाला साजेसा असावा आणि पोषाखाची कामात अडचण होऊ नये यासाठी त्यांनी काही खास क्लृप्त्या शोधून काढल्या होत्या. त्यांनी निऱ्या काढून साडी नेसण्यात जाणारा वेळ कमी व्हावा म्हणून निऱ्या शिवून घेतल्या होत्या. त्या काम करताना साडी वाऱ्यावर उडू नये म्हणून साडीच्या खालच्या काठाला शिशाच्या गोळ्याची पट्टी लावत. साडीच्या फॉलचा तो प्राथमिक अवतार.
त्या सुरतेतील कामातून निवृत्त झाल्यावर, त्यांना राजकोटच्या रसूलकालजी जनाना हॉस्पिटलमध्ये सौराष्ट्र आणि कच्छ प्रांताच्या प्रमुख डॉक्टर म्हणून निमंत्रण आले. त्यावेळेस पहिले महायुद्ध सुरू होते. त्यांनी ‘रेड क्रॉस सोसायटी’तर्फे तेथे जे काम केले त्याबद्दल सोसायटीने त्यांचा गौरव केला. लोकांना आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी प्रथमोपचाराचे शास्त्रीय ज्ञान देणारा अभ्यासक्रम तेव्हा सुरू केला गेला, त्याचे राजकोट येथील केंद्र रखमाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. त्यांनी First Aid Traning Institute साठी विद्यार्थिनी मिळवणे, त्यांना शिकवणे, शिकते ठेवणे या अवघड जबाबदाऱ्या पेलल्या.
बायकांना प्रशिक्षणासाठी वा कामासाठी घरातून परवानगी मिळणे त्याकाळी अर्थातच दुरापास्त होते. मग त्यांनी शक्कल लढवून बायकांचा क्लब काढला. त्या क्लबमध्ये वाचन करणे, खाद्यपदार्थ/कला-कौशल्याच्या गोष्टी शिकवणे अशी सुरुवात केली. नंतर त्यांनी अशास्त्रीय समजांचे निराकरण करणे, स्वच्छतेचे-प्रथमोपचाराचे महत्त्व पटवून देणे असे काम केले. त्यांनी मुलींना स्वावलंबी करण्यासाठी शिक्षणात मदत केली; नर्सिंग शिक्षणासाठी मुलींना प्रेरित करून शिकवले. त्यांनी आरोग्य आणि शिक्षण प्रसार या कामात संस्थानिक, व्यापारी, ब्रिटिश राज्यकर्ते आणि सैन्य अशा सर्वांची मदत घेतली. त्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यात अस्पृश्यता निवारणपर लेखन-भाषण यांत सक्रिय राहिल्या. त्यांनी मुलांमध्ये जातिभेदविरोधी भावना जागी व्हावी म्हणून महापालिकेच्या शाळांमध्ये व्याख्याने दिली.
– अलका पावनगडकर 7722039852, alkapawangad@gmail.com
(‘प्रेरक ललकारी’वरून उद्धृत, संपादित – संस्कारीत)
उत्तम आणि माहिती पूर्ण लेख
उत्तम आणि माहिती पूर्ण लेख
सर, माझा मते आपण त्यांच्या…
सर, माझा मते आपण त्यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केल्यास, त्या लेखास आणि रखमाबाईस योग्य न्याय मिळेल. आज पर्यंत सर्व सामान्य जनतेला यासर्व घटनांची माहितीच नव्हती, थिंक महाराष्ट्रच्या माध्यमातून यासारखी माहिती आमच्यापर्यंत पोचते हे खरेच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे,
जमल्यास, पूर्ण नावाचा उल्लेख करता आल्यास बघावे.??
गिरीश, अकोला.
त्यांचे पुर्ण नाव रखमाबाई…
त्यांचे पुर्ण नाव रखमाबाई जनार्दन सावे होते.
Comments are closed.