डुडुळगावचे कमळ-उद्यान

8
133

सतीश गदिया नावाचा एक अवलिया व मनस्वी छांदिष्ट पुण्याजवळील तीर्थक्षेत्र श्री मोरया गोसावींच्या समाधीच्या चिंचवडगावात राहतो. त्यांना वेगळाच व कोणी फारशी कल्पनाही करू शकणार नाही असा छंद आहे, तो म्हणजे देशविदेशातील निरनिराळ्या जातींची, आकारांची, रंगांची व वैशिष्ट्यांची 'कमळे' जतन व संवर्धन करण्याचा. त्यांच्या आवडीचे प्रथम छंदात व पुढे त्याचे रूपांतर आयुष्यभराच्या ध्यासात कसे व कधी झाले हे त्यांनाही समजले नाही!

सतीश गदियास्वत:, पत्नी व दोन मुलगे असे त्यांचे छोटे व चौकोनी कुटुंब. त्यांचा मूळ व्यवसाय कपड्यांना इस्त्री करण्याचा. ते जवळपासच्या घराघरात जाऊन कपडे इस्त्री करण्याकरता आणत. असेच, ते एका घरात कपडे आणण्याच्या निमित्ताने गेले असता तिथे त्यांना पाण्यात उगवलेले व उमललेले कमळ दिसले. गदिया यांना ते कमळ हवेसे वाटले, त्या ग्राहकानेही गदियांची कमळाबद्दलची ओढ व आकर्षण पाहून त्यांना ते कमळ दिले. गदियांनी कमळाचे रोप (कंद) आपल्या घरी आणून एका टबमध्ये लावले. पण वर्षभर त्या रोपाची काळजी घेऊनही त्याला फूल काही आले नाही. त्यांनी त्या काळात 'कमळ' या विषयावरची उपलब्ध पुस्तके वाचून अभ्यास केला आणि एक दिवस अचानक त्या रोपाला प्रथम एक कळी आलेली त्यांनी पाहिली, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना. त्या कळीचे फूल झाले. त्यामुळे त्यांचा उत्साह व आत्मविश्वास दुणावला.

सतीशचे संगोपन आजीकडे (आईची आई) झाले. त्याचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. आजीचे नाव सुंदरबाई बागमार. त्यांना निसर्ग, फुले, झाडे ह्यांची आवड होती. त्या कुंड्यांमध्ये फुलझाडे वाढवत. सतीशला तो नाद लागला, पण त्याला कमळाची ओढ वाटली, ती तो लोणावळ्याला कमळांच्या तळ्यात पडला तेव्हा. तिथे पाणी उथळ होते, त्यामुळे तो लगेच बाहेर आला, परंतु त्यावेळी त्याने लोकांना कमळे, कमळांचे जलाशय, त्यांतील चिखल ह्यांबाबत नाना गोष्टी बोलताना ऐकले आणि त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले. पुढे, सतीशला तामीळनाडूमध्ये कमळांच्या दलदलीत अडकण्याचा अनुभवही आला.

कमळाचे बी मोहरीपेक्षा बारीक असते. कमळाला वर्षांतून तीन वेळा फुले येतात. वेगवेगळ्या जातींच्या कमळांच्या फुलण्याचे हंगाम वेगवेगळे असतात. त्यामुळे वर्षातले सहा-आठ महिने कमळाची फुले असतात. कंदाला देठ येतो व त्या देठातून कळी वर उमलते. कंदाच्या मुळ्या पाण्याखाली बारा फुटांपर्यत जाऊ शकतात. कमलपुष्पाचे आयुष्य तीन-चार दिवसांचे असते.

सतीशच्या माहितीप्रमाणे, कमळाच्या आठ-दहा जाती आहेत. कमळाची उपजात लिली . लिलीचे तीस-पस्तीस प्रकार आहेत. लिलीला गाभा नसतो, मध्यभागी परागांचा गुच्छ असू शकतो. कमळफुलाला मात्र गाभा असतो.

महाराष्ट्रातून कमळाचे जवळजवळ उच्चाटन झाले आहे. मात्र तामिळनाडू, आंध्र, गुजराथ, बिहार वगैरे राज्यांत कमळांची तळी रस्त्याकडेलादेखील दिसतात. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात मखाना जातीच्या कमळाची शेती करतात, कारण त्या कमळाच्या बियांच्या लाह्या लोकप्रिय आहेत. त्या पाचशे रुपये किलोच्या भावाने मिळतात. त्या जातीच्या कमळाचे पान आठ-दहा फूट व्यासाचे असते.

बिहार हे कमळांच्या विविध जाती मिळण्याचे ठिकाण आहे. मग गदियांनी कोलकात्याला जाऊन कमळाचा एक कंद मिळवला. त्यांनी तो आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर एका टबमध्ये लावला. त्यांनी कमळे लावण्यासाठी गच्चीवर निरनिराळया आकाराचे प्लॅस्टिक, पत्र्याचे टब वापरले. एकेक करता करता त्यांची गच्ची निरनिराळ्या जातींच्या व अप्रतिम रंगांच्या कमळांच्या रोपांनी व फुलांनी भरून गेली. त्यांच्याकडे आठ ते नऊ फूट व्यासाची पाने असणारी कमळेही आहेत.

सतीश गदिया

त्यांच्या वाढत्या पसार्‍यासाठी गच्ची अपुरी पडू लागली. त्यांच्या सासर्‍यांनी आपल्या या मेहनती व जिद्दी जावयास पुण्याजवळच मोशी येथील डुडुळगाव येथील एक एकर जागा देऊ केली. आता गदिया यांच्या आत्मविश्वासाच्या व जिद्दीच्या जोरावर त्या ठिकाणी खासगी क्षेत्रातील एकमेवाद्वितीय असे 'कमळउद्यान' आकाराला आले आहे! तेथे काम जोरात सुरूही झाले आहे. सध्या जवळजवळ तीस वेगवेगळ्या प्रकारांची, जातींची, रंगांची देशी व विदेशी कमळे त्यांच्याजवळ आहेत व ती संख्या पन्नासपर्यंत नेण्याचा त्यांचा संकल्प व प्रयत्न आहे.

हा छंद जोपासण्याचे त्यांचे एक उद्दिष्ट म्हणजे 'कमळ' हे आपले राष्ट्रीय फूल आहे. त्यात असणार्‍या औषधी गुणधर्मांची माहिती ही देशातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी व त्याविषयी लोकांमध्ये आवड व जागृती निर्माण व्हावी हा आहे. त्यासाठी त्यांनी मानसिक, भावनिक व अर्थात आर्थिक गुंतवणूकही खूप केली आहे.

सतीश गदियामहाराष्ट्रात पुणे, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अकोला, औरंगाबाद अशा जवळपास आठ-दहा जिल्ह्यांत त्यांचे नाव व कार्य परिचित आहे. त्यांनी औरंगाबाद महापालिकेचे कमळकारंजे विकसित करून दिले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, बर्‍याचशा आयुर्वेदिक औषधांमध्ये कमळ व त्याच्या देठ, बिया वगैरे भागांचा उपयोग केलेला असतो. त्यांनी स्वत: घरी खाण्यासाठी गुलकंदाप्रमाणे कमळकंद केला आहे. कमळकंदामध्ये प्रचंड कॅल्शियम असून ते हाडांसाठी उपयुक्त असल्याचेही ते सागंतात. सतीश गदिया यांनी कमळांवर घरीच अनेक प्रयोग केले आहेत. ते कमळांच्‍या बीयांपासून खीर तयार करताच. सोबत त्‍यांनी कमळांच्‍या पानांची चटणी, कमळाच्‍या देठाची भाजी, गुलकंदाप्रमाणे कमळाच्‍या पानांचा कमळकंद अशा काही पाककृती तयार केल्‍या आहेत. सतीश गदिया यांनी त्‍यांचा मूळ 'इस्‍त्री करण्‍याचा' व्‍यवसाय बंद केला आहे. ते आता पूर्णवेळ कमळांच्‍या देखभालीसाठी देतात. त्‍यांचे कमळाविषयीचे संशोधन सतत सुरू असते. Indian Council of Agricultural Research च्या बिहारमधील दरभंगा येथील संस्थेत 'मरवाना'बद्दल (कमळाची एक जात) विशेष संशोधन चालते. त्या संस्थेनेही लिखित स्वरूपात (ऑगस्ट 2009 मध्ये) सतीश गदिया यांचे कौतुक व ते राबवत असलेल्या उपक्रमाविषयी विशेष दखल घेतली आहे.

सतीश गदिया हे अंगकाठीने शिडशिडीत. यांच्‍या शब्‍दोच्‍चारात व्‍यंग आहे. भाषा व्‍यवस्थित बोलता येत नसल्‍याने त्‍यांना शालेय जीवनापासून आत्‍मविश्‍वासाची कमतरता जाणवत असे. याचा परिणाम त्‍यांच्‍या अभ्यासावर झाला. ते इच्‍छा असूनही पुढे शिकू शकले नाहीत. त्‍यांचे बालपण आजोळी गेल्‍याने त्‍यांना आईवडिलांची कमतरता जाणवत असे. अशा परिस्थितीत त्‍यांना कमळ म्‍हणजे त्‍याच्‍या जीवनाला लाभलेला आधार वाटतो. ''मी कमळामध्‍ये मला कधीच लाभलेले प्रेम पाहतो.'' असे ते सांगतात. गदियांचा आत्‍मविश्‍वास एवढा कमी होता की वयाच्‍या पस्‍तीसाव्‍या वर्षापर्यंत त्‍यांनी पुण्‍याची हद्दही ओलांडली नव्‍हती. मात्र त्‍यांच्‍या मनाने कमळाचा ध्‍यास घेतला आणि त्‍यांच्‍या आयुष्‍याला कलाटणी मिळाली. आज ते कमळाच्‍या विविध जातींच्‍या शोधात भारतभर हिंडत असतात. कमळाविषयी बोलताना त्‍यांना त्‍यांच्‍या वाचेच्‍या व्‍यंगाचाही विसर पडतो. मात्र ते जेव्‍हा बोलतात तेव्‍हा त्‍यांचे बोल कानाला मधुर भासतात.

गदिया यांच्‍या कमळ उद्यानात अनेकविध जाती पाहायला मिळतात. त्‍यात मखना जातीच्‍या अवाढव्‍य पानांच्‍या कमळापासून चंद्रकमळांसारख्‍या जाती पाहायला मिळतात.

सतीश गदिया
9890969994

आशुतोष महाजन
9767753016

About Post Author

8 COMMENTS

  1. hi

    hi
    i will like to see your kamal garden.
    before that i want to see atleast few snaps of the same pl.

  2. अतिशय सुंदर शब्दच सापडत…
    अतिशय सुंदर शब्दच सापडत नाहीत मलाही मार्गदर्शन हवे आहे

  3. मला पण हा छंद अनेक…
    मला पण हा छंद अनेक वर्षांपासून आहे.त्याचे रुपांतर आता माझा माहिती मधील जवळपासच्या नदी,तलाव,डबकी यामध्ये कमळबीज,कंद,मुळ लावून त्या परिसरात कमळ लागवड करण्यात झाले आहे. आज पर्यंत मी व माझ्या सहकार्यानी मिळून अनेक ठिकाणी कमळ लागवड केली आहे. आपणही मला सहकार्य करणार ही अपेक्षाच नाहीतर संपूर्ण विश्वास आहे.

Comments are closed.