ठाण्यातील वैचारिक चर्चेचे दालन – डॉ. राममनोहर लोहिया व्याख्यानमाला

1
35

– संजीव साने

ठाण्यातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विश्वात स्वत:चं स्थान निर्माण करणारी डॉ. राममनोहर लोहिया व्याख्यानमाला वैशिष्ट्यपूर्ण आहे. गेल्‍या सत्तावीस वर्षांपासून ही व्‍याख्‍यानमाला आयोजित करण्‍यात येत आहे. दरवर्षी आठ ते नऊ दिवस चालणा-या या व्‍याख्‍यानमालेत व्याख्यानं, टॉक शो, मुलाखत अशा स्वरूपाचे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जातात. ‘सामान्‍य लोकांकडून सामान्‍य लोकांसाठी चालवण्‍यात आलेली व्‍याख्‍यानमाला’ हे या उपक्रमाचे वैशिष्‍ट्य ठरते. व्‍याख्‍यानमालेचे आयोजक संजीव साने यांच्‍याकडून या व्‍याख्‍यानमालेच्‍या प्रवासावर टाकण्‍यात आलेला हा प्रकाशझोत…

– संजीव साने

ठाण्‍यात 1984 सालाच्‍या सुमारास आम्‍हा समाजवादी विचारांच्‍या व्‍यक्‍तींकडून ‘समता आंदोलन’ नावाची एक संघटना चालवली जात असे. ठाण्‍यात कायम स्‍वरूपी चालणारी व्‍याख्‍यानमाला असणे गरजेचे आहे, असा विचार यावेळी पुढे आला. खरं तर, ठाण्‍यातील कामगार संघटना, ‘म्‍युनिसीपल लेबर युनिअन’चे संस्‍थापक वि. न. साने अर्थात अण्‍णा साने यांच्‍यासोबत आम्‍हा कार्यकर्त्‍यांच्‍या झालेल्‍या चर्चेतूनच या व्‍याख्‍यानमालेची कल्‍पना उदयास आली. त्‍यानंतर अण्णा साने, हिंद मजदूर किसान पंचायत, समता आंदोलन व मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या सहकार्यातून 1984 साली या व्‍याख्‍यानमालेची सुरूवात करण्‍यात आली. 23 मार्च या डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्‍मदिनी या व्‍याख्‍यानमालेची मुहूर्तमेढ रोवण्‍यात आली. तेव्‍हापासून आजतागायत गेली सत्तावीस वर्षे ही व्‍याख्‍यानमाला अखंडितपणे सुरू आहे.
त्‍यावेळी ठाण्‍यात मराठी ग्रंथ संग्रहालय आणि नगरवाचन मंदिर अशा दोन महत्‍त्‍वाच्‍या संस्‍था होत्‍या. त्‍यांच्‍याकडून काही कार्यक्रम आणि व्‍याख्‍याने आयोजित केली जात असत. मात्र त्‍या व्‍यतिरिक्‍त व्‍याख्‍यानांचा उपक्रम इतरत्र कुठेच होत नसे. त्‍यामुळे या व्‍याख्‍यानमालेची सुरूवात ठाण्‍यातील वैचारिक क्षेत्राच्‍या दृष्‍टीने महत्‍त्‍वाची ठरली. त्‍यावेळी व्‍याख्‍यानमालेचे उद्घाटन ज्‍येष्‍ठ विचारवंत विनायकराव कुलकर्णी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले होते. विनायकराव कुलकर्णी आणि ज्‍येष्‍ठ पत्रकार दिनकर साक्रीकर यांच्‍या व्‍याख्‍यानांपासून या उपक्रमाची सुरूवात झाली. प्रबोधनाची प्रक्रिया म्‍हणून महाराष्‍ट्रातील आणि देशातील विविध विचारवंत-अभ्‍यासकांची व्‍याख्‍याने आयोजित करणे हे या उपक्रमाचे वैशिष्‍ट्य आहे.
त्‍यानंतर या व्‍याख्‍यानमालेत अनेक मान्‍यवर व्‍यक्‍तींच्‍या मुलाखती आणि व्‍याख्‍याने झाली. ज्‍येष्‍ठ कामगार नेते बगाराम तुळपुळे यांनी तंत्रज्ञान आणि विकास या विषयांवर व्‍याख्‍याने दिली. या भाषणांची पुस्तिका आमच्‍याकडून पुढे प्रसिद्ध करण्‍यात आली. त्‍यानंतर य. दि. फडके यांनी सलग तीन दिवस स्‍वातंत्र्य चळवळीतील मुसलमानांचा सहभाग, स्‍वातंत्र्य चळवळीतील शिखांचा सहभाग आणि स्‍वातंत्र्य चळवळीतील महिलांचा सहभाग या विषयावर व्‍याख्‍याने दिली. ही भाषणे आजही ठाणेकरांच्‍या स्‍मृतीत आहेत. या भाषणांवर दोन पुस्‍तके प्रसिद्ध करण्‍यात आली. यांसोबत नानासाहेब गोरे, पन्नालाल सुराणा, कुमार केतकर, डॉ. भालचंद मुणगेकर, मेधा पाटकर, अनिल अवचट, लक्ष्मण माने, कुमार सप्‍तर्षी, निळू फुले, प्राध्‍यापक एन. डी. पाटील, अरूणा रॉय, योगेंद्र यादव, पर्यावरण तज्ञ आणि शास्‍त्रज्ञ वंदना शिवा, राजकीय विश्‍लेषक प्रकाश बाळ, डॉ. उत्‍तरा सहस्‍त्रबुद्धे, डॉ. यशवंत सुमंत, सातारा आंबेडकर अकादमीचे किशोर बेडकिहाळ, दिल्‍लीचे परराष्‍ट्रविषयक तज्ञ राकेश भट, महादेव जानकर, अरूण ठाकूर, सुनिती सुलभा रघुनाथ, जगन फडणीस, कविता महाजन, राजदीप सरदेसाई आदी मान्‍यवरांनी या व्‍याख्‍यानमालेद्वारे लोकांना मार्गदर्शन केले.
व्‍याख्‍यानमालेत सादर होणा-या व्‍याख्‍यानांच्‍या विषयात नेहमीच सलगता असते असे नाही. प्रत्‍येक व्‍याख्‍यान हे वेगवेगळ्या विषयांवरील असू शकते. मात्र कधी आवश्‍यक असले तर तसा प्रयोग केला जातो. मान्‍यवर वक्‍त्‍यांच्‍या व्‍याख्‍यानांसोबत सांस्‍कृतिक अंगाने जाणा-या अनेक गोष्‍टींचा समावेश या व्‍याख्‍यानमालेत करण्‍याचा आमचा प्रयत्‍न असतो. स्‍वातंत्र्य आंदोलनातील गाण्‍यांवर आधारित एक कार्यक्रम लिलाधर हेगडे यांच्‍याकडून सादर करण्‍यात येतो. तो कार्यक्रम व्‍याख्‍यानमालेत सादर करण्‍यात आला होता. याप्रमाणे चळवळीतील नाटके, गाणी अशा प्रकारचे सांस्‍कृतिक कार्यक्रमही सादर केले जातात. व्‍याख्‍यानमाला यशस्‍वी होण्‍याकरीता दरवर्षी आयोजन समितीची स्‍थापना करण्‍यात येते.
डॉ. राममनोहर लोहिया व्‍याख्‍यानमाला ठाण्‍यात सुरू करण्‍यात आली, त्‍यावेळी तीस ते चाळीस व्‍यक्‍ती या व्‍याख्‍यानांना उपस्थित रहातील असा आमचा कयास होता. मात्र सुरूवातीपासूनच अपेक्षेपेक्षा जास्‍त श्रोत्‍यांची उपस्थिती या व्‍याख्‍यानमालेस लाभली. ठाणे शहराच्‍या परिघात ‘डॉ. राममनोहर लोहिया व्‍याख्‍यानमाले’च्‍या रूपाने एक वैचारिक चर्चेचे दालनच उघडले गेले. त्‍यानंतर अनेकांनी त्‍याचा स्‍वीकार करून इतर व्‍याख्‍यानमालांची सुरूवात केली. आज ठाण्‍यात आठ ते दहा व्‍याख्‍यानमाला सुरू आहेत. प्रबोधनाच्‍या चळवळीसाठी ही आवश्‍यक आणि स्‍वागतार्ह गोष्‍ट आहे. सुरूवातीस ‘समता आंदोलन’च्‍या माध्‍यमातून या व्‍याख्‍यानमालांचे आयोजन केले जात असे. गेल्‍या पंधरा वर्षांपासून ‘समाजवादी जनपरिषदे’कडून या व्‍याख्‍यानमालांचे आयोजन केले जाते. व्‍याख्‍यानमालांच्‍या सुरूवातीपासूनच ठाण्‍यातील कामगार संघटना अर्थात ‘म्‍युनिसिपल लेबर युनिअन’ यांचे आयोजनात सहकार्य असते.
गेल्‍या सत्तावीस वर्षांच्‍या काळात माध्‍यमांचा प्रभाव वाढला, त्‍याद्वारे रोज चर्चासत्रे, व्‍याख्‍याने पाहता येऊ लागली. मात्र तरीही या व्‍याख्‍यानमालेस दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्‍याचा आमचा अनुभव आहे. व्‍याख्‍याते, विषय आणि वेळ यांची निवड आणि आयोजन चांगले झाले तर लोक आवर्जून ऐकण्‍यास येतात. त्‍यातल्‍या त्‍यात वाढलेल्‍या अडचणी अशा, की अनेकदा लोकांच्‍या आणि आमच्‍या वेळा जुळत नाही. मात्र या धकाधकीच्‍या काळात हे होणारच! आतापर्यंतचा अनुभव असा, की लोकांसाठी चर्चेची अन्‍य माध्‍यमं असली तरी लोकांना प्रत्‍यक्ष व्‍याख्‍यानांना येण्‍याची आवड असते आणि त्‍यांना ते गरजेचेही वाटते. लोक मोठ्या संख्‍येने कार्यक्रमास येतात. नुसती येतातच नव्‍हे तर नियमीत येणारे लोक स्‍वतःहून देणग्‍याही देतात.
अगदी सुरूवातीच्‍या काळात मराठी ग्रंथ संग्रहालयात ही व्‍याख्‍याने आयोजित केली जात. संग्रहालयाची वेळ संपल्‍यानंतर रात्री नऊ वाजता ही व्‍याख्‍याने होत असत. मात्र दूरवरून येणा-या लोकांची या वेळेमुळे गैरसोय होत असल्‍याचे आमच्‍या निदर्शनस आले. त्‍यानंतर आम्‍ही ग्रंथ संग्रहालयास विनंती केली, की आम्‍हाला सांयकाळी सातच्‍या सुमाराची वेळ व्‍याख्‍यानांसाठी द्यावी. त्‍यानंतर ग्रंथ संग्रहालयाच्‍या गच्‍चीवर व्‍याख्‍यानमाला आयोजित करण्‍यात येऊ लागली. ग्रंथ संग्रहालयाच्‍या इमारतीची डागडुजी करण्‍याच्‍या काळात व्‍याख्‍याने इतरत्र आयोजित करण्‍यात आली होती. हा अपवाद वगळता ही व्‍याख्‍यानमाला याच ठिकाणी आयोजित केली गेली. योग्‍य वक्‍ता आणि वेळेची योग्‍य निवड झाली असली तरी या कार्यक्रमाचा योग्‍य प्रचार होणेही तेवढेच महत्‍त्‍वाचे आहे. सुरूवातीच्‍या काळात प्रसिद्धीसाठी फारशी धावपळ करावी लागत नसे. एकदा वर्तमानपत्रातून जाहिरात आली की लोक जमत. मात्र आता काळ बदलला. आता जाहिरातींचं थोडं हॅमरींगही करावं लागतं. सुरूवातीला 23 मार्चला व्‍याख्‍यानमाला पार पडत असे. मात्र हा दहावीच्‍या परिक्षांचा काळ असल्‍याने व्‍याख्‍यानमाला ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये आयोजित करण्‍यात येऊ लागल्‍या. आता ठाण्‍यात इतरही व्‍याख्‍यानमाला होत असल्‍याने त्‍यांच्‍या तारखांसोबत आपल्‍या तारखा मेळ खाऊ नयेत याचीही खबरदारी घ्‍यावी लागते.
या व्‍याख्‍यानमालांच्‍या काही आठवणीही आहेत. मो. ह. विद्यालयात माजी गृहराज्‍यमंत्री भाई वैद्यांचे राजकीय विषयावर एक व्‍याख्‍यान ठेवण्‍यात आले होते. त्‍यावेळी ते संघपरिवाराच्‍या विरोधात बोलले. तेव्‍हा काही लोकांनी व्‍याख्‍यान उधळण्‍याचा प्रयत्‍न केला. कुणाला मारहाण झाली नाही, मात्र बॅनर फाडणे, माईक तोडणे असे प्रकार घडले. अजूनही त्‍या प्रकरणाचा खटला सुरू आहे. निखिल वागळे यांच्‍यावर शिवसेनेकडून आयबीएन लोकमतच्‍या कार्यालयात हल्‍ला करण्‍यात आला. त्‍यानंतर दोनच दिवसांनी आमच्‍या व्‍याख्‍यानमालेत निखिल वागळे यांचे व्‍याख्‍यान ठेवण्‍यात आले होते. त्‍या सुमारास महाराष्‍ट्राच्‍या स्‍थापनेला पन्‍नास वर्षे पूर्ण होत असल्‍याच्‍या निमित्‍ताने त्‍या व्‍याख्‍यानाला अनेक राजकीय संदर्भही होते. त्‍यामुळे निखिल वागळे येणार का? आले तर काही गडबड तर होणार नाही ना? अनेक प्रश्‍न उभे राहिले होते. मात्र पोलिसांनी चांगला बंदोबस्‍त ठेवल्‍याने कार्यक्रम उत्‍तमपणे पार पडला. तसेच, दिवंगत ज्‍येष्‍ठ अभिनेते निळू फुले यांचे व्‍याख्‍यान ठेवले असता त्‍यांना चाहत्‍यांपासून वाचवण्‍याचेच मोठे काम आमच्‍यावर येऊन पडले. जेवढा वेळ त्‍यांच्‍या व्‍याख्‍यानाला लागला नाही, त्‍याहून जास्‍त वेळ त्‍यांना चाहत्‍यांच्‍या गराड्यातून बाहेर काढण्‍यात गेला.
आज माध्‍यमांचा सुळसुळाट झालेला असला तरी लोक प्रत्‍यक्ष उपस्थित राहून व्‍याख्‍याने ऐकणे पसंत करतात. आपण लोकांकडून ऐकतो की, मी सानेगुरूजीं च्‍या कथा ऐकल्‍या, आंबेडकरांची भाषणं ऐकली, भीमसेन जोशींचं गाणं ऐकलं. हा प्रत्‍यक्षानुभव वेगळाच आनंद देऊन जात असतो. कदाचित हे लोकांच्‍या चांगल्‍या प्रतिसादाचे कारण असू शकेल. व्‍याख्‍यानमाला झाल्‍यानंतर लोक रस्‍त्‍यात भेटले, की पुढील व्‍याख्‍यानमालेची विचारपूस करायचे. व्‍याख्‍यानमालेचे अनुभव सांगायचे. लोकांचा असा वाढता सहभाग आणि पाठिंबा पाहिला की, कामाचा हुरूप आणखीनच वाढत जातो. आयोजकांचे परिश्रम आणि लोकांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग यामुळेच या व्‍याख्‍यानमालेने ठाण्‍याच्‍या राजकीय, सामाजिक आणि सांस्‍कृतिक विश्‍वात स्‍वतःचे स्‍थान निर्माण केले आहे.
संजीव साने, 9819221239

संबंधित लेख –

भारतीय लोकशाहीचे भवितव्य

दि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील

‘अमृतवेल’ बहरत आहे!

ऋतुसंहार

केजचे पहिले साहित्य संमेलन

About Post Author

1 COMMENT

  1. सुंदर उपक्रम. आजच्या काळात
    सुंदर उपक्रम. आजच्या काळात अशा वैचारिक चळवळींची अत्यंत आवश्यकता आहे.

Comments are closed.