टांकांच्या फेकी (व्यंगचित्रे)- स्वतंत्र विचारांचा अंकुश (Takanchya feki- Book of old cartoons makes one think independently)

0
110

वृत्तपत्रांतील टिकाटिप्पणीचा अग्रलेखांइतकाच महत्त्वाचा विभाग म्हणजे व्यंगचित्रांचा. अनेक वाचक तर अग्रलेख वाचत नाहीत, पण ते आम्ही व्यंगचित्र बघतो असे सांगतात. व्यंगचित्रांची वर्तमानपत्रांतील परंपरा किती जुनी आहे असे कुतूहल जागे झाले ते टांकाच्या फेकी या व्यंगचित्रांच्या पुस्तकामुळे. ते पुस्तक प्रकाशित 1935 साली झाले आहे. त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ व्यंगचित्रांचे पुस्तक नाही तर प्रत्येक व्यंगचित्राचा अर्थ ठसवणारे विवेचन त्या चित्रासोबत आहे. चित्रे काढली होती शंकरराव किर्लोस्कर यांनी आणि विवेचन केले होते प्रसिद्ध कादंबरीकार ना.सी. फडके यांनी. एकंदर चाळीस चित्रे त्या छोट्या पुस्तकात आहेत. शंकरराव किर्लोस्कर त्यांच्या शंवाकिय या आत्मचरित्रामुळे परिचित आहेत. त्यांच्या नावावर आणखी काही पुस्तकेही आहेत – आत्मप्रभाव, यशस्वी धंद्याचा मार्ग, यांत्रिकाची यात्रा, व्यापाराचे व्याकरण. ते चित्रकला पंडित सातवळेकर यांच्यापासून स्फूर्ती घेऊन, खुद्द त्यांच्याकडून लाहोरला जाऊन शिकले. नंतर, त्यांनी मुंबईच्या जे जे कला महाविद्यालयातूनही शिक्षण घेतले.

व्यंगचित्रांची परंपरा त्यांहून थोडी मागे जाते. शिशिरकुमार दास यांच्या History of Indian Literature या पुस्तकात असा उल्लेख आला आहे, की कृष्णाजी काशिनाथ फडके नावाचे गृहस्थ दोन नियतकालिके – इंग्रजीमध्ये Hindu Punch आणि मराठीत विदूषक अशा नावांची चालवत असत. ती राजकीय व्यंगचित्रांनी आणि राजकीय विडंबनांनी युक्त असत. त्याहून अधिक जुना असा उल्लेख बासू बिरादार यांच्या Marathi Journalism या लेखात मिळतो – 1890 मध्ये आनंदराव धुरंधर भूत नावाचे नियतकालिक चालवत असत. ते दर शुद्ध प्रतिपदा आणि पौर्णिमा यां दिवशी प्रकाशित होत असे. बिरादार यांचे म्हणणे असे आहे, की ते राजकीय व्यंगचित्रे प्रकाशित करणारे पहिले नियतकालिक होय.

तीच परंपरा किर्लोस्कर यांनी पुढे नेली, परंतु त्यांच्या पुस्तकातील चित्रांचे विषय, समाजाची मानसिकता बदलण्यासाठी काय करण्यास हवे हे आहेत. ते त्या पुस्तकाच्या प्रास्ताविकस्वरूपी निवेदनात म्हणतात – जग हलवण्याचे सामर्थ्य समशेरीइतकेच लेखणीतही आहे. श्री शिवाजी महाराजांनीमराठ्यांचे स्वराज्य तलवार गाजवून स्थापले, परंतु माझी तलवार म्यानातून उपसण्याची प्रेरणा भारतातील गोष्टी ऐकून, म्हणजे एका प्रतिभासंपन्न लेखकाचे विचार ऐकल्याने झाली — मनुष्य अन्नावर जगतो असे म्हणण्यापेक्षा विचारांवर जगतो असे म्हणणेच यथार्थ होईल. तशा सुंदर विचारांची लहानशी माला गुंफून तुम्हाला अर्पण करण्याचे योजले आहे.

प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे चित्रांतून मांडले गेलेले विचार प्रामुख्याने असे आहेत – विचार स्वतंत्र हवेत, त्यात गतानुगतिकता नको, सुधारणांची गाडी वेगाने पुढे जाणार आहे, जुन्या गोष्टींचे वृथा अभिमान नको, नव्या विचारांनीच हिंदू समाजाची रुग्णावस्था संपेल, विचार धाडसी हवेत, कर्तबगारी गाजवूनच प्रतिकूल पारिस्थितीवर मात होते इत्यादी इत्यादी.

प्रत्येक चित्रासोबत त्याचे विवेचन आहे, ते ना.सी. फडके यांचे. फडके कलेसाठी कला हे तत्त्व हिरिरीने मांडणारे, परंतु त्यांनी येथे जीवन सुधारण्यासाठी बोध करू इच्छिणाऱ्या व्यंगचित्रांना निवेदनाची जोड देऊन जीवनासाठी कला हे तत्त्व अप्रत्यक्ष रीत्या मान्य केले असे म्हणावेसे वाटते. त्यांची निवेदने मोजक्या लांबीची आहेत. त्यांची भाषा सोपी आणि सरळ आहे, उदाहरणार्थ –ज्याला जगाची प्रगती घडवून आणायची असेल त्याने रूढींचा हट्ट हसण्यावारी नेऊन स्वत:च्या स्वतंत्र विचारांच्या अंकुशाने जगाला सारखे डिवचले पाहिजे.गंमत अशी, की पुराणमतवाद्यांनी प्रत्येक नव्या सुधारणेच्या वेळी आता समाज रसातळाला जाणार!असा आरडाओरडा केला आहे, परंतु त्यांच्या भविष्याप्रमाणे समाज केव्हाही रसातळाला गेलेला नाही!प्रत्येक नवी परिस्थिती, वास्तविक पाहता, माणसाच्या कानांत हळूच सांगत असते, की तू तुझ्या वागण्यात बदल कर.तीच सूचना लोक ऐकत नाहीत, म्हणून तिच्यात व लोकांत झगडा उत्पन्न होतो आणि माणसाला एखाद्या हट्टी दुखणाइताप्रमाणे कण्हत पडावे लागते.उमरखय्यामने म्हटले आहे, की संसार हा एक सारीपाट आहे आणि आपण माणसे त्या पटावरच्या सोंगट्यांसारखी असून, दैव नावाचा द्यूतकार माणसांना पुढेमागे सरकावत असतो. पण असे का म्हणायचे? खरे म्हणजे असे, की तुम्ही,आम्ही सगळेजण संसाराच्या अजस्त्र चाळणीत बसलेले आहोत. त्या चाळणीला संकटांचे आणि विपत्तीचे धक्के बसत आहेत. आपल्यापैकी जे लेचेपेचे असतील ते त्या चाळणीतून पडतील व त्यांची स्थिती दुःखात आणि अपयशात गटांगळ्या खाता खाता अनुकंपनीय होईल. पण तो दोष त्यांचा आहे, संसाराचा नाही.

व्यंगचित्रांच्या इतिहासातील पुस्तकाचा हा दुवा उस्मानिया विद्यापीठाच्या डिजिटल लायब्ररीत उपलब्ध आहे.

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

रामचंद्र वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्‍लोज्ड सर्किट’, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध  झाल्‍या आहेत. त्‍यांचे ’महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

——————————————————————————————————————————————————————————————————————

 

 

 

————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here