झुंडी तंत्राने न्याय – भय संपलेले नाही!

1
41
_jhundi_tantrane_nyay

देशाचा कायदा, न्याय ह्याला न जुमानता कायदा हातात घेतला जातो; लोक गर्दी करतात आणि त्यांच्या विचारांच्या विरूद्ध वागत असलेल्या माणसाला मारहाण करतात किंवा जिवे मारतात. त्याला मॉब लिंचिंग म्हणतात. विचारांशी सहमत नसणाऱ्या  कोणाचीही दशा तशीच केली जाईल, असा संदेश अशा दुष्कृत्यांतून देशवासीयांत पसरवला जातो. ते विरोधी विचारांचे दमन असते. ती दहशत असते. भारत देशात तशा त्रेसष्ट घटना 2010 ते 2018 या वर्षांत झाल्या. त्यांत अठ्ठावीस लोक निरपराध मारले गेले. त्यांतील सत्याण्णव टक्के घटना मोदी सरकारच्या काळामध्ये घडल्या. गुन्ह्यांत मारल्या गेलेल्या अठ्ठावीस व्यक्तींपैकी चोवीस मुस्लिम आहेत. म्हणजे शहाऐंशी टक्के गुन्हे मुस्लिमांविरोधी आहेत.

‘लिंचिंग’ या शब्दाची उत्पत्ती विलियम लिंच या अमेरिकन व्यक्तीच्या नावापासून झाली. कॅप्टन विलियम लिंच याचा जन्म 1742 साली झाला आणि मृत्यू 1820 मध्ये झाला. त्याने स्वत: एक न्यायाधिकरण बनवले होते. विलियम लिंच कोणालाही कोणत्याही आरोपावरून, कोणाचीही बाजू ऐकून न घेता सर्वांसमोर मारून शिक्षा करत असे. त्या शिक्षेला अमेरिकेतील आफ्रिकी लोक मोठ्या प्रमाणात बळी पडले. त्याचे अनुकरण करून पुढे, त्याच्या मृत्यूनंतर,1882 ते 1968 या काळात साडेतीन हजार लोकांचे मृत्यू झाले. ते प्रमाण लक्षात घेऊन अमेरिकेत 1922 मध्ये ‘लिंचिंग विरोधी’ कायदा तयार करण्यात आला. भारतात मात्र तशा हत्या राजनैतिक स्वार्थासाठी सर्वसामान्य लोकांना जातीयवादाच्या नावाखाली भडकावून केल्या जातात. बिहारमध्ये कृष्णया गोपालगंज या तत्कालीन जिल्हा अधिकाऱ्याची हत्या दगड मारून १९९४ मध्ये करण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 मध्ये हजारो शिखांचे हत्याकांड लोकक्षोभातून झाले. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात घडलेल्या 2006 सालच्या ‘खैरलांजी हत्याकांडा’ने संपूर्ण महाराष्ट्राला घाबरून सोडले. नागलँडमधील एका आरोपीची हत्या सातशे लोकांनी कारागृहात जाऊन 2015 मध्ये केली. भारतात झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगली यांचासुद्धा ‘मॉब लिंचिंग’मध्ये समावेश आहे.

गुजरातमध्ये कोणाच्या फ्रीजमध्ये गाईचे मांस आहे असे समजले व म्हणून त्याला ठार मारले गेले. कोणी गाईचे मांस रेल्वेमध्ये बरोबर घेऊन चालला आहे असे समजून, त्याला गर्दी करून मारले गेले. वीस वर्षांचा सोराणपूरचा नोमान कोकरांना चोरून घेऊन जात आहे असे समजून त्याला मारले गेले. मजलून अन्सारी, इन्तारखान, दादरीमध्ये मोहम्मद अशांना, ते बीफ खातात अशा अफवेने मार्च 2016 मध्ये मारले गेले.

भारतात कोणीही व्यक्ती दुसऱ्या नागरिकाचे हक्क नि स्वातंत्र्य राज्यघटनेच्या एकविसाव्या कलमानुसार हिरावून घेऊ शकत नाही. संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने आणि आदराने जगण्याचा हक्क दिलेला आहे. कोणालाही कायदा हातात घेऊन, गर्दी करून मारण्याचा अधिकार नाही. त्यासाठी ‘नॉट इन माय नेम’ नावाची चळवळ देशात सुरू झाली. तेथे गाय स्वत: म्हणते, “माझ्या नावाने कोणाची हत्या करू नका, त्यासाठी माझे प्रतीक वापरू नका. मी प्लास्टिक खाऊन मरते, तेव्हा माझा तुम्हाला कळवळा येत नाही. मला पांजरपोळ्यात घास मिळत नाही, तेथे मी कुपोषणाने मरते, तेथेही मला कोणी गवत पुरवत नाही, तर मग माझ्या नावाने निरपराधांना कशाला मारता?” हा खडा सवाल खुद्द गोमातेचा मॉब लिंचिंगवाल्यांना आहे. गर्दीला चेहरा नसतो, त्यामुळे लिंचिंगच्या प्रकारात मारेकरी सहसा पकडले जात नाहीत. पण ती दहशत आहे, अराजक आहे. विरोधी विचार प्रतिवादाने निष्प्रभ करण्याऐवजी मृत्युदंडाने नष्ट करणे हे समाजात भीती निर्माण करण्यासाठी अंगीकारले जाते.

देशातील एक गट असे मानतो, की भारत हा देश हिंदूंचा आहे. जो माणूस हिंदूंचा धर्म पाळत नाही अशा अल्पसंख्य जनतेने देश सोडून जावे, नाहीतर स्थानिक कायदे पाळावेत. त्यामधून गाईला पवित्र देवता म्हणून पुजावे, श्रीरामाचा नामघोष करावा, देशातील प्राचीन उपासना पूजा, _khairlanjiकर्मकांड, श्रद्धा, चालीरीती इत्यादी अंगिकाराव्या-जोपासाव्या अशी मानसिकता तयार झाली आहे किंवा ती हेतूपूर्वक बनवली जात आहे. त्याकडे धर्माच्या नजरेने पाहिले तर ती चूक ठरेल. त्यात सामाजिक, आर्थिक नि राजकीय हितसंबंध दडले आहेत, जमिनीचे व्यवहार आहेत. भिवंडीची दंगल त्याला साक्ष आहे. दंगल झाली, ती वरवर धार्मिक भासवली गेली. वास्तवात दंगलीचा लाभ घेऊन स्थानिकांनी त्यांच्या जागा ज्यांना विकल्या होत्या, त्यांनी स्वत: त्यांच्या मालमत्ता जाळल्या आणि त्यांना नको त्या लोकांना हाकलून दिले. त्यामध्ये गावकऱ्यांनी त्यांचे हात सामाजिक आणि आर्थिक लाभासाठी धुऊन घेतले. ते गावकऱ्यांचे ‘मॉब लिंचिंग’ होते. राजकीय लोक त्यांची सत्तेची पोळी दोन समाजांत विभाजन करून त्या अग्निकुंडात भाजून घेतात व नकळत समर्थन लिंचिंगचे करतात.

फ्रेंच आणि रशियन राज्यक्रांतीनंतर उदयास आलेली काही मानवी मूल्ये भारतीय स्वीकारली आहेत. ती एका विशिष्ट गटाला पूर्वीपासून मान्य नव्हती. त्यातूनच गांधीहत्या घडली आहे. ‘मॉब लिंचिंग’च्या प्रवृत्तीतून तेच सद्यकालात स्पष्ट होत आहे आणि एककल्ली राज्यकारभारातून सूचित होत आहे. मानवतेची मूल्ये सनातनी प्रवृत्तीला मान्य नाहीत. त्यांच्या मते, संविधानाने त्या मूल्यांआधारे अल्पसंख्याकांचे भरपूर लाड पुरवले आहेत. परंतु मूळ देशवासीयांवर त्यामुळे अन्याय झाला आहे, तर दुसरीकडे अल्पसंख्याक त्यांना संविधानाने हक्क दिलेले असूनही त्यांच्यावर अन्याय-अत्याचार होतात म्हणून नाराज आहे व ते घाबरून राहतात.

केंद्रात सत्तेवर असलेला पक्ष आणि राज्यात सत्तेवर असलेला दुसऱ्या विचाराचा पक्ष यांच्यामध्ये बेबनाव दिसतो. लिंचिंगचे प्रकरण घडले की केंद्र सरकार स्वत:ची जबाबदारी, त्या घटनेची जबाबदारी राज्य सरकारची आहे असे सांगून झटकते; तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी म्हणतात, ‘केंद्रातील सत्तेवरील पक्ष देशात अशी विभागणी व्हावी म्हणून जाणीवपूर्वक प्रोत्साहन देत आहे आणि त्या कृष्णकृत्यातूनच मॉब लिंचिंगची प्रकरणे सनातन्यांच्या आशीर्वादाने घडतात, अंगवळणी पडतात. निरपराध जनता मात्र दोघांच्या अशा परस्परविरोधी दाव्यांमुळे भरडली जात आहे; दहशतीत आणि भीतीत जीवन जगत आहे, प्राण गमावत आहे.

दहशतवादी आणि नक्षलवादी यांच्याकडून होणाऱ्या हत्या आणि ‘मॉब लिंचिंग’मध्ये होणाऱ्या हत्या यांना एका मापाने मोजता येणार नाही. दहशतवादी हे एका विशिष्ट ध्येयासाठी हत्या करत असतात. ‘मॉब लिंचिंग’मध्ये मात्र एक-दोघांच्या कर्मठ धर्मांधतेमुळे हल्ले होत नाहीत. तेथे त्यांचे वैयक्तिक हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे दहशतवादी-नक्षलवादी हत्या करतात, तेव्हा पुरोगामी गप्प असतात आणि तेच लोक ‘मॉब लिंचिंग’ हत्येचा निषेध करतात, असा दुट्टपीपणा का? हा यावरचा तर्क, युक्तिवाद होऊ शकत नाही.

‘मॉब लिंचिंग’सारख्या निर्घृण हत्येवेळी गप्प राहणे, चूप बसणे म्हणजे त्यास मूक संमती दर्शवणे होय. कालांतराने, इतर हत्यांप्रमाणे त्याची सवय होऊन समाज असंवेदनाशील, बधिर होऊन जाईल. परंतु जागरूक नागरिकांनी, प्रकरण तोपर्यंत त्यांच्या दारात येऊन ठेपलेले असेल हे लक्षात घेण्यास हवे. ‘मॉब लिंचिंग’ला खतपाणी घालणारी दुसरी यंत्रणा म्हणजे अफवांचे संदेश आणि पेड न्यूज. युरोप-अमेरिकेसारखी भारतीय संचार यंत्रणा अद्ययावत आणि सुसज्ज नसल्याने अफवा पसरवणाऱ्यांना पकडणे कठीण होऊन जाते. अशा न्यूज/अफवा अशिक्षितांच्या अज्ञानाचा लाभ घेऊन त्यांना खेडोपाडी एकमेकांविरूद्ध भडकावत असतात; दंगली, ‘लिंचिंग’ प्रकरणे घडवून आणतात. पुरुषप्रधान शक्ती स्त्रियांवर अन्याय करून त्यांच्या हत्या बलात्कार आणि लिंचिंग यांमध्ये घडवून आणते. वरवर बलात्कार वाटणाऱ्या घटना जातीच्या वर्चस्वासाठी घडवून आणल्या जातात. तेथे लैंगिक शोषण नसते तर जातीचे शोषण करण्याचा कूट हेतू असतो. व्यक्तींकडून त्यांच्या वर्चस्वासाठी तशा घटना घडवून आणल्या जातात.
सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एक आमदार बलात्कार करतो, गोष्ट तेथे संपत नाही.

_not_in_my_nameराजकारण्यांच्या दबावाखाली तक्रार घेण्यास पोलिस तयार होत नाहीत, म्हणून मुलीचे नातेवाईक न्यायालयात जातात, गोष्ट तेथे संपत नाही.

झालेल्या प्रकाराने वैतागून पीडित मुलगी मुख्यमंत्री निवासासमोर आत्महत्येचा प्रयत्न करते; दुर्दैवाने, गोष्ट तेथेही संपत नाही.

पीडित मुलीची कार एक ट्रक उडवतो, त्यात तिचे दोन नातेवाईक मृत्युमुखी पडतात, पीडित मुलगी आणि तिचे वकील गंभीर जखमी होतात; गोष्ट तेथेही संपत नाही.

सर्व भारतीय नागरिकांच्या दुर्दैवाने गोष्ट अजूनही संपलेली नाही आणि भयदेखील संपलेले नाही. ‘मॉब लिंचिंग’शिवाय आमदाराला पर्याय नाही!
कधी थांबणार हे सगळं…!

– वेन्सी डिमेलो 9922200330
vencydmello@gmail.com
 

About Post Author

1 COMMENT

  1. लेख अभ्यासपूर्ण आणि वाचनीय…
    लेख अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहे. तार्कीक मांडणी आणि ओघवती भाषा. एकूण लेख अप्रतिम. त्रिवार अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा !

Comments are closed.