झाडीपट्टी रंगभूमी अजूनही चैतन्यमय (Vidharbha’s Folk Theatre Still Lively)

1
166

 

झाडीपट्टी रंगभूमीला एकशेबत्तीस वर्षें पूर्ण झाली आहेत. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांचीझाडीपट्टीम्हणून ओळख आहे. त्या प्रदेशांत हिरव्याकंच झाडीने, जंगलांनी व्याप्त निसर्गाची लयलूट आहे. त्या भूभागाला ब्रिटिश काळात झाडीमंडळअसे संबोधले जाई. तेथे थकल्या-भागल्या जिवाला विरंगुळा, करमणूक यांचे साधन म्हणून लोककला सादर केल्या जात होत्या. त्यांना डाहाका, खडीगंमत, भारूड, कथासार गोंधळ, रामायणी पोवाडे, दंडार अशी विविध नावांनी ओळखले जाई. त्यांचे आयोजन सण, उत्सव, जत्रा या निमित्ताने होई; कधी हौशीनेही केले जाई. त्यात दंडार हे लोकनाट्य महत्त्वाचे. दंडारीच्या निमित्ताने रात्री दहा वाजता सुरू झालेली करमणूक पहाटेपर्यंत चालत असे. दंडार हा प्रकार रामायण-महाभारत काळातील पात्रांना आणि कथानकाला घेऊन, त्याला विनोदाची झालर चढवत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असे. दंडार मंडळे श्रीमंत पाटलांची असत. ती नेपथ्य, वेषभूषा, आभूषण याशिवाय बराच लवाजमा असलेली, सुसज्ज अशी असत. नानाजी जोशी आणि भाऊजी जोशी ही दंडार मंडळातील हौशी नटमंडळी नवरगावला वास्तव्याला होती. त्यांना त्यांच्या आयुष्यात 1886 मध्ये वेगळेच काहीतरी पाहण्याचा प्रसंग आला आणि झाडीपट्टी रंगभूमीचा इतिहास घडला!
          सांगलीकर मंडळींचे संगीत सौभद्रहे नाटक 1886 मध्ये नागपूरला आले होते. त्याचे प्रयोग पंधरा-वीस दिवस सातत्याने तेथे होत राहिले. जोशी बंधू कामानिमित्त त्याचवेळी नागपूरला होते. त्यांनी चला, बघून तर घेऊअसे म्हणत नाटक बघितले. त्यांना त्या नाटकातील संगीत आणि नेपथ्य बघितल्यावर हे सगळे तर आपल्याकडेही आहेअसे वाटले. त्यांनी नवरगावच्या दंडार मंडळातील लोकांनी ते बघायला पाहिजे; या भावनेने, गावी परतून मंडळात चर्चा केली. बालाजी पाटील बोरकर यांचे वडील, जोशी बंधू आणि इतर आख्खे दंडारमंडळ नाटक बघण्यास नागपूरला दाखल झाले. सर्वांनाच अप्रूप वाटले. पण त्यांचा आत्मविश्वासही नाटक पाहून वाढला. त्यांच्या ध्यानी आले, की ‘हे तर सगळं आपण करतोय तेच आहे, फक्त थोडे शिस्तबद्ध हवे’. म्हणून त्यांनी त्यांचे व्यंकटेश प्रासादिक नाट्यमंडळस्थापन केले. त्यांनी तीन महिने तालमी करून संगीत सौभद्रनाटकाचा पहिला प्रयोग चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव या गावात 16 जानेवारी1887 ला सादर केला. तेव्हापासून व्यंकटेश प्रासादिक नाट्यमंडळाची 16 जानेवारीला नवनवीन नाट्यप्रयोग करण्याची परंपरा आजतागायत कायम आहे!
            पण अशा पद्धतीचे स्वतंत्र नाटक सादर करणे दंडारप्रेमी नाट्यरसिकांना गावगाड्यात रूचले नाही. पुढे नवरगावातील नाटकांचा परिसरात बोलबाला होऊ लागला आणि गावोगावच्या दंडारीमध्येच छापील नाटकाचा एखादा अंक मध्यंतरात सादर केला जाऊ लागला. प्रेक्षकांना दंडारीमध्ये नाटकही कल्पना आवडू लागली. काही जमीनदार, मोडकळीस आलेल्या संस्थानांचे राजे, श्रीमंत पाटील अशी मंडळी व्यावसायिक नाटकांचे आयोजन करू लागली. नाटकांची ओळख अहेरी, गडचिरोली, तुमसर, भंडारा, पवनी, वरोरा, वणी आदी, मोठ्या बाजारपेठा असणाऱ्या नगरांना होत गेली. हळुहळू नाटकांना लोकाश्रय वाढून दंडारी मागे पडू लागल्या. नाटकांना दिवस चांगले येऊ लागले.
         महाराष्ट्रात नाट्यकला अस्ताला जाते की काय अशी भीती 1920 च्या आसपास वाटू लागली होती. नाटक मंडळींना नाटकांचा खर्च चालवणेही कठीण झाले होते. सिनेमा आल्याने परिस्थिती 1935 नंतर आणखी बिकट झाली, पण तशाही अवस्थेत झाडीपट्टीरंगभूमीला मात्र चांगले दिवस होते. कारण त्या रंगभूमीला परंपरागत असा ग्रामीण प्रेक्षकवर्ग कायम लाभला होता. गावातील जत्रेला पंचक्रोशीतील मंडळी छकडा, रेंगी, खासर, बैलगाडी जुंपून दाखल होत. जत्रा, बैलांच्या शर्यतीचे शंकरपट, एकनाथी भागवत सप्ताह असे कार्यक्रम दिवसभर चालत असत. ते पाहून लोकं रात्री पुन्हा उशिरापर्यंत चालणाऱ्या नाटकांचाही आस्वाद घेत.
          पवनीच्या झोलबाजी पाटील राऊत यांनी संत दामाजीया नाटकाचे ओळीने चार प्रयोग 1920 मध्ये केले. भंडाऱ्याच्या उस्मान शेख या रॉकेल व्यापाऱ्याने त्याच मंडळींना हौशीखातर भंडाऱ्यात प्रयोग करण्यास लावून पुढे झाडीपट्टी रंगभूमीवरील त्या नाटकाला नागपुरात आलेल्या महाराष्ट्रातील नाट्यमंडळांच्या इतर कलावंतांसमोर सादर करण्याची संधी मिळवून दिली. त्या निमित्ताने, महाराष्ट्रातील इतर नाट्यकर्मींना झाडीपट्टी रंगभूमीची, कलावंतांची ओळख झाली. झोलबाजी पाटील राऊत यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे खरा ब्राह्मणहे नाटक पुढे चार-पाच वर्षांनी बसवले. त्याचे चार-पाच प्रयोगही पवनीत झाले. पुढे, भंडारा येथील पांडे यांच्या वाड्यालगत सलग पंधरा दिवस त्या नाटकाचे प्रयोग झाले. तो झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांच्या दृष्टीने विक्रमच होय.
        

ब्रिटिशांच्या सोशल क्लबचा रौप्य महोत्सवी सोहळा विदर्भात साकोलीला 1936 साली आयोजित करण्यात आला होता. दंडार आणि नाटक हीच त्या काळची करमणुकीची साधने होती. त्यातही पुण्या-मुंबईची व्यावसायिक नाटक मंडळे मोडकळीस आली होती. तेव्हा नवेगाव बांधच्या सीताराम पाटील डोंगरवार यांना नाटक सादर करण्याविषयी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विचारणा केली. परंतु सीताराम पाटील यांनी वाहतूक व्यवस्थेच्या अभावी नाटकाचा सगळा लवाजमा तेथे नेता येणे शक्य नसल्याने असमर्थता दर्शवली. तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चांदाफोर्ट (चंद्रपूर) ते गोंदिया चालणारी नॅरोगेजही ट्रेन केवळ नाटक मंडळींच्या सोयीसाठी सलगसौंदड ते नवेगाव बांधच्या फेऱ्या करण्यासाठी उपलब्ध करून दिली होती! बाकी सर्व स्टेशने वगळण्याची सूचना ट्रेनला दिली आणि ‘सिंहाचा छावा’ नाटकाचा ब्रिटिशांनी आस्वाद घेतला.
            झाडीपट्टीतील नवरगावच्या रंगमंचावर काम करणारी अनेक कलावंत मंडळी संघविचारांची होती. भारतात 1975 साली आणीबाणी लागू झाल्याने झाडीपट्टी रंगभूमीच्या त्या नाटकमंडळींना नाशिकच्या तुरूंगात डांबण्यात आले होते. त्या नाटकाचा वर्धापनदिन 16 जानेवारी हा त्यांना तुरूंगात डांबल्यामुळे चुकतो की काय अशी भीती त्यांनाच वाटू लागली. पण त्यांनी तुरूंग अधिकाऱ्यांची परवानगी मिळवली. चादरी, ब्लँकेट या साहित्याच्या आधारे नेपथ्य उभारून नाटकाचे यशस्वी सादरीकरण केले. विंगमधील कैद्यांना नाटक आवडले. नाटकाची चर्चा सकाळी आपापसांत होऊ लागली. इतरही बरॅकमधील कैद्यांनी तुरूंगाधिकाऱ्यांकडे नाटकाची आवड व्यक्त केली. मग काय, एकेक म्हणता चारही बरॅकमध्ये इथे ओशाळला मृत्यूया नाटकाचे चार प्रयोग करण्यात आले!
          पुणे-मुंबई येथील नाटककारांची नाटके झाडीपट्टी रंगभूमीवर 1975 पर्यंत सादर होत होती. त्यानंतर कोकण, परळ, गिरणगाव येथील लेखकांची नाटके करण्याचा ट्रेंड झाडीपट्टीत आला. झाडीपट्टी म्हणजे कोकणाशी साधर्म्य असणारा भातशेतीचा परिसर, दोन्हीकडील जनजीवन जवळपास सारखे. त्यामुळे त्या नाटकांशी प्रेक्षकांची जवळीक निर्माण झाली. 1984 नंतर दूरदर्शनवर मालिका आल्या. त्या पाहून तशा प्रकारचे लेखन तेथील बोलीभाषेतही केले पाहिजे अशी ईर्षा स्थानिकांची जागी होऊन झाडीपट्टीतील लेखक नव्या नाट्यसंहिता लिहू लागले. कुरखेडा येथील विठ्ठल पाकलवार यांनी नरबळीया सत्यघटनेवर आधारित मरीमाईचा भुत्याहे वास्तववादी नाटक लिहून सादर केले. समाजजीवनाचे ज्वलंत चित्रण तशा पद्धतीने सादर व्हावे हे त्या परिसरातील काही बड्या राजकीय मंडळींना रुचले नाही. त्यांनी ते नाटक अश्लील असून, त्यावर बंदी आणावी याकरता न्यायालयात धाव घेतली. कुरखेड्याच्या न्यायालयाने नाट्यसंहिता तपासली. त्यांना त्यात अश्लील असे काहीही आढळून आले नाही. त्यावर, ‘नाटकाची संहिता नाही तर सादरीकरण अश्लील आहेअसे सांगण्यात आले. तेव्हा न्यायाधीशांनी त्या नाटकाचा प्रयोग चक्क न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला! न्यायाधीशांनी नाटक पाहिल्यानंतर त्यात सगळे वास्तववादी असून प्रयोग सादर करण्यास काहीही हरकत नाहीअसा निर्वाळा दिला. पुढे त्या नाटकाचे झाडीपट्टी रंगभूमीवर विक्रमी असे साडेचारशेच्या वर प्रयोग झाले आणि नाटक लोकांच्या चर्चेचा विषय ठरला.
         गोविंदराव मुनघाटे गुरूजींनी लिहिलेल्या संगीत खेड्यातील माणसंया नाटकाचा तिकिटाचा प्रयोग आरमोरी येथे 26 फेबृवारी 1960 ला करण्यात आला. झाडीपट्टीतील लेखकाने लिहिलेले ते पहिले नाटक रंगमंचावर सादर झाले. ती ऐतिहासिक महत्त्वाची घटना ठरली. त्यानंतर हरिश्चंद्र बोरकर यांची ही तुळस माझीया द्वारी’, ‘अग्निपरीक्षा’, ‘सतीची सत्त्वपरीक्षा; सदानंद बोरकर यांची माझं कुंकू मीच पुसलं’, ‘आत्महत्या; विनोद मोरांडे यांचे नक्षल जीवनावर आधारितबुरख्यातील माणसं’, दिलीप वढे यांचे वंदे मातरम’, गणपतराव वडपल्लीवार यांचे मातामाईचा मुंज्याअशी वास्तववादी नाटके सादर झाली. मातामाईचा मुंज्याहे ग्रामीण जीवनातील अंधश्रद्धा, बुवाबाजी व इतर ज्वलंत समस्या यांचा वेध घेते. पुरूषोत्तम शेडमाके लिखित शहीद रणसूर्य बाबूराव शेडमाके’, बा.ल. मेश्राम यांचे जातीच्या नावावर’, चुडाराम बल्लारपुरे यांचे स्पेशल रिपोर्टयांसारखी वास्तववादी आणि समाजाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी काही नाटके झाडीपट्टी रंगभूमीवर ओळीने अवतरली.
          चुडाराम बल्लारपुरे यांचे स्पेशल रिपोर्टहे कॉर्पोरेट जीवनावरील वास्तववादी असे पहिले नाटक. ते त्रिदलया मुंबईच्या प्रकाशनाने प्रकाशित केले आणि मुंबईच्या कलावंतांनी नागर रंगभूमीवरही सादर केले. तो झाडीपट्टी रंगभूमीचा सन्मानच समजावा लागेल. त्यानंतर त्या परिसरातील लेखकांची काही नाटके प्रकाशित झाली. चुडाराम बल्लारपुरे यांचेमहामृत्युंजय मार्कंडेश्वरहे नाटक एकावन्न कलावंतांनी सादर केले आणि ते झाडीपट्टी रंगभूमीवरील महानाट्य ठरले! त्यांचेच दगाबाजहे सत्य घटनेवर आधारित नाटक आहे. त्यांचे बहुढंगी समाधीवाले बाबाहे नाटकही वास्तववादी असल्यामुळे झाडीपट्टीत खूप गाजले. पुढील काळात अनेक नवे लेखक, लेखिका लिहीते झाले. नवे विषय, नाविन्यपूर्ण सादरीकरण, चतुरस्त्र अभिनय, दिलखेचक नृत्ये आणि बहारदार संगीत यामुळे ती नाटके झाडीपट्टी रंगभूमीवर तुफान गाजली.
            झाडीपट्टी रंगभूमीवर नाटकांचा सीझन साधारणतः भाऊबीज ते महाशिवरात्री/होळीपर्यंत चालू असतो. शहरी रंगभूमीला मिळणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग झाडीपट्टी रंगभूमीला लाभलेला आहे. पी.साईनाथ यांनी 2012 मध्ये झाडीपट्टी रंगभूमीचा सर्व्हे केला. तेव्हा त्यांनी येथे साठ-पासष्ट कोटींची वार्षिक उलाढाल होते असे नमूद केले आहे. परंतु ती वार्षिक उलाढाल मात्र सव्वाशे कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोचली आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या व्यावसायिक कलाकारांना झाडीपट्टी रंगभूमीबद्दल कुतूहल वाटते.
           

झाडीपट्टी रंगभूमी अनेक वर्षांच्या संक्रमणातून समृद्ध होत गेली आहे. झाडीपट्टीच्या नाटकांची राजधानी ठरलेल्या वडसाजवळील कुरूडया पाच हजार लोकवस्ती असलेल्या गावात बैलांच्या जंगी शंकरपटाच्या निमित्ताने एकारात्री तब्बल आठ-दहा नाटके हाऊसफुल्लहोतात. लग्नानंतर बाहेरगावी गेलेल्या मुली त्यानिमित्ताने सणावाराला येतात. लग्न जुळवण्यासाठी काही पाहुणे मंडळीही येत असतात. शेतीभातीतून मोकळा झालेला कास्तकार(शेतकरी), मजूरवर्ग त्यांच्या जिवाची हौसमौजकरण्याची संधी त्यात पाहतो. गरिबीतहीरसिकमनाच्या मोठेपणालाआणि पाहुण्यांना नाटक दाखवण्याच्या हौसेला पर्याय नाही. जत्रेचे स्वरूप आजच्या काळात ओसरले आहे. शंकरपटांवर बंदी आली असली तरी नाटकांची रेलचेल कमी झालेली नाही. झाडीपट्टीच्या हौशी आणि व्यावसायिक नाटकांतील गाण्यांना आणि अभिनयाला इंटरनेटच्या काळातही आनंदाने हंस-मोर’ (वन्स मोअर) अशी दाद देणाऱ्या प्रेक्षकांची कमी नाही.
            अनेक नाट्यकर्मींनी त्यांच्या अभिनयाने झाडीपट्टी रंगभूमीला शिखरावर नेऊन ठेवले आहे. कसदार अभिनयाचे नट झाडीपट्टी रंगभूमीने दिले आहेत. झाडीपट्टीतील हौषी कलावंत गावात नाटक बसवतात. नव्या तरूणांना, मुलांना, मुलींना अभिनयाची, वादकांना वाजवण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यातील कलागुणांचा विकास होतो. त्यामुळे गावागावात उत्तम कलावंत घडण्याची प्रक्रिया सुरू राहते. त्यातून नावारूपाला आलेले कलावंत पुढे झाडीपट्टीच्या व्यायसायिक नाट्यमंडळांतून भूमिका करतात.
         

          झाडीपट्टी रंगभूमीवर 1965-70 च्या काळात तिकिटाची नाटके सादर करण्याचा प्रघात सुरू झाला. सिनेमाप्रमाणेच नाटकातील स्त्री भूमिका स्त्रियांनीच कराव्या असा रसिकांचा आग्रह वाढू लागला. तेव्हा नागपूर-पुणे-मुंबई येथील नाट्यअभिनेत्रींना पाचारण केले जाऊ लागले. डाकूजीवनावरील व तमाशाप्रधान नाटकांत (1975च्या सुमारास) नागपूरच्या नृत्यागनांनाच बोलवावे लागायचे. त्या नृत्यांगनांनी झाडीपट्टी रंगभूमीवर संगीताचा साज चढवला. तबल्याचा ठेका, नृत्यांगनांचा ठसका आणि उडत्या चालीच्या लावण्या यांमुळे नाटकांची आवड वृध्दिंगत होऊन झाडीपट्टी रंगभूमी गर्दी खेचू लागली. त्यानंतर झाडीपट्टीतील नृत्यांगना पुढे येत व्यावसायिक नाटकांमधून त्यांच्या अभिनयाचा, नृत्याचा, गायनाचा साज चढवू लागल्या. झाडीपट्टीतील मुली पाचसात वर्षातच नाटकातून कामे करू लागल्या. यामुळे स्त्रिया-मुलींमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण होऊन संपूर्ण स्त्रीसंचात नाटक करण्याचा कल वाढू लागला. स्त्रियांची नाटके स्नेहसंमेलने, दुर्गोत्सव, शारदोत्सव, भाऊबीज यानिमित्तांनी होऊ लागली.
            आज, वडसा येथे पंचावन्न नाट्यमंडळे कार्यरत आहेत, गावात हौशी नाट्यमंडळे आहेत. म्हणूनच नाटकाच्या सीझनमध्ये रोज शंभर ते सव्वाशे नाटके केवळ पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांत होतात. अनेकांना रोजगार मिळतो. सर्वांचे मनोरंजन व प्रबोधन होते. नाट्यक्षेत्रातील ही घटना जणू लोकचळवळ होऊन गेली आहे.
 (‘सृजन-चंद्रपूरच्या व्यासपीठावर झाडीपट्टी रंगभूमीचे रंगकर्मी, अभ्यासक प्रा.श्याम मोहरकर यांच्या मुलाखतीआधारे. त्यांच्याच झाडीपट्टी रंगभूमीची शतकोत्तर वाटचालझाडीपट्टी रंगभूमी – आकलन आणि आस्वादया दोन पुस्तकांचा लेखन करताना उपयोग झाला.)
प्रा. डॉ. श्याम मोहरकर – 9422909880
शब्दांकन – गोपाल शिरपूरकर 7972715904
गोपाल शिरपूरकर हे चंद्रपूरला राहतात. त्यांचे एम. ए. पर्यंतचे शिक्षण झाले आहे. ते पेशाने शिक्षक आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा आणि कविता प्रसिध्द आहेत. ते विविध वर्तमानपत्रांतून लेखन करत असतात.
——————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. आपण झाडीपट्टी नाट्यरंगभूमीची वाटचाल अतिशय सविस्तर मांडली खूप छान लेख ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here