इंटरनेटवरचा ज्ञानप्रलय अटळ आहे. त्यात हरवून जाण्याचा धोका ही प्रत्येकावरची टांगती तलवार आहे. आजमितीस आपण अनुभवत आहोत त्या ज्ञानप्रलयातील मिनी गटांगळ्या ! मेगा गटांगळ्या आणखी पाच वर्षांनी आपण अनुभवणार आहोत. त्या नंतरच्या भविष्यकाळात मात्र सिगारेटच्या पाकिटावर असतो तसा वैधानिक इशारा आपल्याला प्रत्येक मॉनिटर स्क्रीनच्या भाळी कोरलेला दिसणार आहे. तो कदाचित असा असेल: ज्ञानप्रलय धोकादायक आहे.
ज्ञानप्रलयातील गटांगळ्या
– माधव शिरवळकर
मराठीत ‘ वयात येणं ‘ हा वाक्प्रचार विशिष्ट स्थितीत वापरण्याचा प्रघात आहे. ‘मराठी नाटक वयात आलं’ हे त्या वापराचं एक उदाहरण. त्या धर्तीवर अजून ‘ इंटरनेट वयात आलं ‘ अशा प्रकारची चर्चा ऐकू आलेली नाही. याचा दुसरा अर्थ असा, की इंटरनेटला ‘ वयात यायला’ अजून अवकाश आहे. आजही इंटरनेटचा विषय निघाला की एक विचारप्रवाह त्याचं ग्रामीण भागातलं अस्तित्व (भारतात तरी) नगण्य आहे आणि ते वाढायला हवं असं ठासून मांडतो. त्या दृष्टीनं ब्रॉडबँडच्या सोयी वाढायला हव्यात आणि त्याचे दर कमी व्हायला हवेत ही त्या प्रतिपादनातील पुढली मागणी असते. इंटरनेटची उपयुक्तता आणि एक ज्ञानस्रोत म्हणून त्याचं महत्त्व- ग्रंथ हे जसं ज्ञानाचं वाहक माध्यम आहे, तसं इंटरनेट हेही ज्ञानाचं वाहक माध्यम आहे ही बाब- सर्व स्तरांवर मान्य झालं आहे. खरं तर, हे मान्य झाल्यालाही बराच काळ लोटला आहे. आपण एव्हाना इ लायब्ररीच्या संकल्पनेपर्यंत आणि नजिकच्या काळात तिच्या अंमलबजावणीपर्यंत पोचलोही आहोत.
कालचे ज्ञानस्रोत
इंटरनेट येण्यापूर्वीचं ज्ञानविश्व मुख्यत्वे ग्रंथांमध्ये आणि ग्रंथालयांच्या दालनामध्ये वसलेलं होतं. माणसाचा मेंदू आणि त्या मेंदूत ग्रंथांच्या वाचनातून जमा झालेला ज्ञानसंचय यावर विद्वत्तेचं प्रमाण आधारलेलं असायचं. दांडग्या वाचनावर विद्वत्तेचा विकास अवलंबून असायचा. ग्रंथांच्या जोडीला पुढे आकाशवाणी, ऑडिओ-व्हिडिओ टेप्स किंवा कॅसेट्स, चित्रपट यांसारखी माध्यमं उपलब्ध झाली तरी ज्ञानविश्वाचा आधार हा छापील शब्दांच्या वाचनावर आणि त्यातही मुख्यत्वे ग्रंथांवर राहिला. ग्रंथालयांची वाढ आणि विकास त्यामुळे आपोआप होत राहिले. विद्वानांना भेटायचं असेल तर त्यांची वाट ग्रंथालयांच्या पायर्यांवर बसून पाहायची हे ठरून गेलं होतं.
ग्रंथांचं वाचन आणि त्यातून मिळणारं ज्ञान यांची काही निश्चित बलस्थानं आहेत आणि काही मर्यादाही. हवा तो संदर्भ नेमक्या कोणत्या ग्रंथात आहे आणि त्या ग्रंथातल्या नेमक्या कोणत्या पृष्ठावर आहे हे शोधण्यात विद्वानांचे शेकडो तास खर्ची पडत असत. हे खर्ची पडणारे तास ही एकीकडे मर्यादा होती, तर दुसरीकडे ते बलस्थान होतं. मर्यादा अशासाठी की अमुक तासांमध्ये एकूण किती उपयुक्त संदर्भ शोधले जातील हे सांगणं अवघड असे. ग्रंथालयात वीस वीस तास ठिय्या देऊन बसावं तेव्हा थोडं काहीतरी हाती लागे. पण त्यातली जमेची बाजू ही असे, की संदर्भ शोधताना डोक्यात विचारांची गर्दी आणि गोंधळ होत नसे. अभ्यासाचा हा व्यवहार विशिष्ट दिशेनं आणि शांत, एकाग्रचित्तानं चालत असे. एक पुस्तक बाजूस ठेवून दुसरं घेताना दरम्यानचा काळ हा आपोआप बौद्धिक विश्रामाचा (Rest pauses) असे. अशा प्रकारच्या रेस्ट पॉजेसमुळे पुस्तकांच्या सहवासात सातत्यानं तासन् तास राहूनही मेंदूत गोंधळ निर्माण होत नसे वा मानसिक थकवाही येत नसे. उलट, ते स्वत:लाच झालेल्या ज्ञान साक्षात्काराचे समाधानाचे क्षण असत. संदर्भासाठी पुस्तक हाती घेतलं की ते चाळण्यासाठी, वाचनासाठी विशिष्ट वेळ मिळायचा. हाती घेतलेल्या पुस्तकात दुसर्या एखाद्या पुस्तकाचा संदर्भ आला तर तात्काळ हातातलं पुस्तक बाजूस ठेवून त्या पुस्तकात डोकं घालण्यापेक्षा, वहीत त्या दुसर्या पुस्तकाची नोंद केली जायची. हातातलं पुस्तक पूर्ण होत आलं की मग त्या पुस्तकाकडे वळायचं अशी सामान्यतः पद्धत असे. अधीर होऊन ते दुसरं पुस्तक तात्काळ हातात घेण्याची अतीव इच्छा झाली तरी किमान ‘ रेस्ट पॉज ‘ अपरिहार्य असे. हातातलं पुस्तक बंद करून बाजूस ठेवणं आणि दुसरं हातात घेऊन उघडणं ह्यांमधल्या वेळात माणसाचा विश्राम होई. जिने चढताना दम लागल्यावर आपण एखाद्या पायरीवर थांबतो आणि मग पुन्हा पुढे चालू लागतो अशा प्रकारची मेंदूची ती विश्रांती असे.
ही बाब थोडी आणखी स्पष्ट करण्यासाठी आपण ‘एनसायक्लोपेडिया ब्रिटानिका’चं उदाहरण घेऊ. Anything and everything under the sun is available in Britannica असं ‘ब्रिटानिका’चं वर्णन केलं जातं, आणि त्यात तथ्य आहे. ‘ब्रिटानिका’चे प्रत्येकी सुमारे एक हजार पानांचे तीस खंड, त्यातील रंगीत छायाचित्रं, नकाशे, आकृती, रेखाचित्रं आणि त्यांच्या आजुबाजूस पसरलेलं अफाट ज्ञान पाहायला आकर्षक वाटे. त्यातल्या ज्ञानाचा खजिना पाहून अचंबा वाटे. छापील कोशांमध्ये त्यांतील माहिती अकारविल्हे असल्यानं एका विशिष्ट विषयावरचे लेख एकत्र मिळत नसत. त्यासाठी शेकडो पानांची Index शीर्षकाखाली पसरलेली यादी धुंडाळावी लागे. पानांवर पाने उलटावी लागत. ते काम जिकिरीचं असे. पण त्यात आनंद वाटे आणि एकाग्रता साधली जाई. एखादा लेख वाचता वाचताही इतर अनेक लेखांच्या संदर्भांचे शब्द अधोरेखित केलेले किंवा ठळक वा तिरके करून दाखवलेले असत. उदाहरणार्थ Shivaji (Indian king) हा ‘ब्रिटानिका’ तील लेख वा नोंद घ्या. ह्या लेखातलं पहिलं वाक्य Indian king (reigned 1674–80), founder of the Maratha kingdom of India हे आहे. त्यातले Maratha आणि India हे दोन शब्द ठळक आहेत. याचा अर्थ त्या विषयांवर स्वतंत्र नोंदी ‘ब्रिटानिका’च्या संबंधित खंडात आहेत हे लक्षात यायचं. वाचताना Shivaji ही नोंद अर्धवट सोडून Maratha ही नोंद वाचण्याचा मोह अनावर झाला तरी ते सहज शक्य नसे. हातातला खंड बाजूस ठेवायचा आणि मग ज्यात ती Maratha नोंद आहे तो खंड हातात घ्यायचा. या दोन क्रियांमध्ये मोकळे काही क्षण जात. वाचक त्या अवधीत ज्ञानाच्या नशेतून भानावर येई. आपण Shivaji ही नोंद वाचत होतो आणि त्या अनुषंगाने पुढे Maratha ही नोंद वाचण्यासाठी दुसरा खंड हातात घेतोय याचं भान शाबूत असे. एकीकडे जो अभ्यास करायचा आहे तो आपण सोडत आहोत याबद्दलची हुरहूर तर दुसरीकडे नवीन नोंदीत काय ज्ञान लपलं असेल याचं आकर्षण. वाचता वाचता किती वेळा ह्या खंडातून त्या खंडात किंवा ह्या ग्रंथातून त्या ग्रंथात उड्या मारणार याला मात्र मर्यादा असे. त्यामुळे ज्ञानप्राशन करता करता विषयांने झपाटून गेला अशी मनोवस्था जरूर होई, पण विषयाचे पाय जमिनीवर स्थिर असत. ज्ञानार्जन करता करता आपला नेमका विषय काय होता, आपण काय करत होतो, कुठे होतो, आता कुठे आलो याचा गोंधळ उडत नसे.
इंटरनेट नावाचा राक्षसी ज्ञानदूत
ज्योतिषात मनुष्य, देव आणि राक्षस असे तीन गण आहेत. माणसाचा स्वभाव पाहून आपण ‘ तू राक्षसगणाचा आहेस का रे ‘ असं गंमतीनं विचारतो. त्या पार्श्वभूमीवर ग्रंथ हे मनुष्यगणाचे मानायला हवेत. माणसाच्या क्षमतांशी जुळवून घेऊन त्याला सोसेल अशा पद्धतीनं ज्ञान देणं हा ग्रंथांचा स्वभाव आणि हे त्यांचं वैशिष्ट्य. पण त्या तुलनेत इंटरनेट हे मात्र मनुष्यगणाचं नाही. ते क्षणात राक्षसगणाचं आणि क्षणात देवगणाचं अशा अस्थिर स्वभावाचं. कित्येकदा, माणसाच्या ज्ञानार्जनाच्या क्षमतांचा पूर्ण आणि सहज फज्जा उडवणारं.
इंटरनेटच्या राक्षसगणाचा आणि देवगणाचा मुद्दा एक उदाहरण घेऊन समजावून घेऊ. समजा, Shivaji (Indian king) हा संदर्भ आपण Google वर शोधत आहोत. एंटर बटण दाबताच ०.२३ सेकंदात आपल्याला साडेतीन लाख रिझल्टस असल्याचं दिसतं. त्यातल्या पहिल्या दहा रिझल्टसमध्ये Wikipedia आणि Britannica ह्या दोन ज्ञानकोशांतील लेखांचा समावेश आहे. आणि पुढे अगणित ब्लॉग्ज, संकेतस्थळं, ऑनलाईन इबुक्स इत्यादींचा समावेश आहे. पाव सेकंदात साडेतीन लाख संदर्भ हजर करणारं इंटरनेट राक्षसी कृती करणारं आहे यात शंका नाही. मात्र जगात कुठेही असताना लॅपटॉपवर अथवा नजिकच्या कोणत्याही सायबर कॅफेमध्ये हे सारे संदर्भ बसल्या जागी उपलब्ध करणारं इंटरनेट हे ज्ञानाचं वरदान आहे हेही तेवढंच खरं. म्हणूनच, राक्षस आणि देव अशा दोन्ही गणांत इंटरनेटला बसवता येतं.
प्रलयातील गटांगळ्या
खरं तर, इंटरनेट अजून पुरतं परिपक्व झालेलं नाही. दूध विरजल्यानंतर काही तासांनी थोडं घट्ट होतं पण दही पूर्ण तयार न झाल्यानं ते हलत असतं, तशी अवस्था आजच्या इंटरनेटची आहे. ते सुरू झालं ती आरंभावस्था त्यानं केव्हाच मागे टाकली आहे. पण ते पूर्णावस्थेच्या जवळपासही अजून पोचलेलं नाही. आत्ता कुठे आपल्या मराठीला इंटरनेट संकेतस्थळांसाठी ‘युनिकोड’ची अक्षरं मिळू लागली आहेत. अजून गुगलला इंग्रजीचं मराठी भाषांतर करता यायचं आहे. त्यासाठी आणखी काही वर्षं जाणार आहेत. सामान्य माणूस अजून ‘ ब्लॉग ‘ म्हटलं की प्रश्नार्थक चेहेरा करून शुन्यात जातो. पण अगदी नजिकच्या काळात सामान्य माणसाच्या चेहेर्यावरची अशी प्रश्नचिन्हं जातील. तो इंटरनेटवर आपल्या शब्दांचं अर्घ्य देऊ लागेल. ते प्रत्येक अर्घ्य ही माहिती ओंजळ असेल. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ ह्या न्यायानं ह्या ओंजळी इंटरनेटवरील ज्ञानाचा पूर वाढवत नेतील. पण पूर आला म्हणून ज्ञानलोट वाढायचा थांबणार नाही. तो वाढतच राहील. इंटरनेटवरील ज्ञानाचं स्वरूप पुढे पुढे प्रलयंकारी होत जाईल. काहींना तर ते आजच तसं वाटतं. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या प्रलयात पोहायचं आणि तळाशी जाऊन त्यातील मोती शोधायचे, व त्याच वेळी निरूपयोगी दगडधोंडे बाजूस सारायचे हे काम भासतं तेवढं सरळ राहणार नाही. मोत्यांचा शोध हा सामान्य माणसाच्या आवाक्यात राहणार नाही. नुसतं Shivaji Maharaj असं टाईप करून आपण गुगलवर एंटर दाबते झालात तर समोर काही कोटी रिझल्ट्सची प्रचंड त्सुनामी अंगावर येऊन आदळेल. त्यात फक्त इंग्रजी नसेल तर जगातल्या असंख्य भाषा असतील. त्यांच्या भाषांतराची सोय असेल. तुम्ही ज्ञानाच्या प्रलयात अडकलेले असाल. काही कोटी रिझल्ट्स समोर असताना तुम्हाला हवा असलेला संदर्भ काही लाख रिझल्ट्सच्या मध्ये कुठेतरी लपलेला असेल. त्यांच्या पर्यंत पोचायचं तर प्रचंड पिंजणं अपरिहार्य ठरेल. शोधांमधून शोध घेताना वाटेत ज्ञानाची अनेक आमिषं पुढे येत राहतील. आपल्याला हवा तो संदर्भ बहुधा ह्या संकेतस्थळात आहे असं वाटून तुम्ही त्यावर क्लिक करून पुढे जाल, आणखी क्लिक्स करत करत, टेहळणी करत इतके पुढे जाल की मागचा रस्ता स्मरणातून गेलेला असेल. स्मरण ताजं करून पुन्हा मागे जाऊन नवी सुरूवात करतानाच्या गटांगळ्या जीवघेण्या असतील.
एकाग्रतेला आव्हान
दशसहस्र ग्रंथ असलेल्या ग्रंथालयात पीएच.डी.चे विद्यार्थी टेबलावर वीस-पंचवीस पुस्तकं पसरून बसलेले आणि कधी हे पुस्तक घे – तर कधी ते उघड असं करत एकाग्रतेनं अभ्यासात गढून गेलेले असत. त्यात इंटरनेटमध्ये घडू शकतं तसं अतार्किकपणे कुठेतरी फेकले जाण्याची शक्यता नसे. ग्रंथालयात बसून केलेल्या आपल्या विषयाच्या संशोधनाचा टप्पा कुठे संपणार आणि प्रबंध पूर्ण करण्याच्या पायरीवर आपण आलो हे कधी समजायचं हे ठरवताना मागे वाचलेल्या पुस्तकांची यादी तयार असे. बिब्लिओग्राफीच्या मोठ्या यादीकडे पीएच.डी. चा उमेदवार अभिमानाने पाही. संशोधनाला पूर्णत्व आल्याचं समाधान त्या अभिमानात लपलेलं असे. पण इंटरनेटमध्ये पूर्णत्व नाही. तुमचा विषय दररोज मारूतीच्या शेपटीसारखा वाढत असतो. जगभरातून दररोज काहीतरी नवं येऊन पडत असतं. अमुक एका टप्प्यावर प्रबंध पूर्ण करावा म्हटलं की तो टप्पाच थांबत नाही. गाडी स्टेशनास्टेशनातून वेगानं पुढे जात राहवी आणि आपल्याला स्टेशनांच्या पाट्याही दिसू नयेत…तसं काहीतरी…ती भावना आहे.
माणसाच्या दृष्टीनं संगणक आणि इंटरनेट यांच्यातला सर्वांत धोकादायक भाग म्हणजे ‘मल्टी टास्किंग’ची सोय. तुमच्या संगणकावर एकाच वेळी अनेक विंडोज उघडलेल्या असणं आणि तुमचा मेंदू त्या सर्वांचं भान ठेवत असणं हा प्रकार मुळात तणावाचा आहे. उद्याच्या पिढीला हे ‘भान ठेवणं आणि आपली एकाग्रता ढळू न देता आपल्या ज्ञान उद्दिष्टापर्यंत पोचणं’ हे कौशल्य खास प्रशिक्षणानं शिकावं लागेल. ग्रंथालयात वाचनात गढलेले असताना मध्येच कोणी निरोप-चिठ्ठी आणून दिली तर कपाळावर आठी येत असे. वाचनात आलेला हा व्यत्यय सहन होण्यासारखा नसे. वाचन बाजूस ठेवून पत्र फोडून वाचायला सुरूवात केली असं फारच क्वचित. पण इंटरनेटवरील लेख वाचत असताना इमेल आल्याचा संदेश स्क्रीनवर उमटला की लागलीच त्यावर क्लिक करून ती इमेल वाचायला सुरूवात ! त्या इमेलमधील संदेशाचा भावनिक परिणाम म्हणजे आपण मेल वाचायला सुरूवात करण्यापूर्वी इंटरनेटवर काय करत होतो याचं विस्मरण.
मल्टी टास्किंगचा दुसरा साथीदार म्हणजे हायपर लिंक. हायपरलिंक हा शब्द फारच अर्थपूर्ण आहे. छापील पुस्तकात काहीही हायपर नसतं. इंटरनेटवर जिकडे तिकडे हायपर पेरलेले. पाहता पाहता किती लिंक्सवर आपण क्लिक केलं, ते कशासाठी केलं यांत लोक हरवून जाताना दिसतात. एका पाठोपाठ एक क्लिक यामध्ये ग्रंथाच्या वापरात असतात तसे रेस्ट पॉजेस मिळत नाहीत. रेस्ट पॉजेस मिळाले नाहीत याचं भानही हरवून गेलेलं असतं. मल्टी टास्किंग आणि हायपर लिंक्सचं व्यवस्थापन असं सदोष झालं तर ज्ञानार्जनात दिशाहीनता वाट्याला येत राहते.
मल्टी टास्किंग आणि हायपर लिंक ह्या दोन प्रकारांनंतरचा तिसरा प्रकार म्हणजे मल्टीमिडियाची सोय. एकीकडे डोळे वेगवेगळ्या विंडोज आणि लिंक्स पाहण्यात गर्क असताना दुसरीकडे कानाला लावलेला इयरफोन काहीतरी ऐकवत असतो. तो कधी समोरच्या स्क्रीनवर दिसणार्या दृश्याशी संबंधित असेल, किंवा त्या दृश्याचा त्या श्रवणाशी सुतराम संबंध नसेल! श्रवण आणि वाचन यांत एकाग्रता विचित्ररीत्या विभागली जाते. हे सारं करत असताना आपला मोबाईल नावाचा पाळीव प्राणी हातपाय झाडत असतो. त्याला देखील आपण त्याच्याकडे एकाग्रतेनं पाहवं असं वाटत असतं.
चौथा प्रकार म्हणजे इंटरनेटचा डायनॅमिक स्वभाव. क्षणापूर्वी जे वाचलं ते दुसर्या क्षणाला बदललेलं, संपादित झालेलं असतं. त्या उलट ग्रंथ हा स्थिर असतो. त्याचा पृष्ठ क्रमांक आणि आतला मजकूर कधीच बदलत नाही. लेखक, पुस्तकाचं नाव, पुस्तकाची आवृत्ती, पृष्ठक्रमांक देऊन मजकूर अवतरण चिन्हात दिला की तो पुरावा स्थिर असतो. विद्वानांना अनेक दाखले देता येणं हे ग्रंथाच्या स्थिर अवस्थेमुळे शक्य होतं. एखाद्या संकेतस्थळावरील एखादा परिच्छेद दाखला म्हणून देता येणं जवळ जवळ अशक्य!
ज्ञानार्जनाचा अनुभव
ज्ञानप्रलयातला जोखमीचा भाग हा, की आपल्याला आपण इंटरनेट पिंजून काढतोय असं वर वर वाटत असतं, पण प्रत्यक्षात इंटरनेटच आपल्या मेंदूचे स्लाईस करून ते पिंजून काढत असतं. यातूनच इंटरनेटचं व्यसन अर्थात नेट अॅडिक्शनला सुरूवात होते. चौदा चौदा तास खुर्चीवरून न उठता संदर्भ शोधत हरवून गेलेली मंडळी रेस्ट पॉज घ्यायला विसरलेली असतात. एखादं मोठं पुस्तक वाचून झाल्यानंतर ज्ञानसाफल्याचा जो अनुभव चेहेर्यावर दिसतो तो सकारात्मक असतो. इंटरनेटवर चार तासांची मुशाफिरी झाल्यानंतर चेहेर्यावर येतो त्याला हँगओव्हर म्हणण्याची पद्धत आहे.
इंटरनेटकडे पाहण्याचा आजचा दृष्टिकोन बराचसा भाबडेपणाचा आहे. घी देखा लेकिन बडगा नही देखा असं इंटरनेटच्या बाबतीत म्हणावं लागतं. जगातली प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवर आली आहे असा दिवस भविष्यकाळात नक्की असणार आहे. आजची चर्चा मर्यादित आहे. इंटरनेटपेक्षा मोबाईल चौपट वेगानं पसरले आहेत, त्यामुळे इंटरनेटचा वापर संगणकाच्या पडद्यापेक्षा मोबाईलवर अधिक होईल वगैरे चर्चाही ऐकू येते. पण मोबाईलवर इंटरनेटचा उपयोग म्हणजे पिस्तुलात घालून अणुबाँब उडवण्याचा प्रयत्न आहे. इंटरनेटचा पडदा हातात घेऊन कुठेही फिरता येणं हे नजिकच्या काळात शक्य होणार आहे. पण तो पडदा मोबाईल फोनचा असणं अवघड आहे. कारण माणसाच्या डोळ्यांना सूक्ष्मात पाहणं आणि वाचणं हे निसर्गतः रुचत नाही. मोठा पडदा त्याला स्वभावतः भुरळ घालतो. इंटरनेटच्या माध्यमातून दाटत चाललेला ज्ञानप्रलय हा मोबाईलच्या बोटभर पडद्यावर अनुभवणं आज तरी शक्य वाटत नाही. इंटरनेटवरचा ज्ञानप्रलय अटळ आहे. त्यात हरवून जाण्याचा धोका ही प्रत्येकावरची टांगती तलवार आहे. आजमितीस आपण अनुभवत आहोत त्या ज्ञानप्रलयातील मिनी गटांगळ्या ! मेगा गटांगळ्या आणखी पाच वर्षांनी आपण अनुभवणार आहोत. त्या नंतरच्या भविष्यकाळात मात्र सिगारेटच्या पाकिटावर असतो तसा वैधानिक इशारा आपल्याला प्रत्येक मॉनिटर स्क्रीनच्या भाळी कोरलेला दिसणार आहे. तो कदाचित असा असेल: ज्ञानप्रलय धोकादायक आहे.
माधव शिरवळकर
ms@pujasoft.net