जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ – पर्यावरण रक्षणाचा गौरव बिंदू

4
76
carasole

जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी भारताचे पर्यावरण मंत्रालय निर्माण होण्यात-घडण्यात पुढाकार घेतला. तेव्हा त्यांच्या डोक्यात होता गांधीजींचा इशारा. “सृष्टी साऱ्यांचे भरणपोषण करण्यास समर्थ आहे, मात्र ती मानवाची लालसा भागवण्यास समर्थ नाही. तिला ओरबाडून घ्याल तर निसर्गाचा तोल बिघडेल!” गाडगीळांनी गांधीजींचा तो इशारा तोच त्यांचा संदेश मानला, त्यातून गाडगीळ निसर्गप्रेमी, संस्कृतिप्रेमी बनले.

त्यांनी १९६० च्या दशकात परिसरशास्त्र, निसर्गसंरक्षणशास्त्र, पर्यावरण या विषयांमध्ये देशातील धोरणकर्त्यांना जागे केले. त्यांनी सह्याद्रीच्या खोऱ्यात, रानावनात हिंडत परिसराचा आणि मानवी जीवनाचा अभ्यास केला; स्वतःला परिसरशास्त्र आणि उत्क्रांती या विषयांमध्ये झोकून दिले.

माधव गाडगीळ यांचा जन्म २४ मे १९४२ रोजी पुण्यात झाला. ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि भारताच्या पंचवार्षिक योजना समितीचे उपाध्यक्ष धनंजयराव आणि प्रमिलाताई गाडगीळ यांचे ते चिरंजीव. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्या घरातील वातावरण मोकळे, उदारमतवादी आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध होते. धनंजयरावांना निसर्ग आणि साहित्य यांची आवड होती. त्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल प्रेम होते. त्याचबरोबर, आम लोकांच्याबद्दल कळकळ होती. त्यांची तळमळ जे काही करू ते लोकांना उपयोगी असले पाहिजे अशी असे. त्यातून त्यांनी सहकारी बँकांची, सहकारी साखर कारखान्यांची चळवळ उभारली.

गाडगीळ कुटुंबाची शेती नागपुरात होती. त्यावर संत्री, ज्वारी, ऊस, फुलशेती होत असे. माधव यांचे बालपण रॉकेलचे दिवे, विहिरीचे पाणी, डोंगरावर मनसोक्त फिरणे अशा निसर्गसान्निध्य असलेल्या मोकळ्या वातावरणात गेले. “आम्ही, आमचे संपूर्ण कुटुंब पुण्यात सिंहगडावरील जयंतराव टिळकांचा बंगला भाड्याने घेऊन, मे महिन्यात, दिवाळीच्या सुटीत तेथे राहण्यास जात असे; किंवा नागपूरला शेतावर. त्यावेळी मला पक्षीनिरीक्षणाची आवड लागली. पक्षीनिरीक्षणाचे छंद, शास्त्र म्हणून महत्त्व वाढलेले नव्हते; परंतु माझ्याकडे दुर्बीण होती, घरात सलीम अली यांची आणि पक्ष्यांवरील इतर पुस्तके होती. वडील ‘नॅचरॅलिस्ट सोसायटी’चे सदस्य होते. सिंहगडावर धनगर-गवळ्यांची वस्ती होती, मनात त्यांच्याविषयी कुतूहल वाटे. इरावती कर्वे यांचे घर पुण्यात शेजारीच होते. त्यांच्याबरोबर समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मराठी साहित्य या विषयांवर बोलणे होई. विविध विषयांतील कुतूहल जागवणारे असे संस्कार झाले.” माधव सांगत होते.

माधव अभ्यासात तर तेज होतेच, परंतु त्यांना वडिलांकडून खेळाचा वारसाही मिळाला होता. त्यांनी मुंबई राज्याचे व पुणे विद्यापीठाचे सोळा वर्षांखालील उंच उडीचे उच्चांक मोडले होते. त्यांनी अखिल भारतीय स्पर्धांमध्ये पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्वही केले होते. ते म्हणतात, “विशेष म्हणजे दुसरे कोणीतरी अधिकारवाणीने म्हणतेय म्हणून कोठली तरी गोष्ट मान्य करायची अशी सक्ती आमच्यावर नव्हती. घरात ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव’ अशी संस्कृती नव्हती. म्हणजे त्या सर्वांविषयी आदर नव्हता असे नाही, पण घरात स्वतःच्या स्वतंत्र विचारांना आकाश मोकळे होते.”

माधव फर्ग्युसन कॉलेजमध्ये १९५६ साली शिक्षण घेत होते. त्याच काळात त्यांच्या वडिलांच्या पुढाकाराने हाल्डेन हे डाव्या विचारसरणीचे कम्युनिस्ट जीवशास्त्रज्ञ इंग्लंड सोडून भारतात आले होते. त्यांची पुस्तके वाचून माधव जीवशास्त्र या विषयाकडे आकर्षित झाले. त्यांना जीवशास्त्र आणि गणित या दोन्ही विषयांचे प्रेम होते, पण त्यांचा कल जीवशास्त्राकडे अधिक होता. मात्र त्यांना मेडिकलला जायचे नव्हते. त्यांनी जीवशास्त्र घेऊन बी.एस्सी. केले. त्याच वेळी, ते बी.एस्सी.चे गणित घरी बर्वे नावाच्या शिक्षकाची शिकवणी लावून केवळ हौसेसाठी शिकले. मात्र, मरीन बायॉलॉजीमध्ये एम.एस्सी. करत असतानाच त्यांच्या मनाने इकॉलॉजीवर काम करण्याचे पक्के ठरवले. विशेष म्हणजे, माधव पुस्तकी अभ्यासापुरते सीमित कधीच राहिले नाहीत. त्यांना स्वतःहून निसर्गाचे निरीक्षण करायचे आणि पुस्तकातील ताडून बघायचे, स्वतःची निरीक्षणे टिपून ठेवायची अशी आवड होती. उदाहरणार्थ, विंचवाचा अभ्यास करायचा तर ते सगळ्या विद्यार्थ्यांसाठी विंचू डोंगरावरून वेचून आणत असत. त्यांनी मरीन बायॉलॉजी शिकत असताना, मांदळी माशावर अभ्यास केला तेव्हा मुंबईच्या समुद्रावर मुद्दाम मच्छिमारांच्या बोटीतून फिरणे, त्यांच्याशी गप्पा मारणे असे उद्योग त्यांचे चालू असत. त्यांचे एम.एस्सी.१९६५ मध्ये पूर्ण झाले.

त्यांनी एम.एस्सी.नंतर काय करायचे याचाही विचार करून ठेवला होता. नातेवाईक, ओळखीचे म्हणत – ‘मेडिकलला गेला नाहीस. आता निदान IAS, IPS हो’, पण माधवना हॉर्वर्ड विद्यापीठात जायचे होते. Evolutionary Biology च्या अभ्यासाच्या दृष्टीने हॉर्वर्ड विद्यापीठ जगात उत्तम मानले जाई.

माधवने परदेशात जाण्याअगोदर लग्न करावे अशी इच्छा त्यांच्या आईने व्यक्त केली. तेव्हा त्यांनी कॉलेजमध्येच शिकणार्याल बुद्धिमान सुलोचनाशी विवाह केला. दोघांनाही हॉर्वर्ड विद्यापीठात पी.एचडी. करण्यासाठी प्रवेश मिळाला.

हॉर्वर्ड विद्यापीठात एडवर्ड विल्सन या जीवशास्त्रज्ञाने Mathematical Theory of Evolution मांडून त्यावर काम सुरू केले होते (उत्क्रांतीचा गणिती सिद्धांत). तो विषय माधवना पीएच.डी.साठी उत्सुकतेचा वाटला. ते काम त्यांना हाल्डेन यांच्याशी जोडणारे होते आणि ते त्यांच्याबरोबर करणे शक्य झाले होते, कारण हॉर्वर्डमध्ये त्या काळाच्या मानाने शक्तिमान असे कॉम्प्युटर सेंटर सुरू झालेले होते!

त्यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधाची मांडणी कशी होती या प्रश्नाचे उत्तर देताना माधव गाडगीळ म्हणाले, की “कोठल्याही प्राण्याजवळ, वनस्पतीजवळ किंवा कोठल्याही जीवाजवळ मर्यादित प्रमाणात साधनसंपत्ती असते. ती अशा रीतीने वापरली जायला हवी, की तीमुळे उत्क्रांतीच्या दृष्टीने जीवनाचे जे उद्दिष्ट आहे, की त्याची प्रजा मोठ्या प्रमाणात पुढे जगत, वाढत राहील, ते साध्य करता येईल. म्हणजे ती साधनसंपत्ती जिवाला जिवंत ठेवण्यासाठी किती प्रमाणात वापरली गेली पाहिजे -किती प्रमाणात वाढण्यासाठी, किती प्रमाणात प्रजोत्पादनासाठी वापरली गेली पाहिजे आणि ते जिवाच्या एकूण जडणघडणीवर, एकूण परिस्थितीवर कसे अवलंबून असते त्याचा विचार त्या प्रबंधात केला आहे.”

माधव गाडगीळ पुढे म्हणाले, की “उद्योगधंद्याचे कसे असते, की त्यात उपलब्ध साधनसंपत्तीपैकी कच्च्या मालावर किती-जाहिरातींवर किती-उत्पादनावर किती आणि संशोधन इत्यादींवर किती खर्च करायचा त्याचे एक गणित बनवावे लागते. तसे गणित वापरून जीवसृष्टीबद्दलचे काही एक मॉडेल बनवता येते का? त्यातून काही प्रत्यक्ष ताडून जोखता येतील असे निष्कर्ष काढता येतात का? असा अभ्यास मी त्यात केला होता. हॉर्वर्डमध्येसुद्धा जीवशास्त्र विभागात तशा प्रकारचे काम केलेला तो पहिलाच प्रबंध होता”

माधव गाडगीळ यांनी त्यानंतरची दोन वर्षें फिल्डवर्कला दिली, कारण त्यांचा प्रबंध तीन वर्षांत पूर्ण झाला होता. त्यांना बॉसर्ट या जीवशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. प्राप्त झाली. परंतु सुलोचना यांची पीएच.डी. पूर्ण व्हायची होती. त्यांनी त्या काळात तीन वर्षें आयबीएम कॉम्प्युटर सेंटरचे फेलो म्हणून, लेक्चररच्या पदावर काम केले. पण त्यांना खरा रस होता तो वनस्पती निरीक्षणात. तिकडे अनेक संधी चालून आल्या, परंतु दोघांनाही तेथे जास्त काळ राहण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे ती दोघे पुण्यात परतली.

माधव पुण्यात एम.ए.सी.एस. या संस्थेत सी.एस.आर.आर. ऑफिसर म्हणून काम करू लागले. सुलोचना यांनी Indian Institute of Tropical Meteology मध्ये काम सुरू केले. एम.ए.सी.एस.मध्ये काय स्वरूपाचे काम होते असे विचारल्यावर माधव म्हणाले, “फर्ग्युसन कॉलेजमध्ये आमचे वनस्पतीशास्त्रातील गुरू वामनराव वर्तक होते. ते उत्साही होते. त्यांच्याबरोबर मी काम सुरू केले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मूळ वनस्पती काय होत्या असा अभ्यास केला. उदाहरणार्थ, वरंधा घाटाच्या वरच्या सड्यावर ‘धूपरहाट’ म्हणून देवराई आहे. तेथे धूपाची चार प्रचंड मोठी झाडे आहेत. ती झाडे कर्नाटकात खूप. महाराष्ट्रात त्या मानाने तुरळक. पण त्या चार प्रचंड मोठ्या वृक्षांवरून त्याला ‘धूपरहाट’ असे नाव पडले. मराठीत देवराईला ‘रहाटी’ असा शब्दप्रयोग आहेच. खेड्यात तर ‘देवरहाटी’ असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात तशी मूळ सृष्टी काय होती हे पाहण्यास गेले तर फक्त देवराई शिल्लक राहिली आहे. तिची जपणूक करायला हवी. वरवर पाहता, देवरायांचे रक्षण काही धार्मिक समजुतींमधून झाले. परंतु त्या अनेक प्रथा समाजाला उपयुक्त आहेत; त्या निर्माण झाल्या त्याचे कारण त्या उपयुक्त आहेत ही समज असणेदेखील शक्य आहे.”

माधव पुढे म्हणाले, “कर्नाटकात बंडीपूरच्या कामात मला त्याचा प्रत्यय आला. मला असे दिसले, की केवळ भारतात नव्हे तर आशिया-आफ्रिकेच्या अनेक बागांत, पोलिनेशिअन बेटांवरही वड, पिंपळ, औदुंबर हे वृक्ष पवित्र मानले जातात. तेथे नवीन अभ्यासक्रमातही ते शिकवले जाते, की ते वृक्ष म्हणजे key-stone resources आहेत. त्या एका वृक्षामुळे अनेक जिवांचे भरणपोषण होते. ते नष्ट झाले तर अनेक जीवजाती नष्ट होतील.” त्यांनी देवरायांच्या शास्त्रीय अभ्यासाची मुहुर्तमेढ त्या कामामधून घातली असे म्हणायला पाहिजे. भारतातील तीच देवरायांची पहिली शिरगणती. तीदेखील त्यांनी स्वतः जातीने उपस्थित राहून केली.

माधव गाडगीळ यांनी त्यांच्या कारकिर्दीतील त्यानंतरचा मोठा काळ ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेत बंगलोरला व्यतीत केला. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ ही संस्था भारतातीलच नव्हे जगातील अग्रगण्य वैज्ञानिक संस्था आहे. तीविषयी सांगताना माधव म्हणाले, “तेथे डॉ. सतीश धवन संचालक होते, त्यांच्यामुळे त्या संस्थेत फार मोठे काम झाले. त्यावेळी डॉ. धवन आणि डॉ. जॉर्ज सुदर्शन यांच्यात चर्चा होऊन विविध शाखांतर्गत (Interdisciplinary, Cross disciplinary), विषयांची मर्यादा ओलांडून काम करण्याची उत्सुकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः Mathematical Modeling वेगवेगळ्या विषयांना जोडून अभ्यास करणाऱ्यांसाठी नवीन विभाग निर्माण करण्याची कल्पना पुढे आली. डॉ. दास यांनी सुलोचनाचे नाव सांगितले. सुलोचनाने त्यांना सांगितले, की “मला काम करायला आवडेल, परंतु माझ्या नवऱ्यालाही तेथे काम मिळाले तर आम्ही दोघेही येऊ शकू.” इन्स्टिट्यूटला जीवशास्त्रात तसे काम करायचेच होते. तेव्हा त्यांनी आम्हा दोघांनाही इन्स्टिट्यूटमध्ये येण्याचे आमंत्रण दिले.” माधव म्हणाले. माधव यांनी पर्यावरण, उत्क्रांती आणि निसर्ग व मानव परस्परसंबंध या विषयांमध्ये १९७३ ते २००४ या दीर्घ कालावधीत इन्स्टिट्यूटमध्ये राहून मोठे काम केले.

इन्स्टिट्यूटमध्ये Centre for Theoretical Studies या नावाने नवीन विभाग स्थापन झाला. तेथे दोघांनाही शास्त्रीय संशोधनाला मोठा वाव मिळाला. “मला सोशिओ-बायॉलॉजिकल कामात रस होता” माधव म्हणाले, “आम्ही नैसर्गिक निवड (Natural selection), उत्क्रांती वगैरे सगळ्या जीवशास्त्रीय कल्पना मानवी समाजालाही कशा लावता येतील याचा विचार करत होतो. मी जेनेटिक्स आणि ह्युमन सोशल ऑर्गनायझेशन यावर भारतातील समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, जनुकशास्त्रज्ञ इत्यादींना बोलावून चर्चा घडवून आणली. बंडीपूरला एक छोटेसे Field Station सुरू करून तेथे संशोधन प्रकल्प सुरू केला.”

माधव गाडगीळ यांनी बंडीपूर अभयारण्यात तीन महिन्यांचा विशेष अभ्यासक्रम शिकवण्याचा वेगळा प्रयोगही करून पाहिला. त्यासाठी १९७८ साली विद्यापीठ अनुदान आयोगाचे अनुदान मिळाले. पंधरा विद्यार्थ्यांनी खास तयार केलेला तो अभ्यासक्रम प्रत्यक्ष अभयारण्यात राहून पूर्ण केला. त्यात वनअधिकारी आणि साहित्यिक मारुती चितमपल्ली आणि वेगवेगळ्या विद्यापीठांचे इतर विद्यार्थी यांनी रस दाखवला. नंतर त्यातील प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या जागी जाऊन छोटे छोटे प्रकल्प राबवले.

भारत सरकारने वेगळा पर्यावरण विभाग काढावा अशी कल्पना पुढे आली. पंतप्रधानांनी नवा पर्यावरण विभाग निर्माण करण्यासाठी काय करायला पाहिजे यासंबंधीची समिती स्थापन केली. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉ. स्वामीनाथन. तेच योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. त्या समितीमध्ये माधव गाडगीळ यांचाही समावेश होता. त्यानुसार ‘पर्यावरण’ हे नवीन खाते निर्माण केले गेले. त्यामध्ये असे ठरले, की हिमालयाचा काही भाग, गंगेचे पूर्ण खोरे आणि सह्याद्रीचा पश्चिम घाट यांवर लक्ष केंद्रित करून त्यासाठी Centre of Excellence असावे. त्या केंद्राच्या वतीने मोठे संयुक्त कार्यक्रम करावेत आणि पर्यावरण विभागाने त्यास मदत करावी. विद्यापीठ अनुदान आयोग आणि भारत सरकारचा पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ते करण्याचे ठरले. त्यातून १९८३ साली Centre for Ecological Sciences स्थापन झाले. भारतात परिसरशास्त्र व प्राण्यांचे आचरण यांच्या अभ्यासात सांख्यिकी काम सुरू करण्याचे, तसेच मानव हा परिसराचा घटक आहे हा विचार समाजात रुजवण्याचे श्रेय माधव गाडगीळ यांना दिले पाहिजे.

गाडगीळ यांनी स्वत:च्या बुद्धीला जे पटेल तेच त्यांच्या विचारांत, कामात मांडले, आणीबाणी सुरू असताना त्यांनी जंगल विभागावर त्यांच्या लेखांतून टिका केली होती, तेव्हा प्रसिद्धीअगोदर लेख दाखवावेत अशी सरकारी दमदाटी करण्याचा प्रयत्नही झाला होता. त्यावेळी सतीश धवन त्यांच्या पाठीशी उभे राहिले. गाडगीळ म्हणाले, “डॉ. धवन यांना मी नोटिस दाखवली. तेव्हा ते म्हणाले, केराच्या टोपलीत टाक.”

ते environmental impact assessment कमिटीवर (१९८०) होते. माधव म्हणाले, “कारवारमध्ये बेडकी नदी प्रोजेक्ट समितीने ‘सर्व काही ठीक’ असल्याचा रिपोर्ट दिला. मी समितीवर सर्वात लहान होतो. माझी सक्तीने सही घेतली गेली. मला पटत नव्हते. मग मी ठरवले, की लोकांच्यातर्फे पुन्हा तपासणी करून घेऊ. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी डेटा गोळा केला. आमचे म्हणणे असे होते, की प्रकल्प चुकीचा नाही, पण आकडे, निष्कर्ष चुकीचे आहेत. आम्ही वस्तुनिष्ठपणे काम करत होतो. पण ‘कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन’चे अधिकारी बिथरले. त्यांनी धवन यांना फोन केला. पण धवन यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला.” माधव पुढे म्हणाले, “आपण निष्कारण भेदरटपणे वागतो.” पुढच्याच वर्षी, कर्नाटक सरकारने त्यांच्यावर राज्यातील बांबू संसाधनांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवली. “तेथे मी कानडी शिकलो. मी माझ्या भाषेवरून लोकांना कानडीच वाटायचो.” माधव हसून म्हणाले. त्यांनी निलगिरीत स्थापलेल्या देशातील पहिल्या बायोस्फिअर रिझर्वची संपूर्ण आखणीदेखील १९८६ मध्ये करून दिली.

माधव गाडगीळ १९८६ ते ९० या काळात पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळातील सदस्य होते, तर त्यांनी १९९८ ते २००२ पर्यंत संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक पर्यावरण-वैज्ञानिक आणि तांत्रिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून कामगिरी बजावली. त्यांनी २०१०-२०११ सालात भारत सरकारच्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणूनही काम केले. भारताचा बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अॅक्ट – जैवविविधता कायद्याचा मसुदा तयार करण्यामध्ये माधव गाडगीळ यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी भारताचे पर्यावरणविषयक धोरण ठरवणाऱ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समित्यांवर काम केले आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतात पर्यावरण मंत्रालयाची निर्मिती करण्याच्या कामात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी जैवविविधता स्रोतांवरील भारताच्या हक्काचा उच्चार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरून सातत्याने केला. त्यांनी ज्या देशांत ज्या प्रकारचे जीव असतील, त्या देशाचे त्यावर स्वामित्व असेल असे मत स्पष्टपणे मांडले. पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समितीचा अहवाल (Western Ghat Ecology Expert Panel) बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गाडगीळ हे देशातील सर्व विज्ञान अकादमींचे, थर्ड वर्ल्ड सायन्स अकादमीचे, यु.एस. नॅशनल सायन्स अकादमीचे फेलो आहेत. त्यांना ब्रिटिश व अमेरिकन इकॉलॉजिकल सोसायट्यांनी आणि सोसायटी फॉर ट्रॉपिकल इकॉलॉजी अॅण्ड कॉन्झर्वेशन यांनी मानद सदस्य म्हणून निवडले आहे. विशेष म्हणजे, माधव गाडगीळ यांचा लोकशाहीवर, विकेंद्रित पद्धतीने काम करण्यावर विश्वास आहे. त्यांनी देशभरातील संशोधकांशी, शिक्षकांशी, धोरणकर्त्या प्रशासकांशी, सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांशी व प्रत्यक्ष काळ्या मातीत काम करणाऱ्या शेतकरी, आदिवासी, धनगर यांच्याशी संवाद करून, लोकसहभाग घेऊन काम केले. त्यांनी समाजात निसर्ग आणि मानव यांतील नात्याची समज कामातून वाढवली. त्यांनी पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासामध्ये महत्त्वाची अंतर्दृष्टी निर्माण केली. त्यांचे काम भारताच्या पर्यावरणशास्त्राच्या इतिहासामध्ये पथदर्शी ठरले.

त्यांच्या त्या बहुमोल कामाची नोंद घेऊन त्यांना शांतिस्वरूप भटनागर, विक्रम साराभाई, एच.के. फिरोदिया इत्यादी राष्ट्रीय आणि व्हॉल्व्हो व टायलर अशा आंतरराष्ट्रीय पर्यावरण पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यांना हॉर्वर्ड विद्यापीठाचे शताब्दी पदकही लाभले आहे. कर्नाटक सरकारने त्यांना राज्योत्सव व भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

माधव गाडगीळ यांच्या कार्याची व्याप्ती इतकी मोठी आहे, की त्यांच्या एकेका कामाचे मूल्यमापन करण्यासाठी एक पुस्तक लिहावे लागेल. परंतु एका दृष्टिक्षेपात डॉ. गाडगीळ यांच्या संपूर्ण कामाचा पट पाहण्याचे ठरवले तर लक्षात येते, की त्यांनी परिसरशास्त्र, निसर्गरक्षणशास्त्र व पर्यावरणाचा इतिहास अशा परस्परसंबंधित अभ्यासशाखांमध्ये संशोधन केले आहे. त्यांनी त्या विषयांमध्ये दोनशेपेक्षा जास्त शास्त्रीय लेख लिहिले आहेत. त्यांनी रामचंद्र गुहा यांच्याबरोबर पर्यावरणीय इतिहासावर ‘धिस फियर्ड लँड’ हे पुस्तक लिहिले आहेच, पण सर्वसामान्यासाठीही लेखन केले आहे. ते त्या विषयावरील पहिले प्रकाशित पुस्तक होते. त्यांनी सर्वसामान्य जनांसाठी मराठी वृत्तपत्रांमध्येही सातत्याने लेखन केले आहे. त्यांनी ‘सृष्टिज्ञान’ या मासिकात प्राण्यांच्या आचरणावर दहा लेख लिहिले होते तेव्हा ते इयत्ता दहावीमध्ये शिकत होते. त्यांची भाषाशैली सरळसोपी, हलकी फुलकी आहे. त्यांच्या वृत्तपत्रांतील लेखांची शीर्षके बोधप्रद आणि उत्सुकता वाढवणारी असतात. लोककथा, लोकज्ञान, लोकभाषा यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या लेखनात आढळतो. त्यांची तीन मराठी आणि सहा इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अगदी अलिकडे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘वारूळ पुराण’ या त्यांच्या पुस्तकातही त्यांचा अभ्यास आणि तळमळ जाणवते. त्यांच्या पुस्तकांचे हिंदी, मराठी, कानडी, गुजराथी, मल्याळी आणि चिनी भाषांत अनुवाद झाले आहेत.

डॉ. गाडगीळ गोवा विद्यापीठात डी.डी. कोसंबी अध्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कामावरील श्रद्धा ढळलेली नाही. वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षीही अथकपणे काम करणारे डॉ. माधव गाडगीळ म्हणजे आपल्या देशाचा एक गौरवबिंदूच आहेत!

– अंजली कुलकर्णी

About Post Author

4 COMMENTS

  1. एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची
    एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची छोटीशी झलक वरील लेखाद्वारे मिळाली. या मराठी नरवराला माझा त्रि्वार प्रणाम!

  2. अतिशय अभ्यासपूर्ण लेख. खूप…
    अतिशय अभ्यासपूर्ण लेख. खूप काही शिकायला मिळाले. थिंक महाराष्ट्र आणि अंजली कुलकर्णी मॅडम यांचे आभार.

    -अरविंद म्हेत्रे, सोलापूर
    निसर्ग माझा सखा.

  3. Vistrut parichayabddal…
    Vistrut parichayabddal Dhanyawad.मी नुकताच २७ जुलै २०१८ला मसाप पुणे येथे डॉ .वर्षा गजेंद्रगडकर यांनी डॉ माधवराव गाडगीळ यांच्याशी गप्पा ह्या कार्यक्रमाला हजर होतो.इतका सारा मोठेपणा असूनही त्यांच्यातील साधेपणा अचंबित करणारा आहे व सामन्यांच्या भाषेत व्यवहार करण्याचे त्यांचे प्रयत्न वाखणण्यासारखे आहेत .त्यांच्या कार्याला प्रणाम. जुग जुग जीओ गाडगीळ सर .

  4. अतिशय सुंदर माहिती मिळाली.
    अतिशय सुंदर माहिती मिळाली.

Comments are closed.