जीनियस दिग्दर्शक प्रवीण काळोखे

2
41
_Pravin_Kalokhe_1.jpg

प्रवाहापेक्षा वेगळी नाटके करणे व कलावंतांना घडवणे असे काम निष्ठापूर्वक नाशिकमध्ये करणारे ‘जीनियस’ संस्थेचे प्रमुख प्रवीण काळोखे. प्रवीणचा जन्म नाशिकजवळच्या चणकापूरचा. वडील इरिगेशन खात्यात नोकरीला तर आई गृहिणी. प्रवीणचे वडील बबनराव सुकदेव काळोखे हे स्वतः १९७० च्या काळात नाटकातून प्रमुख भूमिका करत. प्रवीणचे आप्पा आजोबा बासरी, डफ वाजवत, कीर्तनात-भजनात साथ-संगत करत. ते प्रवीणलाही सोबत घेऊन जात. प्रवीणच्या आईला वाचनाची तर आत्याला गाण्याची आवड. त्यामुळे त्याच्या घरातच लहानपणापासून गाणी, नाटक, चित्रपट, नभोनाट्य यांबद्दल जिव्हाळ्याने बोलणे होई. प्रवीणला नाटकात काम करण्याची संधी वयाच्या चौथ्‍या वर्षी मिळाली ती गिरणा धरणाच्या कॉलनीच्या गणेशोत्सवात. प्रवीणचे धोतर रंगमंचावर सुटले तरी तो दवंडी पूर्ण करूनच रंगमंचाच्या खाली आला. छोट्या दवंडीवाल्याचे कौतुक झाले आणि प्रवीणच्या आयुष्यात तिसरी घंटा वाजली!

प्रवीण धुळ्याच्या शासकीय विद्यानिकेतन शाळेत शिकत असताना, तेथे सुंदरकांत देशमुखसरांनी त्याच्यामधील कलाकार हेरला आणि तेथेच मकरंद भारंबे या वर्गमित्राने लिहिलेल्या ‘सुलेमानचा खजिना’ या नाटकात प्रवीणने ‘मडकू’ची प्रमुख भूमिका केली. ते नाटक कै. अनिल बांदेकर स्मृती बालनाट्य स्पर्धेत पहिले आले. प्रवीणला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याच्याच वजनाएवढी ढाल बक्षीस मिळाली. प्रवीणचा आत्मविश्वास सरांच्या प्रोत्साहनाने बळावला.

प्रवीणने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतले. त्‍यावेळी त्‍याला चंद्रकांत जोशीसरांचे मार्गदर्शन लाभले. त्‍याने राष्ट्रीय नाट्य विद्यालय (दिल्ली) या संस्थेचे इंटेन्सिव थिएटर वर्कशॉप, इंडिया थिएटर फोरम आणि इंडिया फौंडेशन फॉर द आर्ट्स यांच्या वतीने आयोजित नाटक आणि कला यांच्या व्यवस्थापनाचा पदवी कोर्स, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे राष्ट्रीय पातळीवरच्या दिग्दर्शकांसाठी असणारे वर्कशॉप आणि विजया मेहतांचा मॅजिक मोमेंट वर्कशॉप अशा वेगवेगळ्या मार्गांनी नाटक या विषयाचा अभ्‍यास केला. त्‍याला लाभलेल्‍या सतीश आळेकर- वामन केंद्रे-चंद्रकांत कुलकर्णी-सुनील शानबाग, संजना कपूर-अतुल पेठे इत्यादींच्‍या मार्गदर्शन व सहकार्य यांमुळे प्रवीणचा नाटकातील पाय भक्कम झाला.

प्रवीणने ‘लग्नाची बेडी’ हे नाटक कराडला इंजिनीयरिंग कॉलेजला शिकत असताना दिग्दर्शित केले. त्यात भूमिका करणाऱ्या रश्मीसोबत पुढे अधिक घट्ट मैत्री होऊन प्रवीण स्वतःच लग्नाच्या बेडीत अडकला. रश्मी चांगली अभिनेत्री आहे. ती प्रवीणच्या प्रत्येक कलाकृतीत त्याच्यासोबत असते- कधी रंगमंचावर तर कधी रंगमंचामागे.

_Pravin_Kalokhe_2.jpgप्रवीणने ‘जीनियस, नाशिक’ या संस्थेची स्थापना २००२ मध्ये करून अनेक प्रायोगिक नाटकांचे दिग्दर्शन केले. ‘जीनियस’मध्ये प्रवीणचे सुनील जाधव, रश्मी काळोखे, दत्ता पाटील, रवी तायडे, देवेन कापडणीस, चिन्मय उदगीकर, मृणाल दुसानीस, निलेश-राकेश-चेतन हे कलावंत मित्र सहप्रवासी आहेत. प्रवीण नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, (एकलहरे) येथील ‘रंगसाधना’ संस्थेचाही कर्ता-धर्ता आहे. तेथे विजय रावळ, चंद्रकांत जाडकर, रवींद्र कटारे, गुलाब पवार हे कलावंत त्याच्यासोबत काम करत असतात.

प्रवीणच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला ‘मंथरमाया’, ‘खेळीया’, ‘मध्यमपदलोपी’, ‘एक ओसाड गाव’, ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’, ‘रक्तपुष्प’, ‘राशोमान’, ‘रंगशोध’, ‘रिमझिम रिमझिम’, ‘पुष्पसाज’ ही नाटके झळाळी देणारी ठरली. प्रवीणने दिग्दर्शित केलेल्या नाटकांचे प्रयोग ‘पृथ्वी इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल, मुंबई’, ‘तें’ फेस्टिवल, पुणे’, ‘अरविंद देशपांडे फेस्टिवल, मुंबई’, ‘रंगसंग फेस्टिवल, मुंबई’, ‘जीनियस थिएटर फेस्टिवल, नाशिक’ अशा प्रतिष्ठित राष्ट्रीय नाट्यमहोत्सवांतून झालेले आहेत.

प्रवीणला त्याच्या प्रायोगिक रंगभूमीवरील दिग्दर्शकीय योगदानासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, (मुंबई) तर्फे देण्यात येणारे ‘कै. कमलाकर सारंग स्मृती पारितोषिक’ देण्यात आले, प्रवीणच्या जिरेटोपात ‘म.टा. सन्मान’ आणि ‘झी गौरव’ असे प्रतिष्ठेचे आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांचे तुरे खोवले गेले आहेत.

परफॉर्मिंग आर्ट्समध्ये सातत्याने अतुलनीय गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या कलावंताला प्रदान करण्यात येणारे व कलेच्या क्षेत्रातील मानाचे असे ‘कै. विनोद दोशी फेलोशिप अवार्ड’ २०१६ साली भारतातील फक्त पाच कलावंतांना देण्यात आले. त्या पाचपैकी एक प्रवीण काळोखे होता.

प्रवीणने ‘जीनियस,नाशिक’ या संस्थेच्या माध्यमातून नाट्यकार्यशाळा, नाटकावर चर्चासत्रे, नाट्यमहोत्सवांचे आयोजन असे कार्यक्रम सातत्याने केले आहेत. प्रवीणने ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक’ या संस्थेच्या नाट्यसमितीचा प्रमुख म्हणूनही धुरा २०१४-१५ या वर्षी यशस्वी रीत्या सांभाळली. त्याचा नाटक अभ्यास वर्ग चालू असतो.

प्रवीण पेशाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता तर त्याची सहचारिणी रश्मी ही उपकार्यकारी अभियंता म्हणून ‘महावितरण’मध्ये कार्यरत आहेत.

प्रवीण काळोखे – pravinkalokhe10@gmail.com

– मंगेश बनसोड

फोन : +9122-26543209/10, 9122-26508200

academyoftheatrearts2007@gmail.com, academyoftheatrearts@yahoo.com

About Post Author

2 COMMENTS

  1. उत्तम कलाकार तयार करतात सर…
    उत्तम कलाकार तयार करतात सर हे आपल्या लेखात राहिले आहे त्यांचे योगदान मोठे आहे

  2. Very nice work and…
    Very nice work and achievements that inspires the others upcoming in this field.and interested to he any workshop for here in Pune district semi urban areas.

Comments are closed.