जिद्दीचे पाऊल थंडावले

0
76
Jiddiche_Pavun_Thandavale

शैला बेडेकरमी, एम.ए. पास झाल्यावर माझ्यापुढे यक्षप्रश्न उभा राहिला होता, की पुढील आयुष्यभर करायचे काय? कारण मी अंपग असल्याने बाहेर जाऊन कुठे नोकरी–व्यवसाय करू शकत नव्हते;  आणि घरच्या सुबत्तेमुळे मला तसे कोणी कामानिमित्त बाहेर जाऊपण दिले नसते. पण मला मात्र घरी नुसते बसून चैन पडणार नव्हते. त्यामुळेच मी बेचैन झाले होते.

अपंगांनी काही कामधंदा करून, स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे हा विचार जनमानसात त्या वेळपर्यंत रुजला नव्हता. माझा आतेभाऊ बहिरा–मुका आहे, पण तो चांगला चित्रकार असल्यामुळे कामाकरता बाहेर जाऊ शकत होता. माझी परिस्थितीच वेगळी होती. माझे व्यंग वेगळे होते.

त्यामुळे मी कितीही सांगितले, कोणाच्या मागे लागले, कोणासमोर अगदी रडले, तरी कोणाला माझी कामधंदा करण्याची कल्पना फारशी पटत नव्हती. त्याहीपेक्षा मला काय काम करता येईल हेच कोणाला सुचत नव्हते, समजत नव्हते, उमगत नव्हते आणि त्यामुळे माझी व घरातल्या इतरांची थोड़ीशी चिडचीडही होत होती. त्यातूनही कोणी काही, कोणी काही उपाय, उद्योग सुचवत होते, पण ते मला जमेल का? असे वाटत होते.

आईबाबांना पण सुचत नव्हते की त्यावेळी मला काय काम द्यावे? मला काय जमेल? शिवाय, त्यांना वाटे, की हिला काय गरज आहे उद्योग-व्यवसाय करायची? माझा हट्ट, आटापिटा हास्यास्पद होत होता. त्यांचे म्हणणे होते की ‘मोठ्या वाचनालयात जावे. भरपूर वाचन करावे. आणखी काय पाहिजे?’ पण नुसते वाचन करत राहणे मला पटत नव्हते. मला काही उद्योग पाहिजे होता, ज्यामुळे माझा वेळ चांगला जाईल आणि मला माझ्या पायावर उभे राहता येईल. तो विचार माझ्या मनात मी बी.ए. व्हायच्या आधीपासूनच होता.

कारण एकदा आईने मला विचारले, की शैला आम्ही आता माणिकला (माझी धाकटी बहीण) स्थळे बघायला लागणार तर तुला काही वाटणार नाही ना? तेव्हाच मी आईला म्हटले, की मला काही वाटणार नाही. पण पुढच्या आयुष्यात मला काहीतरी काम पाहिजे. त्याच वेळेला, मी आईला वाचनालयाची कल्पना बोलून दाखवली आणि सहज प्रयोग म्हणून दिवाळी अंक वाचण्याकरता ठेवायचे ठरले. त्याकरता दहा-पंधरा सभासद मिळाले. तेवढ्यापुरता तो प्रयोग यशस्वी झाला. पुढे B.A.चा अभ्यास, B.A पास झाल्यावर M.A.चा अभ्यास. मधेच माझे ऑपरेशन. त्यामध्ये तीन-चार वर्षे निघून गेली आणि पुढे  M.A पास झाल्यावर हो–नाही करता करता, शेवटी हट्ट करूनच मी १९७२च्या दिवाळी अंकांपासून ‘मनोरंजन वाचनालय’ चालू केले.

‘मनोरंजन’ यशस्वीपणे चालू झाले आणि माझ्या मनात विचार घोळू लागले, की मला शक्य झाले वाचनालय चालू करणे, पण बाकीच्या अपंगांचे काय? त्यांनी काय करायचे? कुठे जायचे? एकतर रेल्वेच्या गर्दीतून कामाला मुंबईला जायचे. नाही तर घरी बसायचे!  त्यापेक्षा आपल्या गावातच अपंगांकरता एखादे उद्योगकेंद्र चालू केले तर? त्याच सुमाराला मी बाबुकाका दिवाणांवर एक कादंबरी वाचली. त्यांनी बंगलोरला अपंगांकरता तसा प्रयोग केला होता. तसे, आपल्या गावात चालू केले तर? माझे विचारचक्र त्या दृष्टीने सुरू झाले.

त्यावेळी ठाण्यात अपंग मुलांच्या फक्त दोन शाळा होत्या. बधिर–मुक मुलांकरता जव्हेरी ठाणावला आणि दुसरी मतिमंद मुलांकरता सेंट जॉन. पण अपंगांचे उद्योगकेंद्र एकही नव्हते. त्यामुळे शाळेत शिकणार्‍या ह्या मुलांचे पुढचे भविष्य काय? हा पालकांपुढे प्रश्न होता. माझे मला बेचैन करणारे हे विचार मी डॉ. अशोक बापटांना, (माझे मेहुणे) बोलून दाखवले, तेव्हा ते म्हणाले, की मला पण या कामाची आवड आहे. अशा प्रकारे एकमेकांच्या विचारांच्या तारा जुळल्यावर ते म्हणाले, “तू पुढे हो, मी तुझ्या पाठीशी उभा आहे” आणि मग १ जुलै १९७९ला पहिली सभा होऊन ‘स्वयंसिद्ध’ संस्थेची स्थापना केली गेली. हळुहळू, संस्थेत प्रवेश घेण्याकरता अपंगांची गर्दी वाढू लागली. कार्यकर्त्यांची फळी तयार होऊ लागली. त्यात उषाताई, भिडेबाई, ठाकुरदेसाई, गोखले, पातकर, मेजर काळे, लेले हे उत्साही कार्यकर्ते होते. संस्था रजिस्टर केली गेली. बाबांनी जागेचा प्रश्न सोडवला. त्यांनी ‘नारायण भुवन’मधला हॉल संस्थेच्या उद्योग केंद्राला विनामूल्य दिला. लगेच आलेल्या मुलांची शारीरिक, मानसिक तपासणी केली गेली आणि मतिमंद मुलांच्या उद्योग केंद्राची जबाबदारी उषाताईंनी स्वीकारली व समर्थपणे पेललीही. त्यांनी ब्राह्मण सोसायटी, हिंदू भगिनी महिला मंडळाच्या हॉलमध्ये मतिमंदांचे उद्योग केंद्र चालू केले.

आम्ही आमच्या येथे शारीरिक व बधिर–मुक अपंग मुलींचे उद्योग केंद्र चालू केले. त्यात हॉस्पिटलकरता सॅनिटरी पॅड तयार करण्याचा मोठा उद्योग कायमस्वरूपी मिळाला आणि आईबाबांनी पहिलीच मोठी आर्डर आमच्याकडे दिली. भिडे, ठाकुरदेसाई यांनी तीन–चार हॉस्पिटले फिरून, खेपा घालून आशा व रमा कारखानिसांच्या ह़ॉस्पिटलच्या ऑर्डर मिळवल्या आणि मीना पालकर यांच्या ओळखीने रत्नागिरी येथील दोन हॉस्पिटलच्या ऑर्डर मिळाल्या. ते काम जोरदार चालू झाले. त्यावेळी पंधरा अपंग मुली कामाकरता येत होत्या. त्या कामाच्या जोडीला उदबत्त्या, लिक्विड सोप, साबण, फिनेल, राख्या, उटणे बनवणे, पॅकिंग, शिवण ही कामेही चालू केली.

अशा प्रकारे, उद्योग केंद्राचे काम जोरात चालू असताना दुसरीकडे शाळेत शिकणार्‍या अपंग मुलांना पुस्तक, वह्या, गणवेष इत्यादीची मदत करून त्यांचेही पुनर्वसन केले जात होते. त्या करता डॉ. र.म. शेजवलकर ह्यांनी पाच हजार रुपयांची देणगी दिली होती. माझे मामा श्रीनिवास जोशी ह्यांनीही संस्थेला दोन लाखांची देणगी दिली होती. सौ. सरोजिनी कुंटे पण दर वर्षी संस्थेकरता देणगी देत असतात. तसेच कुबड्या, बूट, यांत्रिक हात, चक्की ह्या प्रकारची मदतही केली गेली होती.

लोक येत होते, पाहत होते. ‘आपण असे करू, तसे करू’ अशी आश्वासने दिली जात होती. पण पुढे काही होत नसे. आम्ही मात्र आमच्या रस्त्याने जात होतो आणि हळुहळू संस्थेचे आधारस्तंभ असलेले हातच संस्थेला सोडून दूर जाऊ लागले! उषाताई कर्‍हाडला गेल्या. भिडेबाई पुण्याला गेल्या. काळेकाका डोंबिवलीच्या ‘अस्तित्व’मध्ये गुंतले. बाकीच्यांचा उत्साह कमी कमी होत गेला. त्यातच आणखी एक आघात म्हणजे विनाकारण गैरसमज होऊन मतिमंदांचे केंद्र आमच्यातून बाहेर पडले!

एकीकडे हे आघात चालू असताना दुसरीकडे सॅनिटरी नॅपकिनच्या कापसाचे आणि इतर मालांचे भाव वाढत होते. वाहतूक महागली. त्यामुळे हॉस्पिटलच्या ऑर्डर कमी होत जाऊन फक्त बेडेकर हॉस्पिटल तेवढे आमच्या मालाची मागणी करण्याकरता उरले. काम करणार्‍या अपंग महिलांची पगाराची मागणी वाढत होती. त्या पण काम सोडून जाऊ लागल्या. काही नवीन अपंग महिला कामावर येत होत्या. संस्था हे अपंगांचे उद्योग केंद्र असल्यामुळे संस्थेला सरकारी अनुदान मिळत नव्हते. त्यामुळे तयार होणार्‍या मालाच्या विक्रीतून जो फायदा होईल त्यावरच पगार दिला जायचा. संस्था कायम ‘ना नफा ना तोटा’  या तत्त्वावर चालली होती.

पॅडचे काम कमी झाल्यावर संस्थेने आपल्या कामाचे स्वरूप पालटले. चक्कीवर कणीक व इतर अनेक प्रकारची पिठे, भाजण्या, मसाले, लाडू, चकली हा माल तयार केला जाऊ लागला. त्या मालाच्या विक्रीकरता रोज संध्याकाळी स्टॉलची सोय केली गेली. संस्थेने कधीही हलका माल वापरला नाही, पगारालाही कधी ५ तारीख येऊ दिली नाही. गो़डा मसाला, थालीपीठ भाजणी, बटाटा कीस, मेथी लाडू, नाचणी लाडू, दाणेकूट आणि दिवाळीत चकल्या, संक्रांतीला तिळगुळ ह्यांच्या ऑर्डरी इतक्या असायच्या की शेवटी, ‘आता नको, पुरे’ म्हणून सांगावे लागायचे. अनारसापीठ, शिंगाडापीठ हे तर खटपटीचे काम पण तेही करून घेतले जायचे. हळद-तिखट दळून आणायचो. त्यात कसलीही भेसळ नाही, पण आमचा विक्रीस्टॉल आतल्या भागात असल्याने विक्रीला मर्यादा पडत होत्या. दोन-चार पदार्थांच्या ऑर्डर जरी मोठ्या प्रमाणावर मिळाल्या असत्या तरी चित्र पालटले असते. पण तसा प्रयत्न केला गेला नाही आणि मुख्य म्हणजे मी सर्वच बाबतींत परावलंबी होते. त्यामुळे बाहेर जाऊन काही प्रयत्नही करू शकत नव्हते. काही गोष्टी मान्य केल्याच पाहिजेत.

‘इनर व्हील क्लब’ने आम्हाला शेवटपर्यंत खूप मदत केली आणि ठाणा कॉलेजमध्ये आमचे पदार्थ आवर्जून घेतले जात असत. त्यात माणिकचे प्रयत्न विशेष होते. तिने मुख्य म्हणजे हिशेबावर लक्ष ठेवण्याचे काम केले.

शेवटी, कुठलाही व्यवहार म्हटला आणि विशेषत: सामाजिक व्यवहार म्हटला म्हणजे दहा लोक एकत्र येणार, मतभेद, फायदा-तोटा, हार-जीत, यश-अपयश हे गृहीत धरावे लागते. पण तरीही एक शल्य कायम मनात काट्यासारखे सलत राहणार आहेच. ठाण्यातली पहिली अपंगांचे उद्योग केंद्र असलेली ‘स्वयंसिद्ध’ तेहतीस वर्षे चालून बंद व्हायला नको होती!

पण तिची गरज संपली असे म्हणायचे किंवा आपलेच काही चुकले असेल असे म्हणून गप्प बसायचे.

शैला बेडेकर,
c/o- अविनाश बर्वे, 106, ‘सुचेता’सोसायटी,
सिध्देश्वर तलाव, पाटीलवाडी, ठाणे-400601.
दूरध्वनी: (022) 25337250.

टिप

शैला बेडेकर यांचे वडिल कै. वासुदेव नारायण बेडेकर हे ठाण्‍यातील नावाजलेले डॉक्‍टर. ठाण्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत त्‍यांचा मोठा वावर होता. त्‍यांनी शिक्षणक्षेत्रात केलेले काम सर्वश्रृत आहे. ते विद्या प्रसारक मंडळाचे अध्‍यक्ष होते. ठाण्‍यातील पूर्वीच्‍या एका खासगी शाळेचे पुनुरूज्‍जीवन करत तिचे ‘बेडेकर विद्या मंदीरात’ रूपांतर केले. या शाळेस पुढे बराच नावलौकीक मिळाला. त्‍यांनी इंग्‍लीश स्‍कूलचीही स्‍थापना केली. कला आणि वाणिज्‍य शाखांचेठाण्‍यातील पहिले महाविद्यालय ‘जोशी आंबेडकर महाविद्यालय’ त्‍यांनीच सुरू केले. सोबत बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचीही स्‍थापना केली. शैला बेडेकरांच्‍या कार्यासाठी डॉक्‍टरांनी केलेलीमदत महत्‍त्‍वाची ठरली. त्‍यांच्‍यामुळेच शैला बेडेकरांच्‍या व्‍यक्तिमत्‍त्‍वाचा विकास घडून आला. डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांमुळे शैला बेडेकर बराच प्रवास करू शकल्‍या. त्‍यावर त्‍यांनी काही प्रवासवर्णनही लिहीली आहेत.

शैला बेडेकरांनी ‘स्‍वयंसिद्ध’ची सुरूवात केली त्‍यावेळी त्‍यांना अनेक व्‍यक्‍तींचे सहकार्य लाभले. मेजर काळे हे संस्‍थेचे संस्‍थापक सदस्य होते. ते डोंबिवली येथे राहात असत. पुढे जाऊन त्‍यांनी ‘अस्तित्‍व’ नावाची अपंगांसाठी कार्य करणारी संस्‍था डोंबिवली येथे सुरू केली. बेडेकर, भिडेबाई आणि ठाकूरदेसाई यांची कार्यकारिणी होती. भिडेबाईंनी संस्‍थेतील मुलांना व्‍यवसाय मिळवून देण्‍यासाठी बरेच प्रयत्‍न केले. ठाकूरदेसाई संस्‍थेचा जमाखर्च पाहायच्‍या. गोखले हे संस्‍थेचे खजिनदार होते. बेडेकरांनी स्‍थापन केलेल्‍या वाचनालयातून पातकर आणि लेले या दोघी ‘स्‍वयंसिद्ध’शी जोडल्‍या गेल्‍या. हे काम विनावेतन असल्‍याने प्रत्‍येकजण जमेल तसा वेळ देऊन संस्‍थेचे काम करीत असत.

—————————————————————————

‘स्वयंसिध्द’ बंद करताना शैलाताईंनी उषाताई यांना लिहिलेले हे पत्र . 1979 साली ‘स्‍वयंसिद्ध’ची स्‍थापना झाल्‍यापासून उषाताई त्यांच्याबरोबर कार्यात होत्या. शैला बेडेकर यांच्‍यासोबत काम करताना उषाताईंनी मतीमंदांसाठी कार्य केले. उषाताई यांचा मुलगा मुकबधीर असल्‍याकारणाने त्‍याच्‍या देखभालीसाठी पुढे 1985 साली उषाताई क-हाडला स्‍थायिक झाल्‍या. क-हाडवरूनही त्‍या शैला बेडेकरांच्‍या संपर्कात होत्‍या. शैला बेडेकर यांनी आपल्‍या बळावर ‘स्‍वयंसिद्ध’ सुरू ठेवली, मात्र कार्यकर्त्‍यांचा अभाव आणि इतर अडचणींमुळे तेहतीस वर्षे चाललेली ही संस्‍था बंद करण्‍याचा निर्णय शैला बेडेकरांनी घेतला. यावेळी उषाताईंना हे पत्र लिहून त्‍यांनी आपल्‍या भावनांना वाट करून दिली.

शैलाताईंची व्‍याकुळता

तीर्थस्वरुप प्रिय उषाताई यांस सप्रेम नमस्कार,

अगदी खुप दिवसांपासून म्हणते आहे, की तुम्हांला पत्र लिहिन! पण प्रत्यक्षात येत नव्हतं. आज अगदी बसलेच. अगदी खरं सांगू, ह्या संध्याछाया जगणं फार कठीण जात आहे. ठसका तर हात धुऊन पाठी लागला आहे. शिवाय रोजच काही ना काही चालूच असतं. किती प्रकारच्या गोळ्या चालू आहेत. मनात सारखं येतं, की बाकीच्यांपेक्षा आपण खूपच ब-या आहोत. तरी पण मन कच खातं? आणि अशा वेळेला मनात सारखं येत राहतं, काय उपयोग गीता-ज्ञानेश्वरी-दासबोधाचा अभ्यास करुन? आहे ती परिस्थिती शांतपणे स्वीकारता येत नाही. रडून काहीही उपयोग नाही. हे कळतं पण वळत नाही. अशा वेळेला आईची, आजीची फार आठवण येते. आजी तर शंभर वर्षे जगली. पण निराशेचा सूर कधीही नाही, की डोळ्यांत टिपुस नाही, की कधी औषधाची गोळी नाही. आई सहनशील होती. तुमच्यासारखं रोजच्या जीवनात आनंद टिपणं मला जमेल का? हं, एक मात्र आहे. अजून थोडा फार वाचन-आनंद घेऊ शकते. मान दुखते पण तरी वाचल्याशिवाय राहावत नाही. गाणी ऐकू शकते. वाचनालयात तर जातेच. खरं तर रात्री झोप लागत नाही. म्हणून सकाळी उठणे अगदी जीवावर येतं. अंघोळ केली की बरं वाटतं, गंमत अशी, की एखाद्या दिवशी रात्री ठसक्याचा खूपच त्रास झाला म्हणून न उठता झोपून राहिले, तर झोप लागत नाही. त्यापेक्षा उठून गेलो असतो तर बरं झालं असतं असं वाटतं. असो.

पत्र लिहिण्याचे आणखी एक कारण म्हणजे ३१ मार्चपासून आपली ‘स्वयंसिद्ध’ संस्था बंद करत आहे. खरंतर खूप वाईट वाटत आहे. पण काय करू? एक तर कोणी कार्यकर्ते नाहीत, मी आता जाऊच शकत नाही. त्यामुळे सगळा आनंदीआनंद आहे. ज्यांच्याकरता संस्था चालू केली ते अपंग तीनच आहेत, दोन हजारांत कोणी काम करायला तयार नाही. दोन्ही भाचे हॉस्पिटल वाढवत आहेत. त्यांना जागा पाहिजे आहे. विचार केला, की माझ्यानंतर संस्था चालू ठेवणारे कोणीच नाही. मग आवराआवर करायला त्रास होण्यापेक्षा आपणच आवरून घेतलेलं बरं, कशी का होईना संस्था तेहतीस वर्षे चालली, तीन पालक नाराज आहेत, पण ईलाज नाही. उषाताई, एक गोष्ट मनाला फार लागली. गेल्यावर्षी ‘चैतन्य’चे पंचवीस वर्ष साजरे झाले. दरवर्षीप्रमाणे मला वार्षिक अहवाल पाठवला. त्यात तुमचं-माझं नाव होतं, पण पुढे लिहिलं होतं, की ‘स्वयंसिद्ध’ने आम्हांला काहीही मदत केली नाही. इतक्या दिवसाने मनमोकळे करून घेतले. अशावेळेला रत्नप्रभाची खूप आठवण येते. १९ तारखेला सोsहमचा पणतू दर्शनाचा कार्यक्रम छान झाला. सख्खे पणजोबा नाहीत पण पणज्या-पणजोबा बरेच आहेत.

उषाताई अगदी सहज विचारते तीन ते चार महिन्यांपूर्वी तुम्ही ठाण्याला गोहार बाईंकडे येऊन गेलात का? कारण मला दोघा-तिघांनी सांगितले. बाकी ठीक. यंदाच्या दिवाळी ‘मनोरंजन’ला चाळीस वर्षे पुरी होतील.

पत्राची वाट पाहू का?

तुमची
शैला

About Post Author