पुण्यातील दोन खुणा जयंतराव टिळक यांची आठवण चिरकाल ठेवतील. शनिवारवाड्यासमोरचा पूल आणि त्यांच्या नावाने सहकार नगर येथे उभारलेले गुलाब पुष्प उद्यान. जयंतरावांचे गुलाब पुष्प प्रेम प्रसिद्ध आहे. त्यांनी गुलाब पुष्पाबद्दल पुणेकर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. ते लोकमान्यांचे नातू होत. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1921 चा.
जयंतरावांचे वडील श्रीधरराव अकाली गेले. त्यामुळे त्यांची बालपणात ससेहोलपट झाली. त्यांनी पुण्यात टिळक घराण्याचा मोठा वाडा असताना भाड्याच्या घरात राहून, कष्टात दिवस काढले. जयंतराव शेवटी त्यांच्या हक्काच्या केसरी वाड्यात राहण्यास आले. त्यांनी ‘लोकमान्य टिळक यांचा नातू’ या कवचकुंडलाचा वापर न करता सर्वसामान्यांपैकी एक म्हणून काम सुरू केले व ते असामान्य झाले. जयंतराव टिळक हे माणसांत रमणारे होते. अन्यायाविरुद्ध चीड आणि तो दूर करण्यासाठी झोकून देण्याची तयारी हा त्यांच्या डी.एन.ए.चाच भाग असावा. त्यांनी धनंजयराव गाडगीळ यांच्याबरोबर दुष्काळ निवारण समितीत केलेली कामगिरी मोठी आहे. त्यांचा पिंड कार्यकर्त्याचा होता. आंदोलकाचा, सकारात्मक बदल घडवण्यासाठी आक्रमक नेतृत्व करण्याचा होता. त्यांचा सहभाग संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होताच. त्यांनी प्रतापगडावर पंडित नेहरु आले असताना त्यांना या आंदोलनचे महत्त्व पटवून देण्यासाठी आखलेली रणनीती पंडितजी यांनाही प्रभावित करून गेली.
त्यांचे नाव गोवा संग्रामातील बिनीच्या शिलेदारांमध्ये घेतले जाते. ते गोवा मुक्ती संघटनेचे सरचिटणीस होते. ते त्या संग्रामात कायम आघाडीवर राहिले. गोवा मुक्तीसाठी केसरी वाडा हा केंद्रबिंदू ठरला. ते स्वयंसेवकांचे हक्काचे ठिकाण झाले. दयानंद बांदोडकर हे स्वतंत्र गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यात जयंतरावांच्या शिफारशीचा वाटा सिंहाचा होता.
पानशेतचा पूर असो वा कोयनेचा भूकंप, जयंतराव आणि त्यांचा ‘केसरी’ यांनी त्या संकटात कायमच मदतीचा हात पुढे केला. त्यांनी संपादक म्हणून केलेले काम ‘केसरी’ वृत्तपत्राच्या वाढीसाठी पोषक असे ठरले. एक तर ‘केसरी’चे स्वरूप त्यांनी पूर्णपणे बदलून टाकले. त्याचे दैनिकात रुपांतर केले. ते दैनिक आठ कॉलमी मजकूर घेऊन अवतरले.
जयंतराव यांनी नवे मशीन, नव्या आकाराचा कागद, नवा उत्साह केसरी कार्यालयात खेळवला. केसरीचा खप त्यांच्या कारकिर्दीत एक लाखाच्या घरात पोचला. रविवारचा केसरी ही रसिक वाचकांसाठी मेजवानी ठरली. पुरवणी कथा, कविता याबरोबर जंगल, पर्यावरण, शेती अशा अनेकविध विषयांनी गजबजू लागली. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांची व्यंगचित्रे अंकात रंग भरू लागली. जिम कॉर्बेट याच्यावरील मृत्युलेख, व्यंकटेश माडगूळकर यांच्या खनपटीत बसून त्यांनी लिहून घेतला. कोणत्या इंग्रजी वृत्तपत्रानेही इतक्या त्वरेने या जंगलच्या राजाच्या कार्याची दखल घेतली नव्हती. पूर्वी विचारपत्र म्हणून ओळखले जाणारे ‘केसरी’ वृत्तपत्र म्हणूनही जनमानसात रुजू लागले. त्यांची संपादकीय कारकीर्द तीस वर्षांची आहे. तो केसरीचा सुवर्णकाळ ठरला. ते राज्यसभेचे सदस्य म्हणून खासदार पंधरा-सोळा वर्षे असताना दिल्लीतून केसरीसाठी खुसखुशीत भाषेत वार्तापत्रे लिहीत. त्यांनी राजकारणाबाहेरचे, शेरोशायरी वापरणाऱ्या, दिल्ली दर्शन ‘केसरी’च्या वाचकांना घडवले.
दादांनी राजकारणातही ठसा उमटवला. ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून पुण्यातील सदाशिव पेठ मतदारसंघातून प्रथम निवडून आले. पण त्यांना कोणताही पक्षीय अभिनिवेश नव्हता. ते पुढे काँग्रेसमध्ये गेले. ते महाराष्ट्रात मंत्रीही झाले. ते विधान परिषदेचे सभापती तर तीन वेळा झाले. त्यांनी ऊर्जामंत्री असताना विजेच्या गळतीवर प्रबंध लिहून तो दिल्लीच्या परिषदेत सादर केला होता.
पुणे-मुंबई रस्त्यावरील खंडाळ्याच्या घाटात होणारे ट्राफिक जाम ही प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असे. त्यांनी तेथील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सुचवलेले उपाय रामबाण ठरले आणि पुणे-मुंबई प्रवास हजारो प्रवाशांसाठी सुखाचा झाला. टिळक स्मारक मंदिराची वास्तू, दादरचे सावरकर भवन ही त्यांच्या नियोजनबद्ध कामातून उभारल्या गेलेल्या वास्तू आहेत.
त्यांच्या काळात वसंत व्याख्यानमाला, वेदशास्त्रोत्तेजक सभा या धडाडीने कार्यरत राहिल्या. पुण्यातील पत्रकार संघाची स्थापना, पत्रकार भवनाची उभारणी यांतील जयंतराव यांचा सहभाग मोठा आहे. त्यांनी पुणे विद्यापीठात पत्रकारिता अभ्यासक्रम असण्यास हवा यासाठी घेतलेला पुढाकार कामी आला आणि पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम पुण्यात सुरू झाला. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कामांमध्ये लक्ष घातले. विद्यापीठाला अभिमत हा दर्जा मिळाला.
जयंतराव नावाजलेले शिकारी होते आणि गुलाब पुष्पप्रेमीही होते. जयंतराव टिळक यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजेही ऊर्जा, उत्साह, धडाडी, नवोन्मेष, प्रेरणा, प्रोत्साहन अशी ऊर्जेची सकारात्मक रूपे आहेत. त्यामुळे एका अर्थाने ते एका अक्षय्य ऊर्जेचे प्रतीक होत.
– केशव साठये 9822108314 keshavsathaye@gmail.com
——————————————————————————————————————