जगन्नाथराव खापरे – ध्यास द्राक्षमाल निर्यातीचा!

_JagannatharavKhapre_DrakshamalNiryaticha_1_0.jpg

नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळील कोठुरे गावाचे जगन्नाथ खापरे हे द्राक्ष उत्पादन व त्यासाठी परकीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी मागील पंचेचाळीस वर्षांपासून झटत आहेत. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या चाळीस एकर शेतीत द्राक्षांच्या बागा फुलवल्या आहेत. खापरे यांचा द्राक्ष उत्पादन व निर्यात यांतील अनुभव द्राक्ष बागायतदारांसाठी उपयुक्त असाच आहे. जगन्नाथराव यांचा जन्म 1947 चा. जगन्नाथ यांना बालपणापासून शेतीची ओढ लागली. प्राथमिक शाळा गावातच होती. त्यामुळे त्यांचा सारा वेळ शेतावर जाई. ते हायस्कूलला लासलगावला गेले. तरी सुट्टी मिळाली, की लगेच गावी येत आणि शेतातच दिवस काढत. पुण्याला कॉलेजला गेले तरी त्यांची तीच अवस्था! बैल,औत असेच विषय सारखे त्यांच्या डोक्यात असत. त्यांनी त्यावेळी मोटदेखील हाकली. ते म्हणतात, “शिक्षण आणि शेती हा वारसा मला वडिलांकडून लाभला. माझे वडील फक्त सातवी शिकलेले होते. पण पुढे ते ट्युशन लावून इंग्रजी शिकले.”

खापरे यांची स्वत:च्या शेतीच्या व्यवसायाला सुरुवात झाली तीच मुळी दुष्काळाच्या काळात! खापरे 1970 मध्ये पुण्याच्या एमईएस कॉलेजमधून फिजिक्स व गणित हे विषय घेऊन बी.एस्सी. झाले. परंतु त्यांनी नोकरीची वाट धरली नाही. त्यांच्या घरी शेतीची परंपरा होतीच. खापरे यांचे वडील लुकाराम, उगाव येथे द्राक्षांचे उत्पादन 1927 पासून घेत होते. त्यामुळे जगन्नाथ यांनीदेखील द्राक्षशेती करण्याला प्राधान्य दिले. खापरे यांनी शेती करिअर म्हणून स्वीकारली आणि दोन वर्षांतच दुष्काळाने राज्य होरपळू लागले! पुढे तीन वर्षें, म्हणजे 1975 पर्यंत दुष्काळाचीच परिस्थिती होती. दुष्काळाच्या काळात पिके कशी तगवली असे विचारले असता, खापरे म्हणाले, ‘‘त्यावेळी आमची द्राक्षबाग पाच-सहा एकरांवर होती. त्यासाठी टँकर मागवावे लागत. ते परवडत नसे. त्यामुळे द्राक्षांचे उत्पादन कमीत कमी पाणी वापरून कसे करावे याचा विचार सुरू झाला आणि मल्चिंग या पद्धतीची माहिती झाली. त्या पद्धतीने द्राक्षबागांसाठी पाणी देणे सुरू झाले. मल्चिंग पद्धतीत पाण्याचे बाष्पीभवन कमी होते आणि जमिनीतील कार्बनही वाढतो. बागांना त्याचा फायदा निश्चितच झाला आणि बागांनी तग धरली.’’

_JagannatharavKhapre_DrakshamalNiryaticha_2.jpgत्यांना दुष्काळ उलटल्यानंतर,1976 साली पालखेड डावा कालवा प्रकल्पातून पाणी मिळू लागले; मात्र अतिपाण्यामुळे जमिनीतील आर्द्रता वाढली आणि द्राक्षांच्या पिकास रोगराई होऊ लागली. त्यांनी ते टाळण्यासाठी 1982 पासून ड्रिप सिंचन पद्धतीचा अवलंब केला. त्याच सुमारास ओझर येथे द्राक्ष उत्पादनाच्या संदर्भात एक चर्चासत्र भरवण्यात आले होते. त्यावेळी प्रगत शेतकरी म्हणून ओळखले जाणारे वसंतराव आरवे हे कॅलिफोर्निया येथे जाऊन, द्राक्ष उत्पादनाचा अभ्यास करून परतले होते. त्यांनी चर्चासत्रात शेतक-यांना मार्गदर्शन केले. त्या प्रमाणे पहिली वाय पद्धतीची द्राक्ष बाग उभी राहिली ती खापरे यांच्या शेतात. त्या प्रयोगाचा त्यांना व इतर शेतक-यांना फायदा झाला. काही फ्रेंच पाहुणे उगाव येथे द्राक्षबागा बघण्यासाठी 1986 मध्ये गेले. त्यांनी खापरे यांच्या लक्षात आणून दिले, की भारतातील द्राक्षांची साठवण पद्धत योग्य नाही. त्यामुळे द्राक्षे लवकर खराब होतात. द्राक्षे व्यवस्थित साठवण्यासाठी ‘प्री कुलिंग’ची व्यवस्था (शितीकरण) करणे आवश्यक आहे. त्या पद्धतीत साठवणुकीसाठी द्राक्षे ज्या खोलीत ठेवतात तेथील तापमान नॉर्मलपासून वजा एक डिग्रीपर्यंत पाच तासांमध्ये आणता आले पाहिजे. द्राक्षांची साठवण त्या पद्धतीने केल्यास त्यांचा भाव चारपट मिळेल. खापरे यांना पूर्वी प्री कुलिंग पद्धत माहीत नसल्याने निर्यातीसंदर्भात पाच-सहा लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते.

खापरे साठवणुकीची ती सोय कशी करता येईल याची माहिती गोळा करू लागले. अरुण पाटील या शेतक-याने दोन टन द्राक्षांसाठी ‘प्री कुलिंग’चे यशस्वी प्रयोग 1988-89 मध्ये करून दाखवले होते. उगाव येथेही दोन टन क्षमतेचे प्री कुलिंग युनिट 1992 मध्ये बसवण्यात आले. ‘महाराष्ट्र बागायतदार संघा’ने कॅलिफोर्नियाला भेट त्याच वर्षी योजली. त्या भेटीनंतर ‘महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघा’ने प्री कुलिंगसाठी यंत्रणा निर्माण केली. नंतर ‘महाग्रेप्स’ने प्री कुलिंगची चार मोबाइल युनिट बनवली. द्राक्षांची निर्यात ‘महाग्रेप्स’कडून 1990 मध्ये सुरू झाली; निर्यात दर कमी म्हणजे सतरा-अठरा रुपयांच्या जवळ मिळायचा. ‘नाशिक ग्रेप्स फूड प्रोसेसिंग प्रायवेट लिमिटेड’ ही संस्था नावारूपास आली होती. जगन्नाथ खापरे संस्थेचे उपाध्यक्ष होते. त्यांनी निर्यातीला 1992 मध्ये सुरुवात केली. दाक्षमालास सुरुवातीलाच साठ रुपये भाव मिळाल्याने द्राक्षे निर्यात करण्याच्या प्रक्रियेस खूप चालना मिळाली.

द्राक्ष निर्यातीची दोन वर्षें पूर्ण झाल्यावर, 1993 साली त्यांना कळले, की इंग्लंडमध्ये सुपरमार्केट आहेत, तेथे द्राक्षाला चांगला भाव मिळतो. पण त्यासाठी त्या सुपरमार्केटचे प्रतिनिधी पॅकहाऊस व बागेचे व्यवस्थापन यासंबंधात ऑडिट करतात. खापरे यांनी कागदपत्रांची जमवाजमव करून सुपरमार्केटचे पहिले ऑडिट 1993 च्या शेवटी मिळवले आणि 1994 साली सुपरमार्केटला भारतातून पुरवठा करणारी ‘नासिक ग्रेप्स’ ही पहिली कंपनी ठरली. खापरे यांनी उगाव येथे कोठुरे या गावी 1994 मध्ये तीन टन क्षमतेचे प्री कुलिंग युनिट व चाळीस टनी कोल्ड स्टोरेज (कोल्डस्टोर या ठीकाणी प्रॉडक्टचे टेंपरेचर 0-3 डिग्री मेंटेंट करतात) बसवले आहे. त्यानंतर 1998 साली तब्बल चाळीस टन क्षमतेचे शीतगृह (कोल्ड स्टोरेज युनिट) बसवले! त्यासाठी त्यांनी शासकीय योजनेतून वीस टक्के, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाकडून वीस टक्के अनुदान व बँकेकडून साठ टक्के अर्थसहाय्य मिळवले. खापरे यांनी पुन्हा दुसरे पाच टन क्षमतेचे प्री कुलिंग युनिट आणि वीस टन क्षमतेचे शीतगृह कार्यान्वित केले आहे.

_JagannatharavKhapre_DrakshamalNiryaticha_3.jpgखापरे यांनी साठवणुकीच्या व्यवस्थेत सुधारणा केल्याने निर्यातीचा मार्ग सोपा झाला; परंतु व्यवसायातील अडचणी होत्याच. परदेशात पाठवलेला माल सरसकट उचलला जात नाही, त्यापूर्वी मालाचे परीक्षण केले जाते. मालाची गुणवत्ता त्या चाचण्यांत पाहिली जाते. ती आंतरराष्ट्रीय मानकांनुसार नसेल तर माल निर्यातीसाठी निवडला जात नाही. त्यात देशाची प्रतिष्ठाही कमी होते. द्राक्षांच्या बाबतीत खतांमधून व फवारणीतून कोठल्याही प्रकारची हानिकारक रसायने तर नाहीत ना याची पडताळणी विशेष केली जाते. खापरे यांनी रासायनिक खतांमुळे द्राक्षमाल परत आल्याची एक आठवण सांगितली – ‘युरोपमध्ये पाठवलेल्या मालावर रासायनिक सीसीसी (chloromaquet chloride) चे अवशेष सापडल्यामुळे युरोपीयन देशांनी 2010 साली माल घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे दीडशे निर्यातदारांचे सुमारे दोनशे कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तो माल इतर देशांनी कमी किंमतीत घेतला. द्राक्षमाल भारतातून निर्यात होणा-या देशांपैकी जर्मनीत चाळीस टक्के जातो. निर्यातदार व शेतकरी सावध झाले, त्यांनी पुरेशी काळजी घेतली. त्यामुळे परिस्थिती सुधारली आणि पूर्ण युरोपने नाशिकचा द्राक्ष माल स्वीकारण्यास सुरुवात केली.’

भारताच्या द्राक्ष निर्यातीत पंच्याण्णव टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रातील सत्तर टक्के वाटा नाशिकचा आहे. जगन्नाथ खापरे आणि इतर शेतकरीही निर्यातीतील गुंतागुंत कमीत कमी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. शेतकरी त्यांची अडवणूक कोणा एका देशाकडून झाल्याने अडचणीत येऊ नये यासाठी इतर देशांतही बाजारपेठ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असतात. त्यांत ऑस्ट्रेलिया, कॅनडा व न्यू झीलंड हे देश प्राधान्य क्रमांकावर असल्याचे खापरे यांनी सांगितले.

सध्या भारतातून उत्पादन होणा-या  द्राक्ष्यांच्या केवळ तीन टक्के माल निर्यात होतो. खापरे यांनी ते प्रमाण वाढून दहा टक्के व्हावे यासाठी केंद्र सरकारबरोबर बोलणे सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्य शासनानेदेखील द्राक्ष्यांचे उत्पादन वाढवणे, साठवणे, पॅकिंग करणे, बाजारपेठेची निर्मिती करणे यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

शेतजमिनीची हानी रासायनिक खतांमुळे होत आहे. चांगल्या द्राक्ष उत्पादनासाठी जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याची गरज असते. मात्र खतांचा विपरीत परिणाम जमिनीच्या गुणधर्मांवर होतो. त्यावर उपाय म्हणून खापरे हे एका परदेशी सल्लागाराची मदत घेत आहेत; ते त्याच्याकडून पाण्याचे नियोजन व खतांचे नियोजन या दोन गोष्टी सुधारण्यावर भर देत आहेत- त्या सल्ल्याचा लाभ केवळ स्वत: न घेता इतरही परिचित शेतक-यांना देत आहेत. दरम्यान, खापरे यांनी ‘महाराष्ट्र बागायतदार संघा’च्या संचालकपदाचा भारही सांभाळला आहे. ते ‘भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटने’चे अध्यक्षही 2007 पासून आहेत. त्यांनी त्या पदी राहून कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले. खापरे यांना त्यांची द्राक्ष उत्पादन व निर्यात यांतील अविरत तळमळ लक्षात घेऊन ‘वसंतराव नाईक प्रतिष्ठान’च्या वतीने 2014 साली पुरस्कृत केले गेले. खापरे मात्र पुरस्काराच्या पल्याड जाऊन द्राक्ष उत्पादनासाठी अहोरात्र कष्टत आहेत. त्यांची दोन्ही मुलेदेखील उच्च शिक्षण घेऊन घरच्या शेतीतच करिअर करत आहेत. जगन्नाथरावांना चार नातवंडे आहेत.

– पुरुषोत्तम क-हाडे

About Post Author

Previous articleशशिकांत पानट यांचे गीत महाभारत
Next articleवाळक्या काटक्या क्षुल्लक तरी महत्त्वाच्या!
पुरूषोत्‍तम क-हाडे हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर. ते सौरऊर्जेसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्‍नशील असतात. क-हाडे यांनी वीज मंडळातील अधिकारी पदासोबत 'टाटा कन्‍सल्‍टींग इंजिनीयर'मध्‍ये जबाबदारीचे पद भूषवले. त्‍यांचे नोकरीच्‍या निमित्‍ताने सौदी अरेबिया, जपान, लाओस, भूतान, मलावी आणि इराणसारख्‍या देशांमध्‍ये वास्‍तव्‍य होते. इराणमध्‍ये घडलेली क्रांती त्‍यांनी स्‍वतः पाहिली. महाराष्‍ट्र ऊर्जेच्‍या पातळीवर स्‍वयंपूर्ण व्‍हावा या ध्‍यासापोटी त्‍यांनी महाराष्‍ट्रातील वीज परिस्थितीचा अभ्‍यास केला. सौरऊर्जा हा त्‍यांचा जिव्‍हाळ्याचा विषय. त्‍यांनी मुजुमदार या ज्‍येष्‍ठ तंत्रज्ञ मित्राच्‍या सहकार्याने 'ऊर्जा प्रबोधन' नावाचा गट तयार केला आहे. त्‍याद्वारे ते विविध ठिकाणी जाऊन लोकांचे ऊर्जाविषयक प्रबोधन करण्‍याचा प्रयत्‍न करतात. क-हाडे यांनी स्वानंदासाठी गीतेवर आधारित इंग्रजी प्रवचनांचा मराठी अनुवाद करून ठेवला आहे. त्‍यांनी संस्‍कृतमधून मराठीत भाषांतरीत केलेला अंबेजोगाई येथील 'श्री योगेश्‍वरी देवी' या देवस्थानाचा तीस ओव्‍यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. लेखकाचा दूरध्वनी 9987041510