चार वाटा एकत्र येत असल्यामुळे चव्हाटा हा नेहमीच रहदारीने गजबजलेला असतो. अशा ठिकाणी दुकान थाटल्यास मालाची विक्रीही चांगली होते. त्यामुळेच व्यापारासाठी मोक्याची जागा म्हणून चव्हाट्याकडे पाहिले आहे.
पूर्वीच्या काळी जेव्हा वर्तमानपत्रे किंवा दूरदर्शनसारखी प्रसारमाध्यमे नव्हती, तेव्हा चव्हाटा प्रसारमाध्यमाचे कार्य करायचा. चव्हाट्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या भागांतील प्रवासी येत. त्यांच्या बोलण्यातून दूरदेशीच्या वार्ता कळत. त्याचबरोबर स्थानिक बातम्या, घडामोडीही दूरच्या प्रवासाला जात. त्यामुळे एखादी गोष्ट चव्हाट्यावर झाली की ती जगजाहीर झाली असे समजले जाई. म्हणूनच एखाद्या व्यक्तीची अथवा घराण्याची चारचौघात चव्हाट्याच्या ठिकाणी नाचक्की झाली म्हणजे ‘अब्रू चव्हाट्यावर मांडली’ असा अर्थ होई. त्यातून ‘अब्रू चव्हाट्यावर मांडणे’ असा वाक्प्रचार रूढ झाला. त्याचबरोबर ‘घरातलं भांडण उंबऱ्याच्या आत ठेवावं. चव्हाट्यावर मांडू नये.’ असा उपदेश वडीलधारी मंडळी करत.
चव्हाटा म्हणजे चार वाटा एकत्र येणे तर अव्हाटा म्हणजे ज्या वाटेने जाऊ नये अशी वाट म्हणजेच आडमार्ग. चव्हाट्याला संस्कृत शब्द आहे चतुष्पथ. ज्ञानेश्वरीत चव्हाटा, अव्हाटा हे शब्द अनेक वेळा आले आहेत. तसाच चतुष्पथही एक ओवीत आला आहे. ती ओवी अशी :
तैसें, प्रयाग होत सामरस्याचें |
वरी वोसण तरत सात्त्विकाचें |
ते संवाद चतुष्पथींचें |
गणेश जहाले ||
या ओवीतून गणेश या देवतेच्या प्राचीन काळातील स्वरूपाबाबत माहिती मिळते. गणेश हा मुळात ‘विघ्नकर्ता’. परंतु त्याची स्तुती केल्यास तो ‘विघ्नहर्ता’ होतो, अशी प्राचीन काळी समजूत होती. सुरुवातीच्या काळातील काही ग्रंथांमध्ये विनायकांचा उल्लेख उपद्रवी असा येतो आणि त्यांची तुष्टी करण्यासाठी हमरस्ते जेथे एकमेकांना छेदतात अशा जागी म्हणजे चव्हाट्यावर त्यांना नैवेद्य ठेवावे असे सांगितले आहे. त्यातून पुढे गणेश उपासना सुरू झाली आणि गुप्त काळात स्वतंत्र गणेश मंदिरे अस्तित्वात आली. ज्ञानेश्वरीत आलेला ‘चतुष्पथीचे गणेश’ हा उल्लेख त्या प्रथेवर आधारित असावा.
अर्थात आजही पुण्यासारख्या मोठ्या शहरात, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तीचे विसर्जन न करता, चौकातील मोक्याच्या जागी त्यांची स्थापना करून भक्तीची दुकाने उघडलेली पाहिली, की चतुष्पथीचे गणेश ह्या विधानाची सत्यता दिसून येते.
– डॉ. उमेश करंबेळकर
(राजहंस ग्रंथवेध, एप्रिल २०१५ वरून उद्धृत)
Chavata…..well informed
Chavata…..well informed article.