Home छंद निरीक्षण चला, सूर्याची परिक्रमा अनुभवू या… (Let’s Experience the orbit of the Sun)

चला, सूर्याची परिक्रमा अनुभवू या… (Let’s Experience the orbit of the Sun)

_suryachi_parikrama

सूर्य हा आकाशात संक्रमण करत असतो. फार फार पूर्वीच्या काळी, काही माणसे निसर्गाचे निरीक्षण करत असताना, त्यांना सूर्य काही वेळा वेगवेगळ्या महिन्यांमध्ये ठरावीक वेळी घरावर, झाडाच्या मागे, अन्य ठिकाणी दिसत असे. त्यावरून सूर्याचे संक्रमण, ग्रहताऱ्यांचा संचार यांबाबत निरीक्षणे मांडली गेली व खगोल विज्ञान विकसित होत गेले. ते अनुभवण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी साधने पूर्वी नव्हती. तरी त्यावेळच्या लोकांनी चिकाटीने अनेक शोध लावले. परंतु ते जाणण्यासाठी, निसर्गाचा तो अनुभव पडताळून पाहण्यासाठी मात्र आता आपल्या सगळ्यांच्या हातात एक साधन आहे, ते म्हणजे मोबाईल. आपण त्याद्वारे एक प्रयोग करून सूर्याची परिक्रमा पडताळून पाहू शकतो.

सूर्य हा कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त या तीन वृत्तांमध्ये फिरत असतो. तो विषुववृत्ताच्या वरती साडेतेवीस अंश आणि खाली साडेतेवीस अंश अशी परिक्रमा करतो. तो उत्तर-दक्षिण ध्रुवाकडे जात नाही. त्याचा वावर हा त्या तीन वृत्तांमध्येच असतो. तो जेथे आज उगवतो तो तेथे पुढील एक महिन्याच्या कालावधीत नसतो. तो थोडा थोडा सरकतो. तो कर्कापासून विषुववृत्तात जातो. नंतर तो विषुववृत्तापासून मकरमध्ये प्रवेश करतो. त्याची परिक्रमा ही खो-खो खेळासारखी असते.

सूर्य सकाळी सात वाजता हा लाल अशा गडद रंगाचा असतो. तो पुढे नंतर, प्रकाशमान झाल्याने दिसेनासा होतो. आज सूर्याने मकरवृत्तात प्रवेश केला आहे. त्यामुळे प्रयोगाची पहिली कृती ही उद्यापासून सुरू होते. उद्या सकाळी सूर्य पूर्ण बिंबात दिसेल अशा वेळी म्हणजे सकाळी सातच्या दरम्यान गच्चीवर किंवा अन्य ठिकाणी जाऊन त्याचा फोटो काढायचा. त्यानंतर पुढच्या महिन्यात त्याच तारखेला, त्याच वेळी, त्याच ठिकाणी सूर्याचा फोटो काढायचा. असे किमान सहा महिने करायचे. हळू हळू फोटो पाहून लक्षात येईल, की सूर्याची जागा ही बदलत आहे. सहा महिन्याचे सर्व फोटो एकत्र केल्यावर समजेल, की तो मकर ते कर्क किंवा कर्क ते मकर पर्यंत परिक्रमा करत आहे.

एका वेळी लक्षात येईल, की तो खो – खो सारखा दोन खांबांमधून एका खांबाला स्पर्श करून व्यक्ती जसा परत येतो तसा तो मकरला किंवा कर्काला स्पर्श करून विषुववृत्तात जाऊन येत आहे. तो प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींनी करायचा. 

ज्यांना सूर्य-पृथ्वी प्रदक्षिणेबाबत शंका आहेत त्यांनी हा प्रयोग उद्यापासून करावा. सूर्य हा विषुववृत्ताच्या वर साडेतेवीस अंश आणि खाली साडेतेवीस अंश अशी परिक्रमा करत असल्याने विषुववृत्ताच्या वर-खाली मानवी संस्कृती उदयास आल्या. तेथे मानवाला सूर्यप्रकाश असल्याने मुबलक पाणी आणि वातावरण मिळाले. त्याच प्रदेशात शेती चांगल्या प्रकारे झाली. 

जर हा प्रयोग किमान एक वर्षभर नियमित केला, तर जसे पुस्तकाच्या पानावर चित्र काढून पाने एकत्र उघडल्यावर सरकन माणूस चालताना दिसतो; तसे सगळे फोटो एकत्र केल्याने सूर्य फिरल्याचे दिसेलआणि सूर्याच्या त्या अद्भुत प्रवासाचे दर्शन घडेल.

– चंद्रकांत गवाणकर

———————————————————————————————————————————

वरील प्रयोगाबाबत खगोलअभ्यासकांच्या प्रतिक्रिया – 

1. उपक्रम खूप छान आहे. तो प्रयोग विद्यार्थी आणि पालकांनी मिळून करायला पाहिजे. तो प्रयोग करताना सूर्य पूर्ण बिंबात असेल, तेव्हा डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सकाळी साडेसहा ते सात दरम्यान हा प्रयोग करावा.  
संजय पुजारी, प्रयोगशील विज्ञान शिक्षक

 

 

 

 

2. उत्तम उपक्रम. आपण गच्चीवरील खांबासोबतही हा सारखाच प्रयोग करू शकतो. गच्चीवरील खांबाच्या सावलीचा फोटो घेऊन त्याच्या फोटोतील वेगवेगळ्या जागेवरील सावल्यांद्वारे सूर्य परिक्रमेचा अंदाज येईल. दोन्ही प्रयोग करताना तिच वेळ आणि तिच जागा असेल याची काळजी घ्यावी.
– सतीश पाटील, खगोलतज्ञ

 

 

 

3. तो प्रयोग दर पंधरा दिवसांनी करावा. फोटो काढताना सूर्याला मध्यभागी न ठेवता, एखादी वस्तू (उदा. इमारत, झाड) मध्यभागी असावे. तो प्रयोग सकाळी सातच्या आधी किंवा संध्याकाळी चार नंतर सुर्यास्ताआधी करावा.
– सचिन पिळणकर, खगोलअभ्यासक 

 

 

 

4. दरवर्षी नियमित सूर्याचा फोटो काढून प्रयोग करणे हा एक चांगला उपक्रम आहे. त्या प्रयोगातून आपल्यासमोर जे फोटो येतील, त्यातून आपल्याला इंग्रजीमधले 8 या अंकाच्या आकारामध्ये सूर्य दिसेल. त्यासाठी अधिक माहिती पुढील लिंकवर पाहता येईल. – https://www.forbes.com/sites/startswithabang/2019/01/01/this-is-how-the-sun-moves-in-the-sky-throughout-the-year/#398056797303
-शिरीन गांगल, संशोधक  

About Post Author

Exit mobile version