चर्मवाद्ये

0
1119
-heading

महाराष्ट्रात ढोलकी, मृदंग, संबळ, नगारा, हलगी अशी चर्मवाद्ये लोकप्रिय आहेत. वाद्ये लोकांमध्ये नऊ रस निर्माण करू शकतात. महाराष्ट्रात ढोलकी आणि मृदंग दोन्ही एकाच प्रकारची वाद्ये वेगवेगळ्या लोकप्रिय आहेत. ढोलकी घुंगराचे चाळ वाजवते तर मृदंग टाळ वाजवतात- अर्थात ढोलकीला घुंगराची साथ असते तर मृदंगाला टाळाची. ती दोन वाद्ये शृंगार आणि भक्ती व्यक्तीच्या मनात रुजवत असतात. तसेच, नगारा व डफ मनुष्याच्या अंगी वीररस निर्माण करतात. शाहिरांच्या डफांनी महाराष्ट्रात वीरश्री निर्माण केली. गडकिल्ल्यांवरील देवी-देवतांच्या मंदिरांत नगारखान्याची परंपरा आहे. नगारखाना म्हणजे वाद्यासाठी स्वतंत्र विभाग होता. डमरू हे चर्मवाद्य शंकराचे प्रतीक मानले जाते.
मुख्य वाद्यांना पुढे कारागिरांनी व वादकांनी त्यांच्या सोयीनुसार आकार दिले. त्यातूनच आणखी काही वाद्ये वाढली असावी. नगारा हे वाद्य मोठे असते. त्याचे आकारमान व वजन यांमुळे वादक हातात ते घेऊन वाजवू शकत नाही. त्यामुळे ते फक्त एकाच ठिकाणी ठेवून वाजवता येते. त्यातूनच पुढे संबळसारखे वाद्य छोट्या स्वरूपात पुढे आले असावे. संबळ हे विशिष्ट दोरीच्या साहाय्याने खांद्याला लावून, पुढे घेऊन वाजवले जाते. त्याच प्रकारे हलगीसारखे वाद्य निर्माण झाले. हलगीची छोटी प्रतिकृती म्हणून दिमड्या पुढे निर्माण झाल्या. त्या भजनात आणि इतर कार्यक्रमात वाजू लागल्या. दिमडीचा उपयोग विदर्भात भजनामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. वाद्यांच्या आकारानुसार अनेक शब्द प्रचलित झाले आहेत. जसे, की दिमडी छोटी असल्याने ‘दिमडीचा’ हा शब्द रूजला, दिमडीचा पगार, दिडदिमडीची किंमत असे वाक्प्रचार; तसेच, ढेरी सुटलेल्या माणसाच्या पोटाला कधीकधी नगाऱ्याची उपमा विनोदाने दिली जाते.

 

About Post Author