आचार्य अत्रे यांच्या भाषणांत व लेखनात चपखल उपमा असायच्या.
समाजवादी पक्ष फाळणीच्या ठरावाच्या वेळी तटस्थ राहिला. त्या तटस्थ भूमिकेची कारणमीमांसा राम मनोहर लोहियांपासून सर्वांनी केली. अच्युतराव पटवर्धन म्हणाले,” आम्ही ठरावाला पाठिंबा दिला असता तर जातीयवादी ठरलो असतो. ठरावाला विरोध केला असता तर भांडवलवादी ठरलो असतो, म्हणून आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.”
त्यावर अत्रे म्हणाले, ”तुमची भूमिका म्हणजे लग्न नाही केले तर निसर्गाच्या विरुध्द वागणे होते. लग्न केले तर ब्रम्हचर्य मोडते, म्हणून लग्न न करता बाई ठेवण्यासारखे आहे.”
ज्येष्ठ संपादक पां.वा.गाडगीळ हे अत्र्यांचे मित्र. अत्रे त्यांना ‘पांडोबा’ म्हणत असत. पां.वा. गाडगीळ म्हणत, ”मुंबई गेली हातून तर रडत बसू नका, विकासाच्या कामाला लागा.”
‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ असा आग्रह धरणा-या अत्र्यांना गाडगीळांचे म्हणणे कसे सहन होणार? अत्रे म्हणाले, ” आमचे पांडोबा म्हणतात, मुंबई गेली हातातून तर रडत बसू नका, विकासाच्या कामाला लागा, पांडोबांचे हे म्हणणे म्हणजे एखाद्या बाईचा नवरा मेला तर तिला सांगायचे, ‘बाई, तुमचा नवरा गेला अतिशय वाईट झाले, पण आता रडत बसू नका, वेणीफणी करायला लागा.”