ग.ह. पाटील हे खेड्यातील निसर्ग- वातावरण यांचा दृढ संस्कार असलेले, सश्रद्ध, हळव्या-कोवळ्या मनाचे, जुन्या पिढीतील कवी. कवी, बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ ही त्यांची ओळख. ग.ह. पाटील यांच्यापाशी मन लहान मुलांच्या निरागस वृत्तीशी, कुतूहलाशी, उत्कट-सुंदर भावविभोरतेशी नाते सांगणारे होते. त्यांचे आत्मिक सामर्थ्य तेच होते. त्यांची बालकविता म्हणजे जणू अवतीभोवतीच्या निसर्गातून, जीवनातून टिपलेले हळुवार परागकण ! त्यांनी त्यांच्या प्रतिभासामर्थ्याने आशयसंपन्न, वृत्तबद्ध अशा कवितांची देणगी मराठी रसिकांना आणि बालगोपाळांना दिली. त्यांच्या बालकवितांवर काही पिढ्यांची मने पोसली गेली. त्यांच्या काव्यपंक्ती ओठांवर असलेली माणसे कितीतरी आहेत; रसिकांच्या स्मरणात एवढा दीर्घकाळ असणे ही मोठी गोष्ट होय !
ग.ह. पाटील यांनी माधव ज्यूलियन, गिरीश, यशवंत यांच्या कविता; तसेच, केशवसुत, भा.रा. तांबे, बालकवी या महत्त्वाच्या पूर्वकालीन कवींच्या कविता यांचा रसास्वाद घेतला होता. त्यामुळे शहरी कवींची ग्रामीण कविता, निव्वळ शहरी संवेदना व्यक्त करणारी कविता, निव्वळ निसर्ग कविता असे विविध प्रकारचे काव्यलेखन त्यांच्यासमोर होते. काही कविता सामाजिक आशयाचे भान देणाऱ्या, काही उत्कट-धुंद प्रणयभावना व्यक्त करणाऱ्या… त्यांनी स्वत:ची स्वतंत्र वाट त्या पूर्वकालीन, समकालीन कवींचे संस्कार पचवून शोधली; स्वत:शी प्रामाणिक राहून अस्सल अनुभूतींचे चित्रण केले.
ग.ह. लहानाचे मोठे पुण्याजवळील खेड-मंचर-कळंब या खेड्यांतील निसर्गाच्या सान्निध्यात झाले. त्यांना त्या ग्रामजीवनाची, निसर्गरूपांची ओढ होती. ते तेथील डोंगरदऱ्यांत, शेतांत, झाडा-फुलांत रमले, समरस झाले. ते सारे त्यांच्या जीविंचे जिवलग बनले. विस्तीर्ण घारकडा, जुन्नरचा वऱ्हाड्या डोंगर, आंबराई, विहिरीजवळचा लिंब, ‘पेर्ते व्हा, पेर्ते व्हा’ म्हणत उडणारा पावशा, भग्न दुर्गावर पसरलेली पांढरीशुभ्र रानजाई हे सगळे त्यांचे सखे. त्या साऱ्यांना त्यांच्या कवितेत अनन्यसाधारण स्थान आहे. निसर्गाच्या कोमल आणि रूद्र, शांत व संहारक रूपांचा ठसा त्यांच्या संवेदनशील मनावर खोलवरपणे उमटला होता. शेतातील ओल्या मातीत पाऊल उमटावे, त्या पावलानेच आयुष्यभराची वाट मळावी- उजळून टाकावी अशी त्यांच्या कवितेची वाट रानावनाने, फुले-पाखरांनी, डोंगरदऱ्यांनी उजळून टाकली होती. त्यातूनच निर्माण झाले अद्भुताचे आकर्षण, ऐतिहासिक घटना-प्रसंगांची ओढ; शिवाजी- त्याचे पराक्रमी मावळे यांच्या विषयीचा अभिमान ! असे सगळे प्रसंग कथनात्मक पद्धतीने डोळ्यांपुढे साकार करत अभिव्यक्त करण्याची त्यांची पद्धत रसिकांची मने तल्लीन करून टाकते. कविता ही तिचा छंद, वृत्त, लय सहजतेने घेऊन येते. ही सहजता, निर्मळ सश्रद्धता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष होता. म्हणूनच त्यांच्या कवितेत विलक्षण सत्त्वशीलता आणि निर्व्याज साधेपणा आढळतो. कथा कधी कवितेत फुलत जाते, कधी एखादे गीत शब्दांच्या पंखांवर बसून झुलत राहते. पण शब्द साधे असले तरी त्या शब्दांतील भावार्थ बालमनांना थेट भिडवणारा असतो –
देवा तुझे किती | सुंदर आकाश
सुंदर प्रकाश | सूर्य देतो
या परिचित अनुभवाचे वर्णन करता करता कवी
इतके सुंदर | जग तुझे जर
किती तू सुंदर | असशील
अशा एका व्यापक, परम उच्च कोटीच्या आशयाकडे झेपावतो आणि बालमनांना जणू देवबाप्पा दिसतो, कळतो ! ती कविता ‘अरूपाचे रूप दावीन मी डोळा’ अशा उंचीवर जाऊन थांबते. ती कविता ज्यांनी निरागस वयात वाचली आहे, गायली आहे, त्यांच्या स्मरणातून ती पुसली जाणे अशक्य. ‘गोकर्णीचे फूल बाई गोकर्णीचे फूल’, ‘फुलपाखरू छान किती दिसते’, ‘डराव डराव का ओरडता उगाच राव’, ‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो’ या कविता आणि त्यांचे विषय किती साधे, सोपे ! त्या कविता मुलांना निसर्गापाशी थेट घेऊन जाणाऱ्या, निसर्गातील रंग-लय-स्वर यांच्याशी गोड, दृढ भेट घडवून देणाऱ्या आहेत.
त्यांनी निसर्गाशी संवाद साधण्याबरोबरच उत्कट मानवी भावभावनांनी मन ओलेचिंब करून टाकणारी ‘श्रावणबाळ’सारखी करुण रसात्मक कविताही लिहिली. शर आला तो, धावुनि काळ विव्हळला श्रावणबाळ… वाचक ही दीर्घकविता ओल्या पापण्यांनी वाचताना किती भावश्रीमंत होतो ते अनुभवल्यावीण आकळणे अवघड ! ‘लिंबोळ्या’, ‘नांगर’ याही वैशिष्ट्यपूर्ण कविता आहेत. जगात युद्धसंकट किंवा अन्य कोणतेही संकट आले तरी हलधर कर्मयोग्याप्रमाणे शेतात काम करत राहतो. युद्धे ही घटकेची वादळे, नांगर म्हणजे ईश्वराच्या समृद्ध जगाचे पवित्र प्रतीक हा व्यापक आशय उदात्त भावनेचे, चिरंतन मूल्याचे दर्शन घडवणारा आहे.
‘गस्तवाल्याची गीते’ हे ग.ह. पाटील यांच्या काव्यविश्वातील एक स्वतंत्र, आगळेवेगळे दालन आहे. त्यातून ऐतिहासिकतेचे, अद्भुताचे, पराक्रमाचे आकर्षण असणारे कविमन प्रगटले आहे. वृत्तबद्धता, कथनात्मक शैली, आवश्यक त्या तपशिलांचे रोमांचकारी रंग, वातावरणनिर्मिती ही त्या गीतांची वैशिष्ट्ये आहेत. त्यात ‘गस्तवाल्याने पाहिलेली स्वारी’, ‘जकातीच्या नाक्याचे रहस्य’ या सुंदर अशा कविता आहेत. त्यांमध्ये किंचित काळ श्वास रोखून धरण्यास लावणारी उत्कंठा आहे. गस्तवाला धर्माजी वेस्कर हा त्याच्या सोबत्याबरोबर गस्त घालत असे. तो हिंडता हिंडता गावशिवेबाहेर आला- समोर, घारकडा एखाद्या घारीसारखा पंख पसरून उभा होता ! रात्रीची शांत वेळ, भोवताली चांदणे, समोर देवळाचे पांढरे निशाण, काळीकभिन्न भग्न दीपमाळ अशा वातावरणात धर्माजीने सांगितले, की शाळूच्या शेतात घारकड्यावरून भुते येतात. घारकड्याखालून देवाची स्वारी जाते आणि एकाएकी, खरोखरच अद्भुत दृश्य दिसू लागते. ‘देवाची स्वारी’ आली. आघाडीला राजे, पिछाडीला त्यांचे सरदार सगळे चंदेरी घोड्यावर स्वार झालेले… वेगात दौडत गेले. त्यांची शस्त्रास्त्रेही चंदेरी ! त्या थाटाच्या स्वारीने राष्ट्राला संदेश दिला, पुण्यशील छत्रपतींच्या महाराष्ट्रात मर्द मराठ्यांच्या स्वाऱ्या अजूनही निघतात ! कविमनातील तो भाव कवितेच्या अखेरीला प्रगट होतो आणि कवितेतील अद्भुततेला उंची प्राप्त होते. ‘वटराज’ ही कवितासुद्धा, कवीच्या मनातील स्वातंत्र्याची आस व्यक्त करते. वडाची गळून पडणारी पिकली पाने पाहून कवी म्हणतो –
पिकली पाने, जणू आसवे खाली हा गाळितो
समाधिस्थ सुहृदास कहाणी गहिवरूनी सांगतो
‘स्वातंत्र्याचा तरु उन्मळुनी पडला खाली कसा?’
याच, विचारी जीव लागला झुरणीत त्याचा असा !
ग.ह. पाटील यांनी काही चांगल्या अभंगरचनाही केल्या आहेत. त्यांत ईश्वराविषयीचा भक्तिभाव, कृतज्ञता, शरणागती… हे सारे व्यक्त झाले आहे. कवी तुझ्यावीण मला त्राता कोण? असा प्रश्न विचारतात. ते तुझ्या मंगल नामातच विराट स्वरूप सामावले आहे अशी विशाल भावना व्यक्त करतात. त्या अभंगात खिन्न आर्तता जाणवते.
ग.ह. पाटील यांचे शिक्षणक्षेत्रातील कार्यही महत्त्वाचे आहे. ते जळगाव, धुळे, बोर्डी, पुणे येथे ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य होते. ते काही काळ शिक्षणाधिकारीही होते. पाठ्यपुस्तक मंडळाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. जिल्हा स्कूल बोर्ड कमिटीचे सदस्य होते. त्यांची ‘मन्वंतर वाचनमाला’ लोकप्रिय झाली होती. ‘बालशारदा’ या पुस्तकाला त्यांची रसग्रहणात्मक प्रस्तावना आहे. त्यांचे शिक्षणविषयक कार्य ‘पदविका, शिक्षण व अध्ययन’, ‘आधुनिक शिक्षणशास्त्र’, ‘भाषेचा अभ्यास’, ‘वाङ्मयलेखन परिचय’, ‘नवीन सोपे मोडी वाचन’, ‘बालमोहन पुरवणी वाचनमाला’ इत्यादींतून डोळ्यांपुढे येते. बालमनाची भूक- त्यांच्या जाणिवा, संवेदना अचूक जाणून शिक्षणक्षेत्रात काही चांगले घडवून आणण्याचा प्रयत्न करणारे जे शिक्षणाधिकारी होते, आहेत त्यात ग.ह. पाटील यांना महत्त्वाचे स्थान आहे. स्वत:च्या विचारविश्वात, भावविश्वात रममाण झालेले, स्वत:चे विहीत कर्तव्य मन:पूर्वक पार पाडणारे ग.ह. पाटील जेव्हा- उतरत आहे सांज सावकाश | उदास उदास वाटताहे || असे लिहितात तेव्हा रसिक मनही गलबलून गेल्याशिवाय राहत नाही. तरीही सांजवेळेला मनात दरवळते ती रानजाई, दृष्टीपुढे दिसतो तो घारकडा आणि देवाचे ते सुंदर आकाश ! ग.ह. पाटील यांच्या लेखणीची तीच खरी देन आहे.
ग.ह. पाटील (जन्म 19 ऑगस्ट 1906; निधन 1 जुलै 1989)
साहित्य
काव्यसंग्रह
- बालशारदा – 1931
- रानजाई – 1934
- पाखरांची शाळा – 1960
- लिंबोळ्या – 1961
- चंद्रावरचा ससा – 1996
- गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता – 1996
बालकथासंग्रह
- मला पंख असते तर
- मजेदार बाळगोष्टी इ.
संपादित
- गुरुवर्य बाबुराव जगताप जीवनदर्शन
– मेधा सिधये 9588437190 medhasidhaye@gmail.com
————————————————————————————————————————————