बैठक थिंक महाराष्ट्र डॉट कॉम, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय यांनी ठाणे नगर वाचन मंदिराच्या सहकार्याने भरवली होती. ग्रंथालये ही माहिती व मनोरंजन यांचे अड्डे बनले पाहिजेत. लोकांची ही गरज कमी झालेली नाही; उलट वाढली आहे.
ग्रंथालये ज्ञानकेंद्रे बनू शकतील !
ठाणे बैठकीतील मार्गदर्शक विचार
गावोगावची ग्रंथालये पुन्हा एकदा त्या त्या ठिकाणची ज्ञानकेंद्रे व्हावीत यासाठी त्यांना आधुनिक स्वरूप येणे गरजेचे आहे; त्यासाठी काय करावे याचा विचार ठाणे नगर वाचन मंदिरात बोलावल्या गेलेल्या एका बैठकीत करण्यात आला. नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष यशवंत साने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्रातील शंभरच्या आसपास ग्रंथालये शंभर वर्षांहून अधिक जुनी आहेत. तेथील प्रत्येक ठिकाणची ग्रंथसंपदा संख्येने एक लाखाहून अधिक आणि काळाने शंभर वर्षांहून अधिक जुनी आहे. ब-याच ठिकाणी हस्तलिखिते वगैरे सामग्रीही संग्रहित केलेली आहे. वास्तवात मात्र वाचकांची संख्या रोडावत आहे. कर्मचा-यांना नोकरीच्या चांगल्या सोयीसंधी नाहीत; पुरेशा वेतनाचा अभाव अशा कारणांनी त्यांच्यामध्ये कार्योत्सुकता नाही. यामुळे गावोगावची ग्रंथालये अडगळीत पडली आहेत. एके काळी ग्रंथालये हे त्या त्या गावचे सांस्कृतिक अड्डे असत. त्यांऐवजी त्या जागा उदास बनल्या आहेत.
उलट, ‘नॉलेज इंडस्ट्री’ असलेल्या आजच्या जगात लोकांनी ग्रंथालयांकडे माहिती व ज्ञान यासाठी ओढीने यायला हवे; तेथील बालतरुणांसहित प्रौढ नागरिकांची वर्दळ वाढायला हवी; हे कसे साधता येईल यावर बैठकीत खल झाला.
बैठक थिंक महाराष्ट्र डॉट कॉम, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय यांनी ठाणे नगर वाचन मंदिराच्या सहकार्याने भरवली होती. ग्रंथालये ही माहिती व मनोरंजन यांचे अड्डे बनले पाहिजेत. लोकांची ही गरज कमी झालेली नाही; उलट वाढली आहे. फक्त ह्या दोन्ही गोष्टी एके काळी केवळ पुस्तकांतून मिळत. त्यामुळे पुस्तकांबद्दल ओढ वाटे. आता, माहिती व मनोरंजन यांची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. त्यांची कास धरली गेली पाहिजे असे बैठकीत वेगवेगळ्या वक्त्यांनी प्रतिपादले. ग्रंथालयात चैतन्य यायला हवे असेल तर तेथील माहिती व ज्ञान यांचा ‘कमॉडिटी’ म्हणून विचार झाला पाहिजे असेही सुचवले गेले.
बैठकीला वेगवेगळ्या क्षेत्रांतले पंचवीसहून अधिक लोक आले होते. सर्वांना पुस्तकांबद्दल व ग्रंथालयांबद्दल आस्था होती. गिरगाव चौपाटीहून सुधीर बदामी, अंधेरीहून सुषमा पौडवाल, ठाण्याहून दामोदर मल, संगीता मल, चुनाभट्टीचे हेमंत शेट्ये, भिवंडीचे सुधीर धनवटकर यांनी वेगवेगळ्या सूचना मांडल्या. गावातील नागरिक एकत्र झाले तर एखादी वास्तू कशी सजीव करू शकतात याचा दाखला म्हणून डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे उदाहरण देण्यात आले.
वाचनालयांनी भाषाशिक्षणाचे व वेगवेगळ्या आधुनिक विद्याशाखांचे माहिती-अभ्यासक्रम सुरू करावेत; ग्रंथालयांत त्या त्या गावाची माहिती उपलब्ध करून द्यावी; ग्रंथालयांतील दुर्मीळ पुस्तकांची यादी खुली करावी; ग्रंथालयांत संगणक इंटरनेट जोडणीसह वाचकांना वापरण्यास खुले ठेवावे; वाचकांना घरपोच पुस्तके देण्याची व्यवस्था करावी… ग्रंथालयसेवा सुधारण्याच्या अशा काही सूचना करण्यात आल्या.
गावोगावी ग्रंथालय मित्रमंडळे स्थापन व्हावीत आणि त्यांच्या कामांना चालना मिळावी म्हणून दोन कलमी कृती कार्यक्रम बैठकीत पक्का करण्यात आला. एकतर नागरिकांकडे असलेली जादा पुस्तके जमा करून घेऊन ती गावोगावच्या गरजू ग्रंथालयांना पोचवण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी सुभाष मुंदडा, राजीव देवल व सुधीर धनवटकर यांच्यावर सोपवण्यात आली; तर सुषमा पौडवाल, हेमंत शेट्ये व दामोदर मल यांच्यावर एक जुने ग्रंथालय आधुनिक ज्ञानकेंद्र बनण्याच्या दृष्टीने तेथे काय आदर्श सोयीसुविधा करता येऊ शकतील याचा ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्याची कामगिरी सोपवण्यात आली.
ठाणे नगर वाचन मंदिराचे कार्यवाह नरेंद्र नाडकर्णी यांनी आभार मानले.
– प्रतिनिधी