गो. म. कुलकर्णी – चिकित्सक चिंतनशील

0
59
_G_M_Kulkarni

गो. म. कुलकर्णी (छायाचित्र - लोकमत वृत्‍तपत्रातून साभार)गो. म. कुलकर्णी गेले त्यालाही पुरी बारा वर्षं झाली. एक तप. आणि आता हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचं. १९१४ चा त्यांचा जन्म. काळ फार भराभर सरकत जातो आहे. सार्वजनिक जीवनावरून, पुस्तकांवरून, आपल्यावरूनही वाड्मय व्यवहारात सतत वावरलेली, प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली, वाचनात आणि चर्चेत असलेली माणसेही काळाने पाहता-पाहता विस्मरणाच्या छायेत सरकवून दिली आहेत. मग गो. मं. सारख्या शांत, मितभाषी समीक्षकांची गोष्ट काय!

फार साधे, सौम्य होते गो. म.! साहित्याच्या जगातले एखाद-दोन अपवाद वगळता बहुतेक कुलकर्णी जसे होते तसेच, गंभीर प्रकृतीचे. सद्भिरुची असणारे. वाड्मयव्यवहारातल्या मौजमजेच्या कार्यक्रमांना किंवा उत्सवांना त्यांची उपस्थिती फारशी नसायची. इचलकरंजी-सांगली भागात ते शिकले आणि नंतर पुण्यात आले. एम्. ए. झाले. शिक्षकही झाले. मराठी आणि संस्कृत हे त्यांचे प्रेमाचे विषय. नंतर महाविद्यालयांमधून शिकवताना विजापूर, कर्हाकड, वाईला राहिले आणि अखेरचा काळ पुन्हा पुण्यात येऊन स्थिरावले.

फार चढ-उतार नसलेला आयुष्यक्रम. नेमस्त, सत्वशील असं जगणं भोवतालच्या माणसावर ठसा उमटे तो त्यांच्या अनाग्रही पण चिकित्सक, मार्मिक अशा वाड्मयीन दृष्टीचा. १९८० च्या आसपास ते आमच्या घरी येऊ लागले. विश्वरनाथराव शेट्ये यांच्याबरोबर माझ्या वडिलांच्या अमृत महोत्सवी गौरवग्रंथाचं संपादन ते करत होते तेव्हा. नंतर मग पुण्यात राहायलाच आले आणि सपत्निक घरी येत राहिले. घरगुती, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये वडीलधा-या माणसांसारखी त्या दोघांची उपस्थिती असायची.

मात्र, गो. म. अशा वातावरणात प्रत्यक्ष असले, तरी मनानं फारसे गुंतलेले नसायचे. त्यांचं जग वेगळं होतं. वाड्मयाचं जग. ग्रंथांचं जग. महाराष्ट्राबाहेर विजापूरला ते बरीच वर्षं होते. विजय कॉलेजमध्ये ते शिकवीत असत. तिथे मराठीच्या दृष्टीनं वाड्मयीन-सांस्कृतिक असं वातावरण फारसं नव्हतं. मराठीच्या मुख्य व्यवहारापासून विजापूर तसं लांबचं- कर्नाटकातलं शहर होतं. पण नाही म्हणायला तिथे श्री. र. भिडे होते. तेही मराठी-संस्कृतचे प्रेमी. त्या दोघांनी मिळून १९५४ मध्ये एक पुस्तक सिद्ध केलं- ‘मराठीचे स्वरूपदर्शन.’ मराठी काव्य, व्याकरण आणि गद्य यांचे स्वरूप माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना समजावून देणारं हे पुस्तक खरं म्हणजे आजही मराठीच्या शालेय माध्यमिक विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं आहे. गो. मं.च्या लेखनाची ती साधी-सामान्य सुरुवात होती. याच वर्षी त्यांचा एक कविता संग्रह ‘प्राची’ या नावानं प्रसिद्ध झाला. वस्तुत: गो. म. कवी नव्हते. संवेदनशीलता होती, प्रतिभाही होती, पण दोहोंची जातकुळी कवितेच्या निर्मितीची नव्हती. रसास्वादाच्या प्रक्रियेत त्यांची संवेदनशीलता त्यांना साहित्यकृतीची सूक्ष्म सौंदर्य उलगडून दाखवीत होती आणि त्यांची प्रतिभा त्यांना साहित्याच्या र्ममांचा साक्षात्कार घडवीत होती.

गो. मं.नाही हे आपोआप आतूनच उलगडले असणार. त्यामुळे ‘प्राची’ची पाऊलवाट पुढे राजरस्त्यात रूपांतरित झाली नाही. ‘मराठीचे स्वरूपदर्शन’ मात्र नाना कळांनी विस्तारले. खंडण-मंडन, ‘साद-पडसाद’, ‘वाटा आणि वळणे’ अशी लेख-संग्रहांच्या स्वरूपाची पुस्तके येत गेली. केशवसुत, बालकवी, माधव जुलियन, अनिल यांच्या कविता, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्यासारखे नाटककार आणि कीचकवध, संशयकल्लोळ, दुसरा पेशवा, माता द्रौपदी यांच्यासारखी नाटकं, अरविंद गोखल्यांच्या कथा, पु. शि. रेग्यांच्या कादंब-या आणि अस्तित्ववाद, गांधीवाद यांसारखे वाड्मयावर प्रभाव टाकणारे काही विचारप्रवाह यांच्यावरची ती बहुमुखी समीक्षा होती. प्राचीन-अर्वाचिन गद्य आणि काव्यसारख्याच आस्थेने न्याहाळणारी समीक्षा होती. गो. मं.च्या प्रगल्भ समीक्षेची साक्ष देणारं ‘मराठी साहित्यातील स्पंदने’सारखं एखादं पुस्तकही आज पुन: पुन्हा हाती घ्यावे असं आहे.

१९६० ते १९९० हा काळ मराठी साहित्यातला मोठा खळबळीचा काळ. लघुअनियतकालिकांची चळवळ आणि पाठोपाठ ग्रामीण, दलित, स्त्रीवादी अशा साहित्याचा उदय, यांमुळे मोठी उलथापालथ घडवणारा, रूढ समीक्षादृष्टीला नवी आव्हानं देणारा हा काळ होता. गो. मं.ना तोपर्यंत महत्त्वाचे वाटणारे कवी होते केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज, बोरकर त्यांनी ‘झपुर्झा’ या नावानं केशवसुतांची कविता संपादित केली, ‘हृदयशारदा’ नावानं गोविंदाग्रजांची कविता संपादित केली आणि ‘चांदणवेल’ या शीर्षकानं त्यांनी बा. भ. बोरकरांची कविता संपादित केली. या संपादनांमागे त्यांची कवितालेखन करू पाहणारी संवेदनशीलता तर होतीच, पण कवी प्रकृती आणि कवितेच्या परंपरेचंही सूक्ष्म भान होतं.

तशाप्रकारे साठोत्तरी कवी आणि कवितेवर गो. मं.कडून फारसं लेखन झालं नाही. ‘अभिरुची : ग्रामीण आणि नागर’ आणि ‘नवसमीक्षा’ अशी त्यांची दोन संपादनं प्रसिद्ध आहेत खरी, पण गो. म. खर्या् अर्थानं जोडलेले होते ते विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आणि शतक मध्यात लेखन करणार्यां साहित्यकारांशी. त्यांच्याशी लेखनातून वाद-संवाद करताना, त्यांच्यावर प्रभाव गाजवणा-या मतांचं आणि विचारांचं खंडण-मंडन करताना त्यांच्या समीक्षेला समाधान मिळत होतं. विचारानं ते न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले यांच्या पंथाला जवळचे. या दोघांची चरित्रंही त्यांनी अनुवादित केली. वामन मल्हारांविषयीही त्यांना फार जिव्हाळा होता. त्यांच्या वैचारिक घडणीत या माणसांचा मोलाचा वाटा होता.

अनेक वर्षं त्यांनी दक्ष आणि जागरुक अशा अध्ययन-अध्यापनात घालवली होती. त्यांच्या वाचनाचं क्षेत्र विस्तृत होतं. ते हाडाचे शिक्षक होते; त्यामुळेच असेल कदाचित् पण त्यांनी परिभाषेत अडकलेली समीक्षा दूरच ठेवली. लेखकाच्या जीवनदृष्टीचा वेध घेणारी आणि वाड्मयीन परंपरेचं बहुपदरी भान असणारी त्यांची समीक्षा आहे. त्यांचा मराठी आणि संस्कृतचा व्यासंग त्यामागे आहे. धर्म, सामाजिक विज्ञानं, इतिहास-पुराणं यांनाही परीघात घेणारा त्यांचा समीक्षेचा आलोक आहे.

वाड्मय समीक्षा हा तर त्यांच्या विशेष चिंतनाचा विषय. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत अधिक अचूक बोलायचं, तर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत साहित्यकृती आणि समीक्षा यांच्यात फार अंतर पडलेलं नव्हतं. कारण समीक्षक रूढ टीकाशास्त्राला अनुसरूनच समीक्षा करत होते. अभिजात युगाचं वर्चस्व असण्याचा तो काळ होता. कलावंत नवीनिर्मिती करताना जुन्याचीही आर्जवं करीत होते आणि टीकाकारही प्रचलित टीकाशास्त्राच्या वाटेनं नव्या घटकांना विचारांत सामावून घेत होते. मात्र, ‘अशी असावी कविता, फिरून, तशी नसावी कविता म्हणून’ तुम्ही कवीला सांगणारे कोण मोठे लागून गेलात? असा प्रश्न विचारणारे केशवसुतांसारखे धीट कवी पुढे आले आणि समीक्षकांपुढे नवे आव्हान उभे राहिले. गो. म. नी त्या आव्हानांचं स्वरूप नेमकं समजून घेतलं होतं. त्यातूनच त्यांची डोळस, चिकित्सक अशी र्ममदृष्टी तयार झाली होती.

मराठीला या दृष्टीनेच त्यांनी काही उत्तम कोशवाड्मयाचं आणि वाड्मये इतिहासाचं योगदान दिलं. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मराठी वाड्मय कोशाचं-ग्रंथकार खंडाचं त्यांनी केलेलं काम असो की साहित्य परिषदेनं सिद्ध केलेला वाड्मयेतिहास असो, गो. मं.च्या स्वतंत्र आणि चिकित्सक दृष्टीचं ते उत्तम फलित म्हटलं पाहिजे.

गो. मं.च्या आयुष्याच्या उत्तरार्धात, अगदी शेवटच्या टप्प्यावर ते असताना सगळ्या जगभरच मिथकांच्या महत्त्वाची चर्चा होऊ लागली होती. साहित्य इतर कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात मिथकांचं अवतरण लक्षणीय ठरलं होतं आणि मिथकांचा अभ्यासही त्या दृष्टीनं होऊ लागला होता. गो. मं.ना मराठी साहित्याच्या संदर्भात या अभ्यासाचं महत्त्व जाणवलं होतं. बा. भ. बोरकरांच्या कवितेचं संपादन करताना ते त्या तशा दृष्टीचं उपयोजन करू पाहत होतेच, पण मिथकीय समीक्षा अधिक प्रमाणात झाली पाहिजे, असंही ते आग्रहानं म्हणत होते. त्यांनी स्वत:चं एखादं वैचारिक स्कूल काही निर्माण केलं नव्हतं, पण त्यांनी केलेली पूर्वग्रहमुक्त, अनाग्रही आणि समतोल समीक्षा अनेक अभ्यासकांपुढचा आदर्शमात्र ठरली होती; ठरली आहेही.

वाड्मयव्यवहारात त्यांनी कायम प्रकट केलेली विधायक दृष्टी, त्यांनी वाड्मयास्वादाच्या प्रक्रियेत घडवलेला वाचकाच्या आकलनाचा विस्तार आणि एकूणच अभिरुचीला त्यांच्या लेखनामुळे मिळालेली समृद्धी यासाठी आपण गो. मं.चे ऋणी आहोत. त्यांच्यासारखी माणसं पुरस्कार, चर्चा, गाजावाजा यांच्या पलीकडली. त्यांचं जन्मशताब्दीच्या निमित्तानं कृतज्ञ स्मरण तरी करुया. एरवी एखाद्या अभ्यासकाच्या मूलगामी आणि र्ममग्राही चिकित्सेपाशी त्यांची आठवण येऊन उभी राहणारच आहे.

अरुणा ढेरे
(लेखिका ज्येष्ठ समीक्षक आहेत.)
(लोकमत, मंथन – ५ जानेवारी २०१४)

Last Updated On – 3rd May 2016

About Post Author