गोविंद साठे
ठाण्यातील‘इंद्रधनू’ संस्थेचे संस्थापक सदस्य गोविंद साठे यांनी आगळावेगळा छंद जोपासला आहे. ते त्यांच्या आवडत्या हिंदी-मराठी गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका (रेकॉर्ड) बाजारात जाऊन किंवा ओळखीच्या माणसांकडून विकत घेऊन ते वारंवार ऐकतात आणि मित्रमंडळींनाही ऐकवतात. त्यांनी रेकॉर्ड्स ऐकणारा रसिक वर्गच जोपासला आहे! गाणे सुंदर आहे हे कळण्यासाठी संगीतातील जाणकारच असण्यास हवे असे नाही. हिंदी चित्रपट संगीताने तशी चोखंदळ आवडनिवड भारतीय समाजवर्गात जोपासली आहे. तसे विशेषत: ज्येष्ठांचे ‘ग्रूप’ सध्या ठिकठिकाणी जमले आहेत.
गोविंद साठे यांनीही इतरांप्रमाणे तरुणपणी रेडिओवर गाणी ऐकली आणि मनात साठवून ठेवली. ते बडोद्याला कॉलेजमध्ये होते. त्यांना रस्त्यावरून जात असताना विविध भारती व सिलोन रेडिओवर लागलेली गाणी एखाद्या घरातून ऐकू आली की गोविंद सायकल थांबवून ते गाणे ऐकत असत. त्यांना त्या गाण्यांना घरी घेऊन जावे असे वाटे. हिंदी गाणी कानावर पडत, पण मराठी गाणी बडोद्याला ऐकण्यास मिळत नव्हती. ते नोकरीनिमित्त मुंबईला आले. तेथे विविध प्रकारची गाणी त्यांच्या कानावर पडली. त्यातूनच गोविंद यांना ध्वनिमुद्रिकांचे (रेकॉर्ड) व ग्रामोफोनचे (रेकॉर्ड प्लेअरचे) अप्रूप वाटू लागले. तो काळही अभावाचा होता, सहज उपलब्धतेचा नव्हता.
त्यांनी बाजारात जाऊन रेकॉर्डस विकत घेण्यास सुरुवात केली. त्यांनी गाणे रेडिओ किंवा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर ऐकले आणि आवडले की ते मिळवायचे असा चंगच बांधला! पहिली रेकॉर्ड घेतली ती लता मंगेशकर यांच्या आवाजातील होती. ते ‘संत बहिणाबाई’ या चित्रपटातील गीत होते. मग त्यांनी आणखीही काही ध्वनिमुद्रिका घेऊन ठेवल्या. त्यांना नोकरी मुंबईत फोर्टमध्ये असल्याने मोहंमद अली रोडवर नेहमी जाणे शक्य होते. एकेक रेकॉर्ड मिळवण्यास त्यांच्या कधी कधी दहा-बारा फेऱ्यासुद्धा त्या रस्त्यावर होत, पण गोविंद साठे ती रेकॉर्ड चिकाटीने मिळवल्याशिवाय राहत नसत.
ग्रामोफोन |
त्या रेकॉर्ड रेकॉर्डप्लेअर मिळवल्याशिवाय, ऐकता येणार नव्हत्या. तो योग आला 1975 साली. ठाण्याच्या गोखले रोडवरील एका दुकानात रेकॉर्डप्लेयर आहे व तो शेवटचा पीस शिल्लक आहे अशी बातमी कळताच साठे यांनी त्या दुकानात धाव घेतली. किंमत पाहिली तर पाचशेऐंशी रुपये! ती मोठीच रक्कम होती. तरीही त्यांनी निश्चयाने तो शेवटचा पीस विकत घेऊन टाकला. त्यावर त्यांच्या आवडत्या गाण्याची, लता मंगेशकर यांची रेकॉर्ड लावून उद्घाटन करणे बाकी होते. त्यांनी रेकॉर्डप्लेअर चालू केला तर त्यातून हमिंग ऐकू येऊ लागले! तो पीस सदोष आहे असे कळले. रेकॉर्ड लागेना, मग काय करायचे? गोखले रोडच्या दुकानात रिसीट दाखवून विचारणा केली असता, दुकानदाराने सांगितले, की हा रेकॉर्डप्लेअर जेथून आला आहे, त्या कोलकात्याच्या (कलकत्ता) डमडम येथील फॅक्टरीत पोचवून द्यावा लागेल. तसे करण्यात दोन महिने तरी गेले असते, पण साठे यांनी हार मानली नाही. त्यांनी त्यांच्या घराजवळील इलेक्ट्रॉनिकच्या दुकानातून तो रेकॉर्डप्लेअर दुरुस्त करून आणला. त्यांच्या संगीतओढीचे जणू ते फळ होते. रेकॉर्डप्लेअरवर लता मंगशेकर यांच्या गाण्याची रेकॉर्ड ऐकून साग्रसंगीत उद्घाटन झाले.
संग्रह |
त्या दिवशी सुरू झालेला तो रेकॉर्डप्लेअर पुढे पंचेचाळीस वर्षे रसिकांना गाणी ऐकवत राहिला आहे. गोविंद साठे रसिकतेने रेकॉर्ड्स विकत घेतात. साठे यांची ख्याती त्यांच्याकडे अतिशय जुन्या गायकांच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण रेकॉर्ड्स ऐकण्यास मिळतात अशी आहे. चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील (1932 ते 1969) अनेक रेकॉर्ड्स त्यांच्याकडे आहेत. विश्वास काळे, बबनराव नावडीकर, हिराबाई बडोदेकर यांनी गायलेली अनेक गाणी त्यांच्याकडे आहेत. गोविंद साठे यांनी एकदा एका संस्थेसाठी हिराबाई बडोदेकर यांच्यावर तीन तासांचा कार्यक्रम सादर केला होता. ते निवेदनही सुंदर करतात. ‘खुदकन गाली हसले’ हे गाणे मोहनतारा (तळपदे) अजिंक्य यांनी गायले आहे हे सर्वश्रुत आहे, पण त्या गायिकेने रफी यांच्याबरोबरही काही गाणी गायली आहेत ही माहिती गोविंद साठे यांच्याकडे मिळू शकते. लता आणि युसुफ (अभिनेता दिलीपकुमार) यांचे एक हिंदी द्वंद्व गीतही ऐकण्यास मिळते. तसेच, लता यांनी गायलेली शास्त्रीय गायनाची ‘एरी आई पियाबिन‘ ही यमन रागातील चीजही ऐकण्यास मिळेल. विमल वाकडे, लीला लिमये, सुधा माडगावकर, लीला चिटणीस (अभिनेत्री), स्नेहप्रभा प्रधान (अभिनेत्री), नलिनी मुळगावकर, ललिता देऊळकर (सुधीर फडके यांच्या पत्नी) यांच्या गीतांच्या ध्वनिमुद्रिकाही ऐकण्यास मिळतील.
साठे यांनी लहानपणी त्यांच्या आजीकडून ऐकलेले ‘रमला कुठे गं कान्हा‘ हे अतिशय गोड गाणे त्यांच्या मनात साठून राहिले होते. लीला लिमये यांच्या मधुर आवाजातील ते गाणे मिळवावे असे त्यांच्या मनाने घेतले आणि ते त्या गाण्याच्या शोधात निघाले. रेकॉर्ड्स विकणारे सर्व विक्रेते हिंदी समजणारे होते. त्यांनी विक्रेत्यांना विचारल्यावर चक्क मराठी रेकॉर्ड्सचा एक मोठा गठ्ठा त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाले, तुम्हीच तुमचे शोधून घ्या. आश्चर्य म्हणजे ते गाणे त्यांना तब्बल चाळीस वर्षांनंतर मिळाले. तसेच एकदा त्यांना त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर ऐकलेले ‘जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल है‘ या गाण्याने वेड लावले. ते त्याची रेकॉर्ड मिळवण्यास बरेच फिरले. एका दुकानदाराने विचारले, “ते कोणत्या चित्रपटातील आहे?” साठे म्हणाले, “प्यार किया तो डरना क्या?” ते ऐकून तो तरुण दुकानदार हसू लागला. म्हणाला, “अहो, हे तर ‘मोगले आजम’मधील गाणं आहे.” त्याला माहीतच नव्हते, की त्या नावाचा चित्रपटसुद्धा आहे. शेवटी, ते गाणे एका वयस्कर दुकानदाराकडे सापडले! साठे यांच्याकडे अंदाजे एक हजार रेकॉर्ड्स जमल्या आहेत.
साठे आणि त्यांचे तीन हौशी मित्र यांनी मिळून स्वखर्चाने एक कार्यक्रम 1987 साली आयोजित केला. तो कार्यक्रम म्हणजे दिग्गज संगीतकारांच्या मुलाखती. त्यातूनच ‘इंद्रधनू’ नावाची संस्था स्थापन झाली. ‘इंद्रधनू‘ हे नाव ठेवण्यामागे उद्देश असा, की सात क्षेत्रांतील नामवंतांच्या रसिकांशी भेटी घडवून आणायच्या! साहित्य, संगीत, कला, नाट्य, अध्यात्म, क्रीडा अशा! त्याप्रमाणे ‘इंद्रधनू‘ संस्थेत अनेक कार्यक्रमांसाठी नामवंत गायक-संगीतकार, कलाकार हजेरी लावून गेले. गोविंद साठे सांगतात, “मोठमोठ्या कलावंतांसोबत आयोजक म्हणून चर्चा करण्याचा योग आला. हृदयनाथ मंगेशकर यांचा कार्यक्रम ठरवण्यास सहकाऱ्यांबरोबर गेलो असताना, लता मंगेशकर यांच्याही भेटीचा योग आला. तसेच, आशा भोसले यांच्याकडे कार्यक्रमाची बोलणी करण्यास गेलो असताना, त्या अतिशय साधेपणाने वागल्या. त्यांनी प्रेमाने फराळही समोर आणून ठेवला.
अशा तऱ्हेने अनेक दिग्गज कलाकारांच्या भेटीचे योग येत गेले. त्या कलाकारांच्या उत्तम सहकार्यामुळे ‘इंद्रधनू‘ हे ठाण्यात उच्च अभिरुचीच्या रसिक वर्गासाठी व्यासपीठ बनून गेले आहे. ‘इंद्रधनू‘ संस्थेचे कार्यक्रम बेडेकर विद्यामंदिरच्या हॉलपासून सहयोग मंदिर, गडकरी रंगायतनपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी होतात.
साठे यांनी बँकेतील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती 2000 साली घेतली आणि त्यांनी स्वतःला वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये गुंतवून घेतले. त्यांनी योगगुरू अण्णा व्यवहारे यांचे शिष्य म्हणून योग वर्गांना मार्गदर्शन केले. ते निष्णात आणि शिस्तप्रिय योग मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत.
साठे यांचा लोकसंग्रह वाढला तसे त्यांच्या घरी रेकॉर्ड ऐकण्यास येणारा रसिकवर्गही वाढला. महिन्याला साधारण तीस-चाळीस रसिक त्यांच्या घरी येऊन त्यांची त्यांची आवडती गाणी ऐकून जातात. साठे यांनी सर्व गाण्यांचा सनावळीप्रमाणे अभ्यास करून त्यांच्याबद्दलचे किस्सेसुद्धा जमवले आहेत. त्यामुळे घरच्या बैठकीत एक कार्यक्रमच सादर होतो! पुन्हा, प्रत्येक ग्रूपला आवडेल अशी गाणी निवडून तो नाविन्यासह सादर केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात आकाशवाणीच्या ‘सिग्नेचर धून’ने होते. तसेच, कधी कधी वनिता मंडळाची ‘सिग्नेचर धून’ही ऐकण्यास मिळते. ही रसिकसेवा विनामूल्य असते, शिवाय वर फराळ!
ओळखिले मी तुला या आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या गाण्याची रेकॉर्ड |
साठे यांनी सांगितलेल्या काही सुंदर आठवणी ऐकण्यासारख्या आहेत. ते बँकेत नोकरी करत असताना, त्यांना सुधीर फडके यांचा फोन आला. “मी माझीच गाणी फारशी ऐकली नाहीयेत. माझी व इतरांचीही काही गाणी मला ऐकायची आहेत. तर ती ऐकायला मी केव्हा येऊ?” साठे यांना ते संभाषण स्वप्नवत वाटते. साठे यांना प्रत्यक्ष भेट घडली तेव्हा आकाश ठेंगणे झाले! फडके यांची साठे यांच्याकडे येण्याची अट होती, की त्यांना आणण्यास गाडी वगैरे पाठवायची नाही. ते ट्रेनच्या सेकंड क्लासने येतील. अगदी साधे घरगुती जेवण करतील! फडके ठरल्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता आले. साठे यांनी त्यांना त्यांच्या आवडीच्या अनेक रेकॉर्ड्स ऐकवल्या. ललिता देऊळकर यांच्या गाण्यांच्या रेकॉर्ड्सदेखील साठे यांच्याकडे होत्या. फडके त्या संगीत मैफलीत चांगलेच रमले. सकाळी साडेनऊला आलेले फडके चक्क रात्री साडेआठपर्यंत एकाग्रतेने गाणी ऐकत राहिले. प्रत्येक स्वर मनात टिपून घेत होते.
एकदा यशवंत देव त्यांच्या पुतण्यासह गाणी ऐकण्यास आले. त्यांनी स्वतः संगीत दिलेली गाणी तर ऐकलीच. शिवाय, त्यांच्या आवडत्या गाण्यांचा आस्वाद घेतला. त्या वेळची एक गंमत. लता मंगेशकर यांनी गायलेले आणि देवसाहेबांनी संगीत दिलेले प्रसिद्ध गाणे ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे‘. ते त्यांनी ऐकले. तेव्हा त्यांना त्या चालीत आणखी काही बदल सुचले. देव ते केले असते तर गाणे आणखी चांगले झाले असते अशी चर्चा सोबत आलेल्या पुतण्याशी करू लागले. संगीतकारांची प्रतिभा कशी नेहमीच जागृत असते ते साठे यांना पाहण्यास मिळाले.
नवीन जमान्यातही रेकॉर्ड ऐकण्याची मजा साठे यांना काही वेगळीच वाटते. नव्या पिढीला जुन्या रेकॉर्ड्सविषयी फारशी माहिती नसते. त्यांनी रेकॉर्डप्लेअर पाहिलेलाही नसतो. बेडेकर कॉलेजमधील मुलांसाठी रेकॉर्डप्लेअर आणि रेकॉर्ड्स यांबद्दलचा कार्यक्रम गाणी आणि निवेदन या पद्धतीने गोविंद साठे यांनी सादर केला तेव्हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही उत्सुकतेने त्या रेकॉर्ड ऐकल्या. ‘ग्रामोफोन अँड टाइपरायटर‘ ही कंपनी इंग्लंडमधून भारतात 1903-04 च्या दरम्यान आली आणि कोलकाता येथे त्यांनी ऑफिस स्थापन केले. पुढे, नावातील ‘टाइपरायटर’ हा शब्द काढून फक्त ‘ग्रामोफोन’ शिल्लक राहिले. तीच कंपनी भारतात एच.एम.व्ही. म्हणून नावाजली.
गोविंद साठे यांच्या परिवारात साहित्याचे आदानप्रदान सतत सुरू असते. त्यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका सुचित्रा साठे गेली पंधरा वर्षे ‘लोकसत्ता’मध्ये लेख लिहीत आहेत आणि कन्या निलीमा जर्मन भाषेत पारंगत आहे. ती जर्मन भाषेचे वर्ग चालवते.
ग्रामोफोन ही गोष्ट दुर्मीळ झाली आहे. शिवाय, ध्वनिमुद्रिकाही दुर्मीळ आहेत. पण ध्वनिमुद्रिका ऐकताना कानावर पडणारी आवाजाची शुद्धता ही खूप उच्च प्रतीची असते. त्याची तुलना सध्याच्या डिजिटल आवाजांशी होऊ शकत नाही. रेकॉर्ड्स ऐकताना असे वाटते, की गायक आणि वाद्यमेळ जणू समोर बसून गाणे सादर करत आहे. इतका तो ध्वनी शुद्ध असतो असा साठे यांचा अनुभव आहे.
गोविंद साठे यांनी गेली पंचेचाळीस वर्षे या रेकॉर्ड्स वादनाच्या आणि ‘इंद्रधनू’च्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी मनाची भरघोस सांस्कृतिक मशागतच केली आहे. ते थोडे कळत आणि थोडे नकळत घडून आले आहे!
सुचित्रा साठे 25435265 / 9869959024 suchitrasathe52@gmail.com
– मेघना साने 98695 63710 meghanasane@gmail.com
मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक असून, त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर ‘नाट्यसंपदा’च्या ‘तो मी नव्हेच‘ व ‘सुयोग’च्या ‘लेकुरे उदंड झाली‘ या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी ‘कोवळी उन्हे‘ या स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.
————————————————————————————————————————————-