गोविंद भागा कांबळे (Govind Bhaga Kambale and Mahar Regiment of Indian Army)

0
224

स्वतंत्र भारताने पाच युद्धे लढली. त्यांपैकी 1962 साली चीन बरोबर झालेले युद्ध हे पराभूताचा इतिहास म्हणून ओळखले जाते. तरीही त्या युद्धात भारतीय सैनिकांचे शौर्य समोर आले. 

हुतात्मा हवालदार गोविंद भागा कांबळे यांच्या चीनविरोधी युद्धातील पराक्रमाला साठ वर्षांनंतर उजाळा मिळाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी गावाच्या ग्रामपंचायत सदस्य आणि पत्रकार रेवती पंडित यांनी पुढाकार घेऊन हुतात्मा कांबळे यांची शौर्यगाथा सांगणारा मोठा फलक लावला आहे. हुतात्मा हवालदार गोविंद कांबळे हे संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावचे रहिवासी. त्यांचे कुटुंब ठाण्याला स्थायिक झाले आहे. हवालदार कांबळे हे सैन्यात दाखल झाले, ते महार रेजिमेंटमध्ये.

गोविंद भागा कांबळे यांनी महार रेजिमेंटच्या सातव्या युनिटमध्ये 5 डिसेंबर 1946 पासून कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी 1956 साली झालेल्या गोवा लष्करी कारवाईत भाग घेतला होता.

          1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा शीख लाईट इन्फन्ट्रीची एक कंपनी नेपाळ सरहद्दीनजीक नेफा परिसरात सेला ह्या भागात लढत होती. मागे परतणाऱ्या गढवाल रायफल्सच्या पलटणीस संरक्षण देण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. हवालदार गोविंद कांबळे त्याच शीख लाइट इन्फन्ट्रीच्या नेतृत्वाखालीमध्यम पल्ल्याच्या मशिनगन तुकडीचे नेतृत्व करत होते.

चीनच्या एका बटालियनने त्यांच्या कंपनीवर 18 नोव्हेंबर 1962 ह्या दिवशी हल्ला केला. त्यांच्या दक्षिणेकडील फळी शत्रूच्या हल्ल्याने खचत चालली होती. तशा परिस्थितीत ती कंपनी खंदकात आसरा घेऊन शत्रूशी लढत होती. पण शत्रूची संख्या खूप जास्त होती. त्याच सुमारास त्यांच्या कंपनीस माघारी फिरण्याचा हुकूम मिळाला. हवालदार कांबळे यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या कंपनीला मागे जाता यावे ह्यासाठी कांबळे यांनी स्वत: युद्धभूमीवर थांबून एकट्याने शत्रूशी लढण्याचा निर्णय घेतला. खंदकांमागून खंदक बदलत हवालदार कांबळे एकटे शत्रूशी मशीनगनच्या सहाय्याने लढत राहिले. ते करत असताना शत्रूच्या तोफगोळ्याचा स्फोट त्यांच्याजवळ झाला व त्यांच्या दोन्ही पायांत तोफगोळ्याचे तुकडे घुसून ते जवळपास निकामी झाले. त्यांनी पाय जायबंदी झाल्यावर उभे राहणे शक्य नसताना हात आणि पोट यांवर सरपटत (क्राऊलिंग) शत्रूशी एकहाती सामना केला. त्याचा परिणाम म्हणजे चीनच्या सैन्याला पुढे येणे शक्य झाले नाही आणि त्या मिळालेल्या वेळात शीख रेजिमेंटच्या एकशेपंचवीस सैनिकांनी यशस्वी माघार घेतली.

 

          ह्या युद्धात हवालदार कांबळे यांनी अद्वितीय शौर्य आणि निष्ठा यांचे प्रदर्शन करत सर्वोच्च बलिदान दिले. त्यांचा मृतदेह भारतीय लष्कराला शेवटपर्यंत मिळाला नाही. त्यांना आधी बेपत्ता आणि नंतर मृत घोषित करण्यात आले. हवालदार गोविंद भागा कांबळे यांच्या शौर्याबद्दाल भारत सरकारने त्यांना 1964 साली मरणोत्तर ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचा पुतळा दिल्ली येथील महार रेजिमेंटच्या मुख्यालयात उभारण्यात आला आहे.

असे असले तरी त्यांच्या मूळ गावी मात्र हवालदार कांबळे यांच्याबद्दल अनास्था पाहण्यास मिळते. हवालदार कांबळे यांचे मूळ घर गावात आहे. त्यांचे काही नातेवाईक गावात आहेत. पण गावात एवढ्या मोठ्या योद्धयाची कोणतीही स्मृती जतन करण्यात आलेली नाही. हवालदार कांबळे यांचे घर बौद्धवाडीत आहे, लांजा येथील काही तरुणांनी हवालदार कांबळे यांची माहिती घेत त्यांच्या जयंतीनिमित्त समाजमंदिरात जाऊन जयंती साजरी केली. त्यावेळी एक छोटा फोटो लावला आहे.

शिवाजी महाराजांच्या काळात राजांनी रायगड परिसरातील महार समाजातील तरुणांना एकत्र करून त्यांना स्वराज्याच्या सैन्यात भरती करून घेतल्याचा इतिहास आहे. त्याचीच पुढे इंग्रजांनी महार रेजिमेंट म्हणून स्थापना केली. ती रेजिमेंट पहिल्या आणि दुसर्‍या जागतिक महायुद्धात इंग्रजांच्या बाजूने लढली. इंग्रजांनी ती रेजिमेंट दोन्ही युद्धांनंतर दोन वेळा खालसा केली. ती रेजिमेंट कायमस्वरूपी राहवी ह्यासाठी दोघांनी प्रयत्न केले. त्यापैकी एक होते बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे होते समाजसुधारक गोपाळकृष्ण गोखले. त्यामुळे रेजिमेंट कायमस्वरूपी सैन्यात दाखल झाली. त्या रेजिमेंटला देशातील पहिली संपूर्ण मशिनगनधारी रेजिमेंट होण्याचा मान 1946 साली मिळाला. त्यामुळे रेजिमेंटच्या लोगोवर दोन मशिनगन आणि एक कट्यार आहे. त्या रेजिमेंटने देशाला दोन सेनाप्रमुख स्वातंत्र्यानंतर दिले; पहिले जनरल के व्ही कृष्णराव आणि दुसरे जनरल के सुंदरजी.

 अमित पंडित 9527108522 ameet293@gmail.com

अमित पंडित हे शिक्षक आहेत. ते ‘दैनिक सकाळ’मध्ये पत्रकारिताही करतात. त्यांची सात पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते विविध वृत्तपत्रे व मासिकांत लेखन करतात.

—————————————————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here