मराठी टीव्ही मालिकांनी मराठी श्रोतृजनांवर, विशेषत: प्रौढ वर्गावर मोहिनी घातली आहे. त्यामुळे मालिकेसाठी आकर्षक, तोंडात बसेल- मनात राहील असे टायटल साँग बनवणे हे गीतलेखकांसाठी व संगीतकारांसाठी आव्हान बनते. अशा गीतांवर आधारित मनमोहक कार्यक्रम – नक्षत्रांचे देणे – सुबोध भावे व मृणाल कुळकर्णी यांनी ‘झी मराठी’वर निवेदक म्हणून सादर केला. कार्यक्रमाचा दिवस दसर्याचा होता – सांस्कृतिक महत्त्वाचा.
भावे-कुळकर्णी निवेदन करत होते. गीतलेखक, संगीतकार यांना स्टेजवर बोलावले जात होते. पुष्कर श्रोत्री त्यांच्या चटपटीत मुलाखती घेत होता, गायिका ते गीत सादर करत होत्या. प्रेक्षकांच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होऊन ते रमून गेले असणार! शिवाय, निवेदक भावे व कुळकर्णी, ही दोघेही अनुभवी व कसलेल्या व्यक्ती. त्या दोघांनी त्यांच्यासाठी मराठी प्रेक्षकांच्या मनात उच्च स्थान निर्माण केले आहे. भावे यांच्या बाबतीत तर ते, ‘बालगंधर्व’ व ‘कट्यार’ नंतर सर्वोच्च म्हणावे असे होऊन गेले आहे. ते नव्याने निर्माण काय करतात, सादर काय करतात याबद्दल कुतूहल असते. त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक – ‘घेई छंद’ – आशय व लेखनदृष्ट्या तेवढे वाचनीय झाले नाही, तर प्रेक्षक-वाचक त्याच्यापेक्षा जास्त हिरमुसले. मृणाल कुळकर्णी यांनी त्यांचे नाव ‘स्वामी’पासून प्रेक्षकांच्या मनावर कोरले आहे. भावे यांच्याइतकेच कुळकर्णी यांचे नावही त्यांच्या गोड, हसर्या ‘सोनपरी’ने बिंबवून टाकले. त्यांनीही त्यांची स्वत:ची कलाकृती म्हणून निर्माण व दिग्दर्शित केलेला मराठी सिनेमा – ‘रमा माधव’ – जमला नाही, म्हणून प्रेक्षकांना वाईट वाटले. तो सिनेमा केवळ कुळकर्णी यांच्या करिअरमधील नोंदीपुरताच राहिला. भावे-कुळकर्णी या दोघांना वाचण्याकरता जे निवेदन लिहून दिले गेले होते, तेही कल्पकतेचे होते.
जाहिराती हा टीव्हीवरील कार्यक्रमांचा ‘इंटिग्रल पार्ट’ होऊन गेला आहे. जाहिराती टीव्ही वाहिनी चालवण्यासाठी हव्यात हे तर उघडच आहे. वाहिन्यांवर जाहिराती दिसू लागल्या, त्यांची संख्या वाढू लागली. त्यांचे अतिक्रमण वाढले. प्रथम स्पॉन्सर कंपन्यांची नावे निवेदकांच्या तोंडी येऊ लागली. मग जाहिरातींचे ब्रँड मालिकेतील पात्रांच्या तोंडून वदवले जाऊ लागले. प्रसंग त्यासाठी ओढूनताणून आणून ते मालिकेत बसवले जाऊ लागले. जाहिरातदारांची ती घुसखोरी श्री-जान्हवी यांच्या अती लोकप्रिय मालिकेपासून – होणार सून मी त्या घरची – जाणवू लागली. वाहिनी व जाहिरातदार यांनी त्यासाठी ‘इम्बेडेड जाहिराती’ असे नाव दिले. वर्तमानपत्रांत त्या ‘अॅडव्हर्टोरियल’ म्हणून येऊ लागल्या. वाचक-प्रेक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वाचक-प्रेक्षक असंघटित असतात. शिवाय, ते घरचा टीव्ही स्वान्त भावनेने पाहतात. कुटुंबही आपापसात टीव्ही कार्यक्रमांबद्दल खूप बोलते, चर्चा करते असे नाही. टीव्ही कार्यक्रमांसंबंधीचे घरचे-दारचे-मनातले-जनातले सगळे मुद्दे सोशल मीडियात प्रकट होतात. मात्र, तेथेही जाहिरातींच्या घुसखोरीबद्दल नाराजी तीव्र अशी जाणवली नाही. ती क्वचित केव्हा वाचकांच्या पत्रव्यवहारात दिसून आली. सांगण्याचा मतलब असा, की सिनेमाची ओढ जशी प्रेक्षकांच्या मनात खोल रूतून तयार होते, त्यामधून शिरीष कणेकरपासून अरुण पुराणिकपर्यंतचे तर्हतर्हेचे सिनेमावेडे प्रेक्षक तयार होतात, तसे टीव्ही कार्यक्रमांबाबत घडत नाही. त्यांचे निर्माते-दिग्दर्शक व कलावंत यांच्यासाठी कार्यक्रम हे आळवावरचे पाणी असते. ती त्या माध्यमाची मर्यादा आहे. त्यामुळे टीव्ही कार्यक्रम हे कलावंतांसाठी मोठे आव्हान बनते.
भावे-कुळकर्णी यांचे निवेदन नाट्यपूर्ण रीतीने पुढे चालू होते. ते रविवारी संध्याकाळी अनेक वेळा होणार्या अशा ‘इव्हेंट’वजा कार्यक्रमांपेक्षा सरसच वाटत होते. भावे यांना ‘कलर्स’वर वगैरे आणि तेसुद्धा संत-भजन अशा संबंधित कार्यक्रमात पाहिले होते, तेव्हा निवेदक म्हणून ते तेवढे प्रभावी जाणवले नव्हते. पण दसर्याचा त्यांचा व कुळकर्णी यांचा मोकळेपणा, एकमेकांला चिमटे काढणे सुखावह वाटत होते. त्यांच्या तोंडातील स्पॉन्सर्सचे, प्रॉडक्टचे उल्लेख खटकत होते. पण त्याकडे दुर्लक्ष करणे एकूण कार्यक्रमात शक्य होत होते.
परंतु सारे सुख कार्यक्रमाच्या एका टप्प्यावर ढासळून पडले. मी आतून उध्वस्त झालो. मी दोघा निवेदकांचे संवाद नोंदून ठेवलेले नाहीत, ते शोधून काढण्याची इच्छादेखील नाही. परंतु ढोबळपणे सांगायचे तर, भावे यांनी उल्लेख केला, की “मृणाल, तुमच्या तीन पिढ्या लिहित्या आहेत ना?” तो संदर्भ गो.नी. दांडेकर, वीणा देव व स्वत: मृणाल यांच्याबद्दल होता. त्यावर कुळकर्णी म्हणाल्या, “नाही सुबोध, तेवढ्यावर संपत नाही. माझा मुलगा, गोनीदांची चौथी पिढी पण लिहीत आहे. परंतु त्याला रात्री लिहायचे तर त्रास होई, कारण डास भंडावतात. आता ‘उदबत्ती’ लावल्याने डास नाहीसे झाले व माझा मुलगा निवांत लिहू लागला” (शब्द तंतोतंत तसे नाहीत, पण निवेदनाचा अर्थ हाच आहे) ते शब्द ऐकताच माझे मस्तक चक्रावले. ‘गोनीदां’ हे जुन्या मराठी वाचकांच्या लेखी मोठे नाव आहे. म्हटले, तर त्या काळचा तो ‘सांस्कृतिक सिम्बॉल’ आहे. ‘गोनीदां’ना मराठी सांस्कृतिक जगात अनन्य स्थान आहे. कुळकर्णी यांनी आमच्या मनातील ‘गोनीदां’ना, त्यांच्या मृत्यूनंतर विकायला काढावे? वीणा देव, स्वत: कुळकर्णी व त्यांचा मुलगा ही जिवंत मंडळी त्यांचे निर्णय त्यांच्या स्वत:च्या बाबतीत करू शकतात, परंतु ‘गोनीदां’ना महाराष्ट्राच्या जीवनात जे स्थान आहे त्याचा फायदा त्यांचे कुटुंबीय अशा भ्रष्ट पद्धतीने घेऊ शकतात का? ‘गोनीदां’च्या सर्व साहित्याचे हक्क (कॉपीराइट) विक्रीस काढल्याची चर्चा मराठी प्रकाशन जगतात गेली दोन वर्षें आहे. तो हक्क ‘गोनीदां’नी त्यांच्या कुटुंबीयांना बहाल केला आहे. त्यामुळे तो मुद्दा वेगळा होतो. परंतु त्यांच्या नावाचा व त्यांच्याशी असलेल्या नातेसंबंधाचा उल्लेख एका (तशा निरुपयोगीच) पदार्थाच्या जाहिरातीकरता करणे हा भ्रष्टाचार फार मोठा आहे. पैशांच्या भ्रष्टाचारापेक्षा गंभीर असा तो नैतिक गुन्हा आहे. त्यामुळे तो आमच्यासारख्या, ‘गोनीदां’चे साहित्य वाचत मोठे झालेल्या वाचकांच्या मनावर आघात आहे. तो त्यांच्याबरोबर ऐकलेल्या गडकिल्ल्यांच्या गोष्टींनी मुलांवर केलेल्या सुसंस्कारांना लावलेला सुरुंग आहे.
सद्यकाळ स्थित्यंतराचा आहे. तंत्रज्ञान कोठे नेऊन ठेवणार आहे याचा पत्ता नाही. जीवनाची एक घडी नष्ट होत आहे व नवी घडी रीतसर बसणार की नाही याची धास्ती मनात आहे. अशा वेळी समाजात स्थान असणार्या विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांचा आचारविचार काळजीपूर्वक करायला हवा. क्षणिक लाभाचा विचार करणारे प्रवाहपतित बरेच आहेत. विचारी व्यक्तींनी नवीन जमान्याशी किती प्रमाणात, कशा पद्धतीने व काय किंमतीला जोडून घ्यावे याचे संकेत ठरवावे लागतील. ‘झी मराठी’चा तो कार्यक्रम दोन-पाच कोटी रुपयांचा असावा. त्यातील भावे-कुळकर्णी यांचा ‘शेअर’ किती? एरवीही वेगवेगळे सहभागी कलाकार त्यांचे स्वत्व चॅनेलच्या मर्जीनुसार वाटेल त्या किंमतीला विकताना पाहून विषाद होतो. अभिराम भडकमकर यांनी त्यांच्या कादंबरीत – ‘अॅट एनी कॉस्ट’ – त्या सर्व व्यवहारांची भेदक वर्णने केली आहेत. असे सर्व वास्तव माहीत असूनदेखील भावे-कुळकर्णी यांचे निवेदन ऐकून संताप आला! तो ‘गोनीदां’च्या थोरवीचा अपमान आहेच, पण दोन प्रमुख कलावंतांचे केवढे मोठे स्खलन पडद्यावर दिसत होते!
– दिनकर गांगल ९८६७११८५१७
१) टी. व्ही . मालिकेची…
१) टी. व्ही . मालिकेची शीर्षकगीते जुन्या कवींच्या गीतांचा एकप्रकारे गैरवापर होतोय असं मला वाटतं .
२) हिंदी चित्रपटाच्या पारितोषिक समारंभाच्या निवेदनाची नक्कल मराठी कलाकार व हिंदी कलाकार बॉलीवूडची नक्कल करतात.
एकन्दर आता सगळीकडे आता सारीकडे सगळं जे खपतं विकायला काढलं आहे.
Kharach nindaniya ghatana…
Kharach nindaniya ghatana aahe hi….prayojak,jahiratbaji etc tr honarach,pn tyasathi Gonidanchya nawacha wapr khudd tyanchyach natine krawa he ayogyach aahe.
Comments are closed.