सह्याद्री व माणकेश्वराच्या कुशीत लपलेले गाव म्हणजे गोटेवाडी. गोटेवाडी गाव हे सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आहे. तालुक्यापासून गावाचे अंतर पस्तीस किलोमीटर आहे. गावाची लोकसंख्या तीन हजार ते चार हजार दरम्यान आहे. गावाच्या आसपासचा परिसर हा सुंदर निसर्गाने नटलेला आहे. हनुमान हे ग्रामदैवत असून, गावामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गावात सात गणेश मंडळे आहेत. प्रत्येक मंडळ त्यांच्या त्यांच्या परीने समाजोपयोगी उपक्रम आणि देखावे सादर करतात; तरीही शेडगेवाडीचा देखावा बघण्यासारखा असतो. पंचक्रोशीतील लोक मंडळाचा देखावा पाहण्यासाठी येतात. गणेशोत्सवाची पारंपरिक पद्धतीची मिरवणूक पाहण्यासारखी असते. हनुमान देवाची यात्रा हनुमान जयंती महोत्सवानंतर येणा-या पहिल्या शनिवारी असते. त्यालाच भंडारासुद्धा म्हटले जाते. विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमाने यात्रेला खऱ्या अर्थाने रंगत येते. गावात यात्रेदिवशी दंडस्नानाची प्रथा आहे. गावात देवाची काठी/पालखी दुपारी बारा वाजता निघते आणि सर्व गावातून फेरफटका मारून दुपारी चारच्या सुमारास परत मंदिराजवळ येते. तेथे काठी/पालखी नाचवणे यामध्ये तरुणाई खूप पुढे असते आणि सगळेच त्या उत्सवात मोठ्या आनंदाने सहभागी होतात. भंडाऱ्याचा प्रसाद घरोघरी वाटला जातो. गोटेवाडी गावाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी यात्रेला थोडा का होईना पाऊस हा पडतोच पडतो!
गावाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. गावामध्ये हरिनाम सप्ताह, पारायण दरवर्षी असते. सर्वजण मोठ्या उत्साहाने यामध्ये सामील होतात. गावात पाऊस चांगला पडतो. गावाच्या पूर्वेस मोठे धरण बांधण्यात आले आहे. त्याचा फायदा या भागातील येळगावाला तसेच गोटेवाडीलासुद्धा थोड्या प्रमाणात होतो. गावामध्ये मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. त्याचबरोबर गावाच्या शेतात भुईमूग, ज्वारी, मका, सोयाबीन ही पिके घेतली जातात. गावामध्ये भूजल साठा असल्यामुळे खूप बोअरवेल आहेत आणि त्याचा फायदा शेतीसाठी होतो. त्याचमुळे ऊसासारख्या नगदी पिकाचे प्रमाणही चांगल्या प्रकारे वाढले आहे. गावात ग्रामपंचायत ही गावाच्या मध्यावर ग्रामदैवताच्या मंदिराशेजारीच असून, त्याला लागूनच जिल्हा परिषदेची शाळा इयत्ता सातवीपर्यंत आहे. तसेच, ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे माणकेश्वर विद्यालय हे गावाच्या बाहेर निसर्गरम्य ठिकाणी आहे. माणकेश्वर विद्यालय हे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत आहे. गावातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कराड तालुक्याच्या ठिकाणी जातात. तसेच येळगाव, उंडाळे या ठिकाणीसुद्धा दहावीनंतरच्या शिक्षणाची सोय आहे. गावात विकाससेवा सहकारी सोसायटी असून शामराव पाटील ही एकमेव पतसंस्था आहे. गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून काही लोक कामधंद्यासाठी कराड-मुंबई–पुण्यासारख्या ठिकाणी कार्यरत आहेत. गावात आठवडी बाजार भरत नाही. तो शेजारच्या येळगाव, उंडाळे या गावांमध्ये भरतो. तसेच आजूबाजूला भरेवाडी, बोरगाव, गणेशवाडी, येवती, शेवाळेवाडी(म्हासोली) ही गावे आहेत. गावाची तरुणाई ही गावाचे भवितव्य. ती शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला व क्रीडा क्षेत्रात आघाडीवर आहे. माणकेश्वराच्या पठारावर पवनचक्की आहे. गावाला जवळचे रेल्वेस्टेशन कराड आणि ओगलेवाडी आहे.
– एकनाथ मोहिते
Mast
Mast
Super
Super
अत्यंत चोखंदळ लेख ?छान
अत्यंत चोखंदळ लेख ?छान
खरोखर माझे गाव आहेच तसे आणि…
खरोखर माझे गाव आहेच तसे आणि गावातील लोक तर त्याहून गोड
तुमच्यासारखी.
आपले गाव , प्रगत गाव
आपले गाव , प्रगत गाव
keep it up eknath…
keep it up eknath…
Comments are closed.