गेट वे ऑफ इंडिया

_GatewayOfInadia_1.jpg

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मध्यवर्ती स्थान आणि येथून तत्कालीन ज्ञात जगाशी सहज साधता येणारा संपर्क या प्रमुख कारणांमुळे मुंबईच्या सात बेटांच्या समूहाचे आकर्षण राज्यकर्त्यांना पूर्वापार होते. मुंबईने राणा प्रताप बिंबाची इसवी सन 1140 पासून हिंदू राजवट, मोगल प्रभाव 1348 पासून व पोर्तुगीज राज्य 1534 पासून पाहिले. नंतर, मुंबई बेट पोर्तुगीजांनी राजघराण्यातील सोयरिकीमुळे ब्रिटिशांना 1661 मध्ये आंदण दिले व ते 1665 मध्ये प्रत्यक्ष हस्तांतरित झाले.

ब्रिटिशांनी 1947 मध्ये भारतातील सत्ता सोडेपर्यंत मुंबईचे भौगोलिक व आर्थिक स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले.

त्यांनी स्थानिकांच्या माहितीवर अवलंबून न राहता, त्यांची यंत्रणा राबवून सर्व भूभागाची पाहणी बारकाईने केली, काटेकोर मोजमापे घेऊन सुरेख नकाशे तयार केले. ते साडेतीनशे वर्षांनंतरदेखील संदर्भासाठी वापरता येतात!

मुंबईची मूळची जी सात बेटे आहेत त्यांचे उत्तरेकडील टोक हे मुख्य जमिनीस जोडलेले व तेथून दळणवळणास सोयीचे होते. ही सात बेटे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला जराशी बगल देऊन अरबी समुद्रात शिरलेली असल्यामुळे समुद्राची दक्षिणोत्तर चिंचोळी पट्टी येथे निर्माण झालेली आहे व पूर्वीच्या गलबतांपेक्षा अवाढव्य अशा व्यापारी नौका, लढाऊ जहाजे अशा सर्वांचा येथे नंतरच्या काळात सोयीस्कर वावर होता, अजून आहे व या सर्वांच्या देखभालीचे व दुरुस्तीचे काम करणाऱ्या गोदी म्हणजेच डॉक्स येथे निर्माण केल्या गेल्या. बेटांच्या पश्चिमेकडील उथळ खडकाळ किनाऱ्यापेक्षा तेथील चिंचोळी समुद्रपट्टी सखोल आहे. मात्र अरबी समुद्रातून पश्चिमेकडून येणाऱ्या सर्व होड्या, मचवे, जहाजे व गलबते यांना नांगरण्यासाठी; तसेच, मालसामानाची चढउतार करण्यासाठी जी बंदरे आवश्यक होती, ती बेटांच्या पूर्वेकडील किनारपट्टीचा भाग आहे, तेथे बांधली गेली होती.

पश्चिमेच्या मलबार हिलपासून पूर्वेच्या गिरगावातून या चिंचोळ्या समुद्रपट्टीतील बंदरापर्यंत पसरलेले मुंबई बेट हे आकाराने व विस्ताराने सर्वात मोठे बेट होते. ते दक्षिणेकडून तिसरे. (याच बेटावर मुंबई देवीचे देऊळ असल्याने, एकत्रित सर्व बेटांचे नाव मुंबई असे पडले.) सात बेटांची नावे दक्षिणेकडून उत्तरेकडे अशी -कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, परळपरळ व माहीम.

मुंबई बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर सम्राट अशोकाच्या काळापासून बंदर होते. त्याचे नाव त्या काळात पल्लव असे होते. हजारो वर्षांच्या वापराने व चर्चेने त्या पल्लवचे पालव असे नाव झाले. मुंबईची वस्ती वाढल्यानंतर गिरगावापासून दक्षिणेकडच्या भागाला पालव असे अजूनही म्हटले जाते व दक्षिणेच्या रस्त्याला पालवाचा रस्ता म्हणतात. ब्रिटिशांनी त्या ठिकाणी 1665 नंतर बंदर भक्कम केले व त्याला अपोलो बंदर असे नाव दिले. मुंबई बेटावर ब्रिटिशांनी बांधलेल्या किल्ल्याचा जो दक्षिण दरवाजा होता तो त्या बंदराजवळ होता. त्यामुळे त्या दरवाज्याला अपोलो गेट असे नाव मिळाले. (उदाहरणार्थ -ब्रिटिशांचे उच्चार. वाराणसीचे बनारस, वडोदाराचे बरोडा तसेच मुंबईचे बॉम्बे झाले. शिवाय अपोलो हे त्यांच्या देवतेचे नाव आहे.) ब्रिटिशांनी अपोलो बंदराच्या पश्चिमेकडील प्रशस्त मोकळा भाग वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वापरण्यास सुरुवात केली – सैन्यदल, नाविक दल व विमान दल यांच्या कवायती, जनतेसाठी करमणुकीचे कार्यक्रम तेथे होऊ लागले. मोठी जागा व सतत आल्हाददायक हवा त्यामुळे जनतेचे फिरावयास जाण्याचे अतिशय प्रिय ठिकाण झाले, अजूनही आहे.

तशातच, ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पाचवा व क्वीन मेरी यांनी मुंबईला भेट देण्याचे ठरवले. त्यांचे आगमन बोटीने होणार व ते अपोलो बंदरात होणार हे ठरल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी सरकारने त्यांच्या अपोलो बंदरावर कमान उभारावी असे ठरवले व त्याप्रमाणे भारतीय कमान वाटेल असे बांधकाम समुद्रकिनारी उभे केले. त्या कमानीची शैली मुगल पद्धतीची आहे. ती 1911 मध्ये उभारली गेली. सम्राटाचे स्वागत कमानीने केले गेले. तेथे राजेशाही कवायती झाल्या व सोहळा पार पडला. नंतर मात्र सरकारने तेथे कायमस्वरूपी देखणी कमान उभारावी असे ठरवले. त्यासाठी 1904 मध्ये मुंबईस बदलून आलेल्या जॉर्ज विटेट या सरकारी आर्किटेक्टची नेमणूक केली. जॉर्ज विटेट यांनी सर्व बांधकाम शैलींचा सखोल अभ्यास केला होता. ते त्यांच्या कारकिर्दीत मुंबईमधील खानदानी गॉथिक शैली व भारतातील विविध प्रादेशिक शैली यांचे मिश्रण करून तिचा गरजेनुसार वापर करत. त्यांनी त्या शैलीला ‘इंडो सारसँनिक स्टाईल’ असे नाव दिले होते. त्यांनी तीच स्टाईल गेटवेच्या डिझाइनसाठी वापरली आहे.

1911 मध्ये उभारलेली स्वागत कमान पाडून टाकली गेली. समुद्रकिनारी भराव घालून जमीन तयार केली गेली. किनाऱ्याला भक्कम भिंती बांधल्या व 31 मार्च 1913 रोजी गेटवेची पायाभरणी केली गेली. मात्र त्यापूर्वी, विटेट यांनी 1912-13 मध्ये गेटवेसाठी वेगवेगळी डिझाइन्स तयार केली. त्यांची ड्रॉईंग्ज व मॉडेल्स तयार करून प्रदर्शन भरवले आणि जनतेला आवाहन केले की हे सर्व पाहून त्यावर सूचना कराव्यात. त्यांनी त्या सूचनांची दखल घेऊन डिझाइन निश्चित केले. डिझाइन ऑगस्ट 1914 मध्ये मंजूर झाले. नंतर भक्कमपणासाठी छत्तीस फूट खोल आर सी सी पाईल फाऊंडेशन्स भरली व ते काम झाल्यानंतर गेटवेचे बांधकाम प्रत्यक्ष मे 1920 मध्ये सुरु केले. डिझाइन गुजरातमधील सोळाव्या शतकातील बांधकाम शैलीवर आधारित आहे. त्यासाठी राजस्थानमधील खरोडी या ठिकाणाहून मुद्दाम यलो बेसॉल्ट दगड मागवण्यात आला. तो सॅण्डस्टोन असून पावसाने तो जितका भिजतो तितका अधिक मजबूत होत जातो असे त्याचे वैशिष्टय आहे. गेटवेच्या कमानी तीन आहेत. त्या तिन्हींवर घुमट आहेत. ते बाहेरून दिसत नाहीत. त्यांपैकी मधला घुमट हा अठ्ठेचाळीस फूट व्यासांचा आहे. उंची फरशीपासून त्र्याऐंशी फूट आहे. घुमट आरसीसीचे आहेत. त्या बांधकामाला त्या काळी एकवीस लक्ष रुपये खर्च आला. त्या रकमेत मध्यवर्ती सरकार, सर जेकब ससून, मुंबई महापालिका व पोर्ट ट्रस्ट यांचा वाटा होता. काम पूर्ण झाल्यावर तत्कालीन व्हाइसरॉय अर्ल ऑफ रिडिंग यांच्या हस्ते गुरुवार, 4 डिसेंबर 1924 या दिवशी उद्घाटन करण्यात आले.

गेटवेचे बांधकाम करण्यासाठी रावबहादूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई या मराठी इंजिनीयरची नेमणूक झाली होती. त्यांचा मोठा बंगला गावदेवी येथे होता. त्यांनी बंगल्याच्या आवारात गेटवे कसा दिसेल याची कल्पना येण्यासाठी तशाच दगडाचे छोटे मॉडेल बांधले, तेदेखील अजून टिकून आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने देसाई यांचा गौरव करण्यासाठी हॉटेल ताजच्या मागील चौकास त्यांचे नाव दिले आहे.

मुंबईस येणा-या कोणाही पर्यटकाचे समाधान ‘गेट वे ऑफ इंडिया’ला भेट दिल्याशिवाय होत नाही !

ब्रिटिश हिंदुस्थानातील कारभार गुंडाळून त्यांच्या मायदेशी म्हणजे इंग्लंडला 1947 मध्ये परत गेले. त्यांनी भारतीय कारभाराला लावलेली शिस्त, सातही बेटे एकमेकांना जोडून निर्माण केलेली सलग मुंबई व तिचा उत्तरेकडील विस्तार, जनतेच्या आरोग्यासाठी उपयोगी येणारी उद्याने, वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटल्स, प्रशस्त रस्ते व देखण्या भक्कम इमारती, सेंट्रल व वेस्टर्न रेल्वे आणि त्यांची स्टेशन्स हे सारे येथेच राहिले.

नंतरच्या काळात, बहुतेक आस्थापनांची मूळ नावे बदलून त्यांना स्वदेशी व्यक्तींची नावे देण्याचा प्रकार सुरू झाला. आस्थापना तीच, स्वरूप तेच, सुधारणा काही नाही, मात्र नाव बदलले, त्यातून काय साध्य होते? कोण जाणे ! त्या लोकप्रिय व बालीश खेळांतून गेट वे ऑफ इंडिया मात्र वाचला आहे ! कारण हिंदुस्थानचे प्रवेशद्वार या त्याच्या स्वरूपाला व कार्याला कोठेही धक्का लागत नाही. गेटवे ऑफ इंडिया हा एकमेव व अद्वितीय आहे !

– उज्ज्वला आगासकर

संदर्भ : मूळ लेख लोकप्रभा पुरवणी मधून घेतला आहे.

About Post Author