जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था ही आकुर्डी(पुणे) येथे आहे. ही संस्था बजाज उद्योग समूहा शी संलग्न आहे. ती ग्रामविकासाचे महत्त्व लक्षात घेऊन पुणे, औरंगाबाद व वर्धा आणि सिकर (राजस्थान) परिसरातील एकूण शंभर गावांना साहाय्य करत आहे. ‘निवडक गावांतील ग्रामीण समाजाचे राहणीमान सुधारण्यासाठी, दारिद्र्यनिर्मूलन, आरोग्यरक्षण, महिलांचे सबलीकरण, न्याय, स्त्री-पुरुष समान अधिकार यांसाठी प्रयत्न हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. या गावांनी आपला आदर्श प्रस्थापित करावा म्हणून ग्रामस्थांनी स्वेच्छेने, प्रामाणिकपणे सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे. संस्थेत प्रत्येक योजना विचारपूर्वक आखली जाते. तेथील शिस्त आणि आदब हे गुण घेण्यासारखे आहेत. स्वयंसेवी संस्थांनी कॉर्पोरेट व्यवस्थापानाचा मार्ग अंगिकारायला हवा आहे. त्यामुळे कामे व्यवस्थित, ठऱल्यावेळी व रास्त खर्चात तर होतीलच, पण त्याचबरोबर जनतेचा विश्वासही दुणावेल, हा मंत्र जानकीदेवी संस्थेत छानपैकी जाणवतो.
संस्थेचे कार्यकर्ते वेगवेगळ्या गावांत जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करतात. गावाच्या व गावक-यांच्या अडचणी समजावून घेतात. ग्रामसभेच्या बैठकींना हजर राहतात. तो रिपोर्ट कार्यालयात सादर केला जातो. कार्यकारिणीच्या बैठकीत समस्यांचे वर्गीकरण करून त्यावरच्या उपाययोजनांची तयारी होते. अगदी काळ, वेळ, खर्चासहित. हा अहवाल त्या त्या गावात जाऊन ग्रामसभेसमोर सादर केला जातो. तिथे पुन्हा प्रत्येक बाबीची साधकबाधक चर्चा होते. प्रत्येक शंकेचे निरसन करण्यात येते आणि अंतिम निर्णय ग्रामसभेवर सोपवला जातो. जर ग्रामस्थांमध्ये एकवाक्यता नसेल, अंतर्गत दुफळी असेल, ग्रामस्थ योगदान देणार नसतील तर कुठचीही योजना हाती घेतली जात नाही. संस्थेने अशी चार-दोन गावे कामामधून सोडून दिलेली आहेत. ग्रामसभेने मंजूर केलेल्या योजना फक्त ग्रामस्थांच्या सहभागाने अमलात आणण्यासाठी पुढची तयारी सुरू होते. ग्रामस्थांनी स्वत: गावाच्या अडचणी सोडवायच्या, संस्थेने फक्त त्यासाठी लागणारी मदत – तांत्रिक, यांत्रिक, शासकीय, आर्थिक -पुरवायची. ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय ग्रामविकास होऊ शकणार नाही हे स्वयंसेवी संस्थांनी लक्षात ठेवायला हवे!
ग्रामसभेने संमत केलेल्या योजनेचा संस्थेच्या कार्यालयात बारकाईने अभ्यास केला जातो. मग ग्रामसभा व संस्थेचे कार्यकारी मंडळ यांच्यात चर्चा होऊन, अंतिम मान्यता घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाते. सरकारी योजना अथवा अनुदानाचा लाभ गावाला मिळण्यासाठी संस्थेचे अधिकारी सरकारी अधिका-यांसमवेत बसून आवश्यक कागदपत्रे पुरवून मदत मिळवून देतात.
मी मावळ विभागातील संस्थेच्या पदाधिकार्यांसोबत तीन गावांना भेट दिली व संस्थेने केलेले काम प्रत्यक्ष पाहिले. तिन्ही गावांत टॅंकरने पाणी आणावे लागत असे. संस्थेने भोवतालच्या टेकड्यांवर समतल चर खणले, पाण्याचे स्रोत टप्प्या टप्यावर बांध घलून अडवले. जमिनपातळीवर मोठे बंधारे बांधले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनेचा लाभ घेतला. ह्या गावांतल्या विहिंराची पाण्याची पातळी दोन वर्षांत लक्षणीय वाढली व गावे टॅंकरमुक्त झाली. पुन्हा हे सर्व अत्यंत कमी खर्चात व स्थायी स्वरूपात घडून आले. संस्था लाभार्थींना उचलून आर्थिक मदत करत नाही, तर लागणारे तंत्रज्ञान व साहित्य पुरवते. जिथे आवश्यक असेल तिथे लाभार्थी आणि संस्था निम्मा निम्मा खर्च करतात.
संस्थेने डिझाईन केलेले गुरांचे गोठे सुटसुटीत, साधे, हवेशीर आणि स्वच्छ होते. संस्था शेतकर्यांना संकरित गायी देते; गुरांसाठी वैद्यकीय सेवा पुरवली जाते. घर, शाळा, वाचनालय, पाण्याची टाकी, रस्ते, बांध बांधणे असो की स्त्रियांसाठी कौशल्यवर्ग, लघुउद्योग असोत, मुलांसाठी शिक्षण असो… सर्व काही ग्रामस्थांच्या सहभागाने केले जाते. त्याची पावती म्हणून गोसासी गावच्या ग्रामस्थांनी स्वखर्चाने सरपंचाला गाडी घेऊन दिली. संस्था शंभर गावांत काम करते. आणखी काही गावे कामासाठी घेण्याच्या दृष्टीने विचाराधीन आहेत.
संस्थेचा पत्ता: जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था, द्वारा समाज सेवा केंद्र, सर्व्हे नं. 4272, आकुर्डी पोस्टआँफिसमागे, पुणे – 411035
संपर्क – कर्नल देशमुख, 9850995656/ व्ही. बी सोहनी – 9850995652, 020-27242404/5/6
संस्थेचा मेल आयडी – jbgvs@bajajauto.co.in
वेबसाइट – Jankidevi Bajaj Gram Vikas Sanstha
सतीश राजमाचीकर – 9823117434, smrajmachikar@gmail.com
{jcomments on}