– शांती लहोटी
बंगलोरमध्ये गाढविणीच्या दुधाला प्रचंड मागणी अशी बातमी टाइम्स ऑफ इंडिया ह्या भारतातील सर्वात मोठ्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. त्या शहरात ते दूध शंभर ते दोनशे रुपयाला पन्नास मिलिलिटर या भावाने विकले जाते.
तान्ह्या बाळास आईचे दूध सर्वोत्तम, कारण आईच्या दुधात प्रथिने, कॅल्शियम, लोह जास्त प्रमाणात असल्याने, बालक ते लवकर पचवते. मात्र मनुष्याच्या दुधापेक्षा गाढविणीच्या दुधात हे घटक जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे ते मानवाच्या दुधापेक्षा अधिक पौष्टिक असते. नामवंत डॉक्टरांनीही ते मान्य केले आहे. म्हणून बंगलोर शहरात गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी आहे.
गाढविणीचे दूध हे बालकाच्या अनेक शारीरिक व्याधींवर व रोगांवर उपयोगी आहे. पण त्याच्या औषधी मूल्यांविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचे ठाम मत नाही.
चरकसंहितेमध्ये एकखुरी प्राणी घोडी व गाढवीण यांच्या दुधाविषयी माहिती एका श्लोकात विषद केली आहे:
बल्यं स्थैर्यकरं सर्वमूष्णंश्चैकशाकं पय: l
आम्ल सववणं रुक्षं शाखावतहरं लघु ll च.सु.37
गाढविणीचे दूध शक्तीदायक, स्थिरता आणणारे, उष्ण, किंचित आंबट व खारट असून रुक्ष आहे. त्यात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते. सर्व प्रकारचे शाखागत वातविकार, अर्धांगवात, पक्षाघात (हातपायावरून वारे जाणे) हे रोग या दुधाने बरे होतात.
दुधाच्या सेवनाने भूक वाढते, तसेच ते अजीर्ण होऊ देत नाही. ते दूध वीर्य व कामवासना वाढवणारे आहे. दूध लहान बाळासाठी चांगले होय. सर्वसाधारण, एका गाढविणीपासून दोनशे ते तीनशे मिलिलीटर दूध प्रतिदिन मिळते. तसेच, दुधाची साठवणूक करता येत नसल्याने ते बाजारात मिळत नाही. दूधाचे रासायनिक घटक पुढीलप्रमाणे होय.
|
गाढवीण |
घोडी |
स्त्री |
गाय |
सामु |
7-7.2 |
7.1-7.2 |
7-7.5 |
6.6-6.8 |
प्रथिने |
1.5-1.8 |
1.5-2.8 |
0.9-1.7 |
3.1-3.8 |
स्निग्धता |
0.3-1.8 |
0.5-2.0 |
3.5-4.0 |
3.5-3.9 |
दुग्धशर्करा |
5.8-7.4 |
5.8-7.0 |
6.3-7.0 |
4.4-4.9 |
खनिजे –क्षार |
0.3-0.5 |
0.3-0.5 |
0.2-0.3 |
0.7-0.8 |
तक्त्यावरून लक्षात येईल की गाढविणीच्या दुधात मानवी दूधापेक्षा प्रथिने व क्षार खनिजे जास्त प्रमाणात असतात. तर स्निग्धता कमी असते. तसेच दुग्धशर्करेच्या बाबतीत ती मानवी दूधाइतकीच असते. दुग्धशर्करा ही आपल्या मेंदूच्या पेशी वाढवण्यासाठी उपयोगी पडतात. याच कारणामुळे आय.टी. शहर बंगलोरमध्ये या दुधाची मागणी वाढत असेल!
- गाढविणीचे दूध हे रासायनिक घटकांत मानवी दुधासारखेच आहे.
- हे दूध ज्या बाळाला दुसर्या कोणत्याही दूधाची अॅलर्जी असेल, ज्याला इतर कोणतेही दूध पचत नाही, त्या दूधाला हा पर्याय होय. हे दूध लहान बाळ चांगल्या प्रकारे पचवते. इटली देशातील बारी या विद्यापीठाने तसे संशोधन केले.
- गाढविणीचे दूध हे पचण्यास सोपे, शक्तीदायक असून गायीच्या दुधापेक्षा दुग्धशर्करा जास्त तर स्निग्धता कमी असते.
- वैद्यकशास्त्राचा जनक हिप्पोक्रेटस (इसवी सनपूर्व 460-370) याने गाढविणीचे दूध हे यकृताच्या रोगावर, साथीच्या रोगांवर, नाकातून रक्त येत असेल, विषबाधा व जखमांवर औषधी म्हणून उपयोगी असल्याचे विदित केले आहे.
- इसवी सनाच्या सुरुवातीस प्लीनी दि एल्डर (इसवी सन 23-79) यांनी प्रसिद्ध केलेल्या नॅच्युरालिस हिस्तोरिया या एन्सायक्लोपीडियामध्ये गाढविणीचे दूध विषबाधेवर, तापासाठी, झटके येत असतील तर, डोळ्यांच्या रोगावर, दंतरोगावर, तसेच प्रजननसंबंधी रोगांवर गुणकारी असल्याचे नमूद केले आहे.
- वैद्यकशास्त्रानुसार गाढविणीचे दूध हे रासायनिक व कायिक गुणधर्मात आईच्या दुधासारखेच असते. त्यात स्निग्धता कमी तर जीवनसत्त्वे भरपूर असतात. दुग्धशर्करा जास्त असल्यामुळे चवीला गोड असल्याने लहान बाळ दूध आवडीने सेवन करते.
- पोटाच्या/आतड्याच्या अल्सरकरता गाढविणीचे दूध हे गुणकारी होय. पोट गच्च झाले, बद्ध- कोष्टता असेल, संडास साफ होत नसेल तर गाढविणीचे दूध हे औषधी म्हणून उपयोगी आहे.
- छाती, स्तन, वक्षस्थळ दुखत असेल तर गाढविणीच्या दूधाने त्या वेदना कमी होतात.
- तामिळनाडू राज्यात लहान बाळाचा आवाज चांगला व्हावा याकरता गाढविणीचे दूध एक वेळ पाजण्याची पद्धत आहे. हे दूध फक्त एकदा व तेही पाच-दहा मिलिलीटर दिले जाते.
- या दूधाचा उपयोग पूर्वापार सौंदर्यप्रसाधनात करण्यात येतो. इजिप्तची राणी सौंदर्यसम्राज्ञी क्लिओपात्रा गाढविणीच्या दुधात अंघोळ करत असल्याचे नमूद आहे. याकरता तिच्या पशुशाळेमध्ये सातशे गाढविणी सांभाळल्या जात.
- रोमन साम्राज्याचा राजा, नीरोची राणी पॉपी सबीना (इसवी सन 30-65) गाढविणीच्या दूधाने मालिश करत असे. गाढविणीच्या दूधामुळे चेहर्यावरील सुरकुत्या कमी होण्य़ास मदत होते. तसेच या दुधामुळे शरीराची कातडी ही मऊ, मुलायम व चमकदार होते असे वैद्यकाचे म्हणणे आहे.
- नेपोलियन बोनापार्टची बहीण पाअलीन बोनापार्ट (1780-1825) ही आपल्या त्वचेच्या सुरक्षेसाठी गाढविणीच्या दूधाचा उपयोग करत असे.
- आजच्या विज्ञानयुगातपण गाढविणीचे दूध उच्च प्रतीचा साबण बनवण्यासाठी वापरले जाते.
संबंधित लेख –
गाढविणीच्या दुधातून ते कुटुंबाचा उदरनिवार्ह करतात
गाढविणीचे दूध चिकनगुनियावर गुणकारी
{jcomments on}