अशगर वजाहत या लेखकाकडून अनोख्या नाटकाची अपेक्षा होतीच; ती ‘गोडसे @ गांधी डॉट कॉम’कडून पुरी झाली! अशगरने यापूर्वी ‘जिस लाहोर नही देखा’ सारखी वेगळी वाट चोखाळणारे नाटक लिहिल्यामुळे ती अपेक्षा निर्माण झाली होती. ‘गोडसे @ गांधी’ नाटकात त्याची आगळी दृष्टी आहेच.
गांधीजींचा खून झाला 30 जानेवारी 1948 रोजी. त्यानंतर कायद्यानुसार सर्व प्रक्रिया होऊन नथुराम गोडसे यांना फाशीची शिक्षा झाली. त्या प्रत्यक्ष घटनेला बगल देऊन ते दोघेही जिवंत राहिले आणि त्यांच्या त्यांच्या निष्ठांनुसार पुढे कसे वागले असते हे त्या कल्पनाचित्रात किंवा फँटसीत दाखवले आहे.
नाटककाराला त्यासाठी पहिली आणि सर्वांत महत्त्वाची आवश्यकता होती, गांधी आणि गोडसे या व्यक्ती नीट समजावून घेण्याची. गोडसे यांनी अखेरच्या काळात जी वक्तव्ये केली त्यामुळे त्यांना शब्दांत पकडणे सोपे होते. कोणी त्यांच्या त्या आधीच्या आयुष्यात फारसा रस दाखवलेला नाही, परंतु गांधी यांचे तसे नाही. गांधी यांनी आयुष्यभर केलेले लेखन, त्यांच्याकडे संशोधकांनी आणि इतिहासकारांनी पाहिल्याचे अगणित दृष्टिकोन लक्षात घेता गांधीजींना शब्दांत गोवणे अशक्यप्राय. कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते दशांगुळे उरतातच.
लेखकाने निवडलेली संकल्पना आव्हानात्मक आहे. त्यावर नाटक बेतण्यासाठी इतर पात्रे निर्माण करणे आवश्यक होते. बावनदास हे फणीश्वरनाथ रेणू यांच्या ‘मैला आंचल’ कादंबरीतील पात्र. ते नाटककाराला आयते मिळाले. प्रभावती आणि जयप्रकाश यांच्या बाबतीत प्रत्यक्ष आयुष्यात घडलेल्या हकिकतीनुसार गांधीजींवर अंधभक्ती करणारी सुषमा वर्मा आणि तिच्यावर नितांत प्रेम करणारा प्राध्यापक नवीन जोशी ही पात्रे निर्माण करण्यात आली आहेत. गांधीजी एका दुर्गम्य प्रदेशात आश्रम थाटतात. तेथे देखभाल करण्यासाठी आलेली सुषमाची आई आणि चर्चा चालू ठेवण्यासाठी गांधी व गोडसे यांची सहकारी मंडळी ही पात्रयोजना पुरेशी वाटते.
अशगर वजाहत हे एक यशस्वी, अनुभवी आणि प्रतिभासंपन्न नाटककार असल्यामुळे नाटकाची अठरा प्रवेशांत केलली विभागणी, सुरुवातीच्या ब-याच प्रवेशांतील संवाद, त्यांना जोडणारी निवेदने हे सारे प्रभावी झाले आहे.
मला जाणवलेल्या त्रुटी दोन प्रकारच्या आहेत. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी त्यांच्या समग्र जीवनाकडे पाहायला हवे. बॅरिस्टर गांधी दक्षिण आफ्रिकेत 1893 मध्ये गेले. ते तेव्हापासून जगावेगळे वागत आले. सर्वसाधारण माणसे वागतील तसे ते एकदाही वागलेले दिसत नाहीत. ते सर्वधर्मसमभाव, सर्वभाषासमभाव, सर्ववंशसमभाव, सर्वोदय, सत्याग्रह अशी तत्त्वे मांडू शकले आणि आचरणात आणू शकले त्याचे कारण त्यांची ही जगावेगळी विचारसरणी. ते वयाने लहान-मोठ्यांशी, स्त्री-पुरुषांशी, मित्रांशी आणि विरोधकांशी जसे वागले तसे तेच वागू शकतील. अल्बर्ट आइनस्टीन उगाच नाही म्हणाले, की असा हाडामांसाचा माणूस प्रत्यक्ष होऊन गेला हे पुढील पिढ्यांना पटणार नाही. अशा माणसाला कलाकृतीतून जिवंत करणे हे काम सोपे नव्हते. नाटककाराला ते शेवटपर्यंत झेपवता आलेले नाही. त्यांत काही आश्चर्यही नाही. सुरुवातीच्या प्रवेशांत गांधीजी आणि गोडसे ही दोन्ही पात्रे त्यांच्या त्या वेळच्या धारणेनुसार वागतात, बोलतात. परंतु, लेखकाचा गांधीजींची ब्रह्मचर्याविषयीची कल्पना, ग्रामस्वराज्यामागील भूमिका, त्यांनी शासनापेक्षा समाजाला किंवा सिव्हिल सोसायटीला दिलेले महत्त्व असे अनेक प्रश्न या नाटकात हाताळण्याचा प्रयत्न असल्याने ते सारे पटेलच असे जमलेले नाही. मेंढा येथील ग्रामस्वराज्याचा प्रयत्न, गांधीजी-जवाहरलाल नेहरू वाद अशा गोष्टींची नाटककाराला पूर्ण समज नसावी. गांधीजींना पुन्हा तुरुंगात डांबवले जाणे, तेही गोडसे आहेत तेथेच हे ओढून ताणून, नाटकीपणाने आणलेले वाटते.
आणि हे सारे स्वीकारले तरी त्या दोघांना भगवद्गीता एकत्र आणते हे लेखकाचे निव्वळ स्वप्नरंजन किंवा इच्छारंजन होय! गांधीजींना गीतेचा आधार वाटत असला तरी ते त्याचा राजकीय कारणासाठी उपयोग करून घेतील हे शक्य वाटत नाही आणि गोडसे व त्यांचे अनुयायी यांच्यात सत्याकडे गांधीजींच्या किंवा निदान गीतेच्या नजरेने पाहण्याचे धाडस असते तर आपल्या देशाची जी दुरवस्था होऊ पाहत आहे तशी ती झाली नसती.
गोडसे @ गांधी डॉट कॉम – असगर वजाहत
प्रकाशक : भारतीय ज्ञानपीठ
भाषा : हिंदी
पृष्ठ संख्या : ७९, मूल्य : १०० रुपये
– रामदास भटकळ
नाटकाकडे किती वेगवेगळ्या…
नाटकाकडे किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येते! त्यातून हे गांधींवरचे नाटक. गांधी असे एका नाटकात पकडताच येणार नाहीत. आतातर या नाटकाची संहिता मुळातूनच वाचायला हवी असे वाटते.
Comments are closed.