गर्दीतली वृक्षराजी

0
31

     इमारतींच्या सांदीकोपर्‍यांतून रुजणारी पिंपळाची रोपटी किंवा पेव्हरब्लॉक्संनी मढलेल्या पदपथावर तुडवलं जाण्यासाठी तरारणारं गवत सहज डोळ्यांसमोर आणलं तर असं वाटेल, की जगण्यावरची श्रद्धा म्हणा, जीवनेच्छा म्हणा किंवा अगदी पाहिजे तर जीवनासक्तीसुद्धा, माणसानं शिकावी ती वनस्पतीसृष्टीकडून.

     कारणादाखल सांगतात ते असं, की झाडंझुडपं ही जागेशी जखडलेली असतात. ती प्रतिकूल परिस्थितीपासून दूर जायला असमर्थ असल्यानं, त्‍यांच्‍याकडे आहे त्याच्याशी जुळवून घेऊन राहणं हा एकच पर्याय  असतो. वनस्पतीसृष्टीमधली वेगवेगळ्या प्रजातींकडे पाहिलं तर भवतालात घडून येणार्‍या बदलांना तोंड देण्याचं जनुकीय वैविध्य त्या प्रजातींच्या घटक-गणांत असतं आणि म्हणूनच त्या प्रत्येक प्रजातीचे मोजके प्रतिनिधी-घटक जरी वाचले तरी त्या प्रजातीचं अस्तित्व टिकवून ठेवतात. दुसरा महत्वाचा मुद्दा हा, की आपण जर एकेका घटक वनस्पतीच्या वाढीकडे पाहिलं, तर वाढीचा एकेक टप्पा प्राप्त परिस्थितीनुसार लहान-मोठा होतो, किंवा गाळलाही जाऊ शकतो. म्हणजे त्या वाढीत बाह्यानुवर्ती लवचीकपणा खूप मोठ्या प्रमाणावर आढळतो. कुठेही-कधीही-कसंही फुलून बीपासून बीपर्यंत जायचं तर एवढं हवंच!

     मुंबईच्या दक्षिण टोकाचा फोर्ट परिसर, समुद्रात ताणलेल्या हाताच्या पंजात अंगठ्याचं नख असावं तसा आणि तितकाच. तो वाहनांच्या आणि माणसांच्या पराकाष्ठेच्या वर्दळीचा. धूळ-प्रदूषणाचा आणि गोंगाटाचा. काही ठिकाणी रस्ते भव्य आहेत म्हणून, काही ठिकाणी इमारतींची दाटी आहे म्हणून सतत सगळीकडे सगळ्या प्रकारची वाहनं, माणसं यांची अनिर्बंध हालचाल. त्याचमुळे तिकडे अजूनही तग धरून असलेल्या सदास्थिर वृक्षवैभवाचा त्या भागाकडे दररोज कामावर येणार्‍यांनाही पत्ता नसतो! BNHSच्या प्रयत्नांमुळे हल्ली विद्यापीठाचा परिसर, चर्चगेट, ओव्हल मैदान अशा निवडक भागांत तज्ञ मार्गदर्शकांबरोबर वृक्षपरिचय फेरफटका मारता येतो, पण बरेच एकांडे शिलेदार त्या मळलेल्या वाटेपासून दूर असतात. अचानक कधीतरी घाईत रस्ता ओलांडताना समोर लालचुटुक गुंज (Abrus precatorius) आढळते, किंवा भिरभिरतं बुचाचं (Millingtonia hortensis) फूल कपाळावर तरंगत येतं आणि वर नीट बघायची बुद्धी होते.

     विदेशसंचारनिगमच्या उंच इमारतीकडे बघत अलेक्झांड्रा शाळेजवळून जाताना लगेच ‘महर्षी दधिची‘ मार्ग लागतो. तिथं कोपर्‍यावर नाक, कान, घशाच्या आजारांसाठीचं सरकारी रुग्णालय आहे, त्याला बाहेर हातरुमालाच्या घडीइतकं कुंपण आहे. बकुळीचा (Mimusops elengi) बेचकेदार वृक्ष तिकडे अनेकानेक वर्षं दिमाखात उभा आहे. सरळ मुख्य खोड आणि जमिनीला काहीशी समांतर जाऊन सरळ वर वाढलेली दांडगट फांदी- जिच्या बेचक्यामधे Harp च्या तारा ताणता याव्यात! फांदी दांडगट अशामुळे की ती दर काही वर्षांनी निर्दयपणे छाटली जाते आणि एरवी पाहवी तेव्हा चांगली जाडजूड वाढलेली दिसते. फुलायच्या दिवसांत वाहनांच्या वर्दळीतही ताजी-टपोरी फुलं असतातच. अहर्निश धूर आणि धूळ खाऊनही त्याला येणारी बकुळफळंसुद्धा पिवळी गरगरीत तकतकीत असतात, अशी की बघताक्षणी चिकू (Manilkara zapota) आणि बकुळीचं नातं किती जवळचं आहे हे समजेल.

     दलाल स्ट्रीटवरून स्टॉक एक्सचेंजचा जीजीभॉय टॉवर डाव्या हाताला ठेवून सरळ चालत आलं, की बरोबर समोर पारसभेंडीचं(Thespesia populnea) मोठंथोरलं, बळकट झाड आहे. पिवळ्या, गुलाबी कळ्या-फुलांनी डवरलेलं तरी असतं किंवा गोलसर हिरवी पानं मिरवतं. एका धावत्या पट्टीवर दिसणारे भागभांडवलांचे चढतेउतरते भाव स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीच्या पोटावर कंबरपट्ट्यासारखे झळकत असतात, तेव्हा समोरची रानभेंडी तितकीच दिमाखदार व समृद्ध आणि वैभवसंपन्न वाटते. वाण नाही पण गुण लागतो तो असा.

     BNHS पासून हाकेच्या अंतरावर, वस्तुसंग्रहालयावरून श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात जाताना वाहतुकीच्या पुरात लागणारं झुडपांचं बेट आणि त्यातलं वेडंवाकडं उजाड चाफ्याचं (Plumeria spp)  झाड हे असंच अवचित आनंदाचं ठिकाण आहे. चाफा बघावा तर पिठ्या ढेकणाच्या (Planococcus citri) प्रादुर्भावानं इतका काळवंडलेला, की पांढरा नाही, लाल नाही तर काळा चाफा म्हणून ओळखला जावा. आसपासचं धूर किंवा ध्वनी प्रदूषण अलौकिक. माणसांचा वावर अव्याहत. असं सगळं असूनही पाहवं तेव्हा तिकडे दिसतात कर्दळी (Canna spp), घाणेरी (Lantana camara) यांच्यासारखी अल्पसंतुष्ट फुलं आणि त्या एवढ्याशा पट्टयात रुंजी घालत असतात चार ते पाच प्रकारची फुलपाखरं. इतकी की तिकडून रस्ता ओलांडायचा म्हटलं तर ह्या कोट्यवधी माणसांच्या शहरात गर्दी आड यावी ती फुलपाखरांची!

ऋचा गोडबोले – भ्रमणध्वनी : 9819321852, इमेल rcagodbole@gmail.com 

दिनांक – 12 डिसेंबर 2011
 
संबंधित लेख –

 

ऊस, राजगिरा, साबुदाणा, बटाटा, मिरची  
आकडेवारीचे फुलोरे  
भाषेचे उत्पादक होऊ!   
आपल्या समजुतींचं कपाट

{jcomments on}

About Post Author