बोईंग इंटरनॅशनल विमान कंपनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट डॉ. दिनेश केसकर भेटले.
लोखंडाच्या मळीपासून रनवे आणि हायवे बनवण्याचे तंत्रज्ञान शोधणारे, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, Order of Australia Medal याने विभूषित डॉ. विजय जोशी भेटले.
त्यांची थक्क करणारी विश्वभरारी पाहून मन नादावले. असे वाटत होते, की या मराठी माणसांची माहिती लोकांना व्हायला पाहिजे.
तेवढ्यातच, ‘मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’चे मुख्य निर्माता श्री पुतळाजी अर्जुन नव्याने संपर्कात आले. त्यांच्या ‘शिवाजी महाराज नसते तर आज हिंदुस्तान नसता’ या उद्गारांनी अव्यक्त सूर छेडले गेले. महाराष्ट्रातील मराठी माणसाचे मराठीपण जपणाऱ्या मॉरिशसवासीयांची दोनशे वर्षांपासूनची ओळख विस्मयचकित करणारी आहे.
आनंद आणि सुनीता गानू यांनी ‘मॉरिशसध्ये मराठी’ हे टाइप करून गुगलला साकडे घातले. त्या दोघांसाठी 29 ऑक्टोबर 2016 ची ती संध्याकाळ भारलेली आणि ‘इंटरनेट’कडे खुणावणारी, खुळावणारी ठरली. एक अरूप ओढ निर्माण झाली होती. आनंद-सुनीता यांनी विविध संकेतस्थळांचे आंतरजाल अक्षरशः पिंजून काढले. ‘अबब!’ म्हणायला लावतील एवढी मराठी माणसे वेगवेगळ्या क्षेत्रांत जगाच्या नकाशावर सर्वत्र काम करताना दिसू लागली. मनावर विषण्णतेचे मळभ दाटू लागले. हे आपले लोक आणि त्यांच्याबद्दल मराठी माणसाला काहीच माहीत नाही! त्या सगळ्यांना भेटले पाहिजे.
29 ऑक्टोबरची रात्र सरली, त्या ऊर्मीतच 30 ऑक्टोबर उगवता उगवता सुनीता म्हणाली, “उत्त्तुंग कर्तृत्वाची शिखरे उभारणाऱ्या आणि ज्ञानव्यासंगाची देदीप्यमान बिरुदे मिरवणाऱ्या परदेशस्थ मराठी व्यक्तिमत्त्वांचा संक्षिप्त परिचय आपण मराठी लोकांना करून दिला पाहिजे”. आनंदने लगेच मुलगा शैलेश यांच्याशी सिंगापूरला आणि मुलगी गायत्री व जावई अभिनव झा यांच्याशी कॅलिफोर्निया-अमेरिका येथे स्काइपवर संपर्क साधला. त्या तिघांनाही ती कल्पना खूपच भावली. त्या तिघांशी बराच वेळ तोच विषय घेऊन बोलणे झाले. तेवढ्या चर्चेनंतर ‘ज्ञानसाधनेतून उत्तुंग शिखर सर करणारी परदेशस्थ मराठी व्यक्तिमत्त्वे’ हे सूत्र घेऊन पुस्तक काढण्याचा विचार 30 ऑक्टोबर 2016 रोजी पक्का झाला.
एकदा तशा पुस्तकाचा संकल्प सोडल्यावर त्या दोघांनी त्यांचा सर्व वेळ त्यासाठी खर्च करण्याचे ठरवले. शैलेश, गायत्री आणि अभिनव या उच्चशिक्षित, उच्च्पदस्थ आणि विचारी मुलांची जोड संकल्पाच्या सिद्धीला मिळणार हे नक्की झाले होते. आनंद-सुनीता यांनी चाचपणी आणि आखणी सुरू केली, की अशा अनेक मराठी माणसांपर्यंत कसे पोचायचे? त्यांची भेट, त्यांचा वेळ मिळवायचा कसा? त्यांना त्यांचा हेतू कसा पटवून द्यायचा?… जगभर विखुरलेल्या मराठी सुरांना गवसणी घालून हा वाद्यमेळ कसा जमवायचा? आनंद-सुनीता यांनी वाङ्मय-प्रकाशन क्षेत्राशी संबंधित लोकांशी पुस्तकाचा मनोदय बोलून दाखवला. सन्मान्य व प्रथितयश लोकांचे मत अजमावण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान, ऑस्ट्रेलियातील विजय जोशी भेटले, त्यांना तेथील सर्वोच्च नागरी सन्मान OAM – ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल’ने सन्मानित करण्यात आले होते. आपल्याकडील पद्मभूषण जणू! त्यांनी पुस्तकाच्या संकल्पनेला दुजोरा दिला. मग अनेकांचे मनोबळ मिळाले. आनंदचा लहानपणीचा पार्लेकर मित्र संजय पेठे हा सर्वसंचारी, बहुश्रुत. त्या साक्षेपी मित्राने ‘चौदा विद्या, चौसष्ट कला’ ही त्याची वेबसाइट उघडून दिली व देशोदेशीच्या ‘महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळां’शी संपर्क सिद्ध झाला. पण ज्ञान आणि व्यवसाय साधनेत व्यग्र असणाऱ्या गानू पतिपत्नींना हव्या असलेल्या व्यक्तींचा संपर्क महाराष्ट्र मंडळांशी फारसा नव्हता. तरीही उत्तर अमेरिकेच्या शिकागो येथील महाराष्ट्र मंडळाचे नितिन जोशी यांनी पुढील जवळजवळ बारा आठवडे दररोज संध्याकाळी 5.30 वाजता गानू यांच्याशी फोनसंपर्क करून मदत व सल्ला तर दिलाच; पण काही व्यक्तिमत्त्वांची गाठही घालून दिली. ‘बृहन्महाराष्ट्र मंडळा’चे आणखी एक पदाधिकारी आशीष चौगुले यांच्यामुळे व्यक्तिमत्त्वांच्या निवडीला दिशा मिळाली. भारतातून आणि भारताबाहेरून मोठे संपर्कजाल विणले गेले. आनंद-सुनीता यांनी त्यांच्या श्रेय नामावलीचा उल्लेख पुस्तकाच्या प्रस्तावनेत आणि वेळोवेळी केला आहे.
वेगवेगळ्या मार्गांनी युनिव्हर्सिटीज, असोसिएशन्स, विषय व क्षेत्र विल्हे शोध अखंड चालू होता. मोठ्या व्यक्तींशी संपर्क झाला, की तिच्या कार्यकर्तृत्वाचे तपशील जाणून घेण्याकरता गानू यांनी एक विस्तृत प्रश्नावली तयार केली. बालपण, प्रेरणा, ध्येय, निश्चय आणि यश संपादनाचे वेगवेगळे टप्पे… त्या माहितीत रंग भरायचे होते ते त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेरणेचे.
आख्ख्या नोव्हेंबर 2016 महिन्यात फक्त एक चरित्र साकार झाले, ते डॉ. अजय कोष्टी यांचे. त्यानंतर लेखनाची गती धावू लागली. फेब्रुवारी 2017 पर्यंत सात-आठ आलेख लिहून तयार झाले. फेब्रुवारी ते एप्रिल 2017 दरम्यान लेखनाचा झपाटा वाढला, एकूण छत्तीस लेख प्रकाशाची वाट पाहत कागदाच्या खोलीत बंदिस्त झाले होते! आनंद-सुनीता यांच्यासाठी तो सात महिन्यांचा काळ एका ध्येयाच्या पूर्तीसाठी मंतरलेला होता. त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोचण्यासाठी पुस्तकाचे माध्यम इंग्रजी ठरवले होते.
‘ग्रंथाली’ने तो ‘प्रकल्प’ प्रकाशन व वितरण यासाठी स्वीकारला. साडेतीनशे पृष्ठे, ‘कॉफी टेबल बुक’चा आकार, सजावट आणि छपाई असे सारे पुढील चार महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे ठरले. निलेश जाधव या मितभाषी आर्टिस्टने पुस्तकाचे दृश्य रूप जमवले. मुद्रक आनंद लिमये परदेश दौऱ्यावर होते, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली विजय खापरे यांनी परिश्रम घेऊन पुस्तक तयार केले.
एव्हाना रघुनाथ माशेलकर यांचा वरदहस्त पुस्तकाला लाभला. त्यांनी मुखपृष्ठावरील विश्व पादाक्रांत करून केशरी पताका फडकावणाऱ्या साहसवीराच्या संकेतचित्राचे कौतुक केले. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा 1 ऑगस्ट 2017 ला, टिळक पुण्यतिथीचा मुहूर्त साधून पार पडला! साडेतीन तास चाललेल्या त्या सोहळ्याला साडेचारशे श्रोत्यांची उपस्थिती लाभली. जगभरातून आवर्जून पुस्तकातील महाराष्ट्राची अकरा रत्ने उपस्थित झाली होती. ‘गर्जे मराठी’चा भाग दोन आणि पहिल्या भागाची मराठी आवृत्ती, लगेच वर्षभरात पुढील 1 ऑगस्ट 2018 ला प्रकाशित झाली. त्याआधी 1 मार्च 2018 रोजी ‘गर्जे मराठी- भाग एक’चे ई बुक/ऑडिओ बुक प्रकाशित झाले. ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’चे संस्थापक, अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. डी.वाय. पाटील यांच्या उपस्थितीत, पुस्तकाच्या दुसऱ्या खंडातील त्रेसष्ठपैकी पंधरा महाराष्ट्र रत्नांचा चक्षुर्वै कौतुकसोहळा 1 ऑगस्ट 2018 रोजी साजरा झाला. दुसऱ्या खंडात तरूण पिढीतील सोळा व्यक्तिमत्त्वे ही जादाची भर आहेत. ‘माणसाचे कर्तृत्व तरुणपणीच सिद्ध होते, त्यासाठी त्याला पोक्त अनुभवी होत बसण्याची गरज नाही.’ या सद्यकालीन मंत्राचे प्रत्यंतर त्या तरुण विभागात येते.
परदेशस्थ मराठी विद्वानांची नावे आम मराठी वाचक श्रोत्यांच्या परिचयाच्या कक्षेबाहेर अज्ञात ताऱ्यासारखे लुप्त आहेत. ‘गर्जे मराठी’मुळे आकाशगंगेच्या त्या दुरस्थ भागावर दुर्बिणीचा रोख पोचत आहे. ‘गर्जे मराठी’चे यश त्या दूरदेशीच्या ताऱ्यांची झळाळी मराठी माणसासमोर आणण्यामध्ये आहे. असे काय आहे परदेशस्थ मंडळींकडे ज्याचे कौतुक करावे! आनंद-सुनीता यांना त्या व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा घेताना जाणवले, की त्या सर्वांनी घराची सुरक्षितता सोडून देण्याचे साहस केले आहे. त्या साहसात संकुचितपणाचा परीघ तोडून जोखीम घेण्याची वीरश्री आहे. प्रत्येकाने त्याचे अस्तित्व भारताबाहेर गेल्यावर सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत. त्या कर्तृत्वाने परकेपणाच्या आम्लात संकुचित अस्मिता जाळून टाकली आहे. दोन्ही पुस्तकांत समाविष्ट व्यक्तिमत्त्वे ही जितकी मराठी आहेत तितकी वैश्विकही आहेत. हा एक प्रकारे मराठीपणाचा वैश्विक विस्तार आहे!
नाव कमावलेले अनेक भारतीय वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत. मग निवडीमध्ये फक्त मराठी का? या प्रश्नाचे उत्तर विचार करण्यास लावते. कवी बा.भ. बोरकर यांनी त्यांच्या ‘पावलापुरता प्रकाश’ या पुस्तकात एक कल्पना मांडली आहे. प्रत्येक माणूस सर्व आसमंत उजळू शकत नाही, पण तो त्याचे पुढील पाऊल दिसेल एवढी जागा उजळू शकतो. परदेशस्थ भारतीयांना ती संकल्पना लागू पडते, तशी ती आनंद-सुनीता यांनाही लागू पडते. भारताबाहेर जवळजवळ तीन कोटी भारतीय पावलांपुरता आणि त्याही पलीकडे प्रकाश पसरवत आहेत. पण तेवढ्या तीन कोटींच्या प्रकाशवलयांना एक व्यक्ती – एक संस्था पालाण कसे घालणार! मग सर्वप्रथम आपल्या मराठी मुळांकडे पाहूया. मराठी माणसाला तो मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे. संतांची-ज्ञानाची-संघर्षाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राने परकीयांशी सर्वात मोठा लढा दिला आहे. ज्यांचे मराठीशी नाते आहे, अशांचे भावविश्व आणि संदर्भ मराठी माणसाला अधिक चांगल्या प्रकारे कळतील. मराठीपणाच्या समान दुव्याने मराठी माणसाला परदेशस्थ मराठी माणसांशी सहज जोडून घेता येईल आणि निश्चितच, त्यांनाही मराठी माणसाविषयी थोडी अधिक आत्मीयता वाटेल. व्यष्टीकडून समष्टीकडे जाण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. परदेशस्थ मराठी माणसाला पुन्हा त्याच्या मातीची ओल आणि ओढ जाणवून देण्यास ‘गर्जे मराठी’ हे केवळ माध्यम आहे. व्यापक अर्थाने प्रत्येक मराठी माणूस त्यानंतर भारताचा आणि विश्वाचाही भाग आहेच.
या बऱ्याचशा लघुचरित्रांमधून जाणवते ती त्या मराठी माणसांची मराठी मातीपासून आलेली दूरता. मराठी मातीतून दुसरीकडे या सर्वांचे यशस्वी पुनरारोपण झाल्याला जवळपास दोन पिढ्या उलटल्या. त्यातून ही दूरता दोन्ही प्रकारे आली, देश सोडल्यामुळे सहवासातून येणारी ओढ आक्रसत गेली. हळुहळू नातेसंबंधांची मागील पिढी संपली आणि मुळे घट्ट धरून ठेवणारी माती सैलावली. त्या ओढीचे झरे या पुस्तकामुळे पुन्हा उमळून येतील का? प्रवासी मराठी माणसे, खरे तर, त्यांच्या भाषेपासूनही दूर गेली, ती पुन्हा जवळ येतील का? त्यांच्या मातीने त्यांना घातलेली ही साद, हे साकडे असेल का? त्यांच्या मराठीपणाचा आणि भारतीयत्वाचा कृतज्ञता निर्देशांक उचलण्याची ही परतवारी वाट हे पुस्तक दाखवेल का? महाराष्ट्रपुत्रांच्या प्रतिभेचा स्पर्श आणि गुरुदक्षिणा महाराष्ट्राच्या मातीला मिळेल का? या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर या दोन्ही पुस्तकांच्या जडणघडणीत निश्चितच आहे.
पुस्तकाच्या या दोन खंडांवर ही प्रकाशयात्रा थांबणार नाही. ती पुस्तकमाला बनली आहे. ‘गर्जे मराठी’च्या नवीन खंडांबरोबरच एकेका व्यक्तिमत्त्वाच्या यशोगाथेवर एकेक चरित्र वा आत्मचरित्र मूळ मराठीतून बनवावेसे वाटावे अशा अपार शक्यतांच्या प्रकाश वाटाही यातून निघू पाहत आहेत. नवे क्षितिज शोधू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी वेबसाइट बनवण्याची संकल्पना पुढे आली आहे. अनेकांनी मोठमोठे सन्मान आणि पुरस्कार मिळवले आहेतच, पण पुढेमागे नोबेल पुरस्कार मिळवावा इतकी ताकद काहींच्या प्रतिभेत आहे.
या पुस्तकांमधील काही जणांची सामाजिक बांधिलकी त्यांच्या कार्यामधून दिसून येते; काहींच्या कर्तृत्वाने त्यांनी वेगळे काही न करताही समाजाला त्याचा फायदा झाला आहे. काही जणांपासून त्यांच्या व्यापापोटी सामाजिक बांधिलकीचा वसा लांब राहिला आहे. त्या सर्वांना या पुस्तकमालेने एका व्यासपीठावर आणून मातृभूमी, समाज आणि वैश्विकता यांचे एक वेगळे आकलन करून दिले आहे. ‘गर्जे मराठी- भाग एक’च्या एक हजार प्रती गोव्याचे आनंद साधले यांनी एक रकमी साडेसात लाखांचा ड्राफ्ट देऊन विकत घेतल्या आणि चार हजार वाचनालये चालवणाऱ्या प्रदीप लोखंडे यांच्या ‘ज्ञान की’ (Gyan key) या संस्थेकरवी एक हजार शाळांना वाटल्या. त्यावर शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. पुस्तक बनवणे जितके कठीण, त्याहून विकणे महाकठीण! त्यातूनच ई-बुक काढण्याविषयी लेखकद्वयाचा विचार चालू आहे. ‘गर्जे मराठी – भाग एक आणि भाग दोन’ ही दोन इंग्रजी पुस्तके, ‘गर्जे मराठी – भाग एक’च्या मराठी रूपांतराच्या तीन प्रती असा संच साडेबावीसशे रुपयांत अडतीसशे शाळांना वाटण्याचा मनोदय आहे. एक संचही प्रायोजित करणाऱ्याचा ऋण निर्देश पुस्तकावर करण्यात येईल. ‘गर्जे मराठी’ अमेरिका, इस्रायल, मॉरीशस, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, जर्मनी, इंग्लंड आणि अनेक देशांतील मराठी माणसांसाठी ‘फेसबुक’ ठरले आहे.
– स्वाती मराठे, ०२२२५८९६६६०, shailajabakul@gmail.com
Very nice. CONGRATULATIONS
Very nice. CONGRATULATIONS
Comments are closed.