गणिताचे विद्यार्थी घडवणारे – एम. प्रकाशसर

8
34
carasole

एम. प्रकाशसर अर्थात प्रकाश मुलबागल हे गणित विषयाचे अध्‍यापक. त्‍यांनी ‘गणित ऑलिम्पियाड स्पर्धे’त भारताला सुवर्णपद मिळवून देण्‍याच्‍या इर्षेने गणित विषयात विद्यार्थी घडवण्‍याचे काम अनेक वर्षे केले. त्‍या स्‍पर्धेत भारताला मिळालेल्या एकूण शंभर पदकांपैकी पंचवीसपेक्षा जास्त विद्यार्थी एकट्या प्रकाशसर यांचे आहेत. अविवाहित राहून, कोणत्याही आमिषांना बळी न पडता संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेतलेले आणि प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिलेले प्रकाशसर शिक्षकी पेशातील अनेकांसाठी खरे हिरो आहेत.

प्रकाशसरांना कानपुरच्या आयआयटीमध्ये मेकॅनिकल इंजिनीयरिंगला अॅडमिशन मिळाली होती, पण त्यांनी तो अभ्यासक्रम एक वर्षात बदलला आणि त्याच कॉलेजमध्ये गणितात एम.एस्सी. करण्याचा निर्णय घेतला. तो त्यांच्या आईवडिलांना मोठा धक्का होता. ते त्यांची समजूत काढण्यासाठी म्हणून विमानाने कानपूरला पोचले, पण उपयोग झाला नाही. सर त्यांच्या निर्णयावर ठाम होते. आईवडील ‘तू आणि तुझे नशीब’ असे म्हणून पुण्याला परतले!

सर त्यांच्या मित्रांचे कॉलेजमध्ये शिक्षक असत. ते स्वतः कोर्समध्ये नसलेल्या अनेक गोष्टी शिकत आणि दुसऱ्याला शिकवत!

सरांनी कानपुरमधील शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ आय.डी.बी.आय. बँकेत नोकरी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की ही बँक परिसराच्या औद्योगिक विकासासाठी नसून व्यक्तिगत उत्कर्षासाठी आहे. त्यांनी नोकरी सोडून दिली. त्यांना मिळणारा पगार आणि मुंबईत नरिमन पॉर्इंटला राहण्यासाठी जागा त्यांना बँकेच्या नोकरीत टिकवू शकली नाही! अशी तत्त्वनिष्ठा आणि असा करारीपणा सरांच्या अंगी आहे.

त्यांची अध्यापनातील करिअरदेखील आकस्मिक प्रकटली. ते मुंबईच्या ‘खालसा कॉलेज’मध्ये मुलाखतीसाठी गेलेले असताना त्यांना अचानक, “बी.एस्सी.च्या एका वर्गात अध्यापक आलेले नाहीत. तू लेक्चर घेतोस का?” असे विचारले गेले. ते लगेच “हो” असे म्हणाले. त्यांनी लेक्चर यशस्वीपणे घेतले आणि त्यांची शिक्षणक्षेत्रात कामे जी सुरू झाली ती मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी. तेथे काही वर्षें काम केल्यावर त्यांच्या लक्षात आले, की हुशार मुले तर वगळाच, सर्वसामान्य मुलेही इंजिनीयरिंगला करिअरच्या ओढीने जात आहेत पण त्यामुळे विशुद्ध विज्ञान करणारी मुले कमी होऊ लागली आहेत. त्याच सुमारास त्यांच्या असे लक्षात आले, की भारत आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये खूप पिछाडीवर आहे. भारताला सुवर्णपदक मिळालेले नाही! म्हणून त्यांनी १९९७-९८ ला फर्ग्युसन कॉलेज सोडून भास्कराचार्य प्रतिष्ठान जॉईन केले.

प्रकाशसरांचे पुण्यातील पाचशे विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यातील दोनशे विद्यार्थ्यांवर १९९८ मध्ये काम सुरू झाले. त्या प्रकल्पाचे नाव ठेवले गेले, ‘गोल्ड २००२’. उद्देश हा, की २००२च्या ऑलिम्पियाडमध्ये भारताला एक सुवर्णपदक मिळवून देणे. प्रकाशसर आणि विद्यार्थी दररोज बारा तास याप्रमाणे सलग चार वर्षें काम करत होते. भारताची टीम निवडण्याची वेळ आली आणि सहापैकी तीन जण ‘गोल्ड २००२’मधील अंतिम संघामध्ये सिलेक्ट झाले. त्या मुलांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्या वर्षी भारताला एक सुवर्ण व दोन कास्य अशी पदके मिळवून दिली आणि भारताचे मानांकन आंतरराष्ट्रीय तुलनेत नऊवर आले. प्रकाशसरांनी त्या नंतरही गेली चौदा वर्षें अनेक मुलांना घडवले आहे. भारताला जी शंभर पदके मिळाली, ती मिळवणा-या विद्यार्थ्‍यांपैकी पंचवीसपेक्षा जास्त विद्यार्थी एकट्या प्रकाशसर यांनी घडवले आहेत.

प्रकाशसरांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवले आहे. वयाच्या चौसष्टाव्या वर्षीही ते तेवढ्याच जोमाने काम करत आहेत.

त्‍यांनी जेव्हा ‘गोल्ड २००२’ प्रकल्प हाती घेतला तेव्हा ते एका जीवघेण्या आजारातून नुकते बाहेर पडले होते. त्यांनी तो प्रकल्प ‘डॉक्टरांनी त्यांचे काम केले. आता मला माझे काम करू द्या’ एवढ्या सोप्या पद्धतीने सुरू केला.

माझी आणि प्रकाशसरांची भेट होऊन डिसेंबर २०१६ मध्ये दहा वर्षें पूर्ण झाली. आम्ही त्‍या काळात अनेक तास एकत्र काम केले. त्यांच्या सारख्या माणसाबरोबर एवढे काम करण्यास मिळणे म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो. आम्हा सर्वांचे आयुष्य त्यांच्या सहवासाने उजळून निघाले आहे.

त्यांचे प्रकाश मुलबागल हे खरे नाव. पण ते ओळखले जातात ‘एम प्रकाशसर’ या नावाने. त्यांनी केलेल्या कामामुळे महाराष्ट्राच्या गणितातील विद्यार्थ्यांचा संपूर्ण भारतात नाही तर जगभरात दबदबा तयार झाला आहे.

एम. प्रकाश
9823135426, prakashmulabagal@gmail.com

– सुबोध पेठे

Last Upadeted On 3rd March 2017

About Post Author

Previous articleझोडगे गावचे माणकेश्वर मंदिर
Next articleभैरव
९८२३०३६७०६ सुबोध पेठे यांचा जन्‍म सिंधुदूर्ग जिल्‍ह्यातील कुडाळ इथला. त्‍यांनी केमिकल इंजिनीरिंगचा डिप्लोमा गोरेगाव व डिग्री नागपूर येथून पूर्ण केली. त्‍यानंतर त्‍यांनी Thermax, Pentair अशा कंपन्यांमध्ये अकरा वर्षे नोकरी केली. त्यापुढील पाच वर्षे Export व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. त्‍यांना त्‍यात तोटा झाला आणि त्‍यांनी तो व्यवसाय बंद केला. त्याच सुमारास ते एम. प्रकाश यांना भेटले. तेव्‍हापासून ते एम. प्रकाश यांसोबत काम करून लागले. ते 2012 सालापासून IIT-JEE Advance म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांना IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लागणारे प्रशिक्षण देत आहेत. ते मुलांना गणित शिकवतात.

8 COMMENTS

  1. वा वा वा! गणितात असं डेडीकेशन
    वा वा वा! गणितात असं डेडीकेशन म्हणजे कमाल आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचे विद्यार्थीदेखील गणितात संशोधनाला प्रेरीत होतील, असा विश्वास वाटतो!!

  2. Wow…….. Great Sir ji..
    Wow…….. Great Sir ji.. thanks Subodh for making us feel Proud to be your friend..

  3. We both are doctor and think
    We both are doctor and think that our son do his career in medical
    But he had good command in maths so join 2 yr iit foundation and he is doing very good in maths we are thankful to M Prakash sir as he nourish es math skill

  4. लेख वाचून खूप छान वाटले.

    लेख वाचून खूप छान वाटले.
    माझ्या मुलाला इथे शिकायची संधी मिळाली ही फार भाग्याची गोष्ट वाटते.प्रकाश सरांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना.

  5. खूपच समाधान देणारे काम सर…
    खूपच समाधान देणारे काम सर करीत आहेत. असाच एक लेख आपण English चे SET/NET चे आयुष्यभर मोफत क्लास घेवून अनेक यशस्वी शिक्षक घडवणारे दिवंगत प्राध्यापक अय्यर सर यांच्यावरही लिहावा हि विनंती आहे. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात नोकरी करून आणि संपूर्ण पगार विद्यार्थी आणि पुस्तके यांच्यावरच खर्च करून, तसेच आयुष्यभर हॉटेलच्या एका खोलीत राहून जगलेल्या सरांच्या आयुष्यावर आपण लिखाण करावे आणि वाचकांना एका अवलियाची जीवनगाथा सांगावी ही विनंती …….

Comments are closed.