गड-किल्ल्यांचे जलव्यवस्थापन

0
334
_gad_kille

गडकिल्ल्यांवरील पाण्याचे महत्त्व रामचंद्रपंत अमात्य (छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रधान) यांच्या आज्ञापत्रात दिले आहे – “… तसेच गडावरी आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थल तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी खडक फोडून तली – टाकी पर्जन्यकालापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे ऐसी मजबूत बांधावी.” गड किल्ले यांची उभारणी करताना आधी उदकपाण्याची सोय करूनच किल्ला बांधावा या विचारातून शिवरायांची दूरदृष्टी आढळते. 
आज्ञापत्रातील पुढील उद्गारांतून पाण्याचे महत्त्व स्पष्ट होते- “गडावर झराही आहे, जैसे तैसे पाणी पुरते, म्हणून तितक्यावर निश्चिती न मानावी. उद्योग करावा. कि निमित्य की जुझामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होताना आणि पाण्याचा खर्च विशेष लागते, तेव्हा संकट पडते या करिता तैसे जागा जखिरियाचे पाणी म्हणोन दोन – चार तली – टाकी बांधून ठेवून त्यातील वाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे”

लढ्यांच्या वेळी दारूगोळ्यांमुळे जिवंत झरे आटण्याचा संभव असतो, त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून प्रत्येक गडावर पाणीसाठा असला पाहिजे. कृत्रिमपणे साठवून ठेवलेल्या त्या पाण्याला ‘जखिरियाचे पाणी’ असे म्हटले जात असे. ते पाणी सडू नये म्हणून काळजी घेतली जात असे.

डॉ. मिलिंद पराडकर यांनी दुर्गबांधणीच्या संदर्भातील विचार पुढीलप्रमाणे मांडले आहेत –

अशा शिल्पशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र अशा कोणत्याही विषयांवरील ‘प्राचीन, अर्वाचीन ग्रंथांमध्ये दुर्गांबद्दल बारकाव्याने विचार केला गेलेला आहे. तो अन्य कोठेही धून सापडत नाही. त्या नियमाला अपवाद दोन! अर्थशास्त्राचा कर्ता कौटिल्य अन् फिलो ऑफ बायझॉण्टिअम. अन्यत्र तितका नेमस्त, कालानुरूप अन् तर्कसुसंगत विचार दुर्मीळ आहे.’
मुंबई प्रदेशात व कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यांतील गडकिल्ल्यांची संख्या सुमारे एकशेएकेचाळीस आहे. रायगड जिल्ह्यात लहानमोठे सत्तावन्न गडकिल्ले आहेत. गोपाळ चांदोरकर या वास्तुशास्त्रज्ञाने लिहिलेल्या श्रीमद् रायगिरौ या पुस्तकात ‘रायगडावरील पाणीपुरवठा’ हे स्वतंत्र प्रकरण आहे. भुईकोट, जलदुर्ग, वनदुर्ग, मिश्रगड असे विविध प्रकार त्यांत आढळतात. त्या सर्व गडकिल्ल्यांवर पाणीव्यवस्था विविध प्रकारे केलेली आहे. तलाव, विहिरी आहेतच, पावसाचे पाणी साठवण्यासाठी; तसेच, खडकांतून पाझरणारे पाणी साठवण्यासाठी बांधलेल्या टाक्या, हौद आढळतात. उतारावर बांध घालून पाणी अडवून साठवणे आणि गुहा खोदून पाणी साठवणे असे तंत्र आहे.

त्या शिलालेखातही पाण्याला प्राधान्य आढळते. इसवी सन 1671 – 72 च्या एका जाबत्यामध्ये (समकालीन कागदपत्र) रायगडासाठी पन्नास हजार होनांची तरतूद झालेली दिसते. त्यांपैकी दोन तलावांसाठी वीस हजार होन, दुर्गासाठी पाच हजार होन, चुनेगच्चीसाठी दहा हजार होन व तटबंदीच्या कामासाठी पंधरा हजार होन अशी ती तरतूद होती. तेथे हे कलम महत्त्वाचे आहे, की पन्नास हजार होनांपैकी चाळीस टक्के रक्कम ही तलावांच्या म्हणजेच, पाण्याच्या सोयीसाठी वर्ग झाली होती. दुर्गांच्या बाबतीत पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ती बाब पुरेशी आहे असा विचार गडअभ्यासक मिलिंद पराडकर यांनी मांडला आहे.
टाकी खोदण्याची पद्धत सातवाहन काळापासून प्रचलित आहे असा उल्लेख अनेक तज्ज्ञांनी केलेला आहे. टाकी खोदण्याची विशिष्ट पद्धत त्या काळात होती. जमिनीवर प्रथम सरळ खोदत जायचे. पुरेसे खाली गेल्यावर, भुयाराप्रमाणे आडवे खोदत जायचे. मात्र ते आडवे खोदकाम करताना; वरून छत कोसळू नये म्हणून, मध्ये मध्ये खांब सोडले जात असत. परंतु त्या पद्धतीत पाण्याचे बाष्पीभवन होऊन (सूर्यप्रकाशाचा संपर्क होऊन पाण्याचे वाफेत रुपांतर होते) तेथील पाण्याचा साठा लवकर नष्ट होत असे; तसेच, ते साठवलेले पाणी खराब होत असे.

प्र. के घाणेकर यांनी लिहिले आहे, की गडकिल्ल्यांवर टाक्यांची रचना अभ्यासपूर्वक केलेली असते. महाराष्ट्राच्या भूरचनेमध्ये जलसमृद्ध आणि जलाभेद्य अशा दोन प्रकारचे खडक आढळतात. ते दोन थर सरळ तुटलेले कडे आणि तिरकस उताराचे भाग असे ओळखता येतात. जलाभेद्य थराच्या वरील भागात आणि जलसमृद्ध भागाच्या तळाशी टाकी खोदली तर त्यात पुरेसे पाणी बराच काळ उपलब्ध होते. ते पाणी त्या खडकातून पाझरत येत असल्यामुळे जमिनीतील क्षार त्यात विरघळतात. सूर्यप्रकाशाचा संपर्क कमी असल्याने ते थंडगार व चविष्ट असते.’

_gad_killeरायगड ही शिवरायांची राजधानी होती. तेथील पाणीव्यवस्था आदर्श आहे. रायगडाची पुनर्रचना करताना, हिरोजी इंदुलकर यांनी कोरवून घेतलेल्या एका शिलालेखात पुढील माहिती आहे – “विहिरी, टाकी, तळी, उपवने, मार्ग, स्तंभ, हत्तीशाळा आणि राजवाडे इत्यादी नाना प्रकारची बांधकामे आणि खोदकामे शिवछत्रपतींनी रायगडावर करविली.” रायगडावरील वस्ती ठिकठिकाणी विखुरलेली होती. त्या वस्त्यांवरील सर्व लोकांना पाणीपुरवठा होईल अशा दृष्टिकोनातून तलाव खोदलेले आहेत. रायगडावर हत्तीतलाव, गंगासागर, कुशावर्त, कोळिंब, बामण टाके, काळा हौद, हिरकणीचा तलाव असे सात भलेमोठे तलाव आहेत. बालेकिल्ल्यामधील पडणाऱ्या पावसाचे पाणी, त्याचे भूपृष्ठाखालील मार्ग शोधून काढून, त्याच्या आधारे कुशावर्तेश्वराच्या मंदिराशेजारील एका जलमंदिरात जमा होऊन, तेथून ते कुशावर्त तलावात साठवले जाते. त्या प्रकारची प्रणाली इतर कोणत्याही दुर्गावर आढळलेली नाही. जलमंदिर आज भग्नावस्थेत आहे. आजही, रायगड दर्शनासाठी जे लोक येतात, त्यांना गंगासागर तलावातील पाणी उपलब्ध करून दिले जाते.
रायगडावर खडकात खोदलेली जवळ जवळ सव्वीस टाकी आहेत. काही टाक्यांची रचना स्नानगृहे आणि शौचकूप यांसाठी केली आहे. छत्रपतींच्या वाड्याच्या दक्षिणेस आणि तटबंदीच्या विरूद्ध दिशेला- उत्तरेला एक द्वार आहे. त्या द्वाराला लागून सुमारे सात फूट रुंद, चौदा फूट लांब आणि पाच फूट खोल असा चिरेबंदी हौद आहे. हौदाच्या तळाशी जलविसर्गासाठी दगडांच्या जाळ्या बसवलेल्या आहेत. तो विसर्गमार्ग बाहेरच्या बाजूस असलेल्या शौचकुपांच्या जलविसर्गाशी थेट जमिनीखालून जोडला आहे. भूमिगत जलविसर्जनाचे मध्ययुगातील ते अत्यंत दुर्मीळ असे उदाहरण आहे. त्या प्रकारची व्यवस्था हिंदुस्थानातील इतर कोणत्याही प्राचीन वा मध्ययुगीन दुर्गात वा प्रासादामध्ये आढळलेली नाही असे मिलिंद पराडकर यांनी नमूद केले आहे. त्यातील बरेचसे बांधकाम भग्नावस्थेत आढळते.

काही जोडटाकी रायगडावर आहेत. हनुमान टाके हे त्यांपैकी एक उदाहरण. त्या टाक्याच्या अलिकडील एका भिंतीवर हनुमानाची उठावदार कोरलेली मूर्ती भग्नावस्थेत आहे. बारटाकीचा खळगा हे नाव बारा टाक्यांमुळे त्या विभागाला दिले गेले. बाराटाकी म्हणजे उत्तम जलसंचय आहे. ती सर्व टाकी खडकात खोदून काढली आहेत. ती बाराही टाकी आतून एकमेकांस जोडली गेलेली आहेत असा समज आहे, पण तो खरा नाही. त्या टाक्यांतील जलसंचयाची पातळी वेगवेगळी आढळते असे गो.नी. दांडेकर यांनी लिहिले आहे. रायगडावरील काही तलाव, टाकी कोरडे पडलेले आढळतात. 

खुद्द रायगड आणि रायगड जिल्ह्यातील सर्व गड यांवर पाणी साठवणे, उतारावर बांध घालून पाणी अडवणे, पावसाचे पाणी साठवून टाक्यात सोडणे, तलाव खोदणे इत्यादी विविध उपाय केलेले आहेत. पाणी साठवण्यासाठी टाक्या रायगड जिल्ह्यातील खांदेरी, उंदेरी, जंदिरा, कोरलई, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग या सर्व गडांवर बांधलेल्या आहेत. खांदेरी किल्ल्यावर दीपगृहाच्या मागील बाजूस असलेल्या एका मोठ्या टाक्यावर पंप बसवून, त्याचे पाणी दीपगृहाजवळील पाण्याच्या टाकीत आणलेले आहे. खांदेरी किल्ल्यावर असलेली ती टाकी पावसाळ्यात साठवलेल्या पाण्याची आहेत. पाणी साठवण्यासाठी तीन टाकी उंदेरी किल्ल्यावर आहेत. _gad_kille_pani_vyavasthapanतिसरा हौद मोठा आहे. तो जलसाठा दगडी भिंत घालून सुरक्षित केला गेला आहे. अलिबागजवळ कुलाबा हा मिश्रदुर्ग आहे. त्या किल्ल्यामध्ये असलेल्या गणेशमंदिरासमोर चारी बाजूंनी बंदिस्त अशी सुंदर पुष्करणी (तलाव) आहे. जंजिरा हा मुरूड तालुक्यातील जलदुर्ग आहे. त्या किल्ल्यावर उत्तर तलाव, दक्षिण तलाव आणि सध्या रिकामी असलेली एक मोठी टाकी आढळते.

कोरलई गडावर असलेला पाणीसाठा एका वाड्यात आढळतो. त्या वाड्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, दीड फूट लांबीरुंदी व दगडी काठाळी असलेले खोल खोल खड्डे पाहण्यास मिळतात. काठाळी म्हणजे हौदाच्या कडा घासून त्या गुळगुळीत केल्या जातात. कारण त्याचे काठ लागून इजा होऊ नये. त्यातून खाली डोकावून पाहिल्यास स्वच्छ पाण्याची टाकी दिसते. गडपायथ्याच्या दीपगृहाजवळ त्याच टाक्याच्या नळातून पाणी नेलेले असून, तो जलसाठा दिवसरात्र उपसा असूनही वर्षाचे बारा महिने भरलेला असतो. फारशा जलसाठ्याची ती अभिनव योजना कोणत्याही गडावर आढळत नाही असा उल्लेख भगवान चिले यांनी केला आहे.
ठाणे जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे नाव श्रीस्थानक. त्या जिल्ह्यात छत्तीस किल्ले आहेत. त्यामधील महत्त्वाचा किल्ला म्हणजे अर्नाळा जलदुर्ग. तो किल्ला बाजीराव पेशव्यांनी 23 मे 1737 रोजी बांधून पूर्ण केला असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. त्या किल्ल्यावर असलेल्या मुबलक पाणीसाठ्यामुळे गडाच्या मधील भूभागावर शेती केली जाते ही वैशिष्ट्यपूर्ण बाब होय. किल्ल्यावर असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर अष्टकोनी विहीर आढळते. गडाच्या मध्यभागी असलेल्या दर्ग्यामागेही विहीर आहे. जीवधन, वसई, घोडबंदर, धारावी हे किल्ले ठाणे शहरानजीक आहेत. त्या किल्ल्यांवर मोठ्या टाक्या, विहिरी बांधून पाण्याची सोय केली आहे. शहरीकरणाच्या वेगामुळे त्या गडकिल्ल्यांच्या मूळच्या स्वरूपात बदल झाला आहे. जीवधन, धारावी या गडांवर देवीच्या यात्रा, उत्सव साजरे केले जातात.

मुंबई जिल्ह्यात शीव, वरळी, शिवडी, मुंबई किल्ला – फोर्ट, धारावी, माहीम, वर्सोवा असे आठ किल्ले आहेत. शीव किल्ल्यातील तलाव सध्या प्रदूषित आहे. वरळी किल्ला मुंबई शहराच्या दाटीवाटीत शोधावा लागतो. त्या किल्ल्यात डाव्या हाताला किल्ल्यातील शिबंदीचा प्राण असलेली विहीर आढळते. त्या किल्ल्याची उभारणी ब्रिटिशांनी समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी १६७५ मध्ये केली. मुंबई किल्ला- फोर्ट परिसरातील डिमेलो रोड, बॅलार्ड इस्टेट, बॅकस्ट्रीट, काळा घोडा, जन्मभूमी मार्ग, नगीनदास मार्ग, हुतात्मा चौक या ठिकाणी पाणीसाठे अस्तित्वात आहेत आणि त्यांचा उपयोग वर्तमानकाळातही केला जातो.
रत्नागिरी जिल्ह्यात अठरा गड आहेत. त्यांपैकी जयगड, गोपाळगड, पूर्णगड या गडांवरील पाणी साठ्यांविषयीची माहिती आहे. जयगडावरील बालेकिल्ल्यात तीन विहिरी आहेत. पण त्या विहिरी चाळीस ते पन्नास फूट खोल आहेत. त्यामुळे त्या विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकत नाही. जयगडच्या समुद्राकाठी कातळात बांधून काढलेली इतिहासकाळातील गोड्या पाण्याची विहीर आहे. अथांग समुद्रकिनाऱ्यापाशी असलेला तो गोड्या पाण्याचा साठा म्हणजे अद्भुत चमत्कार आहे. त्या किल्ल्याच्या सपाट प्रदेशातील लोकवस्तीतील लोक कदाचित त्या पाण्याचा उपयोग करत असावेत. पूर्णगडाचा आकार छोटा आहे. पूर्णगडावर विहीर, तलाव, टाकी आढळत नाहीत ही आश्चर्यकारक बाब आहे. पाण्याची सोय गडाच्या पूर्व दरवाज्याबाहेरील विहिरीतून केलेली आहे. ती विहीर कोरडी पडलेली आढळते. पाणी नाही तेथे गड नाही हे शिवरायांचे तत्त्व होते. पूर्णगड हा त्यांच्या कारकिर्दीत बांधला गेला नसावा असे तज्ज्ञांचे मत आहे.

_baravगोपाळगडावर विहीर खोदलेली आहे. ती खोल नाही. विहिरीत उतरण्याकरता पायऱ्या आहेत. मात्र त्या विहिरीला कुंडाप्रमाणे कमी पाणी आहे. काही किल्ल्यांवर आणि मंदिरात कुंड असतात. तेथे पाणी खूपच कमी असते. त्यांचा वापर केवळ अंघोळ, हात-पाय धुण्यासाठी होतो. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लहानमोठे असे बावीस गड आहेत. सिंधुदुर्ग हा शिवरायांच्या आरमाराचा आरंभ आहे. सुमारे पन्नास एकर क्षेत्रफळ असलेल्या त्या समुद्रगडावर एक तलाव आणि साखरबाव, दहीबाव, दुधबाव या तीन विहिरी आहेत. गडावर राहणारे लोक त्या विहिरीतील पाणी वापरतात. सिंधुदुर्गापासून जवळच पद्मकोट, राजकोट, सर्जेकोट हे किल्ले जणू सिंधुदुर्गाचे थोड्या अंतरावरील पहारेकरी आहेत आणि जमिनीबरोबर सिंधुदुर्गाचा संपर्क ठेवणारे ते किल्ले म्हणजे सिंधुदुर्गाच्या संरक्षणव्यवस्थेची सर्वात बाहेरची फळी आहे असा उल्लेख प्रवीण भोसले यांनी केला आहे.
 (प्रस्तुत लेखिकेने सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली तेव्हा प्रवीण भोसले त्या किल्ल्याची व्यवस्था पाहत असत). 

– सुनिती पेंडसे 9004311115 sunitipendse21@gamail.com
(जलोपासना, दिवाळी अंक २०१३वरून उद्धृत)

About Post Author