गझलमधील दार्शनिकता महत्त्वाची!

0
28
gazal intro

कवितेला मराठीमध्ये गेल्या तीन-चार दशकांत खूपच मोठा बहर आला आहे. कवितेचे रूपही आत्मनिष्ठेकडून समाजनिष्ठेकडे वळले आहे. त्यामुळे मंचीय कविता नावाचा नवा प्रकार उदयास येऊन ठिकठिकाणी कविसंमेलने गाजवली जात आहेत. सोशल मीडियामुळे तर कवितेला पूरच आला आहे. परंतु ढोबळ अंदाजाने मराठीत तीनेकशेपर्यंत कवी कविता या ‘साहित्य’प्रकाराकडे गांभीर्याने पाहत आहेत; तसे त्याचे अनुसरण करत आहेत. कवी (आणि साहित्यिकदेखील) म्हणून व्यक्तीला नावलौकिक मिळवणे सद्यकालात दुरापास्त झाले आहे. मात्र, अनेक कवींच्या एकापासून दहापर्यंत उत्तम कविता असू शकतात. त्याच्या/तिच्या सर्व कवितांना सतत दाद मिळत राहील अशी शक्यता नसते. त्यामुळे कविता मंचावरून सादर करणे आणि तेथल्या तेथे वाहवा मिळवणे हे श्रेयस्कर मानले जाते. त्याचा एकूण काव्यनिर्मितीच्या स्वरूपावर परिणाम होत असतोच. 

याच काव्यसृष्टीतील एक प्रकार आहे, तो गझलेचा. गझलही पेश करण्यात मौज आहे असे मानले जाते. मराठी गझलेचा इतिहास माधव ज्युलियन यांच्यापासून सुरू करून सतीश दराडे, क्रांति जराडे यांच्यापर्यंत घडाघडा सांगणारे गझलकार व त्यांचे चहाते दहा-वीस सहज निघतील. त्या प्रत्येकाचे दोन-पाच चाहते कम अनुयायी असतातच. शिवाय, भीमराव पांचाळे यांच्यापासून मिलिंद भागवत- मिलिंद जोशी यांच्यापर्यंत गझल गाणारे आठ-दहा गायक आहेत. प्रत्येक नव्या-जुन्या गझलकाराला त्यांची गझल त्यांच्या तोंडून गायली जावी असे वाटत असतेच. अशा या बहुप्रसव काळात गझलेची संख्यात्मक वाढ झाली आहे आणि तीमधील प्रासादिकता कमी होत आहे अशी तक्रार सर्वत्र दिसते. त्याहून गंभीर आरोप म्हणजे गझलेची बाराखडी अथवा गझलेचे व्याकरण सांगणारे गुरू ठायी ठायी आहेत, मात्र गझलेचा आशय सघन कसा होईल आणि ती बुद्धीचा व मनाचा ठाव कसा घेईल याचा विचार होताना फारसा दिसत नाही. गझल फॉर्मचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे तंत्रावर/साधनावर सारे बोलतात. परंतु साध्य काय याची चिंता फारशी केली जात नाही. पाडगावकर छंदांमध्ये कधी चुकले नाहीत. त्यामुळे त्यांची गझल बिनचूक असते आणि तरीही ती निखळ कवितेच्या अंगाने जाऊ शकते किंवा बोरकरांनी गझल लिहिली तरी त्यांचे शब्दसौंदर्य ठासून मनात भरते. त्या दोन्ही कवींनी मराठी जागात केवढा आनंद निर्माण केला! अरुण दाते यांचे जीवन पाडगावकर यांच्या एक-दोन गाण्यांवर सजून गेले.  

अलिकडचे गझलकार हे सुरेश भट यांना गझलेचे पीठाधिपती समजतात. त्यामुळे भट यांनी सागितलेले (व त्या त्या गझलकाराने श्रवण केलेले) प्रत्येक विधान हे वेदवचनासारखे बनून गेले आहे. वास्तवात भट यांच्यादेखील समजुतीच्या मर्यादा असतील आणि गझल हा (व प्रत्येक) वाङ्मयप्रकार विकसित होत जात आहे याकडेही कोणाचे अवधान राहिलेले दिसत नाही. गझल या फॉर्मची शुद्धता जपत बसण्याऐवजी त्या प्रकारच्या नवनव्या रचनांमधून दार्शनिकता किती व्यक्त होते ही बाब महत्त्वाची मानली गेली पाहिजे.

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ला चंद्रेशखर सानेकर यांचे गझलेसंबंधीचे छोटेसे टिपण ‘फेसबुक’वर आढळले. सानेकर हे आजचे प्रमुख गझलकार. त्यांचे ते टिपण घेऊन आम्ही आणखी चार कवी-लेखक-समीक्षकांकडे गेलो; गझलवरील छोटीमोठी प्रसिद्ध-अप्रसिद्ध भाष्ये टिपली-अनुभव संग्रहित केले. ते लेखन संस्कारित करून पोर्टलवर प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये वाचकांना सदानंद डबीर, अविनाश सांगोलेकर, राम पंडित, अशी नावे आढळतील. ही चर्चा अशीच पुढे राहवी व मराठी गझल आशयगर्भतेच्या अंगाने विकसित होत राहवी असा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा हेतू आहे. त्याचबरोबर ही संधी घेऊन गझलकारांचे परिचय व त्यांच्याबाबतचे किस्से, हकिगती, भाष्य असे साहित्यही या ‘गझल’ दालनात प्रसिद्ध होत राहील.

ममता सिंधुताई सपकाळ, प्रदीप निफाडकर, श्रीकांत पेटकर, फ.म. शहाजिंदे यांचे लेखन या प्रकारात येत राहील.

– संपादक, ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’

About Post Author