कोळबांद्रे या खेडेगावातील बारा वाड्यांपैकी कुंभारवाडीने वाडीच्या पाणी पुरवठ्याचे चित्र बदलले ते प्रकाश गुंदेकर यांच्या पुढाकाराने ! वाडी बासष्ट कुटुंबांची आहे. त्या सर्वांनी पाणीपुरवठ्याच्या कल्पनेचे स्वागत व समर्थन केले. रानातील पाणी वाडीत आले ! वाडीच्या या प्रयत्नांना ‘शिवतरुण मित्र मंडळ’ कारणीभूत ठरले…
टिंबाएवढे गाव– कोळबांद्रे ! रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक सर्वसामान्य खेडे. तेथे बारा वाड्या. गावची लोकवस्ती सुमारे अकराशे. तेथे चार महिने पाऊस पाणीच पाणी बरसून जातो. त्यावर सहा महिने जातात. मात्र गाव एप्रिल-मेमध्ये कोरडेठाक पडते. सरकारी योजनेतील नळ कधीतरी पाझरतात. त्यासाठी केवढी झुंबड ! तासन् तास पाण्याची प्रतीक्षा. मग चीड, संताप, मारामाऱ्या, भांडणे ! हे चित्र दरवर्षीचे होते ! पण बारा वाड्यांपैकी कुंभारवाडीने तिचे पाणी पुरवठ्याचे चित्र बदलले !

प्रकाश गुंदेकर यांच्या पुढाकाराने ती कामगिरी घडली. त्यांनी त्यांच्या वाडीकरांना विश्वासात घेतले. चित्र बदलण्याची हाक दिली. वाडीत बासष्ट कुटुंबे आहेत. गुंदेकर यांच्या बोलण्याने वाडीकऱ्यांच्या विचारांना चालना मिळाली. मात्र विचारानुसार कृती ही गोष्ट सोपी नव्हती. पाणी दोन किलोमीटर एवढ्या लांबून आणायचे होते ! रस्ता जंगलातील होता. खर्च पंधरा लाख रुपये होता. वाडीतील माणसे मोलमजुरी करणारी. पण तीच मंडळी पाणी टंचाईचे शिवधनुष्य पेलायचेच या जिद्दीने सरसावली. आरत्या मारुतीच्या देवळात दर शनिवारी होत. तेथे मंडळींना शक्ती मिळू लागली ! बांधकाम, चर खोदण्याचे काम सगळ्यांनी श्रमदानाने करावे; पंप-पाईपच्या खर्चासाठी वर्गणी काढावी असे सगळ्यांचे ठरले आणि कुदळ-फावड्यांच्या खणखणाटाने जंगल दणाणून गेले !
दिवसा मजुरी रोजगारासाठी करायची आणि रात्री पाणीयोजनेचे गावाचे सार्वजनिक काम असे वेळापत्रक ठरले. चार गट प्रत्येकी अकरा लोकांचे तयार केले, त्यांना ठराविक अंतर नेमून दिले. कामाला सुरुवात झाली. चार हात काम झाले न झाले तोच काळ्याकभिन्न कातळाने फणा काढला ! श्रमजीवींची सत्त्वपरीक्षा ती ! तब्बल दोनशे फूट लांब, अस्ताव्यस्त पसरलेल्या त्या कातळकालियाला घामाच्या डोहात नेस्तनाबूत करण्यात सारे गावकरी कृष्ण यशस्वी झाले. गावातील तुळपुळे अॅग्रोने मोलाची मदत केली. पाच अश्वशक्तीच्या मोटारीने विहिरीत सोंड खुपसली तसे चाळीस हजार लिटर पाणी टाकीत विसावले. पाइप जमिनीच्या पोटात गडप झाले. पाच कुटुंबांसाठी एक जलस्थळ अशी चौदा जलस्थळे वाडीत सोयीस्कर ठिकाणी बांधण्यात आली. एक मोठा फिल्टर पाण्याच्या स्वच्छ-शुद्धीसाठी उभा ठाकला आणि एके दिवशी अक्षरशः डोंगरातून, जंगलातून वळणे घेत घेत त्या गंगामाईने नव्या भगीरथांच्या अंगणात प्रवेश केला ! वाडीत आनंदीआनंद फुगड्या घालू लागला ! तुळपुळे अॅग्रो या गावातीलच कंपनीने या पाणीयोजनेसाठी फिल्टर दिला; इतरही आर्थिक मदत केली आहे. त्यांचे कार्य गावात चालूच आहे.

प्रकाश गुंदेकर हे धडाडीचे व्यक्तिमत्त्व आहे. तेच वाडी मंडळाचे अध्यक्ष आहेत. ग्रामस्थ वीसेक वर्षांपूर्वी एकत्र आले असता पाणी समस्या चर्चेला पुढे आली. आताची योजना गुंदेकर यांच्याच मुख्य कल्पनेतून साकारली आहे. ग्रामस्थांनी जोरात तिला पुष्टी दिली. मुंबईकर ग्रामस्थांनीही प्रकाश शिवणकर यांच्या पुढाकाराने एकत्र येऊन गावच्या योजनेस साह्य केले. मंडळाच्या अनेक योजना, कामे मार्गी लावणे, पाठपुरावा करणे हे गुंदेकर यांचे मुख्य काम. ते त्याच उत्साहाने सतत काम करत आले आहेत. वाडीतील ‘शिवतरूण मित्र मंडळ’ अनेक उपक्रम राबवते. शेतकरी मेळावे, आरोग्य शिबिरे, मुलांसाठी कार्यक्रम मंडळातर्फे घेतले जातात. मंडळ स्मशानभूमी स्वच्छता, पाणवठे सफाई असे उपक्रम श्रमदानातून यशस्वी करते. क्रीडास्पर्धा, नाटक, एकांकिका याही गोष्टी केल्या जातात. मंडळाकडे स्वतःची अँब्युलन्स होती.

वाडीने गंगामाईच्या व्यवस्थेसाठी पगारी माणूस ठेवला आहे. पाणी सकाळी साडेसात वाजता येते. पाणी सांडलोट न करता, भांडणे न होता घरोघरी भरले जाते. पाणी पाऊण तासाने बंद होते. पाणी पुरवठ्याच्या वेळेत शेतीच्या कामानुसार बदलही होतो. पाण्याचा कार्यक्षम वापर ही वाडीची जलसाक्षरता नव्हे, तर ‘जलपदवी’च ठरली आहे !
वाडीने आणखी एक गोष्ट केली. वाडीतील विद्युत खांबांवर ट्यूब्ज बसवल्या आहेत. त्यांचे कनेक्शन जवळच्या घरातून दिले आहे. अंधार पडल्यावर घरमालक ट्युबलाईट लावतो, सकाळ होताच बंद करतो. वाडी कडून त्याला वीजखर्चासाठी दरमहा दहा रुपये मिळतात. वायकर ग्रूपने मदत करून वाडीत सतरा ठिकाणी स्वखर्चाने ट्युबलाईट दिल्या आहेत. त्याबरोबर तेथे वीज साक्षरता सुद्धा आली आहे !
वायकर कुटुंबीयांमधूनच ‘वायकर ग्रूप’ तयार झाला. त्यांनी रस्त्यांवरील दिवे लावण्यास मोठी मदत केली.
त्यामागील कथा मोठी रंजक आहे. ‘वायकर’ कुटुंबातील एक ग्रहस्थ पहाटे गावाच्या थांब्यावर मुंबई बसने उतरले. ती वीसेक वर्षांपूर्वीची घटना. पण त्यांना घरी जाण्याची वाट सापडेना ! हातात बॅटरी होती, तरी रस्ता दिसेना. दिवस उजाडण्याची वाट पहावी लागली. हा प्रकार कळल्यावर सारे वायकर एकत्र जमले आणि त्यांनी निधी उभारून ‘स्ट्रीट लाईट’चे ‘पथदर्शी’ कार्य केले !
वाडीच्या एकीला ‘शिवतरूण मित्र मंडळ’ असे नाव देऊन रजिस्ट्रेशन केले आहे. मंडळ वाडीतील लग्नकार्य करून देते. त्या दिवशी वाडीतील झाडून सारे उपस्थित राहतात. गणेश विसर्जन एकत्र होते. मयत उचलणे आणि दिवस कार्य यासाठी मंडळाचा हातभार असतो. सुखात आणि दुःखात एकमेकाला साथ देणारे हे खरेखुरे ‘मित्र’मंडळ आहे. सगळे वाडीकर आरतीला दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता जमतात. तेथे हनुमंताचे आणि गोरोबा यांचे मंदिर नव्याने बांधले आहे.
प्रकाश गुंदेकर :-9270153702.
– विनायक नारायण बाळ 9423296082 vinayak.bal62@gmail.com
————————————————————————————————————————————