ख्रिस्ताने मोशेच्या (मोझेसच्या) देवाने दिलेल्या सर्व आज्ञा रद्दबादल केल्या, कारण मोशेच्या देवाच्या धार्मिक आज्ञा या नकारात्मक होत्या – हे करू नका, ते करू नका. दहा आज्ञांपैकी आठ आज्ञा अशा नकारात्मक आहेत. उदाहरणार्थ – मूर्तिपूजा करू नका, कोणाचा जीव घेऊ नका, खोटी साक्ष देऊ नका, लोभ धरू नका इत्यादी. म्हणजेच धर्माचा ऐंशी टक्के आधार नकारात्मक आहे – तर धर्माचा वीस टक्के आधार म्हणजे दोन आज्ञा, आईवडिलांना मान द्या व रविवार पवित्र पाळा या दोन्ही आज्ञा निसर्गनियमाच्या प्रक्रियेशी विसंगत आहेत. (मोझेस हा बायबलमध्ये वर्णन केलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता संबोधला जातो. तो ज्यू धर्मातील प्रेषितांमध्ये प्रमुख आहे. इजिप्तमध्ये फेरो राजाचे राज्य होते. त्यावेळी तेथे ज्यू लोकांची संख्या जास्त होती. ज्यू कष्टाळू असल्याने फेरो राजाला ते परके आहेत, आपले राज्य बळकावतील अशी भीती वाटत होती. म्हणून तो ज्यू बाळंतिणीच्या पोटी जर मुलगा जन्माला आला तर नदीत फेकत असे; मुलगी जन्मली तर तिला वाचवत असे. एका बाईने गुपचूप स्वतःच्या मुलाला कसेबसे तीन महिने वाढवले. त्यानंतरचा सांभाळ तिला असह्य झाल्याने तिने त्याला नदीकिनारी एका पेटाऱ्यात ठेवले. त्या पेटाऱ्याला डांबर फासून गवतात लपवले. नदीकिनारी राजकुमारी अंघोळीला गेली असता, तिला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. तो आवाज पेटाऱ्यातून येत होता. तिने त्या गोंडस बाळाला घेऊन त्याचे नाव मोझेस ठेवले. पुढे, त्याला देवाचा साक्षात्कार झाला. देवाने त्याला ‘मी ज्यू लोकांचा देव असून तू माझा प्रेषित आहेस. लोकांना त्याबद्दल सांग’ असे सांगितले. देवाने त्याला दहा प्रतिज्ञा दिल्या. त्या प्रतिज्ञांमध्ये लोभ, चोरी, स्वार्थ टाळून सेवाभाव करणे हा उद्देश होता. पुढे, त्याने ज्यू लोकांना फेरो राजाच्या गुलामगिरीतून मुक्त केले. इस्लामातही मोझेसला प्रेषित मानले आहे).
मुले जन्माला आल्यापासून वयात येईपर्यंत आणि स्वतंत्रपणे विचार करू लागल्यावरसुद्धा, अपवाद वगळला, तर आईवडिलांशी प्रेमाने वागतात आणि त्यांना तीर्थरूप म्हणून मान देतात. हे जे नैसर्गिक आहे ती देवाची आज्ञा म्हणून सांगणे हे विचित्र नाही का? ते विचित्र आहे एवढेच नव्हे तर, ती आज्ञा निव्वळ प्रेमाच्या कल्पनेशीदेखील विसंगत आहे. म्हणून ख्रिस्ताने ती आज्ञाही नाकारली आहे. ख्रिस्त मत्तय (मत्तय म्हणजे चांगली शिकवण देणारा ग्रंथ. ज्यात ख्रिस्ताने दिलेले शुभ वार्तांकन अध्यायानुसार लिहिले आहेत.) 10:35-36 मध्ये सांगतो, ‘एखाद्याला त्याच्या बापाविरूद्ध, लेकीला आईविरूद्ध आणि सुनेला सासूविरूद्ध उठवण्यास मी आहे. एवढेच नव्हे तर मी मनुष्य त्याच्या आईवडिलांना सोडून त्याच्या पत्नीला धरून राहील असेही बजावतो (पाहा, मार्क 10-8).’ दुसरी आज्ञा – ‘रविवार पवित्र पाळ’- दिवस व रात्र कसे होतात ते मनुष्याला माहीत आहे. पृथ्वी स्थिर असलेल्या सूर्याभोवती फिरते आणि ती सूर्याभोवती फिरत असताना स्वतःभोवती फिरत असते. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ म्हणजे अंदाजे चोवीस तास म्हणजे एक दिवसरात्र; तसेच, पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास एक वर्षाचा काळ लागतो. म्हणजेच दिवस हा निसर्गाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे एक दिवस पवित्र आणि दुसरे दिवस अपवित्र असा भेदभाव हे अज्ञानपणाचे आहे. अमूक दिवस शुभ तर अमूक दिवस अशुभ सांगणे किंवा मानणे हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे.
ख्रिस्ताने विवेकी विचार केला आणि मोशेच्या देवाच्या आज्ञा मोडीत काढण्याचे ठरवले. परंतु लोकांचा देवावरील विश्वास हा मोठा अडथळा त्याच्यापुढे होता. त्याला वाटले, देवाच्या आज्ञा नकारात्मक आहेत, निसर्गाच्या विरूद्ध आहेत असे सांगितले, तर तो देवाच्या विरूद्ध आहे, नास्तिक आहे असे लोकांना वाटेल. शिवाय, माणसे तो जे सांगेल किंवा शिकवेल ते स्वीकारणार नाहीत. कारण ख्रिस्ताने जाणले होते/ओळखले होते, की
मोशेचे धर्मशास्त्र कोणाचा जीव घेऊ नका ही देवाची आज्ञा आहे असे सांगते. तरी लोक व्यभिचारी स्त्रीला दगडमार करावा असे ओरडून सांगतात आणि ख्रिस्ताला विचारतात, “तुमचे म्हणणे काय आहे?” प्रसंग छोटा एका बाईपुरता मर्यादित, पण पेच प्रचंड आवाक्याचा. ख्रिस्ताने त्या प्रचंड आवाक्यातून मार्ग काढण्यासाठी काय केले? ख्रिस्ताने शांतपणे खाली बसून विवेकी विचार केला आणि एवढेच सुचवले, की तुमच्यातील निष्पाप असेल, त्याने प्रथम तिला दगड मारावा. सगळे दगडबहाद्दर/धर्मवीर हळूहळू लुप्त झाले.
एका श्रीमंत व्यक्तीने ख्रिस्ताला विचारले, “मी काय केले म्हणजे मला स्वर्गराज्यात प्रवेश मिळेल?” ख्रिस्ताने त्याला ‘तुझे सर्व वैभव सोडून माझ्या मागे ये’ असे सांगितले. पण त्याला ते जमले नाही. कारण त्याची मिळकत व वैभव फार होते. स्वर्गराज्यापेक्षा त्याचे प्रेम त्या मिळकतीवर जास्त होते. (मत्तय 19:16-23) ख्रिस्ताने त्या प्रसंगीसुद्धा मोझेसच्या आज्ञांचा आधार घेतला नाही. कारण ख्रिस्ताला माहीत होते, की लोक देवाची पूजा करतील, पण त्याच्या आज्ञा कधी पाळणार नाहीत. कारण त्या आज्ञांचा भंग केला, तरी त्यांना शिक्षा करणारा असा देव कोणी नाही.
दुसऱ्या एका प्रसंगी एक शास्त्री ख्रिस्ताची परीक्षा पाहण्याच्या हेतूने म्हणाला, “गुरुवर्य, अनंत जीवन मिळण्यासाठी काय करावे?” ख्रिस्त त्याला सांगतो, “‘धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, तू जसे स्वतःवर प्रेम करतोस तसे शेजाऱ्यावर प्रेम कर.’ पण त्याने ख्रिस्ताला पेचात पकडण्यासाठी विचारले, ‘माझा शेजारी म्हणजे कोण?’ ख्रिस्ताने चांगल्या समारियनचा (चांगले व्यवहार करणारे धर्मगुरूंचे दाखले) दाखला देऊन, जो संकटात आहे तो तुझा शेजारी हे दाखवून दिले ( लुक 10: 25-37).
एका शास्त्रीने येशूला सवाल टाकला, ‘सर्वात महान (सर्वश्रेष्ठ) आज्ञा कोणती हो?’ येशू त्याला म्हणाले, “तू तुझा देव प्रभू याच्यावर अगदी अंत:करणापासून, अगदी जिवाभावाने आणि मनापासून प्रेम कर. ती सर्वश्रेष्ठ आणि पहिली आज्ञा आहे. दुसरी तिच्यासारखीच. ती म्हणजे तू स्वतःवर प्रेम करतोस; तसेच, शेजाऱ्यावरही कर. सारे धर्मशास्त्र या दोन आज्ञांवर आधारलेले आहे. ‘स्वतःवर प्रेम करतोस; तसेच, शेजाऱ्यावरही कर’ याच्यापेक्षा अधिक महत्त्वाची अशी कोणतीही दुसरी आज्ञा नाही.” (मत्तय 22:38-40, मार्क 12:28-39).
ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानाद्वारे सर्व जुन्या कराराची, म्हणजेच देवाच्या आज्ञांप्रमाणे वागण्याची सूचना करतो. म्हणजे त्याच्या नकारात्मक आज्ञा पाळण्याचा सारांश एका नव्या सकारात्मक आज्ञेमध्ये करतो. ‘मी तुम्हाला आज एक नवी आज्ञा देत आहे. एकमेकांवर प्रेम करा. मी जसे तुमच्यावर प्रेम केले; तसेच, तुम्हीदेखील एकमेकांवर प्रेम करा. तुमचे एकमेकांवर प्रेम असेल तरच तुम्ही माझे शिष्य आहात हे सर्वांना पटेल. विशेष म्हणजे ख्रिस्ताने शिष्याचे पाय धुण्याचा प्रसंग केल्यानंतर ती नवी आज्ञा शिष्यांना सांगितली (योहान 13:12-35). “जसे स्वतःवर प्रेम करता तसे तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा. फक्त एवढेच करा, तुम्हाला दहा आज्ञा पाळण्याची काही गरज नाही. देवाची भीती बाळगण्याची जरूरी राहणार नाही.” – ख्रिस्त ही नवी आज्ञा देऊन सर्व धर्मशास्त्र बाजूला सारत आहे. कारण या नव्या आज्ञेत सर्व काही आहे. ख्रिस्त हा एक मानवी सूर्य आहे हे त्या आज्ञेवरून स्पष्ट दिसते.
येशू ख्रिस्ताची शिकवण तत्कालीन राष्ट्रीय धर्म आणि राष्ट्रीयत्व नष्ट करणारी आहे असे ज्यू लोकांना (सनातन्यांना) जाणवले. त्याच वेळी, त्यांना त्यांचे खंडन करणे जमत नव्हते किंवा करणे शक्य नव्हते. म्हणूनच, ख्रिस्त हा सनातन्यांना त्रासदायक वाटत होता. त्याचकरता त्यांनी त्याला ठार करण्याचे ठरवले व योजनाबद्ध पद्धतीने ठार केले. आजही तसे सनातनी समूह समाजात आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर. गोविंद पानसरे, साहित्यिक कलबुर्गी अशा सुधारणावाद्यांचे खून पाडले जातात, हा त्याचा पुरावा आहे. ख्रिस्त जेव्हा म्हणतो, मीच ‘सत्य, जीवन व मार्ग आहे किंवा मीच पिता, पुत्र व पवित्र आत्मा आहे किंवा ते तिघे एकच आहेत, तेव्हा ख्रिस्त हा या जगातील मानवासाठी मानवतेचा संदेश देणारा सूर्य आहे हे स्पष्ट होते. ख्रिस्ताच्या शिकवणुकीचे संपूर्ण तत्त्वज्ञान व सार सूर्य, सूर्याचा प्रकाश आणि सूर्याची उष्णता म्हणजे एक नैसर्गिक त्रैक्य आहे. त्या त्रैक्यात ते संपूर्ण तत्त्वज्ञान व सार सामावलेले आहे.
माणूस स्वर्गराज्याची संकल्पना किंवा स्वर्गराज्याचा अनुभव दया व क्षमा या कृतीद्वारे कसा घेऊ शकतो यांची बोधकथा (मत्तय 1822 ते 35 मध्ये) सांगितलेली आहे. ती स्वर्गराज्य ही संकल्पना माणूस या पृथ्वीवर जीवन जगतो तेथेच आहे याला दुजोरा देते. ‘मला यज्ञ नको, दया हवी आहे.’ (मत्तय १२:६-७). ख्रिस्त पुढे सांगतो, ‘मंदिरापेक्षाही श्रेष्ठ असे काहीतरी येथे आहे हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला स्वर्गाचे राज्य फक्त ही एक आज्ञा पाळण्याने मिळेल व तुम्ही जेथे आहात तेथे स्वर्गराज्य अनुभवाल, कारण स्वर्गराज्य तुमच्यामध्ये आहे. ते येथे, तेथे, कोठेच नाही. तुमचे स्वर्गराज्य किंवा तुमचे शाश्वत जीवन तुम्ही तुमच्या बंधूवर तुमच्याप्रमाणे प्रेम करून प्राप्त करू शकता. त्यासाठी प्रार्थनेची गरज नाही. कुंसाराची (कन्फेशन) गरज नाही. कारण तुमच्याकडून अन्याय्य (वाईट पाप) असे काही घडणार नाही. तुम्हाला मिस्सा (उपासना/प्रार्थना) ऐकण्याची, देण्याची मुळीच गरज नाही. तुम्हाला दानपेटीत पैसे टाकण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही माणसांनी ही एकमेव अशी आज्ञा पाळल्याने तुम्ही आपोआप स्वर्गराज्याचे धनी याच जीवनात होणार आहात. म्हणून काही करू नका, फक्त आज्ञा पाळा. ‘पाळाल का?’ ख्रिस्त माणसाला सूर्य होण्यास बोलावत आहे; ते त्याचे स्वर्गीय पाचारण आहे.
– अतुल आल्मेडा ९६७३८८१९८२
atulalmeida@yahoo.co.in
(‘जनपरिवार’वरून उदृत संपादित-संस्कारित)