खिडकीतून दिसणारे मोकळे आकाश

4
33
_KhidkitunDisnare_MokleAakash_1_0.jpg

आकाश तोरणे नावाचा शिवाई शाळेत शिकणारा मुलगा. आकाशचे घर रस्त्याच्या बाजूला लहानशा झोपडीत होते. त्याच्या घरी मोठी बहीण होती, ती शिकत नव्हती. आई घरकाम करायची; आकाशचे वडील वारले होते. आई काळजीने सांगत होती, ‘मॅडम, आकाश अभ्यास करत नाही. नुसती मस्ती करतो. त्याने त्याचा चष्मा पण मस्ती करून तोडून टाकला आहे. तो ऐकतच नाही.’

मी त्यांचे बोलणे ऐकत होते, आकाश नुसता हसून पाहत होता. त्याला काय कळत होते कोणास ठाऊक? आकाश मग प्रत्येक शिबिराच्या वेळेला भेटायचा. आम्ही शिबिरे घेत असताना, एक गोष्ट आमच्या लक्षात आली होती. ती म्हणजे आकाश हुशार व चुणचुणीत मुलगा आहे. त्याला अभ्यासात कमी मार्क मिळण्याचे कारण, तो त्यात तितके लक्ष देत नसणार. पण त्याची चित्रकला अतिशय छान होती. तो अप्रतिम चित्र सहजरीत्या काढायचा! आम्ही त्याच्या शाळेमध्ये एकदा चित्रकला स्पर्धा ठेवली होती. मला खात्री होती, की आकाशला पहिले बक्षिस मिळणार. कारण त्याच्या वयोगटामध्ये त्याच्या आसपास चित्र काढणारादेखील कोणी त्या शाळेत नव्हता आणि खरेच, आकाशने त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम चित्र काढले. तो तेव्हा सहावीत होता. त्याने लालबागचा राजा अगदी हुबेहूब, रेखीव असा साकारला होता. दुस-या मुलांची चित्रे त्यांच्या वयाला साजेशी होती -घर, निसर्ग, पक्षी वगैरे वगैरे. पण चित्रकलेच्या बार्इंनी स्पर्धेत आकाशला तिसरा क्रमांक दिला. मी चित्रकला स्पर्धेची आयोजक होते; परीक्षक नव्हे, पण तरीही मी त्या बार्इंना न राहवून विचारले, की हे चित्र इतके अप्रतिम आहे. याच्या बरोबरीचेदेखील दुस-या कोणाचे चित्र नाही. मग तुम्ही आकाशला तिसरा नंबर का बरे दिला?’ त्यावर त्या शांतपणे म्हणाल्या, ‘मॅडम, त्याने चित्र काढण्यास ठरलेल्या वेळेपेक्षा दहा मिनिटे जास्त घेतली. मग त्याला पहिला क्रमांक देता येत नाही.’

_KhidkitunDisnare_MokleAakash_2.jpgत्यांचे बोलणे नियमानुसार होते. मी त्यावर काही बोलले नाही. अनुभवाने मला ठाऊक होते, की हे साच्यातील विचार असे सांगून बदलणार नाहीत.

नंतर काही महिन्यांनी, आमच्या सहकारी डॉ. शुभांगी दातार यांनी मला सांगितले, की ”ठाण्यामध्ये ‘रोटरी क्लब’तर्फे चित्रकला स्पर्धा प्रसिद्ध चित्रकार शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. विविध शाळा त्यांत भाग घेणार आहेत. आपण आकाशला तेथे पाठवुया.” मला फार आनंद वाटला. खात्री होती, की आकाश तेथे चमकणार! आम्ही आकाश व त्याच्याबरोबर अजून दोन मुलांना त्या चित्रकला स्पर्धेसाठी पाठवले. रविवारची ती सकाळ होती. मी स्वत: त्या मुलांना घेऊन ठरलेल्या ठिकाणी गेले. अनेक शाळांतील मुले तेथे आलेली होती. आकाश व त्याच्या बरोबरची आम्ही नेलेली दोन मुले त्या वातावरणात संकोचून गेली होती. पण शैलेश साळवी यांनी सुरुवातीलाच सर्व मुलांशी बोलून त्यांना ‘कम्फर्ट लेवल’ला आणले. काही मोठमोठे डॉक्टर, रोटरी क्लबचे सन्माननीय सदस्य, सर्व तेथे आले होते.

मी संध्याकाळी साधारण चार वाजता पुन्हा तेथे गेले आणि बघते तर काय! सर्व मुलांनी त्यांना दिलेल्या भिंतींवर अप्रतिम चित्रे काढली होती. साळवीसर हसत हसत माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, “मॅडम, खूप छान झाले, की या मुलाला घेऊन तुम्ही येथे आलात. त्याच्यामध्ये मोठा कलाकार दडलेला आहे. त्याच्या वयाचा मुलगा एवढे सुंदर चित्र काढू शकला याचे मला आश्चर्यच वाटले! त्याने माझ्यासमोर जर हे चित्र काढले नसते तर ते मला खरे वाटले नसते.”

मला फार आनंद झाला. मी जिंकले होते! मुलांमधील काय अचूक हेरावे हे जाणण्यासाठी त्या क्षेत्राची माहिती असणे हे आवश्यक नसते. आवश्यक असते ती जाणणारी नजर आणि जाणीव. ते मला त्या दिवशी प्रकर्षाने कळून आले.

त्यानंतर साळवीसरांनी आकाशला फी न आकारता त्यांचा विद्यार्थी करून घेतले. रोटरी क्लबच्या एक सदस्य नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. लता घनशामनानी यांनी आकाशचे डोळे विनामूल्य तपासून त्याला आवडलेल्या फ्रेमचा चष्मा बनवून दिला. आकाशने त्याचा चष्मा मस्ती करून तोडला असल्यामुळे तोपर्यंत त्याच्याकडे धड चष्मादेखील  नव्हता.

_KhidkitunDisnare_MokleAakash_3.jpgत्या दिवसापासून आकाशचा आत्मविश्वास वाढला. त्याला कोणी कोठले लेक्चर दिले नव्हते, की ‘अमुक कर, तमुक कर, असंच कर’ असे काही सांगितले नव्हते. पण त्याच्याकडे नैसर्गिक रीत्या जी कला होती; तो जी अप्रतिम चित्रे काढत होता, त्या कलेचे कौतुक झाले होते. आकाशला त्याची स्वत:ची ओळख मिळाली होती! त्याची बाहेरच्या जगाकडे बघण्याची खिडकी विस्तीर्ण झाली होती आणि बाहेरचे ‘मोकळे आकाश’ त्याला खुणावू लागले होते.

आकाशने दहावी पास झाल्यावर, रिझल्ट लागल्या लागल्या मला फोन केला, “मॅडम, मला ऐंशी टक्के गुण मिळाले. मला पुढे खूप शिकायचे आहे. मी तुम्हाला पहिला फोन लावला.” आकाशची ती काही वर्षें एका झटक्यात माझ्या डोळ्यांसमोर येऊन गेली. मी त्याला काय दिले होते. ना पैसे, ना काही महागड्या भेटी! मी फक्त त्याला त्याची स्वत:ची ओळख तयार करण्यामध्ये हातभार लावला होता. आकाशने मात्र मला भरभरून समाधान दिले आहे. आकाशची आई फोनवर माझ्याशी बोलत होती, “मॅडम, आकाश आता चित्रेसुद्धा काढतो आणि अभ्यासपण करतो. त्याची परीक्षा होती ना, त्याच्याच आधी मी ज्यांच्या घरी काम करते त्या बाई त्यांचे घर सजवत होत्या. तेव्हा त्यांनी आकाशला एका भिंतीवर चित्र काढण्यास सांगितले होते. त्या पैसे देणार होत्या. पण मी त्यांना सांगितले, ‘परीक्षा झाल्यावर आकाश चित्र काढेल. आता नाही. नाहीतर आमच्या मॅडम रागावतील. आकाशने अभ्यास सोडून परीक्षा गमावली तरी मॅडमना आवडणार नाही.” मला आईचे शब्द ऐकताना आनंद वाटला. आकाशच्या आईला तिच्या मुलाच्या प्रगतीचे महत्त्व कळले होते. तिला तिच्या मुलाने केवळ चित्रांतून पैसे कमावत न बसता मेहनत घेऊन शिकावे याची जाणीव झाली होती.

– शिल्पा खेर

khersj@rediffmail.com

About Post Author

4 COMMENTS

  1. शिल्पाताई आपले अभिनंदन आपण…
    शिल्पाताई आपले अभिनंदन आपण आकाश मधील कलाकार हेरून त्यास योग्य मार्ग दाखवलात.आयूष्यात योग्य मार्गदर्शक लाभणे हे फार कमी घडते

  2. आपण अतिशय अवघड पण फार आवश्यक…
    आपण अतिशय अवघड पण फार आवश्यक काम करत आहात. आपले अनुभव आणखी लिहिते करा.

Comments are closed.