दिवाळीतील आनंदाचा एक भाग म्हणजे एकाच वेळी खाण्यासाठी उपलब्ध होत असलेले आठ-नऊ प्रकारचे खमंग, तिखट व गोड पदार्थ बनवले किंवा विकत आणले जातात. त्या पदार्थ समूहाला दिवाळीचा ‘फराळ’ असे थाटाने आणि मानाने म्हटले जाते. मला फराळ प्रत्यक्ष खाण्यापेक्षा फराळाच्या पदार्थांनी ओसंडून वाहणारी दुकाने आणि दिवाळीपूर्वी घराघरांतून येणारे भाजणीचे आणि तळणीचे तिखटमधुर वास अधिक आवडतात. पहिला पदार्थ म्हणजे आमच्या घरच्या विदर्भातील चकल्या. आमच्या घरी दिवाळीसाठी म्हणून चिवडा, दोनतीन प्रकारचे लाडू, शंकरपाळी, करंज्या वगैरे अगोदर करून ठेवतात, पण चकल्या मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ताज्या करतात...