खडीगंमत आणि दंडार

0
89
विदर्भाच्या प्राचीन लोककलांमध्ये ‘खडीगंमत’ या प्रकाराचा समावेश होतो.
विदर्भाच्या प्राचीन लोककलांमध्ये ‘खडीगंमत’ या प्रकाराचा समावेश होतो.

खडीगंमत हे लोकनाट्य विदर्भातील नागपूर , बुलढाणा जिल्ह्यांपासून पूर्वेकडील गोंदिया जिल्ह्यापर्यंत सादर केले जाते. विदर्भाच्या प्राचीन लोककलांमध्ये ‘खडीगंमत’ याप्रकाराचा समावेश होतो. दंडार हादेखील लोकनाट्याचा प्रकार आहे. डफगाणे हे मूळ लोकनाट्य. ते बाराव्या शतकात प्रचलित होते. त्याचे प्रथम ‘खरी गंमत’ व नंतर ‘खडीगंमत’ असे नामांतर होत गेले. महाराष्ट्रात मुसलमानी स्वा-यांच्या काळात ‘खडीगंमत’ या लोकनाट्याचे सादरीकरण होऊन नंतर त्याचे ‘तमाशा’ हे रूपांतर झाले.
 

हातात डफ घेऊन खड्या आवाजात गायन करणारा हरहुन्नरी शाहीर हे त्या नाट्यातील प्रमुख पात्र असते. त्याच्या सोबतीला मनोरंजन करणारा गमत्या असतो. शिवाय, नखरेबाज नाच्या असतो. तो स्त्रीवेशधारी गोंडस मुलगा असतो. त्याचे ‘लमडा’ हे झाडीबोली तील नाव आहे. सोबत, ढोलकी वाजवणारा असला की ‘खडीगंमत’ उभी राहते. खडी हा हिंदी शब्द आहे. रात्री दहा वाजता सुरू होणारी ‘खडीगंमत’ सूर्योदयापर्यंत चालते. एवढा प्रदीर्घ काळ ‘गंमत’ सादर करणारी मंडळी रात्रभर उभी असतात.
 

पुरुषाने स्त्रीचा वेश धारण करणे ही ‘खडी’ची ‘गंमती’दार प्रथा. गण झाल्यावर गोपिका व कृष्ण यांच्या संबंधांवर आधारित गवळण सादर होते. ते लोकनाट्य त्यांच्या त्यांच्या बोलीत सादर करणारे कलावंत काही वेळा हिंदी भाषेचादेखील उपयोग करतात. ती हिंदी मुळात ‘खडीबोली’ असते. व-हाडी, नागपुरी व झाडी या तिन्ही बोलींचे ‘खडीबोली’शी सख्य आहे. कमीत कमी पात्रांमध्ये आणि कमीत कमी वाद्यांचा वापर करून ‘खडीगंमत’ सादर केली जाते.
 

गवळणीत नाच्याला वाव असतो. तो त्याच्या विविध विभ्रमांतून प्रेक्षकांना आकर्षित करतो. मथुरेला जाणार्‍या गवळणी आणि पेंद्या व त्यांना अडवणारा श्रीकृष्ण हा विषय महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या भारताला प्रिय आहे. लिखित संहिता नसल्यामुळे स्थानिक झाडीबोलीतील उत्स्फूर्त संवादांनी श्रोत्यांना रिझवले जाते. तेथे पूर्वरंग संपतो.

उत्तररंगात लावण्यांचे विविध प्रकार वापरून त्यांच्यानुसार सर्व पात्रे बतावणी सादर करत असतात. शाहीर, गमत्या व नाचे अभिनयाचा आविष्कार करून, स्थानिक बोलीचा वापर करत प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याची संधी घेत असतात. कधीकधी प्रेक्षकांच्या फर्माइशीलाही महत्त्व देण्यात येते, सवाल-जबाब असतात. चार ओळींचा दोहा, जबाबी दोहा, झगडा, जबाबी झगडा हे अन्य प्रकार असतात. ‘खडीगंमत’ गद्याला अत्यल्प स्थान देते. त्यात सारे गायनातून व्यक्त केले जाते.

दंडार

दंडार हे कोकणातील ‘नमन-खेळे’ या कलाप्रकाराशी साम्य् दर्शवते.दंडार हे विदर्भाचे प्राचीन लोकनाट्य आहे. ते मुळात ‘कृषिनृत्य’ होते. ‘दंड’ म्हणजे शेत आणि ‘डार’ म्हणजे डहाळी, शेतात पडलेली उत्पन्नाची-धान्याची रास पाहून आनंदी झालेला शेतकरी आंब्याच्या पाच-सहा डहाळ्या तोडतो आणि आपल्या गडीमित्रांसोबत नाचायला लागतो, ही दंडारची मूळ संकल्पना असावी. नंतर, काळानुरूप तिच्यात बदल होत गेले. केवळ नृत्यावर जेव्हा समाधान झाले नाही तेव्हा त्यात पौराणिक प्रसंगांचे प्रवेश आले आणि त्यामुळे ‘दंडार’चा पसारा वाढू लागला. दंडारनाट्य आरंभी सात-आठ नर्तक आणि मागील चार-पाच झिलकरी यांच्या आधारावर उभे राही. पण नंतर दंडार उपलब्ध पात्रांच्या संख्येनुसार त्यांतील पात्रांची गरज वाढू-घटू लागली. शिवाय, भरजरी पोशाख, कलात्मक रंगमंच आणि अनेक द्दश्यांचे पडदे असलेले नेपथ्य यांचाही बडेजाव वाढला.
 

‘खडी दंडार’ आणि बसून केलेली दंडार ‘बैठी दंडार’ या दोन्‍ही प्रकारांमध्‍ये ‘पोवाडा’ या रचनाप्रकाराला महत्त्वाचे स्‍थान असते. दंडार हे कोकणातील ‘नमन-खेळे’ या कलाप्रकाराशी साम्‍य दर्शवते.

सुरेश चव्हाण

सी/१०, ‘अक्षय’
अपनाघर, अंधेरी (प.)
मुंबई – ४०००५३.
9867492406
sureshkchavan@gmail.com

About Post Author

Previous articleखडीगंमत
Next articleहेमाडपंती स्थापत्यशैली
सुरेश चव्हाण यांनी एम ए मराठीचे शिक्षण घेतले आहे. ते चाळीस वर्षे मुक्त पत्रकार आहेत. ते रिझर्व बँकेत कार्यरत होते. त्यांनी नाट्य समीक्षक, संशोधक, परीक्षक म्हणून कार्य केले आहे. त्यांनी ‘नमन-खेळे’ या लोककलेवर संशोधन करून नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन केले. त्यांनी ‘देवदासी’ विषयावर यल्लमाच्या दासी हा व अन्य सामाजिक महत्त्वाच्या विषयांवर माहितीपट तयार केले आहेत. ते मुंबईतील ‘ग्रंथाली’ आणि ‘प्रभात चित्र मंडळ’ आणि कोसबाडची ‘नूतन बाल शिक्षण’ या संस्थांशी संलग्न आहेत.