क-हाड नगरीचे ग्रामदैवत: श्री कृष्णाबाई

1
199
carasole

कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमाने पुनित झालेल्या कराड नगरीचे नाव भारतात अनेक दृष्टींनी प्रसिद्ध आहे. नगरीला तिन्ही बाजूंनी कृष्णा व कोयना या नद्यांनी वेढलेले आहे. या नद्यांच्यामुळे कराड नगरी व तिच्या सभोवतालचा परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे. कराड परिसरात तीन बलाढ्य सहकारी व एक खाजगी साखर कारखाना डौलाने उभे आहेत. कराड नगरी उद्योग, व्यवसाय, शिक्षण, संस्कृती, सहकार इत्यादी सर्व गोष्टींत आघाडीवर आहे.
 

कराड नगरीचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील ग्रामदैवत श्री कृष्णाबाई. तिच्या प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजर्‍या होणार्‍या उत्सवाबाबत आख्यायिका अशी आहे, की शिवाजी महाराज यांच्यावर अफजलखानाने स्वारी योजली होती. अफजलखान त्याच्या बलाढ्य सैन्यासह चालून आला होता. परिसरातील लोक-माणसांमध्ये काळजी होती. तेव्हा वाईच्या ब्राह्मण समाजाने कृष्णाबाईला साकडे घातले, की ‘महाराजांवरील संकट टळू दे, आम्ही तुझा उत्सव चालू करू!’  
 

अफजलखान जावळीत आला आणि तो ऐतिहासिक मुकाबला झाला. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला व महाराजांवरचे संकट टळले. त्या वेळेपासून वाईमध्ये कृष्णाबाईचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला. नंतर तो कराड नगरीमध्ये सुद्धा साजरा होऊ लागला. उत्सवाला तीनशेहून अधिक वर्षांची ऐतिहासिक परंपरा तयार झाली आहे.
 

कृष्णाबाईच्या मूर्तीबद्दल आख्यायिका सांगितली जाते, ती अशी, की चाफळचे बाजिपंत करकरे यांनी कोकणात बसवण्यासाठी पांढ-या पाषाणाची देवीची मूर्ती उत्तर हिंदुस्थानातून करवून आणली होती, पण त्यांच्या पत्नीला ‘ही मूर्ती कृष्णाकाठी स्थापन करावी व कराडच्या अंताजी बहिरव यांच्या स्वाधीन करावी’ असा दृष्टांत झाला. म्हणून त्यांनी कराडला कृष्णाकाठी झोपडीवजा जागेत देवीची स्थापना केली आणि व्यवस्थेची जबाबदारी अंताजी बहिरव आवटे यांच्या स्वाधीन केली. भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या पत्नी राजसबाई या विटे येथे राहत. त्यांच्याकडे कामासाठी आलेला गुजराथी ब्राह्मण निपुत्रिक मरण पावला. त्यामुळे त्याच्या बेवारशी तीन हजार रुपयांच्या मालमत्तेचा विनियोग झोपडीच्या जागी सध्याचे दगडी बांधकाम असलेले देऊळ बांधण्याच्या कामी त्यांनी केला व देवीला ‘कृष्णाबाई’ असे नाव दिले. त्यानुसार 1709 साली कृष्‍णाकाठी देवीची स्‍थापना झाली.
 

पेशवाईत मूर्तीचे महत्त्व वाढत गेले. नाना फडणीसांनी मूर्तीची महती लक्षात घेऊन देवालयास कायम उत्पन्नाची सनद दिली. औंध संस्थानच्या कारकिर्दीत 1811 मध्ये कृष्णाबाईच्या उत्सवास प्रारंभ झाला. तेव्हापासून उत्सव हनुमान जयंतीपासून चार दिवस सुरू असतो. प्रारंभी औंध संस्थानच्या वतीने उत्सव सुरू झाला. चैत्र वद्य प्रतिपदेपासून वद्य चतुर्थीपर्यंत उत्सव साजरा होत असे. ब्रिटिशांनी संस्थाने खालसा केल्यानंतर, 1892 मध्‍ये श्रध्दाळू नागरिकांनी उत्सव सुरू केला. उत्सव सुरुवातीला कृष्णाघाटावरील नदीच्या पात्रात मांडव घालून होत होता. त्यावेळी अनेकविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत. विठोबा अण्णा दप्तरदार यांची कीर्तने होत. उत्सवात प्रमुख म्हणून भाऊकाका गरुड, नारायणराव पोतनीस, भाऊसाहेब फल्ले, मारुतराव डांगे, नाना कुलकर्णी, बाबुराव गोगटे, पांडुरंग गणेश भाटे, शंकरराव ढवळीकर हे होते.
 

उत्सवाच्या काळात महाप्रसाद देणारे प्रेमराज किसनलाल लाहोटी, गंगाभिशन जयनारायण बद्रिशेठ लाहोटी ही व्यापारी घराणी देवाचा महाप्रसाद करण्यासाठी तेव्हापासून तत्पर आहेत. सर्व समाजधुरिणांनी उत्सवाचा वारसा चालवला आहे. उत्सव चांगल्या प्रमाणात सुरू असताना दुसर्‍या महायुध्दास प्रारंभ झाला. त्यामुळे उत्सवाची अवस्था बंद पडल्यासारखीच झाली होती. अशा कठीण काळामध्ये, 1955साली हा उत्सव उमेदीने सुरू करण्यासाठी गजाभाऊ पेंढारकर, बाबुराव वळवडे, गजाभाऊ कोल्हटकर, पंडितराव आराणके, तमाण्णा विंगकर, विनायकराव व काशिनाथपंत नावडीकर यांनी पुढाकार घेऊन उत्सवाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यातून उत्सवाला आजमितीला दिसणारे विलोभनीय स्वरूप आले.
 

उत्सवकाळात वाळवंटात मोठा मंडप उभारून तेथे उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यासाठी आदल्या दिवशी म्हणजे चैत्र शुक्लपक्ष पंधराला उत्सवमूर्तीची पुजार्‍यांच्या घरून वाजत-गाजत संपूर्ण कराड शहरातून मिरवणूक काढली जाते. कराड शहरातील आबालवृद्ध मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहाने सामील होतात. या उत्सवासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. स्त्रियाही आपल्या घरासमोर सडा, रांगोळी काढून कृष्णाबाईचे स्वागत करतात. दुपारी भजनी मंडळे आपापली भजने सादर करतात. किर्तनाचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी लोकांसाठी प्रबोधनात्मक व्याख्याने किंवा सांस्कृतिक म्हणजे सुगम संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य राम शेवाळकर, ज्येष्ठ साहित्यिक यु.म.पठाण, सदगुरू वामनराव पै इत्यादी मोठ्या लोकांच्या व्याख्यानांचा आस्वाद कराड शहरातील नागरिकांनी घेतलेला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चित्तरंजन कोल्हटकर, आशालता, बाबगावकर, प्रकाश इनामदार, महेश मुतालिक असे मोठे कलाकार येऊन गेले आहेत. संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
 

उत्सवाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उत्सव कमिटीने 1992 साली दहा दिवसांच्या भरगच्च शंभर कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
 

कृष्णबाईची जत्रा उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भरते. त्यावेळी कराड पंचक्रोशीतील देव-देवता वाजत-गाजत कृष्णाबाईच्या भेटीस येतात. विविध ठिकाणचे व्यापारी आपल्या साधनांचे प्रदर्शन भरवतात व त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो. शेवटच्या (चैत्र कृष्ण पक्ष 5) दिवशी कृष्णाबाईची कराड शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. संध्याकाळी येसुबाईची यात्रा साजरी करून उत्सवाची सांगता होते.
 

कृष्णाबाईची ही मूर्ती दशभुजा, सिंहारूढ असून महिषासुराचा वध करताना दाखवली आहे. मूर्तीची मान तिरपी असून ती कृष्णा-प्रवाहाकडे पाहत आहे असे वाटते. म्हणून तिला ‘कृष्णाबाई’ हे नाव मिळाले असावे. देवळाचे 1976 च्या महापुराने बरेच नुकसान झाले. पण त्यामुळे जीर्णोद्धार करताना प्रदक्षिणा मार्ग प्रथमच सापडला! मूर्तीला नवरात्र उत्सवामध्ये विविध रूपांनी सजवतात व त्यावेळी देवीचे रूप सुंदर व तेजस्वी असे दिसते.
 

कृष्णाबाई उत्सव समिती ही नोंदणीकृत धर्मादाय संस्था असून लोकवर्गणीतून निर्माण झालेल्या या संस्थेने कृष्णाबाई उत्सवाखेरीज गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय क्रीडा स्पर्धा आणि इतर सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत. संस्थेने कोटाच्या प्रवेशद्वारी आणि जुन्या मुतालिक वाड्याच्या ठिकाणी अनुक्रमे कृष्णाबाई आणि प्रीतिसंगम अशी दोन भव्य सांस्कृतिक सभागृहे उभी केली आहेत. कराड शहरातील नागरिकांना त्यांच्या घरातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ही सभागृहे अल्पदरात उपलब्ध करून दिली जातात. तुकाराम हरी शिंदे, महादेव विनायक खंडकर, आणि 1985 पासून वसंतराव दामोदर वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज चालू आहे. यशवंतराव चव्हाण, बाबुराव कोतवाल, पृथ्वीराज चव्हाण, प्रेमलाकाकी चव्हाण, विलासराव पाटील-उंडाळकर अशा राजकीय नेत्यांनी दोन्ही सभागृहांना भेट दिली आहे व संस्थेच्या कामाला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
 

चिन्‍मय वराडकर

Last Updated On – 17th May 2016

About Post Author

1 COMMENT

  1. कृष्णादेवी विषयी मनाेरंजक
    कृष्णादेवी विषयी मनाेरंजक आख्यायिका व शिवकालीन संदर्भ आपल्या लेखातून समजले अभिनंदन, थिंक महाराष्ट्र!

Comments are closed.