पिसई गावचे सरपंच वसंत येसरे कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून गावाच्या विकासासाठी क्रियाशील आहेत. त्यांनी पिसई गाव हे सुजलाम सुफलाम व्हावे, यासाठी जलव्यवस्थेची चोख कामे केली आहेत. ते सरकारी योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी तत्पर असतात…
पिसई गावचे सरपंच वसंत येसरे हे ग्रामविकासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी त्यांच्या विकासकामांनी गावावर अशी छाप सोडली, की ते तब्बल पाच वेळा सरपंच म्हणून निवडून आले. ते खरेतर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मुंबईला नोकरीसाठी गेले होते. त्यांची घरची परिस्थिती गरीब. परंतु, त्यांचा मुंबईत काही जम बसला नाही. ते पुन्हा गावात परतले. येसरे यांनी त्यानंतर स्वतःला समाजकार्यात झोकून दिले.
वसंत येसरे ग्रामपंचायत सरपंच म्हणून प्रथम 1990 साली निवडून आले. गावात जेवढी विकास कामे झाली आहेत ती त्यांच्यामुळेच! त्यांच्या प्रयत्नांनी गावातील वझर वाडी आणि बिवळ वाडी या ठिकाणी पहिली नळपाणी योजना 1992 साली अंमलात आणली गेली. त्यांनी पिसई मुख्य रस्ता ते वाकवली रस्त्याला जोडणारा वाडीतून जाणारा रस्ता करून घेतला. तसेच, त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या जीवन प्राधिकरण योजनेतून पुन्हा एकदा संपूर्ण गावासाठी नळपाणी योजना (1997 साली) अंमलात आणली. येसरे यांनी त्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करून ते काम पूर्णत्वास नेले. त्यांनी त्यांच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत गावातील रस्ते, तलाव, पाखाड्या, विहिरी यांची सर्व कामे सुव्यवस्थित केली आहेत. एकंदरीत, ते त्यांच्या कारकिर्दीत पिसई गाव हे सुजलाम सुफलाम व्हावे यासाठी प्रयत्नरत आहेत.
ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 2021 सालीही सरपंच म्हणून निवडून आले. सरपंच येसरे यांनी गावातील आठही वाड्यांमध्ये मुख्य रस्त्यापासून वाडीअंतर्गत जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यांनी बौद्ध वाडीसाठी समाज कल्याण निधीतून चाळीस लाखांचा निधी व गावातील पन्नास शेतकऱ्यांच्या गोठा दुरुस्तीसाठी चाळीस लाखांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला आहे. सरपंच वसंत येसरे पिसई गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार निधी, आमदार निधी, जिल्हा परिषद निधी, तांडावस्ती निधी यांच्या माध्यमातून शासनाच्या निरनिराळ्या योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देत आहेत. ते निसर्गरम्य पिसईचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विकास व्हावा, यासाठी कार्यरत आहेत.
निलेश उजाळ 7045398561 ujal16@gmail.com
———————————————————————————————————————————————-