कोरोना – चीनची मात; भारतास संधी! (Corona- India’s Opportunity)

4
27

कोरोना साथीचा आरंभ चीनमध्ये झाला. तो कसा झाला? केव्हा जाहीर झाला? याबद्दल विवाद आहेत. खरे तर, तो सोशल मीडियावरून भारतात कळला. भारतानेच नव्हे, तर साऱ्या जगाने तो चीनचा स्थानिक प्रश्न म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. तरी ती रस्त्यावर अचानक पडणाऱ्या वुहानमधील माणसांची दृश्ये आठवतात. लॉकडाऊन काळातील या नोंदी प्रकट होण्यास सुरुवात केल्यापासून आठ-दहा वेगवेगळ्या व्यक्तींसंदर्भात लिहिले गेले आहे. त्यात सर्वात जास्त वाचला व चर्चिला गेला, तो लेख होता शांघायमधील अमित वाईकर याच्या अनुभवासंदर्भातील. ‘थिंक महाराष्ट्र’कडे त्या संबंधात मोठा प्रतिसाद आलाच, त्यात काही प्रश्न उपस्थित केले गेले; तशाच विचारणा अमित याच्याकडेही झाल्या. स्वभाविकच, मी व अमित, आम्ही दोघांनी थोडा अधिक वेळ सविस्तर गप्पा फोनवर मारल्या. त्याचे हे प्रकटन.

          वुहान ही हुबे प्रांताची राजधानी आहे. तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव डिसेंबर मध्यानंतर केव्हातरी जाणवला. आरंभी तो न्युमोनियासारखा आजार आहे, म्हणून त्यावर उपचार झाले. परंतु थोड्याच काळात त्याचा संसर्ग होत असल्याचे लक्षात आले. डॉक्टर व नर्स हेच आजारी झाले तेव्हा तशी खात्री पटली आणि साथीच्या आजाराच्या दृष्टीने उपचारांची तयारी सुरू झाली.
बघता बघता, रोगाने गंभीर स्वरूप धारण केले, परंतु काळ ख्रिसमसचा होता,  चिनी नववर्ष लवकरच सुरु होणार होते(जानेवारी अखेर). वुहानमध्ये तीन लाख परदेशी लोक आहेत. त्यामुळे सुट्टीचे वातावरण होते. लोकांचे लांब लांब प्रवासाचे बेत सुरु झाले होते. तरीदेखील चीनमधील आरोग्याधिकाऱ्यांनी संसर्गाचे गांभीर्य ध्यानात घेऊन काही तयारी सुरू केली. तेवढ्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी बीजिंगमध्ये 13 जानेवारीला जाहीरपणे सांगितले, की आजार संसर्गजन्य असला तरी तो व्यक्ति संपर्कातून पसरणारा दिसत नाही. त्यामुळे एकूण तयारी व उपचार यांत थोडा ढिलेपणा राहिलाच. पण रोग्यांची व मृत्यूंची संख्या वाढत राहिली. तेव्हा चीन सरकारने तेथे 23 जानेवारीला लॉकडाऊन जाहीर केला आणि बीजिंग-शांघायसह सर्व शहरांमध्ये 27 जानेवारीला लॉकडाऊन जाहीर झाला. चीनने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सर्व प्रवास बंद केला. प्रवासाचे सर्व दोरच कापले गेले. अवघा चीन देश जवळ जवळ महिना-सव्वा महिना ताळेबंदीखाली होता. सरकारने एकेक शहर व प्रांत खुले करणे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आरंभले. अक्षरशः एकाद्या मोठ्या सभागृहातील प्रकाश एकेक बटन दाबून पसरत जावा तसा चीनचा एकेक प्रदेश उघडा होत गेला. साथ वुहानमध्ये सुरू झाली, तेथेच ती गेल्या आठवड्यात संपली. पण अजूनही अवघ्या देशभर त्या रोग संसर्गाची काळजी सतत घेतली जात आहे. त्यातून एकाही नागरिकाची सुटका नाही. क्युआर कोडने प्रत्येक नागरिकाच्या स्वास्थ्यावर लक्ष ठेवले जाते.
          अमितने उदाहरण देऊनच सांगितले. तो म्हणाला, की मी राहतो ती इमारत सात मजली आहे. शेजारीच जिमखाना आहे. समजा, मी जिमखान्यात गेलो, तर दारावरील पहारेकरी क्युआर कोड पाहतो. तो ‘यलो’ झाला असेल तरी मला तो तेथे प्रवेश देत नाही. मी घरी परतलो, की रिसेप्शनचा माणूस खुलासा करतो, की चौथ्या मजल्यावरील अमुकअमुक व्यक्‍ती संशयित रोगी आहे. त्यामुळे इमारतीमधील सर्व रहिवासी मुलाबाळांसह देखरेखीखाली राहतील. एवढी दक्षता व तत्परता असल्याने रोग आटोक्यात आला आहे.
          चीनची कार्यपद्धतच अशी आहे, की त्यांचे काम शंभर टक्के प्रयत्नांचे असते. तसेच प्रयत्न करोनाविरुद्ध चीनदेशात झाले. त्याउलट युरोपीय देश वा अमेरिका यांचे झाले आहे. त्यांनी हे करू – ते करू असे प्रयत्न चालवले आहेत व त्यात रोगाची साथ भडकत गेली आहे. स्वास्थ्यकारण की अर्थकारण अशीही दुविधा तेथे असते. चीनमध्ये सरकार ही सर्वश्रेष्ठ गोष्ट असते. सरकारचे सर्वांनी ऐकायचे हे गृहीत धरलेले असते.
          चीनबद्दल गैरसमजुती बर्‍याच आहेत आणि त्या त्यांच्या गेल्या साठसत्तर वर्षांच्या इतिहासामधून निर्माण झालेल्या आहेत. अफाट लोकवस्तीचा हा देश अतोनात दारिद्रयाखाली पिचलेला होता. गरिबी, भुकमरी याखेरीज वेगळे काही त्या देशाने गेली कित्येक शतके पाहिलेच नव्हते. तेथील कम्युनिस्ट सरकारने अक्षरश: काही दशकांत ती परिस्थिती बदलली. बरीच जुलुमजबरदस्ती झाली, पण चीनच्या विद्यमान सोयीसुविधा या पाश्चात्य देशांच्या तोडीस तोड, किंबहुना त्यांच्याहून सरस आहेत. तेथील सरकारने सत्तर कोटी जनतेला सत्तर वर्षांत दारिद्र्यरेषेच्या वर, मध्यमवर्गीय जीवनशैलीत आणून ठेवले आहे. त्यामुळे तेथील जनतेला सरकार देवासमान आहे. भारतात जनता जीवनात जे बरेवाईट घडेल ते परमेश्वराची कृपा असे समजते. चीनमधील लोक त्यांच्या जीवनात देवाची जागा सरकारला देतात. त्यामुळे तेथे खरोखर कोणतीही बंधने नाहीत, पण सरकारचे स्थान लोकजीवनात असे अनन्य आहे, की सरकार सांगेल ती पूर्व दिशा असते. तेथे सरकारवर जाहीरपणे टीका करायची नाही एवढे एक बंधन वगळले तर दुसरे कोणतेच बंधन नाही. सरकारला सारे समजते हीच तेथील लोकांची भावना आहे. जगातील कोणत्याही जनसमुदायाला हेवा वाटावा असे सुखी जीवन चीनमधील जनता जगत आहे!
          चिनी लोकांच्या जेवणाखाण्याच्या सवयींतून कोरोना उद्भवला असा एक समज प्रसृत झाला आहे आणि अमित वाईकर अन्नपदार्थ उद्योगातच आहेत. त्यांच्या उद्योगाच्या भारतासहित चार देशांत शाखा आहेत. चीनमधील कार्यालयात जवळजवळ अकराशे लोक काम करतात. ते बहुसंख्य चीनी आहेत. त्यामुळे अमित यांची उठबस चीनी लोकांत बरीच आहे. त्यामुळे अन्नपदार्थांचा विषय निघाला तेव्हा अमित म्हणाला, की चिनी लोकांच्या खाण्याच्या चवी ‘एक्झॉटिक’ आहेत, हे खरंच. पण ती त्यांच्या दारिद्र्यातून उद्भवलेली सवय आहे. सुखस्वास्थ्य आल्यावर उधळमाधळ होते तसा तो प्रकार आहे. तशी उधळमाधळ भारतातील लग्नसमारंभांतूनही दिसते. फक्त तेथे शाकाहारी पदार्थ असतात. चीनमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींत जो अनाचार दिसतो त्या सवयी पूर्वीच्या तेथील अभावातून, दारिद्र्यातून उद्भवल्या आहेत. ‘कोरोना’नंतर त्या सवयी बदलण्याची शक्यता दिसत नाही. भारतात ताट चाटुनपुसून खाण्याची पद्धत आहे. ती चीनी लोकांना अजिबात आवडत नाही. अमित म्हणतो, की “मी दहा वर्षांपूर्वी चीनमध्ये आलो तेव्हाची गंमत आहे. ऑफिसचे एक डिनर होते. यजमान पदार्थांवर पदार्थ मागवत होते, मी खात होतो. माझ्या स्टाफमधील एका मुलगी आली. तिने सांगितले, की तुम्ही प्लेट रिकामी केलीत की कोणीतरी काहीतरी तुम्हाला वाढणार. ताटात काहीतरी ठेवून द्यायचे, टाकायचे अशी येथील पद्धत आहे. तरच तुमचे पोट भरले असे समजून तुम्हाला वाढण्याचे थांबवतील. एकेकाळचा अभाव आणि विद्यमान विपुलता यामधून या सवयी तयार झाल्या आहेत.
          चीनची अर्थव्यवस्था कोरोनानंतर लगेच सावरेल असा विश्वास अमितला वाटतो. कारण तो म्हणाला, की चीन ही जगाची फॅक्टरी आहे. चीन जगातील सर्व देशांना लागेल ती गोष्ट गेली तीन दशके पुरवत आला आहे. चीनने त्यांच्या देशातील दारिद्र्य जसे हटवले तशी जगातील अनेक देशांना विपुलता व विविधता ही दृष्टी दिली. ते सर्व देश चीनच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहेत. चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे. तिला दूर सारून जग पुढे कसे जाऊ शकेल?
          अमित यास भारताच्या, विशेषत: कोरोना काळातील कामगिरीचे कौतुक वाटते. तो म्हणतो, की केंद्र व विविध राज्य सरकारे परिस्थिती खंबीरपणे हाताळत आहेत. महाराष्ट्र सरकार तर तिपेडी असूनदेखील एकसूत्राने चालल्यासारखे भासते. कडक नियमांची कडक अंमलबजावणी हेच कोरोनावर सध्यातरी उत्तर आहे. ते चीनच्या स्वभावात आहे. भारतात ती भूमिका घेतली जात आहे. कोरोनानंतरच्या काळात चीनबद्दलच्या शंका जगभर आणखी उफाळून येतील, तो काळ भारताला अनुकूल असेल; किंबहुना जगभरचे उद्योग व अर्थकारण स्वतःकडे खेचण्याची संधी भारताकडे येत आहे. तिकडे लक्ष ठेवले गेले पाहिजे.
          अमित यांनी त्यांच्या बलाढ्य कंपनीचा जर्मन प्रमुख(सीइओ) आहे, त्याचे एक संभाषण सांगितले. तो म्हणतो, की भारताकडे बुद्धिमत्ता आहे, गुणवत्ता आहे, तरुणवर्गाची मोठी शक्ती आहे, अत्याधुनिक शिक्षण सोयी आहेत आणि मुख्य म्हणजे पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचा इतिहास आहे. या सगळ्यांची बेरीज का होत नाही? तोच पुढे म्हणतो, की अनेक घटक एकत्र करून खिचडी बनवण्यास खानसामाही कुशल असावा लागतो. भारतीय नेतृत्वाची कसोटी या संकटकाळातून बाहेर आल्यावर लागणार आहे!
अमित वाईकर +8613918228393 wa_amit@hotmail.com
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)

—————————————————————————————————————

 

About Post Author

Previous articleकोरोनाला उःशाप आहे! (There is a curse on corona!)
Next articleकोरोना – चीनचे कारस्थान?(Corona – China’s Conspiracy)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here