कोयना धरण – महाराष्ट्राचे वैभव

2
73
-heading-koyana-dharan

कोयना नदीचा उगम महाबळेश्वरजवळ झाला आहे. कोयना धरण दोन दऱ्यांमध्ये जेथे चांगली उंची मिळाली आहे तेथे बांधण्यात आले आहे. त्या धरणाचा मूळ उद्देश वीजनिर्मिती हा आहे. भारतातील वीजनिर्मिती क्षेत्रात त्या वीज केंद्राचा खास उल्लेख होतो, कारण त्या ठिकाणी 1920 मेगॅवॅट वीजनिर्मिती केली जाते. त्या धरणाचा उपयोग शेतीला पाणी पुरवण्यासाठीही होतो. त्या कारणामुळे त्या नदीला महाराष्ट्राची जीवनदायीनी म्हणून ओळखले जाते. धरणाला सहा दरवाजे आहेत.

धरणाचे बांधकाम 1956 साली सुरू झाले आणि ते 1964साली पूर्णत्वास गेले. धरणाची उंची एकशेतीन मीटर असून लांबी आठशेसात मीटर आहे. धरणाची जलधारणक्षमता दोन हजार सातशेसत्याण्णव दशलक्ष घनमीटर एवढी आहे. धरणामुळे जो जलसाठा निर्माण झाला आहे त्याला शिवाजीसागर असे म्हणतात. जलसाठ्याची लांबी पन्नास किलोमीटर आहे.

धरणाने बऱ्याच भूकंपांना तोंड दिले आहे. त्यात 1967 साली झालेला भूकंप सर्वात मोठा होता. त्या भूकंपामुळे धरणाला काही भेगाही पडल्या. त्या नंतर बुजवण्यात आल्या. शिवाय, धरणाच्या अंतर्गत भागात बोअरने छिद्रे पाडून हायड्रोस्टॅटिक प्रेशर कमी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. धरणाच्या बाजूला एक अतिखोल बोअर घेऊन भूकंपाच्या हालचाली मोजण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे संभाव्य भूकंपांची शक्यता तपासता येणार आहे. ते बोअर जवळपास सात किलोमीटर खोलीचे आहेत. भारतीय शास्त्रज्ञांच्या मदतीने ते जागतिक धर्तीचे काम होणार आहे. धरणाचे सशक्तीकरण 1973 व 2006 साली असे दोन वेळा करण्यात आले. त्यामुळे भविष्यात पुन्हा, 1967 साली झालेल्या भूकंपाइतका भूकंप होऊनही त्याचा धरणाला धोका पोचणार नाही अशी अपेक्षा आहे.

भारतातील पन्नास आणि जगातील तीस शास्त्रज्ञ ‘नॅशनल जियोफिजिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून एकत्र भेटले. त्यांनी अस्तित्वात असलेल्या पद्धतींचा वापर करून परिस्थितीचा सविस्तर अभ्यास केला. त्यांनी कोयना धरणाच्या परिसरातील कराड येथे एक सभा घेतली आणि त्या सभेत धरणाच्या आसपास पंधराशे मीटरचे सहा बोअर घेऊन एक ‘पायलट प्रोजेक्ट’ तयार केले. तीन किलोमीटरचे बोअर २०१६ साली घेऊन मिळालेल्या माहितीचा अभ्यास केला. कोयना परिसरात शंभर वर्षांत असा मोठा भूकंप एकदा होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला. असा सतत अभ्यास होत गेला तर भूकंप कधी होऊ शकेल याचा अंदाज घेणे शक्य राहील असेही मत व्यक्त करण्यात आले. 

कोयना धरण हे अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील आश्चर्य समजले जाते. वीज निर्मितीसाठी तेथे 1999 व 2012 साली करण्यात आलेले लेक टॅपिंग हा जगात चर्चेचा विषय बनला होता. आणखी प्रयत्न करून कोयना धरणातून चारशे मेगॅवॅटने वीजनिर्मिती करण्याची योजना आखली जात आहे.

धरणाबाबत एक मोठी समस्या आहे. ती म्हणजे कोयना नदी पूर्ववाहिनी असूनसुद्धा वीजनिर्मितीसाठी पाणी पश्चिम भागाकडे वळवले जाते व वीजनिर्मितीनंतर त्या पाण्याचा योग्य वापर न होता ते अरबी समुद्रात सोडले जाते. हा अपव्यय थांबवण्यासाठी कोणतीही ठोस योजना आखण्यात आलेली नाही.

 (जलसंवाद मे 2019 वरून उद्धृत संपादित-संस्करीत)

About Post Author

2 COMMENTS

  1. कोयना धरणाबाब खूप महत्त्वाची…
    कोयना धरणाबाबत खूप महत्त्वाची माहिती थिंक महाराष्ट्रने दिल्याबद्दल धन्यवाद.

Comments are closed.