‘कोमसाप’चे चेंबूर साहित्य संमेलन

0
33

कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबुर येथे ५ जून रोजी झाले. त्याचा धावता वृत्तांत आणि संमेलनाच्या अध्यक्ष वसुंधरा पेंडसे –नाईक यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे..

‘कोमसाप’चे चेंबूर साहित्य संमेलन

ह. मो. मराठे – कोकण मराठी साहित्यभूषण

‘कोमसाप’चे चेंबूर संमेलन दोन विशेष कारणांनी लक्षात राहील. एकतर या संमेलनात ह. मो. मराठे यांना कोकण साहित्यभूषण हा पुरस्कार देण्यात आला आणि दुसरे म्हणजे अच्युत गोडबोले यांची दिलखुलास मुलाखत संमेलनात झाली. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संमेलनाच्या अध्यक्ष वसुंधरा पेंडसे- नाईक यांनी केलेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा औचित्यपूर्ण उल्लेख. त्यांच्या भाषणात साहित्यकलाविषयक मुद्दे होतेच, परंतु त्यांनी आवर्जून सांगितले, की महाराष्ट्रराज्य स्थापनेला पन्नास वर्षे झाली तरी येथील कोणत्याही क्रमिक पुस्तकात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेखदेखील नाही!

स्वागताध्यतक्षांचे भाषण : जिल्हा अध्यक्ष शैला नार्वेकर, गिरीजा कीर, भास्कर शेट्ये, वसुंधरा पेंडसे-नाईक वगैरेह. मो. मराठे हे रत्नागिरीचे. त्यांच्या ‘बालकांड’ व ‘पोहरा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकांनी त्यांचे कोकणीपण (व ब्राह्मणी अहंकार देखील) ठसठशीतपणे नजरेत भरले. तोपर्यंत ह. मो. म्हणजे ‘निष्पर्ण वृक्षावर भरदुपारी’ व ‘काळेशार पाणी’ या दोन कादंब-या व औद्योगिक संस्कृतीवर त्यांनी लिहिलेल्या कथा असे व्यक्तिमत्त्व नजरेसमोर येई. त्यांच्या सत्कारानिमित्ताने भाषण करताना अशोक बागवे यांनीदेखील त्यांचे हेच गुणविशेष नमूद केले. खुद्द मराठे यांनी उत्तरादाखल भाषणात आपला साहित्यलेखनाचा प्रवास सलगपणे निवेदन केला. आपण लेखक, पत्रकार आहोत हेही त्यांनी आवर्जून नोंदले. ते म्हणाले, सध्याचा काळ असा विकट आहे की त्यावर सरळ लिहिणेच शक्य नाही! त्यामुळे मी सध्या व्यंगलेखन करत आहे व तशी तीन-चार पुस्तके येत्या वर्षभरात प्रसिध्द होतील.

ह. मो. मराठे यांनी गेल्या काही वर्षांत ब्राह्मण संघटन यावर भर दिला आहे. ब्राह्मण विचार विषयक पुस्तके ते एकापाठोपाठ एक प्रसिध्द करत आहेत. या गोष्टीचा त्यांच्या सत्कार समारंभात त्यांच्याकडून व बागवे यांच्याकडून उल्लेख झाला नाही. गंमत म्हणजे नागपूरच्या अखिल भारतीय संमेलनात मराठे यांची प्रकट मुलाखत झाली, तेथेही त्यांच्या या विचारांना छेडले गेले नव्हते.

मराठे यांचा सत्कार मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाला. मराठे यांनी मधुमंगेशांबाबत एक फार वेगळी आठवण सांगितली. ते म्हणाले की माझे पहिले पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मधुमंगेशांनी मॅजेस्टिक प्रकाशनाच्या केशवराव कोठावळ्यांकडे शब्द टाकला होता. आम्हां सगळ्या कोकणातल्या लेखकांना मधुमंगेश हे आमचे साहित्यिक पालकच वाटतात!

अच्युत गोडबोले यांचे नाव मराठी साहित्यविश्वात गेल्या पाच-सात वर्षांत आघाडीवर आले आहे. त्यांनी विज्ञान, अर्थकारण, संगीत अशा विविध विषयांवर भलीभक्कम पुस्तके लिहिली आहेत. ते स्वत: माहिती तंत्रज्ञानातले तज्ज्ञ, त्या विषयावर त्यांची मराठी- इंग्रजी पुस्तके आहेतच. उच्च विद्याविभूषित, जगभर फिरलेला आणि जगभरच्या मोठमोठ्या कंपन्यांत उच्च पदावर कामे केलेला असा हा लेखक; परंतु तो आपली सोलापुरची मूळे व मध्यमवर्ग विसरलेला नाही. त्याचा झपाटा विलक्षण आहे. त्याला सर्व जग जाणून घ्यायचे आहे व ते सर्वसामान्य माणसाला समजावून सांगायचे आहे. हीच त्याची ओढ आहे हे मुलाखतीतून प्रकट होत गेले. गोडबोले मुलाखतीत रंगून गेले होते. त्यांची मुलाखत सरोज जोशी व आनंद सांडू यांनी घेतली.

संमेलनात ‘महानगराची बदलती शैली’ असा उद्बोधक परिसंवाद झाला. त्यामध्ये डॉ. मनोज भाटवडेकर, विजया चौहान, सुहासिनी कीर्तिकर, धनराज वंजारी वगैरेंचा सहभाग होता. त्यानंतर कवीसंमेलन झाले. त्यात अशोक नायगावकर, अशोक बागवे, महेश केळुस्कर यांच्याबरोबर बेचाळीस कवींनी कविता म्हटल्या. यावेळी शंकर वैद्य आवर्जून हजर होते.

प्रतिनिधी

महाराष्ट्रावर केंद्राकडून अन्याय झाल्यावर सर्वसामान्य माणसांनी उत्स्फूर्तपणे जनआंदोलन केले. त्यामध्ये एकशेसहा जणांना हौतात्म्य प्राप्त झाले आणि आपण संयुक्त महाराष्ट्र मिळवला. त्याचे श्रेय अर्थात मराठीप्रेमी जनतेचे व संयुक्त महाराष्ट्र समितीचे! परंतु असा हा संपूर्ण आंदोलनाचा, महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा इतिहास बारावीपर्यंतच्या कुठल्याच अभ्यासक्रमात नाही! आपल्या घरातील मुलांनाच हा इतिहास माहीत नाही. सुवर्ण महोत्सवी वर्षात तरी हा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा.

वाचकाकडून अपेक्षा आहे प्रगल्भतेची!

– वसुंधरा पेंडसे-नाईक

अध्यक्ष वसुंधरा पेंडसे-नाईक संमेलनात दीप प्रज्वलन करत असतानावाचक-लेखक यांचा अविभाज्य संबंध असतो. लेखक वास्तव जगात असूनही वास्तवापलीकडे जाऊन साहित्यनिर्मिती करत असतो. ती स्वान्त सुखाय असेल तर ठीक, पण ती प्रसिध्द केली की तिचा वाचकांशी संबंध जोडला जातो. त्यामुळे वाचकाचा विचार करण्याचे बंधन लेखकावर स्वाभाविकपणे येते. यामुळे लेखकाच्या अमर्याद स्वातंत्र्यावर थोडी मर्यादा जरी आली तरी त्याबदल्यात वाचकांची प्रतिक्रिया, दाद लेखकाला अंगावर मूठभर मांस चढण्यास कारणीभूत होते. तसेच, उलटही होऊ शकते. आज, ही मर्यादा, ही बंधने कमी प्रमाणात आहेत, कारण आजचा वाचक हा प्रौढ, नव्या अनुभवांना सामोरे जाण्यासाठी मानसिक तयारी असलेला आहे. गावकुसाबाहेरील जीवन, भटके-विमुक्त, शेतकरी अशा सर्व स्तरांतून आलेले साहित्य जाणून घेण्यास त्यांतील विभिन्न अनुभवांमुळे वाचक उत्सुक आहे.

नव्या वाचकांचे कुतूहल विस्तारत आहे. केवळ कथा-कादंब-या नव्हे तर त्याला अनुवादित साहित्य, शास्त्रीय विषयांवरील, वेगळ्या क्षेत्रांतील लोकांची (उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते) आत्मचरित्रे, आत्मकथने, चरित्रे साद घालू लागली आहेत. इंटरनेटमुळे जगभरातील माहितीचा खजिना त्याच्यापुढे आदळत आहे. वैचारिक आवाका विस्तारला जात आहे. केवळ जीवनशैली नव्हे तर दुस-याचे अनुभव समजून घेण्याची क्षमता वाढत असल्यामुळे लेखकांना अधिक मोकळेपणाने लिहिता येऊ लागले आहे. मानवी नात्यातील गुंतागुंत, शारीरिक संबंधांतील गुंतागुंत व वाढते ताण-तणाव, शरीरविक्रम करणा-या स्त्री-पुरुषांच्या समस्या, समलिंगी संबंध याबाबत लेखक-लेखिकाही मुक्तपणे लिहू लागले आहेत.

अनुभव वेगळा, अपरिचित, अज्ञात असेल तर तो समजून घेण्याचा प्रयत्न वाचक करताना दिसतात. तो रुचला, रुचत नसला तरी त्यामुळे त्याच्या भावना दुखावल्या जात नाहीत. ज्ञात व्यक्तीविषयी वाचताना तो अधिक संवेदनशील होतो. रामायण-महाभारत या राष्ट्रीय महाकाव्यांतील व्यक्तिरेखांचा एक आकृतिबंध त्याच्या मनामध्ये असतो. त्याबाबत त्याला धक्का सहन करणे जड जाते. म्हणून ज्ञात व्यक्तिरेखा वेगळ्या प्रकारे रंगवायच्या असतील तर त्यामागील संदर्भ स्पष्टपणे मांडावे लागतात. ऐतिहासिक व्यक्तिरेखांबाबत ठोस पुरावे हवेतच; भक्कम पुरावे नसले तर वाचक कल्पनाविलास मान्य करणार नाहीत!

समाजमनाला धक्का देणारे सत्य संशोधकाला गवसले/सापडले तर त्याने ते ठोस पुरावे देऊन मांडायलाच हवे. पुरावे वादातीत असले पाहिजेत. त्याची मांडणी वस्तुनिष्ठ, तटस्थ अशी हवी.

वादातीत पुराव्यांनी सत्य सिध्द झाले तर प्रौढ, सुजाण वाचकांनी संशोधकांच्या पाठीशी उभे राहायला हवे. अशा प्रकारे पुरावे देण्याचे संशोधकाला बंधनकारक, तसेच त्यास पाठिंबा देणे बंधनकारक वाचकाला! असे त्यांचे कर्तव्य असावयास हवे आणि असा अलिखित संकेत हवा.

वाचकांकडे विचारांचे तारतम्य हवे. सर्व आघाड्यांवर आदर्श असणे अवघड. एखाद्या चुकीमुळे, दोषामुळे कार्य विसरले जाणे हे न शोभणारे वर्तन झाले. शेवटी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे ही माणसेच असतात हे जाणले पाहिजे.

साहित्यबाह्य हेतूने भावना भडकावून दबावगट निर्माण करण्याच्या खेळीला बळी न पडणे ही प्रौढत्वाच्या पुढची पायरी आहे. ती म्हणजे प्रगल्भता. ती आज वाचकांकडून अपेक्षित आहे.

महत्त्वाच्या, समाजजीवन ढवळून टाकणा-या घटनांवर लिहिणे, समाजाचे वैचारिक नेतृत्व करणे, निषेधार्ह घटनांचा स्पष्टपणे निषेध करणे या लेखक-लेखिकांकडून वाचकांच्या आणि समाजाच्या अपेक्षा आहेत. साहित्यात संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गिरणी कामगार संप, सहकारी चळवळ, महिलांची जागृती, शेतकरी आत्महत्या, जागतिकीकरण यांचे प्रतिबिंब फार कमी उमटले. भीषण वास्तव (शेतकरी आत्महत्या) साहित्यातून उमटावेच. परंतु त्यातून बाहेर येण्याचा मार्गही साहित्यातून दिसावा. समाजात वास्तवाशी लढून उभे राहणारे नायक-नायिका आहेत. हे आश्वासक, दिलासा देणारे, उमेद वाढवणारे वास्तवही साहित्यातून पुढे यायला हवे.

महाराष्ट्र राज्य निर्मितीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. भाषा ही जीवनव्यापी आहे. साहित्य हा तिचा घटक आहे. भाषेला पाया मानून भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व विकासासाठी, प्रगतीसाठी मान्य केले पाहिजे. सर्व व्यवहार मातृभाषेत, राज्यभाषेत झाले तर सर्वसामान्य माणसाला कळतील. तो सत्तेत सहभागी होईल आणि यालाच खरे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणता येईल. म्हणून प्रत्येक राज्य हे भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वावर चालले पाहिजे.

महाराष्ट्रावर केंद्राकडून अन्याय झाल्यावर सर्वसामान्य माणसांनी उत्स्फूर्तपणे जनआंदोलन केले. त्यामध्ये एकशेसहा जणांना हौतात्म्य प्राप्त झाले आणि आपण संयुक्त महाराष्ट्र मिळवला. त्याचे श्रेय अर्थात मराठीप्रेमी जनतेचे व संयुक्त महाराष्ट्र समितीचे! परंतु असा हा संपूर्ण आंदोलनाचा, महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा इतिहास बारावीपर्यंतच्या कुठल्याच अभ्यासक्रमात नाही! आपल्या घरातील मुलांनाच हा इतिहास माहीत नाही. सुवर्ण महोत्सवी वर्षात तरी हा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा.

मराठी या राज्यभाषेचे आणि मातृभाषेचे महत्त्व नव्या पिढीला (तरूण पिढी) कळत नाही, परंतु आपल्याला कळते. तर आपण मराठीसाठी काय करणार आहोत? काय करू शकतो? याचा विचार केला पाहिजे. कोमसापच्या सहा जिल्ह्यांत शाखा आहेत. मराठी व्यवहारभाषा होण्यासाठी व्यावहारिक शब्दकोश, वाक्यरचना, संवाद यांवर आधारित छोटे अभ्यासक्रम, कार्यक्रम मराठी व अमराठी या दोघांसाठीही राबवण्यात यावेत. अनेक ज्ञानशाखांसाठी मराठी संदर्भ ग्रंथ नाहीत. त्यासाठी इंग्रजीतून मराठीत अनुवाद करण्यासाठी परिभाषा, पर्यायी शब्द निश्चितीनंतर स्वतंत्रपणे मराठीत संदर्भ ग्रंथ लिहिले जावेत. महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत. त्या बोलणा-या मुलांना प्रमाणभाषेकडे वळवणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी बोलीभाषेतील शब्द आणि प्रमाणभाषेतील शब्द यांचे तक्ते असणारी पुस्तके निर्माण केली पाहिजेत. आपण घरात, मुलांशी, बाहेर सर्वांशी मराठीतून बोलणे गरजेचे आहे. मुलांना, इतरांना मराठीतून बोलायला प्रवृत्त करावयास हवे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आपली भाषा टिकली तरच आपले साहित्य टिकेल!

– वसुंधरा पेंडसे-नाईक

About Post Author

Previous articleसेलिब्रेशनच्या नॉव्हेल आयडिया
Next articleभयकारी कल्पनेची कल्पना
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.