‘कोमसाप’चा लोकशाही उठाव

0
79

‘कोमसाप’चा लोकशाही उठाव

साहित्य महामंडळ नमणार?

– दिनकर गांगल

साहित्य आणि नाट्यविश्वात अराजक आहे. कलासिध्दांतांपासून आचरणापर्यंतच्या संकल्पना स्पष्ट व रीतीच्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे अखिल भारतीयपासून स्थानिकपर्यंतच्या संमेलनात व अन्य प्रसंगां-प्रसंगांनी वाद होत असतात,
भांडणे-मारामा-यांपर्यंत घटना घडत आहेत. अशा काळात कोकण मराठी साहित्य परिषद हा प्रादेशिक गट गेली वीस वर्षे वेगवेगळे साहित्यिक उपक्रम निर्वेधपणे राबवत आहे. परिषदेत सर्वत्र उत्साहाचे व आपुलकीचे वातावरण असते. एका बाजूला सत्कार-सन्मानादी उपचार कटाक्षाने (व किंचित स्तोम माजवूनही) पाळले जात असताना, वातावरणात अनौपचारिकता असते. मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या स्निग्ध नेतृत्वाची छाप सर्वत्र असते व तोच एवढ्या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा दुवा आहे हेही जाणवते. पण त्यांच्या पाठोपाठ भास्कर शेट्ये यांच्यासारखा कुशल प्रशासक, अरुण नेरुरकरसारखा स्नेहल संघटक आणि महेश केळुसकर व अशोक बागवे ह्यांच्यासारखे निर्मितीशील कलावंत संघटनेमध्ये सक्षमपणे उभे आहेत हा मोठा दिलासा असतो व त्यामुळे संस्था-संघटनेची विश्वासार्हता वाढते.

कोकण प्रदेश हा महाराष्ट्र साहित्य परिषद मराठवाड्यात, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात प्रादेशिक साहित्य संस्था आहेत. त्यांचे मिळून साहित्य महामंडळ आहे. गोवा, भोपाळ, हैदराबाद अशा काही बृहन्महाराष्ट्रीय समाजाच्या साहित्य संस्थांनाही त्यांची मान्यता आहे. या संस्थात्मक रचनेमधून मराठीतील साहित्य व्यवहार व्हावा ही मूळ कल्पना. जेव्हा शिक्षणाचा प्रसार नव्हता व साहित्य हे पांढरपेशांपुरते क्षेत्र होते, तेव्हापासून ही रचना अस्तित्वात आहे. त्यात कोकण प्रदेश हा महाराष्ट्र साहित्य परिषद ह्या पुणेस्थित संस्थेच्या अखत्यारीत होता. परंतु शिक्षणप्रसार, आर्थिक विकास घडून आला तेव्हा प्रादेशिक आकांक्षा वाढल्या. त्यात रत्नागिरी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मधू मंगेश कर्णिक यांची निवड झाली व ते निमित्त ठरले. त्यानंतरची वीस वर्षांतील जुळणी अशी घडून आली; की ती म्हणजे शिवाजी आणि त्यांचे मावळे यांची जुळवाजुळवच जशी! मधू मंगेशांचा ‘चार्म’ तेवढ्याच जबरदस्त प्रभावाचा ठरला आणि पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कर्ते – गं. ना. जोगळेकर वगैरे औरंगजेबासारखे वागले. त्यांनी साहित्यक्षेत्रातील ‘कोमसाप’चा लोकशाही उठाव जाणला नाही आणि कोकणची वेगळी साहित्यसंस्था होऊ दिली नाही. अर्थात, त्यामुळे मधू मंगेश व त्यांची फौज यांचे बळ वाढतच गेले.

स्वागताअध्यक्षांचे भाषण : जिल्हा अध्यक्ष शैला नार्वेकर, गीरीजा कीर, भास्कर शेट्ये, वसुंधरा पेंडसे -नाईक वगैरे‘कोमसाप’ हा साहित्य क्षेत्रातला असाधारण असा फिनॉमिनन आहे. त्याची दखल साहित्यश्रेष्ठींना घ्यावीच लागेल. त्याचे सूतोवाच चेंबूर येथे झालेल्या ‘कोमसाप’च्या मुंबई जिल्हा साहित्य संमेलनात (शनिवार, 5 जून 2010) झाले. तसे वारे गेल्या वर्षा-दोन वर्षांपासून वाहू लागले आहेत. कोकण प्रदेशाच्या स्वतंत्र अस्तित्वास प्रखर विरोध असणारे गं. ना. जोगळेकर वारले. साहित्य महामंडळाच्या सभा घटनेच्या बांधिलपणामुळे विस्कळीत होऊ लागल्या आणि घटक संस्थांमधील बेबंदपणा वाढला. त्यात कौतिकराव ठाले-पाटील यांच्यासारखा औचित्यभान न सांभाळणारा अध्यक्ष महामंडळावर होता. ही स्थिती पालटली आहे. घटनात्मक नियमाप्रमाणे महामंडळाचे कार्यालय मुंबई साहित्य संघात आले आहे. त्यांनी उषा तांबे या लेखिका असलेल्या, साहित्यशास्त्र जाणणा-या (त्या इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत) आणि स्वभावाने समंजस, समजूतदार असलेल्या
पदाधिका-याकडे महामंडळाचे अध्यक्षपद सुपूर्द केले आहे.

‘कोमसाप’च्या चेंबूर संमेलनात उषा तांबे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी उत्तरादाखल भाषण करताना, आपण घटनेने बांधील असलो तरी साहित्यक्षेत्रातील लोकशाही भावना महामंडळातही व्यक्त होईल अशा प्रयत्नात राहू. महामंडळाच्या घटना-दुरूस्तीचे काम चालूही आहे असे सांगितले.

गेल्या वर्षभरात मला ‘कोमसाप’च्या तीन संमेलनांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली. ती जिल्हा संमेलने होती. अबंरनाथला रामदास फुटाणे अध्यक्ष होते, खेडला डॉ. अनिल अवचट अध्यक्ष होते आणि चेंबूरला वसुंधरा पेंडसे-नाईक. यांच्यापैकी फक्त वसुंधरा पेंडसे-नाईक या मुंबईच्या म्हणजे कोकण प्रांतातल्या. बाकी दोघे – फुटाणे व अवचट – देशावरचे. किंबहुना मधु मंगेश त्या अर्थाने कोकण प्रदेशाची मर्यादा मानत नाहीत असे त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे सांगितले आहे. त्यासाठी आपली संमेलने बेळगाव व गोवा येथेही झाली असा दाखला ते आवर्जून नमूद करतात. त्यामुळे मधू मंगेशांना साहित्य व्यवहार हा भौगोलिक वा इतर बंधनांपेक्षा अधिक मोठा वाटतो हे त्यांनी प्रांजळपणे व्यक्त केले आहे. त्यांचे स्वतःचे साहित्यकला या गोष्टीवर मनस्वी प्रेम आहे, त्यामुळे त्यांच्या सध्याच्या विविध व्यग्रतांमध्येदेखील ते सतत लिहित असतात व त्यांची पुस्तके प्रकाशित होत असतात.

‘कोमसाप’ या संस्थेकडून मराठी साहित्यात मोलाची भर पडावी असे विशेष काही घडून आलेले नाही. ते नवीन युगाबरोबर असल्याची जाणीव त्यांच्या विविध साहित्यसंमेलनांतील जागरूकपणे योजलेल्या आधुनिक विचारांच्या परिसंवादांवरून होते. तथापि संस्था म्हणून ‘कोमसाप’ मराठी साहित्यव्यवहारात कायमस्वरूपी काय भर घालणार याबद्दल कुतूहल आहे. ‘कोमसाप’चे मालगुंड येथील ‘केशवसुत स्मारक’ वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. त्या स्मारकाच्या विस्तारकार्यासाठी राज्य शासनाने एक कोटी रुपये देऊ केले आहेत. त्यामुळे ‘कोमसाप’ची जबाबदारी अधिक वाढली आहे. ते कोणते प्रकल्प हाती घेतात आणि त्यांची अंमलबजावणी कशा प्रकारे करतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे. या जबाबदारीची जाणीव संयोजकांना आहे असे चेंबूरच्या संमेलनातील पदाधिका-यांच्या भाषणांतील वेळोवेळच्या उल्लेखांवरून जाणवून येत होते. ‘कोमसाप’ ला शुभेच्छा!

– दिनकर गांगल

dinkarhgangal@yahoo.co.in

भ्रमणध्वनी : 9867118517

 अधिक लेख : ‘कोमसाप’चे चेंबूर साहित्य संमेलन

About Post Author

Previous articleजागरण
Next articleसंत श्रीकबीर जयंती
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.