कोकणामध्ये कणकवली येथे भरलेल्या सिंचन विकास परिषदेतून गावाच्या परिसरात पूर्वी पाण्याच्या काय व्यवस्था असत ते स्पष्ट झाले. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन हजार पाणवठे होते. काही ठिकाणी बोगदे काढून पलीकडच्या घळीमधील पाणी वळवले गेले होते. त्या सर्व पाण्याच्या व्यवस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. पण त्यांच्या अवशेषांमधून एकंदर भारताच्या विविध भागांत समाजजीवनाची पाण्याच्या संदर्भातील व्यवस्था कशी होती याचे संकेत मिळतात…
कोकणचा प्रदेश भगवान परशुरामांनी लागवडीला आणला. त्या ठिकाणी भारताच्या अन्य प्रदेशांसारखेच ऋतुचक्र होते. कोकणात केवळ हंगामी पाऊस असल्यामुळे तेथे हजारो तलावांची निर्मिती केली गेली. कोकणामध्ये कणकवलीला सिंचन विकासाची परिषद भरली होती. मधु मंगेश कर्णिक यांनी ती भरवण्यात पुढाकार घेतला होता. त्यासाठी फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील साडेतीनशे मंडळी आली होती. त्या परिषदेसाठी येताना हे सांगितले गेले होते, की प्रत्येक प्रतिनिधीने त्याच्या गावाच्या परिसरात पूर्वी पाण्याच्या काय व्यवस्था असत, त्याची माहिती घेऊन यावे. विशेषतः विद्यार्थ्यांना ही माहिती आणण्यास सांगितले होते. त्यातून असे लक्षात आले, की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन हजार पाणवठे होते. काही ठिकाणी पाच पाच किलोमीटर लांबीचे बोगदेसुद्धा काढून पलीकडच्या घळीमधील काही पाणी वळवले गेले होते. त्या सर्व व्यवस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. पण त्या अवशेषांमधून एकंदर भारताच्या विविध भागांत समाजजीवनाची पाण्याच्या संदर्भातील व्यवस्था कशी होती याचे संकेत मिळतात.
कोकणातील बोलीभाषेमध्ये ‘आज माका तो तळ्यार भेटलो’ असे सहजपणे येते. तळे हा शब्द कोकणी भाषेमध्ये इतका प्रचलित कसा झाला? अनेक गावांभोवती चार-चार, आठ-आठ तलाव होते. महाडचे चवदार तळेही त्यातीलच एक. वेगवेगळ्या उपयोगासाठी वेगवेगळे तलाव ! तलाव बांधणारी चितळे मंडळी विंध्यवासिनीची उपासक आहेत. ते मूळचे राहणारे कोकणातील रावतळ्याचे. म्हणजे विंध्यवासिनीजवळसुद्धा मोठे तळे होते.
– माधव चितळे 9823161909
( ‘जलसंवाद’, डिसेंबर 2017 वरून उद्धृत. मूळ शीर्षक – भारताची जलसंस्कृती)
—————————————————————————————————————————————————-