गवळी-धनगर समाज कोकणात सह्याद्री पर्वताच्या मुख्य व उपरांगांवर राहत असून तो खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा व राजापूर या पाच तालुक्यांत विखुरला गेला आहे. त्यांची वाडी अतिलहान म्हणजे पाच ते दहा घरांची असते. एका वाडीवर सत्तर ते ऐंशी लोकसंख्या असते. त्या समाजाच्या एकूण सत्तर वाड्या चिपळूण तालुक्यात 1990 साली होत्या व साडेपाच हजार इतकी लोकसंख्या होती. त्यांचा मुख्य व्यवसाय सह्याद्री पर्वतातून मालाची वाहतूक करणे हा होता. त्यासाठी ते बैल सांभाळत. कालांतराने, सह्याद्री पर्वतात रस्ते झाले, वाहतुकीची आधुनिक साधने आली; त्यामुळे त्या समाजाचा तो व्यवसाय नाहीसा झाला. त्यांनी दुधाचा व्यवसाय स्वीकारला.
तो समाज डोंगरमाथ्यावरच राहणे पसंत करतो. त्यामुळे तो डोंगरपायथ्याशी राहत असलेल्या समाजांना मिळत असलेल्या सोयीसुविधांपासून वंचित राहतो. तो बहुतांश अल्पभूधारक किंवा भूमिहीन आहे. डोंगरमाथ्यावर पाण्याचा व चाऱ्याचा तुटवडा पावसाळ्यानंतर निर्माण होतो. त्यांच्या शोधात तो नदीकिनारी किंवा पाणथळजागी जनावरांसह जाऊन राहतो. पावसाळ्यात पुन्हा मूळ जागी येतो. दूधव्यवसाय कष्टप्रद आहे. गवळी-धनगर पारंपरिक पद्धत सोडत नसल्यामुळे त्यातून त्यांचा चरितार्थ पूर्ण भागत नाही. त्यांना गावात किंवा खोतांकडे (मोठ्या जमीनमालकांकडे) मोलमजुरी करावी लागते. काहीजण पुण्याला जाऊन हॅाटेलांमध्ये नोकरी करतात.
‘श्रमिक सहयोग’चे कार्यकर्ते सर्वेक्षणासाठी करजावडेवाड्यात 1990 साली गेले. ‘श्रमिक’ने करजावडेवाड्यात अनौपचारिक प्राथमिक शाळा 1995-96 मध्ये सुरू केली. ती जिल्हा परिषदेशी जोडलेली नव्हती. शाळा अनेक स्थानिक गोष्टींशी जोडून घेऊन, स्थानिक गरजा डोळ्यांपुढे ठेवून, त्या समाजाची भाषा-संस्कृती यांना जोडून घेऊन चालवली जात असे. संतोष खरात हे शिक्षक होते. ते स्वतः धनगर समाजातील असल्याने त्यांनी प्रथम मुलांना माहीत असलेले धनगरी शब्द घेऊन ते मराठीत कसे लिहावे ते शिकवले. नंतर त्यांना मराठी भाषेच्या प्रवाहात आणले. धनगरवाडा गावापासून तुटलेला असल्याने तेथील लोकांचा गावठाणातील लोकांशी कमी संबंध येतो. त्यामुळे त्या समाजातील मुले तोतरे बोलतात. ती समस्या तेथेही आली. त्यांचे तोतरे बोलणे मुलांशी सतत बोलणे व त्यांना सतत बोलण्यास लावणे हा उपाय केल्यामुळे हळुहळू नाहीसे झाले. तेथील एकही मूल आता तोतरे बोलत नाही. मुले सामान्यपणे मराठी चांगल्या तऱ्हेने वाचतात व बोलतात. मुलांना प्राथिमक इंग्रजी शब्द माहीत आहेत.
मुलांना महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास शिकवताना; इतिहास म्हणजे काय हे समजावून देताना त्या वाडीचा स्थानिक इतिहास शोधून तो आधी मुलांना सांगितला. वाडीचा जसा इतिहास आहे तसाच मग आपल्या राज्याचा व देशाचा इतिहास आहे, हे सांगून मुलांना मुख्य प्रवाहातील इतिहासाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला गेला. अशा प्रयत्नातूनच संतोष खरात यांनी करजावडेवाडीचा इतिहास संकलित केला आहे.
बाबीबाईंचा धाकटा मुलगा रामा (7/1/2018 रोजी) सत्तर वर्षांचा आहे. त्याची तब्येत खणखणीत आहे. तो त्याच्या बायको-सुनांसह गुरे बाळगतो. आईची पुण्याई स्मरतो. त्या भागात जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने एका बाजूने ट्रॅक्टर ये-जा करेल इतपत कच्चा रस्ता आहे, तर वशिष्टी नदीच्या काठावरून पायवाटेच्या मार्गाने उभा डोंगर चढून जावा लागतो. त्या वाटेने गेल्यास प्रथम बावदन्यांची शेते, गुरांचे वाडे व घरे दिसतात. थोड्या अंतरावर ढेबे यांची घरे, वाडे व शेते दिसतात. घरे व वाडे माती व चिऱ्यात पूर्वी बांधली होती. ती नंतर सिमेंट वापरून बांधली गेली आहेत. त्यासाठी त्यांना सरकारी योजनांचा लाभ झाला आहे. वाडीवर वीज पोचली आहे. काही घरांत डिश अँटेना बसवून टीव्हीसंचही बसवले गेले आहेत. प्रत्येक प्रौढ व्यक्तीकडे मोबाईल फोन आहे. मात्र वाडीत शौचालय नाही! रामा ढेबे यांनी सांगितले, की सरकारी योजनेतून लवकरच ते होणार आहे.
तेथे भातशेती घरापुरती पावसाळ्यात केली जाते. दूध व्यवसायात आधुनिकता आणलेली नाही. गुरे वाडीत स्वतंत्र बांधत असले तरी गुरे व माणसे पाण्यासाठी गावाजवळ केलेल्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी एकाच गोठ्यात राहतात. रामा ढेबे दूध सहकारी दूधसोसायटीला घालणे पसंत करतात. त्यांनी उन्हाळ्याच्या काळात लागतो म्हणून गुरांसाठी पन्नास हजार रूपयांचा कडबा विकत घेऊन साठवून ठेवला आहे.
पाणी वाडीत पावसाचे चार महिने सोडल्यास उरलेल्या आठ महिन्यांत माणसांची दैनंदिन गरज पुरेल इतकेच उपलब्ध आहे. मुले व मुलांचे कपडे पाण्याच्या अभावामुळे अस्वच्छ दिसतात. घरे मात्र साफसूफ होती. शेततळ्यांची सरकारी योजना त्या वाडीत अजून पोचलेली नाही.
बाबीबाईने दोन्ही मुलांना माळकरी बनवले आहे. तिने करजावडेवाड्यात दारू येऊ दिली नाही. पण पोफळीतील धनिक लोक वाडीत येऊन रात्रीची दारू पार्टी करतात असे निदर्शनास आले आहे. करजावडेवाडीचे पोफळी गावाशी चांगले संबंध आहेत. ग्रामपंचायतीत वाडीतील प्रतिनिधी निवडून गेलेला नाही, पण वाडीचा ग्रामपंचायतीच्या यंत्रणेशी संपर्क चांगला आहे.
कोकणातील त्या समाजाची भटक्या पद्धतीची जीवनरहाटी संपली आहे. सर्वसाधारणपणे त्या समाजात दारूच्या व्यसनाचे प्रमाण फारच कमी आहे. समाज भविष्यातील अडीअडचणींना तोंड देण्यासाठी, गुरांची चारा-वैरण साठवण्यासाठी पै-अडका राखून ठेवतात. ते शक्य असेल तेथे स्वतःची जमीन खरेदी करून घरे बांधतात. ती सारी वैशिष्ट्ये बाबीबाईच्या करजावडेवाडीत दिसून येतात.
– विद्यालंकार घारपुरे
(‘श्रमिक सहयोग’ संस्थेने गवळी-धनगर समाजाची संकलित केलेली माहिती)
Best.
Best.
माहीती थोडीफार चांगली आहे…
माहीती थोडीफार चांगली आहे.परंतु कौकणी धनगरांचा पारपारीक व्यवसाय हा पशूपालन हाच आहे.त्याच उत्तम उदाहरण शिवकालिन हिरा गवळण.धनगरांची मुले तोतरी बोलत नाहीत.धनगरांची बोलीभाषा वेगळी आहे.परंतु मूळ मराठी भाषेला धरुनच आहे.
Comments are closed.