कोकणातील कातळशिल्पे

2
169
_Katalshilpe_2.jpg

कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कातळशिल्पांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इंग्रजीमध्ये त्याला पेट्रोग्लिफ असा शब्द आहे. कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतली जाते आणि त्यामध्ये कातळशिल्पे कोरली जातात. त्यांना उठाव कमी असतो. पावसाळा संपल्यावर गेले तर शिल्पे खास उठून दिसतात. कारण त्याच्या बाजूला गवत उगवलेले असते. कातळशिल्पांमध्ये मासा, कासव, बेडूक असे विविध प्राणी व पक्षी यांच्या आकृती दिसतात. काही भौमितिक रचना दिसतात. वीजवाहक मनोरे आणि त्यांच्या तारा जशा दिसतील तशी काही रचना तेथे भासते. कणकवलीजवळ हिवाळ्याचा सडा, निवळी फाट्याजवळ गावडेवाडी, तसेच ऐन निवळी फाटा, भू, भालावल, देवीहसोळ, वेळणेश्वर या ठिकाणी कातळशिल्पे खोदलेली दिसतात. परंतु कोकणात अनेक ठिकाणी त्यांचा आढळ आहे. कातळशिल्पांचे प्रयोजन काय होते? ती कोणी आणि का खोदली? हे अजून न उलगडलेले कोडे आहे. कातळशिल्पांच्या जवळ अंदाजे दोनशे मीटर इतक्या त्रिज्येमध्ये खोल दगडी विहीर आढळते. हा नियम नव्हे, परंतु तशी ती बऱ्याच ठिकाणी आढळते. ही शिल्पे खोदणाऱ्या लोकांसाठी ती सोय केली असावी.

आदिमानवाने विविध शिल्पे कोरून ठेवलेली आहेत. ती कसली चित्रे आहेत, त्यातून काय प्रतीत होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे हे गूढ तर आहेच; शिवाय, ते एक मोठे नवलसुद्धा आहे. पेट्रोग्लिफ हा शब्द मूळ ग्रीक शब्दावरून आलेला आहे. ग्रीक भाषेत ‘पेट्रो’ म्हणजे खडक आणि ‘ग्लिफ’ म्हणजे कोरीव काम. खडकावर केलेले कोरीव काम म्हणून ‘पेट्रोग्लिफ’. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर तशा प्रकारचे कोरीव काम केलेले सर्वत्र आढळते. परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे खास करून कोकणातच पाहण्यास मिळतात. ह्या खोदचित्रांचे स्वरूप, त्यांचा आढळ, आणि त्यांच्यासंबंधी स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या विविध दंतकथा…

रत्नागिरीचे उत्साही संशोधक सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी चिकाटीने त्या खोदचित्रांचा अभ्यास केला आहे. त्यांची एक सूची तयार केली आहे. त्यांच्यामध्ये आढळणारे साम्य आणि विविधता यांचीसुद्धा बारकाईने नोंद केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्या विषयात लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि स्थानिक लोकांनासुद्धा त्या शोधकार्यात सामावून घेतले. रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत जवळजवळ दोनशेऐंशीपेक्षा जास्त खोदचित्रे सापडली आहेत. त्यांच्या सोबतच काही देवता, जसे की गोपद्म आणि लज्जागौरी यांचे केलेले अंकन हे आश्चर्यचकित करते.

प्राण्यांचे आकार हे जिवंत प्राण्याच्या आकाराएवढे खोदलेले दिसतात. काही ठिकाणी हत्ती आणि वाघ यांचे केलेले अंकन अचंबित करते. त्याचा अर्थ ज्या काळात ही चित्रे खोदली गेली त्याकाळात त्या परिसरात हत्ती आणि वाघ हे असणार! मगर, कासव आणि मासे यांची चित्रेसुद्धा आढळतात. स्थानिक लोकांच्या समजुतीनुसार ती खोदचित्रे पांडवांनी वनवासात असताना खोदलेली आहेत. किंवा ती चित्रे तत्कालीन शेतकरी व मेंढपाळ यांनी त्यांच्या पशुधनाच्या रक्षणासाठी खोदली असावीत.

सर्व खोदचित्रांमध्ये मानवी चित्रांचे अंकन हे तुलनेने जास्त आहे. काही ठिकाणी माणसाचा आकार असून हात हे शरीराला चिकटलेले आहेत. डोके मात्र काहीसे उंच आणि निमुळते दिसते. तो कोणी परग्रहावरील मानव असावा असा सहज भास व्हावा इतके ते चित्र हुबेहूब खोदलेले आहे. काही ठिकाणी योगक्रियेमध्ये असलेल्या षट्चक्रांचे सांकेतिक अंकन केले असावे असे वाटते. तेथे मानवाचा देह फक्त डोक्यापासून कंबरेपर्यंत दाखवला आहे आणि त्यात सहा चक्रे खोदलेली दिसतात. अर्थात तो सगळा समजुतीचा भाग आहे व ते चित्र पाहून केलेला तो केवळ अंदाज आहे.

गावडेवाडी आणि निवळीफाटा येथे भौमितिक रचना खोदलेल्या दिसतात. तशा रचनांना चारही बाजूंनी आधी चौकट खोदलेली आहे. त्या चौकटींच्या आतमधे विविध भौमितिक आकार आहेत. त्यांचे प्रयोजन अनाकलनीय आहे. विद्युत मंडळाच्या तारा जशा गावोगावी आढळतात तशा प्रकारचे नक्षीकाम त्या ठिकाणी केलेले दिसते. चौकोन, त्रिकोण, उभ्या आणि आडव्या समांतर रेषा, सापाची नक्षी अशा प्रकारचे विविध आकार त्या एकाच चौकटीत खोदलेले आढळतात.

सर्व कातळशिल्पांमध्ये अत्यंत देखणे शिल्प हे राजापूरजवळ बारसू गावी असलेल्या तारव्याचा सडा येथे पाहण्यास मिळते. राजापूरपासून देवाचे गोठणेला जाऊ लागले, की दहा किलोमीटरवर बारसू/बारसव गाव लागते. तेथून डावीकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याने अंदाजे दीड किलोमीटर गेले, की अंदाजे पन्नास फूट लांब आणि वीस फूट रुंद अशी काळ्या खडकावर खोदचित्र चौकट दिसते. तेथे खडकात दोन वाघ एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यांच्या मध्येच एक मानवी आकृती त्या दोन वाघांना थोपवून धरत आहे असे चित्र खोदलेले आहे. पण खरे आश्चर्य पुढेच आहे. तेच चित्र जर विरुद्ध बाजूने समोर जाऊन पाहिले तर एक मोठे गलबत समुद्रातून चाललेले दिसते. त्याला शिडे आहेत आणि खाली पाण्याच्या लाटा हलत आहेत, पाण्यात विविध मासे पोहत आहेत असे सर्व दाखवले आहे. दोन वाघांच्या मध्ये जी मानवी आकृती कोरलेली दिसते तिच्या छातीवर लज्जागौरीचे चिन्ह अगदी ठसठशीतपणे जाणवते. ते धार्मिक विधीचे शिल्पांकन असेल का? किंवा ते ठिकाण कोठल्या देवतेचे स्थान असेल का? सगळा तर्काचा भाग, परंतु इतके सुंदर, इतके अद्भुत आणि आखीवरेखीव चित्र पाहून प्रेक्षक थक्क होतो. तसेच एक चित्र गणपतीपुळ्याला जाणाऱ्या निवळी फाट्यावर होते. परंतु रस्तारुंदीकरणात ते निम्म्याहून अधिक संपले आहे! तो अगदी दुर्मीळ असा ठेवा आहे.

मराठे यांनी स्थानिक आमदारांच्या मार्फत विधिमंडळात सुद्धा तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. राज्य सरकारकडून अशा कातळशिल्पांसाठी काही निधी राखून ठेवला गेला आहे. ते दोघे खेड्यापाड्यांत जाऊन शाळांमध्ये मुलांना व्याख्यान देतात आणि त्यांच्या त्यांच्या परिसरात तसा काही ठेवा असल्यास तो शोधण्यास सांगतात. आश्चर्य म्हणजे गुहागर तालुक्यातील शाळेच्या पटांगणातच तसे कातळशिल्प आढळून आले!

राजापूर-आडिवरे रस्त्यावर सोलगाव फाटा आहे. तेथून आत दहा किलोमीटरवर देवाचे गोठणे नावाचे गाव आहे. त्या गावी भार्गवरामाचे सुरेख मंदिर आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी ते गाव ब्रह्मेंद्रस्वामींना आंदण दिले होते. त्या गावात असलेल्या भार्गवराम मंदिरात एक सुंदर पोर्तुगीज घंटा टांगलेली आहे. मंदिराच्या समोर एक पायवाट डोंगरावर जाते. डोंगरावर गेले, की काही अंतर उजवीकडे चालून गेल्यावर एक आश्चर्य सामोरे येते. तेही कातळशिल्पच आहे. तेथे एक मानवी आकृती कोरलेली आहे. पण आश्चर्य असे, की त्या मानवी आकृतीच्या पोटावर जर होकायंत्र ठेवले तर ते चुकीची दिशा दाखवते! त्या आकृतीमध्ये काही चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि होकायंत्र चुकीची दिशा दाखवते. तो चौकोन अंदाजे वीस चौरस फूट लांबीरुंदीचा आहे. तेथे कोठेही होकायंत्र नेले तरीसुद्धा दिशा चुकीची दिसते. कातळशिल्प खोदताना त्या मंडळींना याची माहिती होती हे तर नक्कीच. मग त्याच ठिकाणी असे का खोदले गेले असेल? वर्तमानकाळात प्रसिद्ध असलेली चुंबकीय चिकित्सा त्याकाळी ज्ञात होती का ? त्यासाठीच झोपलेल्या मानवाची ही आकृती आणि तेथे होकायंत्राची गडबड यांचा काही संबंध असेल का? मुळात त्या काळी होकायंत्रे होती का? हे सगळे प्रश्न येथे प्रेक्षकाला भंडावून सोडतात. परंतु त्या खोदचित्रामागे काहीना काही संकेत नक्की आहेत. त्या कातळशिल्पाच्या जवळ विहीर नाही, मात्र पाण्याचे छोटे कुंड आहे. संशोधकांना तेथे मोठे भुयार सापडले आहे. बाहेरून तरी ते खूप खोलवर गेलेले दिसते. त्याचा शोध घेण्याचे काम तेथे पावसाळ्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने हाती घेण्यात येणार आहे.

दुसरे एक सुंदर कातळशिल्प आहे देवीहसोळ या गावी. राजापूरच्या पुढे असलेल्या ‘भू’ या एकाक्षरी नाव असलेल्या गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर देवीहसोळ हे गाव येते. तेथे आर्यादुर्गा देवीचे सुंदर मंदिर आहे. कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबांची ती कुलदेवता आहे. त्या मंदिराच्या अलिकडे व मंदिराला लागून रस्त्याच्या डाव्या हाताला अंदाजे पंधरा चौरस फुटांची चौकट आखलेली दिसते. त्या चौकटीला चारही बाजूंनी साखळ्या लावून संरक्षित केलेले आहे. चौकटीच्या आत सुरुवातीला सर्पाकार आकृती आहेत. चौकटीचे चार भाग केलेले दिसतात. त्या चार भागांमध्ये विविध आकृती कोरलेल्या आहेत. त्यांतील काही समजतात, काही अनाकलनीय आहेत. चौकटीच्या मध्यभागी गोल खोलगट खड्डा आहे. त्यात पाणी साठलेले असते. देवीहसोळच्या जवळ भालावली नावाचे गाव आहे. त्या गावात नवदुर्गेचे मंदिर आहे. देवीहसोळच्या आर्यादुर्गेचा उत्सव मार्गशीर्ष वद्य अष्टमीला असतो. त्यावेळी भालावलीहून नवदुर्गेची पालखी त्या देवीच्या भेटीला येते. त्या दोन गावच्या दोन देवींची भेट त्यावेळी कातळशिल्पावर होते, हे एक नवल म्हणायला हवे! त्या भेटीच्या वेळी कातळशिल्पाच्या मधोमध असलेल्या खोलगट भागात फुरसे नावाचा विषारी साप येतो आणि तो तेथेच दिवसभर बसून असतो असे स्थानिक सांगतात. त्या कातळशिल्पापासून देवीच्या मंदिरापर्यंत शंभर मीटर अंतर आहे. तेथे सर्वत्र विविध कातळशिल्पे खोदलेली दिसतात. त्यामध्ये हत्ती, मासा यांसारखे प्राणी प्रामुख्याने आढळतात. काही कातळशिल्पे कोरताना अर्धवट सोडलेली आहेत; मात्र बरीचशी सुस्पष्ट अशी खोदलेली आहेत.

त्या कातळशिल्पांपासून जेमतेम दोनशे मीटर अंतरावर कातळात खोदलेली मोठी विहीर बघण्यासारखी आहे. अंदाजे चाळीस फूट खोल विहिरीला उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या खोदलेल्या आहेत. कातळशिल्पाशेजारी विहीर हे सूत्र तेथे तरी पाहण्यास मिळते.

आशुतोष बापट ८६०५०१८०२०

सुधीर रिसबूड ९४२२३७२०२०

Last Updated On 20th July 2017

About Post Author

2 COMMENTS

  1. छान लेख. थोडे अजून फोटो असते…
    छान लेख. थोडे अजून फोटो असते तर अजून इंटरेस्टिंग झाला असता.

  2. खुप छान माहीती मिळाली .
    अशिच…

    खुप छान माहीती मिळाली .

    अशिच एक विहीर कशेळी ते गावखडी मार्गावर सड्यावर डाव्या बाजुला आहे .त्याला खामतळे असे देखील म्हणतात .
    त्याच्या आजु बाजुला असे कातळ शिल्प असु शक्ते का

Comments are closed.